"महाराष्ट्राच्या काळजाचं रक्त ओरबडणारी धमनी - समृद्धी महामार्ग!" - विश्वनाथ साठे
सहज एक प्रश्न काळजाला चाटतो आहे. ही समृद्धी नेमकी कुणाची? रस्ते की शोषणाचे राजरोस महामार्ग जाळे? विदर्भ हा नैसर्गिक खनिजांचा साठा असलेला प्रदेश म्हणजे चलनवलनाची खाणच. सर्व कच्च्यापक्क्या भौतिक - मानवी - प्राणी - पशु (नैसर्गिक) मालमत्तेचा लूटप्रवाह यापूर्वीही आणि आता तर सहापदरी महामार्गाने राजरोस होतो आहे.
महाराष्ट्रात अशी आडवी रेष का ओढली भांडवलशाही वर्गव्यवस्थेने? वास्तविक पाहता ९७ टक्के इतकी खनिजसंपत्ती विदर्भात असून उर्वरित ३ टक्के कोकणकडे आहे. या संपत्तीत कोळसा, डोलोमाईट क्रोमाइट, बेराईट, कायनाईट व सिलीमनाईट बॉक्साईट, चुनखडी, मॅगनीज, लोहखनिज आदींचा समावेश आहे. भारतीय खनिज संपत्ती सर्वेक्षणानुसार ६ हजार ९५६ दशलक्ष टन खनिजांचे साठे विदर्भात आहेत. पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात हे मोठे साठे आहेत. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त १२.३३% क्षेत्रफळात खनिजसंपत्ती सापडते. तसेच महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे वितरण देखील असमान आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी फक्त ११ जिल्ह्यात खनिजसंपत्ती प्रामुख्याने सापडते. देशातील खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ४.०३ टक्के तर देशात महाराष्ट्राचा खनिज उत्पादनात ११ वा क्रमांक लागतो. हा सगळा खनिज साठा केवळ महाराष्ट्राच्या या अविकसित भागात सापडतो. तो केवळ इथल्या विकासासाठी उरत नाही तर संपूर्ण जगभरात पोहोचता होतो.
भारतात आढळणाऱ्या एकूण मॅग्नीज साठ्यापैकी त्यापैकी ४० टक्के साठा एकट्या महाराष्ट्रात आहे. मॅग्नीजचे साठे हे प्रामुख्याने नागपूर, भंडारा जिल्ह्यात आहेत. भारतात अंदाजे १,३४६ कोटी टनांचा लोहखनिज साठा आहे. एकट्या विदर्भात यातील २० टक्के साठे आढळतात. २१ टक्के बॉक्साइटचे उत्पादन महाराष्ट्रात होते. बॉक्साईटचा उपयोग कोल्हापूर जिल्ह्यात ॲल्युमिनियम कंपनीच्या व बेळगाव येथील कारखान्यात धातु निर्मिती करिता करतात. याचबरोबर बॉक्साईडचा साठा परदेशातही मोठ्या प्रमाणात भारताकडून आयात केल्या जातो. हा साठा ट्रेनमार्फत विदर्भातून मुंबईकडे गोदामात आणि नंतर जहाजेतून विदेशात प्रचंड प्रमाणात निर्यात केल्या जातो. मोठ्या किंमतीत अर्थात विकल्या जातो. खांदेश, मराठवाडा, विदर्भात नवीन उद्योग व्यवसाय, रोजगार, शिक्षणाच्या, विकासाच्या संधी अजूनही पोचलेल्या नाहीत. विदर्भात आजही शिक्षण, तंत्रज्ञान, रोजगार आणि उद्योग - व्यवसाय -बाजारपेठा यांचा अभाव आहे. याचा प्रत्यक्ष परिणाम खांदेश, मराठवाडा, विदर्भातील ग्रामीण भागांमध्ये राहणीमानाचा दर्जा सतत घसरण्यावर होत आहे. बहुसंख्य जनतेपर्यंत पुरेसे अन्न, सोयी या अगदी मूलभूत गरजा भागविण्याच्या संधीदेखील पोहचत नाहीत. परिणामी खांदेश, मराठवाडा, विदर्भाच्या लाखो लोकांच्या वाट्याला दारिद्र्य आले आहे. राज्यात आधीच विकसित असलेल्या भागाचा आणखी विकास झाला. त्यामुळे गेल्या ५० वर्षांत राज्यात विकासाचा प्रादेशिक असमतोल निर्माण झाला आहे. किंबहुना असे म्हटले जाते, राज्याच्या मूळ रचनेमध्येच विकासाच्या प्रक्रियेत असमतोल आहे. भांडवलशाहीचा असमतोल ढाचा आहे.
मॅगनीज, सिलिका , दगडी कोळसा, लोह खनिज, बॉक्साइट, डोलोमाईट, क्रोमाइट, कायनाईट व सिलिमनाईट, चुनखडी व इतर खनिजे हे विदर्भात आढळतात. औद्योगिक विकासासाठी लागणारे पोलाद यामधील हेमेटाइट हे महत्त्वाचे खनिज आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे चांगल्या प्रतीचे लोहखनिजाचे साठे आहे.पूर्व विदर्भ: गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया येथे टॅकोनाईट खडकात लोहखनिज सापडते. चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील पिपळगाव, भिसी येथे आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील रत्नापूर आणि लोहारडोंगरी येथे लोहखनिजांच्या खाणी आहेत. याचबरोबर गडचिरोली - गडचिरोली आणि देऊळगाव परिसर लोहखनिजासाठी प्रसिद्ध आहे. उच्च दर्जाचे लोह खनिज येथे मिळते. तर गोंदिया - गोरेगाव तालुक्यात मॅग्नेटाइट प्रकाराचे लोह धातू आढळते. गोंदिया जिल्ह्यातील आग्नेय खडकांमध्ये लोहखनिज आढळते. बॉक्साईटचा वापर प्रामुख्याने ॲल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो.
मॅग्नीजचा पट्टा नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात खापा या गावापासून सुरु होतो. मध्य प्रदेशात मॅग्नीजचा पट्टा हा पुढे जातो. सावनेर -रामटेक हा वैशिष्ट्यपूर्ण मॅग्नीजचा पट्टा आहे. खापा, पारशिवनी, कांद्री, रामडोंगरी, गुमगाव, मनसळ, कोदेगाव या भागातील मॅग्नीजचे साठे नागपूर जिल्ह्यात आहेत. कन्हान व तुमसर येथे फेरो - मॅग्नीज बनविण्याची सयंत्र उभारण्यात आली आहेत. निम्न प्रतीचे मॅग्नीज खनिज भिलाई पोलाद कारखान्यात वापरतात. भंडारा - तुमसर व नागपूर -सावनेर, रामटेक तालुका येथे मॅग्नीज खाणी आहेत. भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यातील दहेगाव येथे कायनाईटचे साठे आहेत. भंडारा तालुक्यातील गार्काभोंगा येथे कायनाईट व सिलीमनाईटचे साठे आहेत. भंडारा या जिल्ह्यात मौनी व नागपूर जिल्ह्यात टाका येथे क्रोमाईटचे साठे आहेत. याचबरोबर यवतमाळ येथे मांजरी, वांजरी, राजुर तर चंद्रपूर येथे वर्धा, राजुरा येथे चुनखडी मिळते. ही मालमत्ता दळणवळणातून बड्या शहरांकडे व तेथून विदेशात जाते. तेथील भट्टयात वापरली जाते. कारखानदारी व्यवसायात वापरली जाते. बांधकाम उद्योगात उपयोग केला जातो. तर काही ठिकाणी पेये, खाद्यवस्तू, वायू, इंधन, वाहतूकव्यवस्था, आणि प्रक्रियेसाठी वापरली जाते. काही ठिकाणी ऊर्जा म्हणून तर काही सामुग्री म्हणून. आणि काही वेळा कच्चा माल म्हणून वापरात आणल्या जाते. ही सगळी भौगोलिक माहिती मी तुम्हाला का देतो आहे? कारण ही माहिती स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारास आहेच परंतु सर्वसामान्य जनतेला ही माहिती नाही. त्यांना माहीत नाही ही खनिजसंपत्ती या खाणीव्यतिरिक्त कोठे जाते? खाणीतून काढल्यानंतर याचे काय होते? त्यांच्याकरिता ही लेखनसामुग्री.
बघा महाराष्ट्रात दगडी कोळसाचे चार टक्के साठे आहेत. महाराष्ट्रात उच्च व मध्यम प्रतीचा कोळसा आढळतो. कोळसा उत्पादनात चीन प्रथम क्रमांकावर आहे. भारतात झारखंड या राज्यात सर्वाधिक दगडी कोळसा आढळतो. भारतात छत्तीसगड या राज्यात सर्वाधिक उत्पादन होते. राज्यात वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या खोऱ्यात प्रामुख्याने दगडी कोळसा सापडतो. राज्यात दगडी कोळसा पूर्व विदर्भातील गोंडवनि खडकात आढळतो. चंद्रपूर - बल्लारपूर, नागपूर - उमरेड, यवतमाळ - वनी येथेसुद्धा दगडी कोळसा खाणी आहेत. बुलढाणा जिल्ह्यात पांढऱ्या चुन्याच्या खाणी आहेत. पांढरी माती म्हणून चुना भिंतीला रंग देण्यासाठी वापरला जातो. महाराष्ट्रातील १२.२३% भाग मिनरल्स ने भरलेला आहे,ज्यातील ७०% एकट्या विदर्भात, २२% मुंबई, ५% औरंगाबाद, आणि ३%पुणे विभागात नैसर्गिक साधन संपत्ती आहे. विदर्भात कोळसा, Manganese, limestone, Chromite, silicate, tungsten सारखे खनिजे पाहायला मिळतात. याशिवाय लोखंड, तांबे, आणि रेती विदर्भात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. विदर्भातील नागपूर, भंडारा, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक खनिजे मिळतात. विदर्भातील खनिज खननांमुळे विदर्भात सर्वात जास्त प्रदूषण होते ज्यामुळे विदर्भातील शेती आणि पर्यावरण, प्राणी पशुजीवन धोक्यात येते. मात्र या खनिजांचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रातील इतर भागाला आणि विदेशात होतो. महाराष्ट्रातील पूर्ण जंगलामध्ये विदर्भात ८०% टक्के येतो. म्हणजेच ३५७१५ स्क्वे. किमी. जंगलाचा भाग केवळ एकट्या विदर्भात आहे. सरकारच्या धोरणांनुसार ३३% भाग हा जंगलाने ग्रासलेला असायला पाहिजे. भारतासाठी हे प्रमाण २३% आहे आणि महाराष्ट्रासाठी हे प्रमाण २१% आहे. विदर्भ जर वेगळा झाला तर महाराष्ट्राकडे याही पेक्षा कमी जंगल रहाणार जे की महाराष्टासाठी चिंतेची बाब आहे. विदर्भात नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जंगल आहे. महाराष्ट्रातील ५७% वीज पुरवठा एकटा विदर्भ करतो. तरी खांदेश, मराठवाडा, विदर्भात अनियमित वीज पुरवठा पाहायला मिळतो. विदर्भातील वीज पुरवठ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कारखान्यांचे कामे व्यवस्थित चालतात मात्र विदर्भात कारखाने नाहीत आणि खांदेश, मराठवाडा, विदर्भातील तरुणांना रोजगार शोधण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात जावे लागते. सामाजिक विकासात पेरलेले विष हे भांडवलशाहीचे बी आहे.
बेराईट हे खनिज चंद्रपूर जिल्ह्यात आढळते. महाराष्ट्रात बेराईट खनिजांचा अंदाजे साठा १३६५ दशलक्ष टन आहे. हे खनिज प्रामुख्याने तेल विहीर ड्रिलिंग आणि पेंट उद्योगात वापरले जाते. नागपूर जिल्ह्यात पुलर, तांबेखानी, कोलारी इत्यादी आणि चंद्रपूर जिल्ह्यात तांबे कमी प्रमाणात आढळतात. खनिजांचा अंदाजे साठा ७०८ दशलक्ष टन आहे. झिंक समृद्ध खनिजे नागपूर जिल्ह्यातील तांबेखानी, कोलारी, भवारी इत्यादी गावांमध्ये आढळतात आणि परिसरात अंदाजे २७ दशलक्ष टन खनिज साठा आहे. जस्त गॅल्वनाइझिंग, बॅटरी, मिश्रधातू, रसायने, संरक्षण इत्यादी उद्योगांमध्ये वापरली जाते. या सर्व खाणीतील कच्चा माल विदेशी कंपन्यांच्या पोटात घालण्यासाठी महाराष्ट्राच्या काळजावर ही आडवी रेघ म्हणजे समृद्धी महामार्ग. संत्रा, मोसंबी, नारंगी, चिकू, केली, कापूस, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, मका, टरबूज,खरबूज, सीताफळ, रामफळ, बटाटे, वांगे, पेरू, सोयाबीन, सूर्यफूल आदी चीजवस्तूंचे निर्यातीकरण होत आहे. ट्रेन, कंटेनर, ट्रक, मालवाहू वाहनाने शहरांकडे वळविला गेला आहे. कच्चा माल कमी किंमतीत खरेदी करून तो माल मुंबई पुणे शहराच्या गोदामात घालून - साठवून पुढे विदेशात चांगल्या किमतीत विकून मराठवाडा - खांदेश - विदर्भाच्या हातावर तुरी आहेत हे सत्य. इंग्रज गेले आणि त्यांची नीती राजकीय सत्ता खेळत आहे.
या नैसर्गिक साधनसंपत्तीव्यतिरिक्त मानवी साधनसामग्रीसुद्धा रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या शहराकडे वळविली जाते. विदर्भात कित्त्येक गाव तरुणांच्या अभावी उदास व भकास झाले आहेत. कारण तरुण ही शक्ती विकासगतीला सर्वात मोठी ताकद असते. ही शक्ती मुंबई पुणे अशा बड्या शहरांकडे सततधार पाझरते आहे. समृद्धी महामार्ग हा लुटीचाही महामार्ग म्हणूज आता ओळखल्या जाईल. महाराष्ट्रातील नैसर्गिक साधन संपत्ती पैकी एकट्या विदर्भात ७० टक्के साधन संपत्ती विदर्भात आहे. विदर्भातील कोळसा खानिजामुळे महाराष्ट्रातील ६७ टक्के वीज पुरवठा एकटा विदर्भ करतो. विदर्भ एवढा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असल्यानंतरही विदर्भातील मोजकेच ठिकाण प्रगत म्हणता येतील. नागपूर सोडता विदर्भातील जवळपास सर्वच जिल्हे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले आहेत. विदर्भात दुष्काळने प्रभावित भाग आहे,पाण्याचे अनियोजानामुळे इथे पाण्याची समस्या निर्माण होते. येथील शेतकऱ्यांची जीवनपद्धती खूप ढासळलेली आहे. मागील दहा वर्षात महाराष्ट्रात तब्बल २ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती ज्यामधील ७० टक्के फक्त विदर्भातील होते. खांदेश, मराठवाडा, विदर्भात काही नवीन प्रोजेक्ट्स,आणि गुंतवणुकी आणून त्या पुरवठा मागणीपासून दुरावले आहेत. समृद्धी महामार्गासाठी ८३११ हेक्टर जमिनीचं भूसंपादन करण्यात आलं आहे. हा महामार्ग अनेक दृष्टीने फायद्याचा तसंच महत्वाचा ठरणार आहे. याचबरोबर ज्यांच्या पिकाऊ शेती गेल्या त्या कायद्याने वापस मिळत नाहीत. मुंबई - नागपूर प्रवासातील अंतर कमी होण्यास खांदेश, मराठवाडा, विदर्भच्या विकासालाही चालना मिळणार आहे. परंतु त्याचबरोबर सर्वात मोठा धोका जीवाचा होणार आहे. वेग वाढला म्हणजे अपघाताचे प्रमाण वाढणार आहे. आपल्याकडे वेग आला आहे परंतु त्या वेगाचे नियंत्रण मानसशास्त्र शकविल्या गेलेले नाही. यामुळे जीवितास हानी होणार आहे. वाहतूक, व्यापार, उद्योगासह इथे रोजगाराच्याही संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील अशीही माहिती आहे. परंतु ह्या सर्व बाबी शहरांकडे स्थलांतरित होणार आहे. व्यापाऱ्याच्या दृष्टीने जड वाहतूक जलद गतीने होण्यास या महामार्गामुळे मदत होणार आहे. मग सर्वसामान्यांना यातून काय मिळणार आहे. दिवसभर राबणाऱ्या - रोजमजुर जणांसाठी या महामार्गाचे फायदे किती उरतील हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.
चंदन, साग, लिंब, चिंच अशा चिवट आणि किंमतीदार झाडांची कत्तल करवून हा माल फर्निचर, बांधकाम आणि घरांकरिता विकल्या जातो. चंदनाची तस्करी आणि अवैध व्यवसायदेखील रस्त्याने केल्या जातात. फळे, माळवे - भाजीपाला, चारावैरण, खाद्यपदार्थ, दूधदुभते - जनावरं आणि मांस, पाळीव प्राणी, शेतीतील धनधान्यसाठा - पीकपाणी, उपजाऊ माल शहरांकडे स्थलांतरित होत होता त्याच्या वाहतूक सरासरीपेक्षा कमाल अठरापट सरासरी माल आता वेगवान गतीने वाहू लागतो आहे. जो सर्व माल स्थलांतरित होतो याचा अर्थ त्याची कच्च्यातून पक्की करण्याची प्रक्रियाज्ञान संहिता या प्रदेशात नाही. यंत्रणा नाही. या प्रदेशात असावी तितक्या प्रमाणात कारखानदारी नाही. खेळते भांडवल नाही. हा समाज मागास पडला विचाराने, सामाजिक बदलाने उत्क्रांत नाही. ज्ञानअर्थक्रांतीने साक्षर नाही. आणि सुसज्ज व्यवस्थेने निर्गमित नाही.
हा एक्सप्रेस वे नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाईल. हे नागपूरला मुंबईशी जोडेल आणि देशातील सर्वात मोठ्या कंटेनर पोर्ट - जेएनपीटीशी थेट संपर्क साधेल. यामुळे राज्यातील एक्झिम (निर्यात-आयात) व्यापार वाढेल. या मार्गावरील सर्व महत्वाची शहरे आणि पर्यटन स्थळे जोडण्यासाठी आंतर-जोडणारे महामार्ग आणि फीडर रस्ते तयार केले जातील. यामुळे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड हे आणखी चौदा जिल्हे जोडतील. या मार्गाने महाराष्ट्रातील एकूण चोवीस जिल्हे या द्रुतगती मार्गाद्वारे जोडले जातील. राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळेसुद्धा द्रुतगती मार्गाशी जोडली जातील. परंतु या जिल्हयातील जनजीवनाचे काय पशुपक्षीप्राणीजीवनाचे काय? त्यांचा मुक्त असणारा संचार या महामार्गाच्या अडवणुकीने अडणारा ठरला आहे. या सर्व जिल्ह्यातील सहा पदरी रस्त्याला लागणाऱ्या लांबी क्षेत्रफळातील झाडाझुडुपांची कत्तली झाल्या आहेत. उध्वस्त झालेल्या नदी नाल्यांची आणि वेलीवल्लरींची कैफियत कोण मांडणार? भौतिक विकासाबरोबरच महाराष्ट्रातील नैसर्गिक, मानवी, पशुपक्षीसाधनसंपत्तीच्या विनाशाची बीजे या महामार्गात रोवली गेली आहे. गरीबभोळ्या आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेला हे भांडवलशाही राजसत्तेच्या अजगर लपेटाचा विळखा आज कळणार नाही. जेव्हा गळ्यात पडेल तेव्हा मात्र गावं क्रांती करू पाहतील. सत्तालोलूप राजकीयकृत भांडवलशाही या विनाशाच्या मुळाशी दडलेली पुढील संशोधन संशोधकांना दिसून येईल.
वरील सर्व नमूद जिल्ह्यातील पिकाऊ शेती आणि जनावरांसाठी चराऊ असलेली शेतजमीन आता सिमेंटडांबरी महामार्गाच्या जाळ्याने व्यापली असून हिरवी वनराई नष्ट झाली आहे. अंतर्गत भौगोलिक रचना व पाण्याचे नद्यांचे जलस्त्रोत - प्रवाह यामुळे बदलू लागणार आहेत. सर्वात मोठा धोका म्हणजे मानव व प्राणी जीवनातील अन्नसाखळी या महामार्गाच्या निर्मितीमुळे विस्कळीत होऊ शकते. प्रवाशी वाहतूक एक गरजेची बाब म्हणून ब्रिटिश काळापासून महाराष्ट्राला जे महत्त्व प्राप्त झाले आहे ते आंतरराष्ट्रीय दर्जावर गेले आहे. ब्रिटिशांचा तळ येथे बसला आणि राज्यकारभार सुरू झाला. तत्कालीन महाराष्ट्राच्या शहराची लोकसंख्या, दळणवळण, सोयी - सुविधा, वाहने, व्यापार - बाजारपेठा, रस्ते, इमारती, पर्यावरण - शहरी हालचालीत कालांतराने यात वाढ होत होती. झपाट्याने होणारी शहरांची प्रगती आजची लोकसंख्या वाढलेला व्यापार नोकरदार वर्ग मजूर कामगार दळणवळण सोयी सुविधांचा गर्दी आणि वाहनांची गर्दी बाजारपेठेतील स्पर्धा यामुळे रस्ते वाहतूक सुरळीत असावी असा विचार सहाजिकच सर्वांनाच मनात उभा राहणे सोयीचे आहे त्यात समृद्धी महामार्गाची निर्मिती ही पर्यायी प्रवासी व माल वाहतुकीची गरज ही काळाची गरज ठरली आहे त्यादृष्टीने ही तितकेच महत्त्वाचे आहेच परंतु यामागील पार्श्वभूमीही लक्षात घ्यावी लागेल. आजची धावपळ, पर्यावरण, मानसिक संतुलन, मानवी हालचालींचे मानसशास्त्र, गर्दी, जमाव, समूह प्रतिक्रियात्मक संरचना आणि त्यास पूरक समृद्धी महामार्गाची निर्मिती आराखडा, जागा - भूखंड, सेवा-सुविधा, मार्ग - उपमार्ग, आपत्कालीन सुविधा, आपत्कालीन सेवा - दवाखाने, आरोग्य सुविधा, व्यवसाय आणि संरक्षण आदि अनेक बाबींचा अभ्यास या दृष्टीने होणे गरजेचे आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील समृद्धी महामार्गाचे स्थान - प्रास्ताविक जगाच्या पाठीवर असे कोणते शहर नाही की जे सर्वार्थांनी स्थिर आहे? शहरं जसे हालचालीने धुंद असतात तसे ते प्रगमनशील असतात. परिवर्तनाची भूमिका घेत अंतर्बाह्य बदलत असतात. म्हणून शहरांना स्थिरतेचा सिद्धांत लागू पडत नाही. अनेकार्थी अस्थिर असणे हे देखील विकासाच्या आणि सार्वभौम बदलाच्या दृष्टीने हितकारक ठरत असते. त्यासाठी हे अस्थिर असणे म्हणजे त्या शहरांची हालचाल होय. हालचाल शक्य असते त्या त्या शहरांच्या रचनेवर, व्यवस्थेवर आणि सार्वजनिक मालमत्तांच्या विकेंद्रीकरणावर तसेच मुख्यत्वेकरून दळणवळण यंत्रणेवर आणि रस्ते वाहतूक किंवा रस्तेव्यवस्थेवर. कारण रस्ते हे गाव शहरांना दर्शविणारे चेहरे असतात. शहरातील अंतर कमी करत असतात. ते एकमेकांना जोडत असतात. माणसांना, नव्या समूहांना, बदलांना, अर्थकारणाला, एकमेकांना, समाजकारणांना जोडत असतात. ती व्यवस्था म्हणजेच गावशहरांच्या शरीरातील धमणी व्यवस्थाच असते. गावशहराची प्रगती आणि विकास वाटा या शहरांच्या हालचालीवर अवलंबून असतात. त्याचबरोबर अधोगती शोषणाचे षडयंत्रदेखील. खुले मोकळे रस्ते पळायला मोकळे ठरतात तसे शोषणालाही. पूर्वी जी लूट हळूहळू होत होती ती आता नव्या रस्त्यांच्या मोठ्या जाळ्याने जबरदस्त प्रमाणात होईल. आता प्रत्येक जिल्ह्यातील भौगोलिक, नैसर्गिक साधनसंपत्ती वाहून नेण्याकरिता महामार्ग कामी पडला आहे. मानवी वाहतूक करण्यास उपयुक्त ठरला आहे. म्हणूनच समृद्धी महामार्ग हादेखील दळणवळण यंत्रणेबरोबरच शोषणाचा राजरोस महामार्ग ठरला आहे. अर्थात महाराष्ट्राच्या काळजाचं रक्त ओरबडणारी धमनी - समृद्धी महामार्ग!"
.jpeg)
Comments
Post a Comment