"तुझी माझी मैत्रवेल"
- प्रा. पैलवान
# “सामाजिक मूल्यभान जगविणारी संहिता!”
प्रा. पैलवान यांनी "तुझी माझी मैत्रवेल" हा जो काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानंतर जी काव्यसंहिता वाचक - रसिक - समीक्षक आणि प्रकाशन क्षेत्रात आली यामुळे मैत्री या वैश्विक संज्ञाला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी या क्षेत्राला येणार आहे. ही दीर्घ काव्यसंहिता आहे आणि या दीर्घ काव्यसहितेतून केवळ मैत्रीवर बोलताना प्रा. पैलवान यांनी जो आशय दिला आहे आणि सामाजिक स्तराला वैश्विक स्तराचे अनुबंध जोडले आहे त्यामध्ये खूप मोठी ताकद आहे. साहित्याच्या वळणावळणावर आलेली वेगळी मर्यादा ही कविता थोडक्यात सांगते. एक असं वाक्य आले आहे की-
"मित्र आयुष्याचा
एक वळणावर
अनेक वादळ येतील आणि निघूनही जातील
त्या वादळात अखेरपर्यंत टिकून राहायचं आहे तुला"
ही आत्मभानाची जाणीव वाचकांसमोर ठेवताना स्वतःचे आत्मभान आणि मित्राला आत्मभान दर्शवण्याचा सहसंबंध येथे सामाजिक दृष्टिकोनचा स्पर्श प्रस्तुत कवितेतून पाहायला मिळतो. स्वतःची सामर्थ्य शक्ती आणि मैत्रीतला अभ्युदयभाव सांगताना म्हणतात-
"अस्ताव्यस्त करून टाकणाऱ्या वादळाला शमवण्याचे सामर्थ्य तुझ्या अंगी निश्चितच आहे
स्वतः तू जरा डोकावून पाहिलं म्हणजे"
स्वतःला डोकावून पाहताना सामर्थ्याची जी काही स्वतःची कुवत असते ती कुवत मित्रांमध्ये रुजवण्याकरिता मित्र या संकल्पनेमधून सामाजिक संदर्भ देत कविता फुलत येते. प्रस्तुत कवितेचा असे हा सामाजिक आशय होत चालतो. कधी कधी तर भावनांचा उद्रेक झाल्याने आशावादही पालवी फुटल्यासारखा डहाळून गेला आहे.
गर्दी भोवती आपण नेहमी कमकुवत असणे शक्य नाही. कारण गर्दी क्षणिक असते. जगाची गती अस्थिर असल्याने अखेर तिला पांगावच लागणं ही सामाजिक जाणीवसुद्धा रचनतून रचतात-
"आपल्या भोवती गर्दी नेहमी क्षणिक असते
आणि गर्दी पुढे आपणही कमजोरच असतो
तुला या विश्वात एक शाश्वत स्थान निर्माण करायचे आहे हे कधीच क्षणिक नसेल"
हा जो भाव सांगताना मानसशास्त्रीय उकल करण्याची भूमिका पैलवान यांनी घेतलेली आहे. आता ही मानसशास्त्री उकल कशी आहे? तर त्यांच्या या दीर्घ कवितेत एक विधान आहे-
"मनाच्या अस्वस्थपणाचे खरं कारण असतं
कुणाचंही समाधान होत नसते
हे समाधान शोधण्याची धडपड
ज्यांची मनापासून असतात
त्यांच्या हे लक्षात येत नाही"
अशा मनाचा शोध घेण्याची काव्यसंहिता पैलवान करतात आणि अस्तित्वता संदर्भात अभिव्यक्त होतात-
"अस्वस्थता तुझ्याही वाट्याला येईल"
हा अनुभवाचा जाणीव संदर्भ प्रा. पैलवान आपल्या कवितेतून मैत्री या संकल्पनेमध्ये ठेवतात.
"ओसाड पसरलेल्या त्या मातीकडून
हिरवळीची अपेक्षा कर
तुझ्या इच्छाशक्ती
माळराने माळरानावरही बगीचा फुलवेल"
मैत्रीची निष्ठा आणि निर्णयक्षमता या दोन्हीचा समन्वय साधताना मानसिक शक्तीला म्हणजे इच्छाशक्तीला प्रा. पैलवान यांनी सगळ्यात मोठा वाटा दिलेला आहे. मानसिक इच्छाशक्ती असेल तर माळरानावरसुद्धा हिरवा बगीचा फुलवता येतो. अशी खंबीर भूमिका या संहितेमध्ये येते. मैत्री सत्व असं सांगताना ते म्हणतात-
"विश्वासानं विश्वासाला जिंकता येतं"
जीवनामध्ये नीतीसत्व खूप महत्त्वाचे असतात. मैत्री सत्व महत्त्वाचे असतात. हे मांडताना-
"पसरलेली असते
फुलांच्या पायघड्याही
पायांना टोचू लागतात
फुलणाऱ्या कळ्यांचे सुगंधही आपल्याला
नकोसे होतात
कधी सावलीतून चालता
उन्हाचे चटके लागत असतात
आपलीच नाती अचानक परकी भासू लागतात कदाचित तुला प्रश्न पडेल हे कसं आणि का?"
अशी स्वतःची मनोभूमिका आणि मित्राचे मनोभूमिका आणि एकूणच सामाजिक मानसिकतेची उकल करणारी जीवनाच्या अनुभवाविषयी उच्च प्रतीत चिंतनीय मीमांसा केली आहे.
प्रस्तुत काव्यसंहितेमध्ये 'शाप' हा शब्द अंधश्रद्धाजनक रूप घेऊन आलेला आहे. प्राध्यापक पैलवान यांनी हा शब्द या काव्यसंहितेमध्ये घेतला यामागे त्यांचे श्रद्धाळू भूमिका अभ्यासायला मिळते.
"तर काही नुसतेच शाप
आपल्या आयुष्यात असतो
काही जण असतात
म्हणून अर्थपूर्ण असतात"
आपल्याला जगणं अर्थपूर्ण जगण्यासाठी शाप असणं आयुष्यामध्ये महत्त्वाचे आहे का? हा एक प्रश्न इथे समीक्षेमध्ये करता येतो.
"उद्ध्वस्त होणं नशिबात असतंच प्रत्येकाच्या"
या विधानामध्ये प्रस्तुत काव्यसंहिता त्याच्या मर्यादा म्हणजेच ह्या मर्यादा लेखकभूमिकेच्या मर्यादा आहेत का लेखकाच्या ठाई काही ठाम भूमिका झाल्या आहेत का? या भूमिका लवचिक दिसून येत नाहीत. म्हणून हे विधान. या विधानाची सामाजिक मर्यादा आपल्याला इथे तपासता येऊ शकते.
"क्षणात आपण उद्धस्त होऊ शकतो
सावरण्यासाठी एक क्षणही पुरेसा"
मर्यादा आणि संधीशास्त्र म्हणजे नकारात्मक आशय घेऊन त्याचवेळी सकारात्मक जाणीव या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे प्रस्तुत काव्यसंहितेमध्ये 'भाग्यवान', 'शाप', 'कमनशिबी', 'पुनर्जन्म', 'सात जन्म' अशा प्रकारचे हे परंपरासुचक शब्द आलेले आहेत. आपण एकविसाव्या शतकात जगत असताना यंत्र आपल्यासमोर काम करतात. मानवता यंत्रावर नियंत्रण ठेवते. आपण माणसाच्या भाग्य विषयी बोलतो - माणसाच्या नशिबाविषयी आपण बोलतो म्हणजे आधुनिकतेत येतानासुद्धा आपण प्राचीन संकल्पनांचं साहित्यामध्ये वावरणं चालू ठेवतो. हा परंपरा भावसुद्धा प्रस्तुत संहितेमध्ये येतो.
"समाजाच्या अटीमध्ये
परंपरामध्ये प्रेमाला कधीच बांधायचे नसते
कारण प्रेम ही एक अनुभूती असते"
असे ते त्यांचं हे म्हणणं बुद्धतत्त्वज्ञानाचा इतिहास उजळून सांगतो. प्रेमाची वैश्विक भूमिका या विधानातून करतांना प्रा. पैलवान यांनी संविधानिक मतप्रणालीलासुद्धा तितकेच महत्त्व दिलेले आहे. त्यांचे एका विधानामध्ये येतं
"जरुरी नाही माझं मत तुला पटेल"
हे जे विधान अधिकार व हक्क यांचं संमोलन करून संविधानिक मतप्रणालीला महत्त्व देणारे ठरणार आहे.
"तू तुझ्या शत्रुवरही प्रेम करायला शिक"
हे तथागत बुद्धांचे चिंतनप्रस्ताव प्रस्तुत काव्यसंहितामध्ये येतो. तात्विक विचार केला तर प्रा. पैलवान यांनी जगण्याचे तत्त्वज्ञान खूप सूक्ष्म पद्धतीने सांगितलेले आहे.
"तिरस्कार आणि तिरस्कार वाढत जातो
आणि प्रेमाने प्रेम"
अशा प्रकारचं सूक्ष्म आणि तात्विक जगण्याच्या पद्धतीचे तत्त्वज्ञान प्रा. पैलवान मोठ्या आधारभूत विचारप्रणालीला घेत सांगत राहतात.
प्रा. पैलवान यांची काव्य साहित्याची भाषा ही अत्यंत साधी - सरळ आणि लोकोपयोगी असून ती समजूतदार या स्तराची आहे. भाषा वेगळ्या प्रकारचा आशय घेऊन येते असं नाही. सामाजिक आशय त्यात येतो परंतु तो वैयक्तिक आणि मैत्री या संकल्पनेमुळे वैश्विक संकल्पनेत गुंतून आल्यामुळे तो सामाजिक आणि वैश्विक होऊ लागतो यामुळे भाषेची सौंदर्यपूर्ण अनुभवजन्य रचना अगदी महत्त्वाची आणि काव्यतेला मार्मिक भर टाकणारी होते.
प्रा. पैलवान यांचा अस्थिरतावाद आणि विवेकवादसुद्धा खूप महत्त्वाचा आहे-
"समाजाचं नाव मोठं करण्यात
हातभार लावतील
आयुष्यातील महत्त्वाचे
निर्णय घेताना तुझा विवेक जागृत असू दे
अपघाताने एखादा निर्णय चुकलाच
तर निराश होऊ नको"
म्हणजे अस्थिरता आणि विवेकदाचे वेगळ्या प्रकारचे संयोजन प्राध्यापक पैलवान या काव्यसंहितेतून करतात. मुळात प्रा. पैलवान यांचा आशावाद स्वतःप्रति, समाजाप्रती असलेली इच्छा, बदलाची अपेक्षा, मैत्री या भावनेतून केलेला आशावादाचा संयोग ह्या बाबी सामाजिक बदलाची अपेक्षा ठेवणाऱ्या आहेत. वैश्विक बदलाची अपेक्षा ठेवणाऱ्या आहेत. बदलाची अपेक्षा ठेवताना स्त्री जाणिवेचेसुद्धा अनोख्या प्रकारे चिंतन करतात.
"डोक्यापासून धड वेगळे"
म्हणजे तुटण्याची आंतरिक संवेदना व स्त्री दुःखाची जाणीव व्यक्तीची मार्मिक सूक्ष्म संवेदना प्रस्तुत विधानात येते. समाजाविषयी जे चिंतन आहे ते सूक्ष्मपद्धतीचे असल्यामुळे अशा प्रकारचे रोचक विधान त्यांच्या काव्य साहित्यामध्ये येते. प्रा. पैलवान यांचा नशिबावर विश्वास आहे. त्यामुळे-
"आपल्या हातावरच्या
नशिबाच्या रेखात खूप मोठी ताकद असते
हे जरी खरं असलं तरी
त्या रेखात गुरफडलेल्या
आपल्या जगण्याला सलाम करणं
साऱ्यांना जमावं लागतं
हे असं जमून घेणे
परिस्थितीच्या मर्यादा प्रत्येक वेळी
आपल्यावर शिकवणूक घडवत असतात"
अशा प्रकारची नशीबवादाविषयी असलेली त्यांची विश्वासाची भूमिका प्रस्तुत काव्यसंहितेमधून दिसून येते आणि म्हणूनच मित्र या संकल्पनेला वैश्विक भूमिकेमध्ये नेताना स्वतःची अनुभव शैली मित्र या संकल्पनेमध्ये रुजविताना दिसतात.
मैत्री संकल्पना केवळ कुण्या दोघांची मैत्री संकल्पना न उरतात ती सामाजिक होऊ लागते. देश प्रदेशाच्या भिंती तोडून वैश्विक होऊ लागते. म्हणूनच या "तुझी माझी मैत्रवेल" या काव्यसंग्रहाचे रसिक साहित्य समीक्षक आणि प्रकाशन व्यवहारातील जे मूल्य आहे. हे काळावर आत्मभान जागवणारे असे आहे. सामाजिक बदलाला अपेक्षित करणारे आहे. जगाच्या मैत्री या संकल्पनेमध्ये तात्विक अध्यात्मिक आणि नैतिक मूल्यभान जागवणारे आहे.
-संशोधक-
विश्वनाथ अर्जुन साठे ( 9921056462 )
sathe7869@gmail.com
ब्लॉग नाव - VISHWANATH SATHE

Comments
Post a Comment