"गावानं मदत उभी करायची होती ब्वॉ, गाव कसं ईसरलं!"गावाकडून बातमी कळली, अन क्षणार्धात डोक्यात विचार तरळले की,"गाव इतकं कसं बेईमान व्हईल?""पंचक्रोशीतील जगणारांच्या जाणिवांचा अन माणुसकीचा खात्मा झाला क्काय?""निदान गावानं मदत उभी करायची होती ब्वॉ, गाव कसं ईसरलं!""गावातल्या बुजुर्ग लोकांना तरी कळवळा यायलं पाह्यजे होती.""का गावाला हे सगळं माहिती नव्हतं?""गावातलाच माणूस होता नं त्यो का परका होता?"पंचक्रोशीतील जनतेच्या आडल्यानडल्या वक्ताला उपेगी पडणारा माणूस होता ब्वॉ त्यो. वरीसभर कामात जुपलेला. पेरणीपसून तर विकणीपर्यंत उपेगी पडणारा हरहुन्नरी कारागीर होता त्यो. तरबेजी कास्तकार. मापगुण्याला प्यारा असणारा अन -"सगळं काम नीट व्यवस्थित झालं पाह्यजे ब्वॉ!"असं म्हणणारा त्यो सुतार होता. दोरीसुतात काम उभं करणारा मिस्त्री होता त्यो.पेरणीसाठी कोरीव मोघं तयार करायचा. मोघं म्हणजे चाडं. या चाड्यालं तीन छिद्र. अन त्यालं तीन फन बसवलेले. औत सुरू झालं की, यातून बी जमिनीत जातं. सगळा बारदाना लाकडाचा. अन सुती दोरखंड. फन, दांडी, जु, शिवळाटं, शिवळा, रूमनं, नाडगाठ, इळद, आरी ह्या सगळ्या गोष्टी लाकडाच्या. ह्या सगळ्या वस्तू सुतार घाळूनघोळून बनवायचा. ईळनमाळ तासत बसायचा. वखर, नागर, रावण, डवरं, तिफन, गोल्या, फसाटीचं तसंच.पंचक्रोशीतील कास्तकार मंडळी त्यांच्याकडे शेतीसाठी लागणारी आवजारं बनवायला यायचे. इव्हन दुसऱ्या परगण्या - जिल्हयातले कामं यायचे. नावाजलेले सुतार होते त्ये. पेरायचं तास करळ - सेव जाणार नाहीच इतकी बेताची तासूनतुसून चीजवस्तू बनवायची त्यांची रीतभात. कामाच्या मोबदल्यात कधी पैसे त्त कधी दाळदाना. कधी कधी त्त अर्धी क्वाटर सखू संतरा. अन कधी त्त हातासरशी बिंडल - बिडीपेटीचं काम करायचे.एकदा बन्सी मारवाड्याच्या वावरात पेरणीचं औत जमिनीत दबलेल्या दगडाला अडकून फन मोडून बसलं. पेरणी थांबली. दुपार होत आली. म मारवाडी वावरात आला."औत का थांबलं?" म्हणून महिनदाराला विचारलं. "मोडलं म्हून थांबलं बाजी, क्काय करू?"बन्सी मारवाडी म्हणी, "घ्या गाडीत घाला. सुताराकडं नेऊ. देईल करून त्यो. त्यो काही थांबू देणार नाही!"इकडं सुताराच्या कामठ्यावर खाज्या पाटलाचे डवरे भरनं सुरू होते. गाडीतून औत उतरवून सुतारालं बन्सी मारवाडी म्हणी, "ह्ये ह्येव्हढं औत भरा बाप्पू. खुटलंय.सगळा खोळंबा झालाय पेरणीचा.तेव्हढ्यात खाज्या पाटील बोलला की,"आस्सं व्हय मंधात कसं व्हईल?आंम्ची डवरी भरनं सुरू हैत, दिसेनं क्काय?"सुतार बोलले, "आय्का पाटील! याहीचं काम आडलंय, पेरणी थांबली. गडी खोळंबलेत अन पेरणी झाल्यासीवा डवर्नी व्हईल का? तुमचं डवर्न व्हईल. याहीचं देतो आगुदर भरून औत. पेरणीचा वखुत हैं. पुन्हा उगवणार नाही जमिनीत वलसुगी गेली त्त!"सुताराच्या या स्वभावाला पाटील धुरला. म्हणी,"माय झं तू बराबर भूत उतरवतो मास्तर!""दे बाप्पा त्याचं करून काम आगुदर."तव्हापासून सुतारालं सगळी पंचक्रोशी मास्तर मास्तर म्हणू लागली. कोण्ही सुतारच म्हणायचे त्त कोण्ही मिस्त्री म्हणायचे. "कित्येक प्रसंग हैत क्काय क्काय सांगू?" "आता सुतार नाही कालच्या रात्री मेहकरला दवाखान्यात वारले. औरंगाबादला घाटीत होते. काहीतरी दुखतंय म्हणून दवाखान्यात भरती केलं. आजाराच्या इळख्यातच पडले. मलं कळतंय तव्हापासून त्त त्यांच्या मारनापर्यंत लै गोष्टी हैत.आहो कितकाले मोठाले लाकडं फोडले त्याहीनं. इमले बांधले. माळवदं रचले. तस्मे जोडले. जु कोरले. बैलगाडीचे साठे केले. खांडं उभे केले. महिरफी सांधल्या. माड्या शाकारल्या. कब्जे बसवले. चिंदका छेदल्या. सुतारालं कळू लागलं तव्हापासून त्याहीनं हात कामात घातला त्ये आजारी पडस्तोर दमले नाही.शेतीच्या कामापसून तर घराच्या कामापर्यंत अन बलुतेदारीच्या कामापसून तर गोंधळापर्यंतच्या कामापर्यंत त्ये कामं करायचे. वाकस धरू धरू त्यांचा दंड निब्बरखट्ट झालेला. बोटं शिळका धसून धसून जारवटी लागलेले. तळहाताच्या रेखांड्या बुजलेल्या. जात्याचा खुटा बनव त्त कधी निंदण्याच्या हंगामात बाया वावरात जाताजाता खुरप्यालं मुठी बसवून घ्यायच्या. पंचक्रोशीत आंब्याचा खार करण्यासाठी आंबे वाकसानं फोडायचे आमंत्रणच यायचं सुतारालं. सुरीलं धार लावून हातनी बनवून द्यायचे. लहान मूल दोन पायावर मजबुतपणे उभं रहावं म्हणून त्ये लोटगाडा जीव लावून तासायचे. गोलीव चाकं घोळायचे. खंजेरी, गोंधळाचं चोंडकं, खुळखुळा, दातरी, लाकडी लक्षुम्याचे हात - पाय, मिठठू पिंजरा, खोडांगन, बैठकपाठ ते कातीव-कोरीव तासायचे. पाचर बसवून काम करणं त्यांना कधीच पटलं नाही. फेसोफेस त्ये काम धुऱ्यावर न्यायचे. नाही तर सुतार म्हणलं की पाचर आलीच पन त्यांचं उलट होतं ते म्हणायचे, "पाचर म्हणजे चालढकलीचं काम, आज चाल गड्या उद्या पड दाताड्या!"एकदा त्त उन्हाळयात जु फोडतांना उजव्या पायाच्या अंगुठ्यालं तोड्या कुऱ्हाडीचा घाव लागून अंगुठ्याची दुहेरी चिरफाळी झाली. नखाची दुखरी कळ त्यांच्या मस्तकात तडकली. तोंडातून मोठ्यानं,"ह्यं...माय झं. ह्ये लाकूड पन लै चिवट हैं.""शिरा तुटता तुटत नाहीत. माल्कावानीच चिकट हैं!""नाव पैसे सोडत नाहीत खिशातले मालक.""आत्ता ह्ये बोटाचं दुखणं कोण बरं करंल?"त्यांचं तोंड कसणुसं झालं. हातची कुऱ्हाड खाली फेकून देत चिचच्या बुडात ठेवलेली निळीची बाटली आणली अन म्हणत,"टाक बरं बाबू या बोटावर निळी. जरा कळ तरी खंडन व्हईल."म्या तव्हा ह्ये सुतार्कीचं काम न्याहाळायला कामठ्यावर जायचो. गप्पागोष्टी आय्कायला जायचो. इथं मन रमत होतं. म्या निळी बोटावर टाकली. थोडं थंड पडलं. टोंगळ्यावर हात टेकून जरा काळ विश्रांती घेतली. पुन्हा काही काळ उलटल्यावर ते जु फोडू लागले."काम करता करता इजा झाली, रगात वकलं - पडलं, घाव झाली त्त कोण जबाबदार?" असा सरळ फणा काढणारा आस्सील नागासारखा सवालच मह्या डोळ्यासमोर या प्रसंगात उभा राहिला.हो, त्या माणसाचं जगणं म्हणजे कामठा!या कामठ्यावर बैठक बसायची. नाना गप्पाटप्पा झाडायच्या. गुजगोष्टी व्हायच्या. रूपकं सांगितल्या जायची. कथानकं उभी रहायची. दोनदोन - तीनतीन आठवडे कथानकं चालायची. जन्मामरणापासून त्त सरणापर्यंतच्या सगळ्या गोष्टी चालायच्या. या कामठ्यावर दामा मिस्त्री, नाथा ब्वॉ, त्त कधी साळव्या, कुंगाबाई यायचे. दगडू तात्या, भळा शिवाजी, श्रीराम पोलीस, मिठ्ठु तात्या, बानाजी आबा, आसुरू आज्या, टेकाळ मामा, राईंद आप्पा, झुगलानाना, मारत्या, आना मास्तर, निळूबा, कुंडादा, राणू, भगाजी आज्या, शाहूदा, चोखाराव, साळूमाय, दसरूदा असे सगळे जमायचे. या सगळ्यांचं नातं कसं पाण्यासारखं निखळ होतं. संवाद कित्ती प्रांजळ होता. सपष्ट होता. तोंडावरच्या तोंडावर होता. मांघारी कोण्ही कुजागळी करत नसे. "जे हाय ते तोंडावर सांगायला हरकत क्काय?"दामा मिस्त्रीनं सांगितलेली "राघू मैनाची" गोष्ट त्त तीन आठवडे चालली."हिराराणीची" कथा दोन हाप्ते दगडू तात्यांनं वदली. "पोलिसी अन हेरगिरी " खात्यातल्या कैक गुजगोष्टी त्या कामठ्यावर उकलल्या जात. सुतार आवजारं तासत अन गप्पा आय्कत. जीव रमला की, हातचं काम खाली ठेवून मन लावून हुंकार देत. हरहामेस रेडिओ सुरू असायचा. रफी, अजीज, लताची गाणी, दुपारच्या बातम्या, च्यारची फोन फर्माईश, बंजारीगीतं आय्कायची सुतारालं मनापासून सवय. मुहोम्मद अजीजचं "आज कल याद कुछ और रहेता नही" हे गाणं म्या पहिल्यांदा रेडिओवर कामठ्यांवरच आय्कलं होतं. सुतार रोजच्या कामात तल्लीन असायचे. झपाझप झिपल्या काढायचे. ढिगभर, डालंभर झिलप्या झाल्या की, धोतराच्या सोग्यात घालून घरात न्यायचे.धोतर - टोपी, पांढरा पन निळी लावून धुतलेला अंगर्खा ते घालायचे. हासू त्त कायम चेहऱ्यावर फुललेलं. लहानसहान लेकरांचा लाड ते गोळ्याभिस्किट देऊन करायचे. दुकानातून बिड्या - पेटी आणायला सांगून ते म्हणायचे , "या उरलेल्या चार - आठण्याच्या गोळ्या - भिस्किट खाय माय!"त्ये सोमवार ह्या बाजारच्या दिवशी लोणारलं गेले की, अंकगणिताचा खेळ खिश्यात भरलेला असायचा. पुढं अर्धा क्वाटर सकू संतरा पोटात टाकून थैलीभर बजार करून ते दिस बुडण्याधीच घराकडं निंघायांचे. दिस असला की, पुन्हा कामठ्यावर ठाकठोक सुरू व्हायची. कधी कधी अराम पडायचा. पुन्हा दैनंदिन साळसुळीचा सपाटा सुरू.येकेक भरगच्च घर भरून लाकडाच्या फोडीव झिलप्या पडायच्या. वाळल्यावल्ल्या झाडाच्या साळलेल्या साली, तोड्या कुऱ्हाडीने तोडलेली फरळं, वाकसानं छाटलेले शेंडेसांडे, गिरमिठातून वा करवतीने कापल्यामुळे पडलेला भुस्सा, किकऱ्यानं पडलेला लगदा, साराच्या कप्च्या, अन जुन्या मोडक्यातोडक्या लाकडी वस्तूचीजा घरभरून असायच्या. हंगामात सुगी अन वरीसभर बिगिबिगी असं जळतन - सर्पन."आता सगळ्याच गोष्टी सांगायच्या असतात का? काही गोष्टी समजून पन घ्यायच्या असतात न सांगता न बोलता..."शिक्षणासाठी गाव सोडावं लागलं. आता तुरळकपणे गावी जाणं होतं. शहर हाती आलंय. शहरातली वर्दळ लक्ष खाते. पण यातून एखादा आठव वल्ल्या मातीचा येतोय. कातळातून पाझर यावा तसा आठवणींचा उमाळा झिरपून येतो. येका उन्हाळयात गावी जाणं झालं. पाराजवळच मास्तरांची गाठ पडली. ते बोलू लागले,"कव्हा आला माय? ""आत्ता त्त तु मिसरुडा झालाय!""वळखु पण येईनं.""शहरात गेलाय त्त बाप्पू - मास्टरलं इसरला क्काय?"म्या मान हलवून "नाही" म्हणलं,"कसं हाय बरं हैं का सगळं?" म्या बोललो,"बरं हैं, पण आता काम व्हत नाही. आसू दे, मलं च्या प्यायला दे. तू शहरात राह्यतु न..?"न राहवून कमीजच्या खिश्यातून पन्नासाची नोट काढून मस्तरचया हाती टेकवली. म्हणलो, " प्या च्या! पन त्ये पानी पिऊ नका. तबियत बिघडत चालली हैं!"बरं बरं" म्हणत ते हात हलवतच पुढं मुखरी मुखरी हसत चालू लागले.तिथं चिचचं विस्तीर्ण झाड होतं. चिचतुन ऊन झिरपत नसे. हिर्वागदाड पाला. वल्लीगच्च सावली. अन थंडीगार झुकूळ कामठ्यांसीवा गावात कुठंच नाही. चिचच्या बाजूला वडाचं झाड. चिचच्या डांख्या दोनदोन खळे पांगलेल्या, पलीकडं वडाच्या परंब्यात चिच घुसलेली. वड - चिच नवराबायकोवानी डोस्क्यातडोस्कं घालून नांदत. कालांतराने चिच तोडली. आता तिथं सिमेटाचे घरं आहेत. आता वड भग्न येक्टा उभा आहे. त्याच्या डांख्या तोडल्यात. गाव आता मातींतून उठलाय. सिमेटानं भरून गेलाय. प्रश्न पडतोय, " इथ्थली मया कमी होतीय क्काय?""हो! कामठ्यांबद्दल सांगायचंच राहिलं."कामठा म्हणजे चिचेचं वा लिंबाबाभळीच्या खोडमुळाचं चिक्कन लाकूड करवतीनं कापून लाकडाचा सपाट भाग जमिनीच्या उपर आलेला अन अर्धा भाग जमिनीत खोलवर घट्ट रोवलेला. आडवा सुतकी वा घन जरी कामठ्यावर हानला की, त्यो उखळत नाही. त्या कामठ्यावर वाकसानं तासून लाकूड पाह्यजे त्या आकारात बसवायची कला म्हणजे सुतार्की.किकऱ्यांनं गोल छिद्र करून भुस्सा काढन्याची कला म्हणजे सुतार्की. तोड्या कुऱ्हाडीनं जाडजूड - बेढब - फांटाळ लाकूड मापात आणत तासन्याची कला म्हणजे सुतार्की. आडव्या उभ्या गुण्यात नव्वद अंशी कोर करून करवतीनं खोल्या सांधनं सुतारासीवा जमलं नाही कोण्हाला पंचक्रोशीत.जरी १९३५ साली किर्लोस्करी लोखंडी नागर शेतीत आणला तरी अजून गावकुसात अन इकत घ्यायची आय्पत नसलेल्यांना लाकडी आवजारावरच शेती हाकावी लागत होती हे सत्य नाकारता येणार नाही.लाकडाच्या टोकावर गाळीव लोखंडाची पास, फन, घुसन, ईळद, आठचा आकडा लावून शेतीची कामं कास्तकार करत होते. सुतार लोखंड अन लाकडाची जुट बनवत आवजारं तयार करत होते.भांडवली जगानं बलुतेदारी - अलुतेदारी गिळली. नफेबाजी व्यवहारात आणली. तोट्याखोट्याचे हिशोबटिशोब जगण्यात आलेत. समाजाची ही अवस्था बरी नाही. कित्येक संसार उध्वस्त झाले. हे एकार्थी चांगलं होतं. परंपरा नाकारल्या पाह्यजे. जाणिवांचे चलनवलन दर पिढ्यांवर झाले पाह्यजे. निदान या भांडवली पाशाने नवा उद्योगधंदा, सत्ता वा शिक्षणाचे महत्व जुन्या कारागिरांच्या नव्या पिढ्यांना कळत आहे. कित्ती दिवस ही पारंपरिक गुलामगिरी करायची? कारागिरांबद्दल लिहिणं म्हणजे कारागिरीचं सगळं जाणुन घेणं, समजून घेणं, त्याच्या खाचाखोचा उमग्नं होय. सुतार हे पट्टीचे कारागीर होते. त्यांचा हातखंडा अख्या पंचक्रोशीतील कुणालाच पकडता आला नाही. हे कलेचं ढासळतं रूप आहे आजच्या वास्तवातील. नवी यंत्र आलीत शेतीतील कामांकरिता. अगदी परवा परवा सायकलवरील डवरं पाहिलं. ट्रॅक्टरचं सगळं काम पाहिलेली आमची पिढी जुन्या सुताराच्या अन अश्याच जमीनजवरच्या कैक हरहुन्नरी - अष्टपैलू कारागिरांच्या जगण्याच्या व्यथा पाहवत नाही.आजच्या भांडवली व्यवस्थेनं गावाला माणुसकीपन जपू दिली नाही. गावातला कोणताच पुढं आला नाही. कोण्ही म्हणलं नाही ज्या माणसानं हयातभर कामठ्यांवर जिंदगानी काढली. शेतीसाठी लागणारी लाकडी - लोखंडी आवजारं येळ - वखुत न पाहता दिली. त्या माणसांच्या शेवटच्या आयुष्यात असा बाका वखुत आला. त्याला मदतीसाठी धावून जायला हवं. दवाखान्यात हैं तर काही हातभार लावावा.दवाखान्याच्या खाटेवर विव्हळत असलेल्या सुतारालं कित्ती लोकं आठवली असतील की, ज्यांची कामं आईनयेळा केलीत. कित्ती लोकांचा आठव झाला असेल ज्यांची सारी शेतकी सुतरानं हातावर केली. शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची कामं करून घेणाऱ्यांना काहीच कसं वाटलं नाही? कित्त्येक दिवसांचे सुतार आजारी होते. ज्यांनी कलेच्या माध्यमातून शेतीला पूरक आवजारं दिली. ज्यातून या वरच्या गावाची पिकं उभी राहिली, घरात साठवल्या गेली. विकल्या गेली. घरं बांधल्या गेली. कैक घरात माल ठेवल्या गेला. याचं माप करता येनारं नाही परंतु,"गावानं मदत उभी करायची होती ब्वॉ, गाव कसं ईसरलं!"म्या फक्त येक्ट्या गोंय्दा सुताराबद्दल सांगत नाही. असे कैक पंचक्रोशीत, कैक ठिकाणी, कैक गावाशिवत अन चिचेखालील, बहुजनातील कारागीरांबद्दल आर्तपणे व्यक्त होतोय.त्यांची भूमाय म्हणतेय,"मलं माह्या लेकराचं त्वंड तरी दाखवा न वं माय!""आला का दवाखान्यातून मव्हा - गोंय्दा?""कोण्ही भेटलं त्त त्यालं सांगा", "तुही माय दरुज्यात बसून वाट पाह्यती, लौकर ये माय भेटाय!"संदर्भ-"अनुभवाचा संदर्भ अनुभवच असू शकतो!"-विश्वनाथ साठे [9921056462]
★★★म. फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील दुवा - लोकराजा राजर्षी शाहू !"★★★ जागतिक स्तरावरील सामाजिक उन्नतीचे स्तर तपासून पाहिले की, काही प्रवाह दिसतात त्यामध्ये प्रामुख्याने एडमन बर्क, थॉमस पेन, - राजकीय परिवर्तनाचा स्वीकार करणारा प्रवाह आहे. परंपरेत राहून बदल करणे -एडमनच्या प्रवाहाने स्वीकारले. परंतु या प्रवाहाच्या परिप्रेक्ष्याची जर चिकित्सा करायची ठरली तर परंपरा छेद करून बदल घडविणे - थॉमस या प्रवाहाच्या अनुयायांनी म्हणजेच भारतीय उपखंडात म. फुले, आगरकर, महर्षी सिंडे, ताराबाई , सावित्रीबाई, मुक्ता साळवे इ. नी परंपरेतील अनिष्ठ रुढ पद्धती आणि विचार काढून टाकणारे तत्व अंगीकारले . परिणामी म. फुले तर घरातून बाहेर पडले आणि बदल करविला. याउलट अनुयायी रानडे, लोकमान्य हे परंपरेत राहून बदल करण्याचा अट्टहास करतात हे एडमन चे पुरस्कर्ते. वास्तविक मानवी स्वातंत्र्य आणि मूल्यविचारांचा गाभा - फ्रेंच क्रांतीचा क्रिटिक - एडमन यांच्याकडे पाहता येते. भारतीय जाणिवेत महाराष्ट्रात फुले ते आंबडेकर यांच्यातील दुवा राजर्षी शाहु असा ठरतो. कारण ते आग्रहाने आणि अनिष्ठांचे विचार नष्ट व्हावे म्ह...

Comments
Post a Comment