"रित्या ओंजळीत माझ्या"
- प्रा. पैलवान
"नव्या उत्तर आधुनिक स्त्रीवादाचा नवा आवाज!"
प्रा. पैलवान यांना विविध पुरस्कार आणि सत्कार झालेले आहेत. विविध संस्थांच्या संयोजक - नेतृत्व आणि दि लीडरशिप ऑफ सोशलिजमकरिता खंबीर नेतृत्व राहिलेल्या आहेत. त्यांचा "तुझी माझी मैत्रवेल" हा दीर्घ काव्यसंग्र प्रकाशित झालेला आहे. तासगाव तालुका महिला दक्षता समिती सदस्य म्हणून त्यांची निवड आहे. हा सगळं सामाजिक - साहित्यिक व्यवहार सुरू असताना त्यांनी जो संवेदनशीलतेचा दर्शनी भाग आपल्या साहित्यामध्ये समाजाचे बदलते शास्त्र म्हणून ठेवताना पारदर्शक पद्धतीने ठेवलेला आहे. ही त्यांची वेगळी भूमिका साहित्यात - साहित्य व्यवहारात आणि सामाजिक नीती मूल्यांच्या संकल्पना रुजवण्यामध्ये अत्यंत मोलाची ठरणार आहे. म्हणून त्यांची अभिव्यक्ती ही केवळ एका व्यक्तीपूरती न राहता ती सामाजिक होते. तिचे संदर्भ हे वैश्विक जीवन जाणिवेला ग्रासत आधार देतात.
अभिव्यक्ती ही मानवी मनाची नितांत गरज असण्याच्या काळामध्ये पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये एका स्त्रीने पुरुषप्रधान संस्कृतीवरच प्रश्न निर्माण करावे, त्याची उत्तरे शोधत राहावी, जगण्या मरण्याची भ्रांत बाजूला सोडून जीवनतत्वाची कास धरावी अशा प्रकारचा आशय "रित्या ओंजळीत माझ्या" या काव्यसंग्रहातून प्रकटीत होतो. पुरुषप्रधान व्यवस्था आणि त्या व्यवस्थेमुळे स्त्रियांचे होणारे शोषण, तिच्या गुलामगिरीच्या जाणिवा आणि मग त्यातून सुटण्याची यथावकाश कृती, अभिव्यक्ती, विचार, संकल्पना प्रस्तुत कवितेमध्ये पाहायला मिळते. यामुळे कवितेत कुठे कुठे संवेदनांची ओथंबलेली भावनिक अवस्था दीर्घ पल्ला गाठलेली आपल्याला दिसून येते.
आशा निराशांच्या आंदोलनाची मानसिक प्रतवारी सुद्धा या कवितेच्या प्रत्येक शब्दातून तपासता येते. त्याचे मूल्य समाजिकतेतून तपासणी करून घेता येते. मनाची ठोकदार, संवेदनशील, लवचिक, विवेक आदी भूमिका त्या मांडतात. नात्यागोत्यातील स्तर मांडत जाणारी आणि जगण्याचे तत्व जे आहे ते निखळपणे जगणारी भूमिका प्रा. पैलवान यांनी आपल्या जगण्यातून आणि लिखाणातून अगदी सकसपणे मांडली आहे. विविध भावभावनांनी हा संग्रह खेळत राहतो. कधी आपल्याला दुःखाची जाणीव करून देतो. कधी सुखाची जाणीव करून देतो. कधी या कवितासंग्रहातून संवेदनशीलतेमुळे माणसाचं आणि ऐकूनच सामाजिक व्यवहाराचं भावनिक आंदोलन उभं करण्याचा प्रयत्नसुद्धा या संहितेमधून निर्माण होताना दिसतो. कारण की, "भावनेला कृतीची जोड आणि कृतीला अभिव्यक्तीची जोड असल्याशिवाय सामाजिक बदलाची संकल्पना क्रांती धरत नाही!" अशा प्रकारे सामाजिक क्रांती करणाऱ्या या पैलवान यांच्या अभिव्यक्तीची माध्यम जशी काव्य स्वरूपात आहे तशी ती गद्य आहेत. कवितेतील गद्य आणि गद्यातील ही कविता अशा प्रकारचा समीक्षेचा एक वेगळा दृष्टिकोनसुद्धा अभिव्यक्ती मध्ये प्रा. पैलवान यांनी ठेवलेला आहे.
"अशीच असते का आई?" या कवितेमध्ये त्यांनी स्त्रीबद्दल म्हणजेच आईबद्दल या दोन्ही कोटी उकलल्या आहे. स्त्रीचे सावरणं, बहरणं, वाहनं, फुलनं, जळत राहणं, तिचे गंभीरपणे खंबीर असणे या स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचे दर्शन आणि स्त्री भ्रूणहत्याचिंतन, संवेदन, दुःखावेग आणि उपयुक्त जीवनचर्या या सगळ्यांची गोळा बेरीज या कवितेमध्ये दिसते.
"तव्यावर टाकलेली भाकरी
फिरवेल तशी फिरते"
'स्त्री' कवितेमध्ये प्रा. पैलवान- परंपरा आणि दर्शनीकता आणि स्त्रीच्या जगण्याचं पुरुषी हुकूमाचे तत्व या प्रस्तुत कवितेतून दर्शवितात. स्त्री जे जिने आतापर्यंतची जगली आहे. तिच्या जगण्याच्या मूलभूत पद्धती ह्या का? कुणामुळे? कशामुळे निर्माण झाल्यात?तर या पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे निर्माण झाल्या आहेत अशी न सांगता सांगणारी भूमिकासुद्धा या कवितेतून येथे अभ्यासाला मिळते.
"आई" या कवितेत सुद्धा आईची महती सांगताना-
"माया ममता प्रेमाचा अखंड वाहता झरा"
अशा प्रकारचे विधान म्हणजे स्त्रीचे स्त्रीत्व स्त्रीने कसे असावे? कसे असायला पाहिजेत? हा देखील एक संदर्भ पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये पखरलेला असतो. आणि तोच पुरुषवाच इथे या कवितेमध्ये दर्शवला गेला आहे. आईचं निर्व्याज जगणं एक स्त्री मांडते. तेव्हा स्त्रीचे हे वैश्विक नाते स्त्री उल्लेखित करत राहते. 'माझी माय' या कवितेत-
"पदराखाली मला घेतलं
माझ्या मायने माझ्यासाठी
विस्तवावर चालणं केलं"
हे जे पदराखाली घेणं आणि वैश्विक मानवतेचा विचार अंगीकारणे मातृसत्ताक व्यवस्थेत संरक्षण म्हणून होते. कवितेतून सांगणे म्हणजे मूळ गर्भात जाऊन पुरुषसत्ताक संकेत फोडून स्त्रीत्वाची जाणीव सांगणारे आणि ते सामाजिक उन्नतसुद्धा आहे. सामाजिक आशयाची कविता येते 'कर्जमाफी' यामध्ये सामाजिक व आशय आहे. ज्यामध्ये-
"झालं का सगळं कर्ज माफ?
ते लगेच उत्तरले,
तर कुठे काय नक्की होणार?
कुठल्यातरी बँकेचे पासबुक
त्यांच्या खिशातून डोके वर काढत होते"
या सामाजिक जाणीवेची आणि तत्वचिंतनाची लेणी प्रस्तुत कवितेमध्ये कोरलेली आहे.
"वाळूचे घर" या कवितेमध्ये अगदी शून्य भूमिकेत जाऊन मानसिक संवेदनसत्व मांडण्याचा आणि ते कोरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. 'कैऱ्या', 'अंगणातला मोगरा', 'तुळस' ही सगळी संबोधने नवता आणि परंपरेचा व्यवच्छेदक लक्षणाचा व्यवहार सांगतात. 'ओंजळ' या कवितेतून अलंकाराची झालर छंदात्मक रूपाने टाकून नकारात्मक भावनेतून सकारात्मक भावनेकडील प्रेरणादायी प्रवास कवितेतून मांडला आहे. 'अवघड आहे मरण' या कवितेतील-
"बछड्या जिवांना दे लढण्याचे सामर्थ्य"
आणि
"सांग त्यांना जिवंत असेपर्यंत"
या दोन विधानांची सांगता म्हणजे माणुसकी व जिवंतपणाच्या जाणिवा आणि मरण हा तात्विक लढा या कवितेतून सांगितलेला आहे. 'समीक्षा' कवितेत सज्ञासंकल्पनांचा मानसिकतेवरील वापर कसा होत जातो? साहित्य समाज व्यवहार कसा चालतो? याची संवेदनशील भूमिका प्रस्तुत कवितेमध्ये घेतलेली आहे. केवळ लेखनापुरते हे तत्व व्यक्त होत नाही तर सामाजिक मनाचे आशयात्मक व्यंग - अर्थ - लक्षण या आशयातून दिसून येतो. 'लढ' कवितेतसुद्धा धीरगंभीर मनाची प्रेरक अवस्था आली आहे. त्याची अभिव्यक्ती म्हणजेच व्यक्तीकडून सामाजिक कडे येणारा आलेख या ठिकाणी येतो.
"आता कोसळत नाही मी"
"माझे आयुष्य आता खूप बळकट झाले"
अशा प्रकारचा आशय म्हणजे स्त्रीचे खंबीर होणे. स्वतःचं आयुष्य जगत राहणे. हा मूल मातृसत्तेचा भाग या ठिकाणी येतो. 'दुःखाची होडी' या कवितेमध्ये
गाव रडणं आणि दुःखाचे गाव समूहमनाचे चिंतन होत राहते. म्हणजे लेखिका स्वतःच्या व्यक्तीत्वाची आवड जपत सामाजिक भान सुद्धा राहते. आईची माया आणि जाणीव ही काळजाची दीर्घ अध्ययनसूक्त कवीने खूप मार्मिक पद्धतीने केलेले आहे. त्यामुळे ती कविता मूल्यमौलिक आशय घेऊन येते.
भौगोलिक संदर्भ देतांना इचलकरंजीचा जो जीवन व्यवहार आहे तो इथे येतोय. वाफाळत्या चहाच्या आणि पोह्याचा नाश्ता किस्से 'फिरसे कहो' या कवितेमध्ये येतात. 'आणि पुन्हा तशीच' या त्यांच्या कवितेमध्ये-
"शिकार होणार पुन्हा कुण्या नराधमाची
कधी माझ्या चेहऱ्यावर
ऍसिड फेकले जाणार
मग भर चौकात पेट्रोल ओतून जाळले जाणार
माझे अस्तित्व?
समाजवास्तवाच्या संदर्भात हे दृश्यआशय येतातच पण ते संवेदनशीलता घेऊन येतात. जपून आणतात सामाजिक निधी तत्वांचे संकेत. सत्व, सत्य, सदाचार, प्रेम, आपुलकी बाळगणारी ही लेखन कडूसत्ये साहित्य व्यवहारात या कवितेने आणले आहेत.
'बाभळ' नावाच्या कवितेमध्ये पुरुषसत्ताक व्यवस्थेलाच प्रश्न केला आहे.
"कोरी करकरीत बाभळ
बाभळीला वाढायला
ना खत लाग ते ना पाणी
ना कुठलं रसायन"
असा प्रश्न करून पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या विश्लेषण करण्याच्या पद्धतीमध्ये समाजात वावरणाऱ्या स्त्रीची मानसिकता आणि व्यवस्थेला प्रश्न करण्याची भूमिका प्रस्तुत कवितेमध्ये आणली आहे.
"कुणाच्या चुलीमधलं सरपंच होते ती"
तिचं धगधगणं स्त्री मांडते आणि हा काळ महत्त्वाचा आहे. तो काळ इथे व्यक्त होताना दिसतो. "काळ व्यक्त होतो. केवळ जाणिवा असायला हव्यात!" आणि ह्या जाणिवा प्रा. पैलवान यांच्याकडे आहेत. त्या मार्मिक पद्धतीने आपल्या कवितेमध्ये ओसंडून ठेवल्या आहेत. जे जे त्यांना आयुष्य अनुभव आले त्यांचे पडसाद 'आयुष्य' कवितेमध्ये ठेवले आहे. ओसरती दुखरी जाणीव यातून स्पष्ट होते. परंतु सहवास जिथे तिथे वियोग अटळ हे विसरल्यामुळेच 'झेलताना आयुष्य' हे व्यक्त होण्याचं माध्यम प्रा. पैलवान घेतात. 'सुखाचा गर्भ' ही गझलसंदृष्य रचना छंद अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या धाटणीने कवितेमध्ये आणली आहे. 'अर्थ गर्भ' नावाच्या कवितेत रितेपणाची जाणीव भरून उरल्या रितेपणाची आशा येथे पल्लवीत होताना दिसते. निसटत्या आठवणींची प्रेरक वास्तव भूमिका घेताना प्रा. पैलवान-
"वाहिली होती श्रद्धांजली
माझ्या निघून गेलेल्या आयुष्याला
आणि दुसरे म्हणजे
"राहिले नव्हते पूर्वीसारखी आता"
ही खंबीर भूमिका स्त्रीने मांडणे ही काळाची गरज असताना अत्यंत वेगळ्या धाटणीने हे सत्य मांडते आहे. सांगते आहे. समाज - साहित्य व्यवहारांमध्ये घुसळन करते आहे. यामुळे प्रा. पैलवान यांची "रित्या ओंजळीत माझ्या" या कवितेची धाटणी आणि बाभळी ज्याप्रमाणे खतपाणी मिळाले नाही तरी जगत राहतात असे सांगण्याची भूमिका नव्या उत्तर आधुनिक स्त्रीवादाला आधाराचे तोंड देणारी आहे.
-संशोधक-
विश्वनाथ अर्जुन साठे ( 9921056462 )
sathe7869@gmail.com
ब्लॉग नाव - VISHWANATH SATHE

Comments
Post a Comment