"महाराष्ट्राच्या काळजाचं रक्त ओरबडणारी धमनी - समृद्धी महामार्ग!" - विश्वनाथ साठे सहज एक प्रश्न काळजाला चाटतो आहे. ही समृद्धी नेमकी कुणाची? रस्ते की शोषणाचे राजरोस महामार्ग जाळे? विदर्भ हा नैसर्गिक खनिजांचा साठा असलेला प्रदेश म्हणजे चलनवलनाची खाणच. सर्व कच्च्यापक्क्या भौतिक - मानवी - प्राणी - पशु (नैसर्गिक) मालमत्तेचा लूटप्रवाह यापूर्वीही आणि आता तर सहापदरी महामार्गाने राजरोस होतो आहे. महाराष्ट्रात अशी आडवी रेष का ओढली भांडवलशाही वर्गव्यवस्थेने? वास्तविक पाहता ९७ टक्के इतकी खनिजसंपत्ती विदर्भात असून उर्वरित ३ टक्के कोकणकडे आहे. या संपत्तीत कोळसा, डोलोमाईट क्रोमाइट, बेराईट, कायनाईट व सिलीमनाईट बॉक्साईट, चुनखडी, मॅगनीज, लोहखनिज आदींचा समावेश आहे. भारतीय खनिज संपत्ती सर्वेक्षणानुसार ६ हजार ९५६ दशलक्ष टन खनिजांचे साठे विदर्भात आहेत. पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात हे मोठे साठे आहेत. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त १२.३३% क्षेत्रफळात खनिजसंपत्ती सापडते. तस...