"शूद्र पूर्वी कोण होते?"


डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शूद्र पूर्वी कोण होते?
आणि हिंदी आर्य समाजातील चौथा वर्ण ते कसे झाले?
अनुवादक - चांगदेव भगवानराव खैरमोडे, अनंत प्रकाशन - जयसिंगपुरा, औरंगाबाद.

          या पुस्तकाच्या प्रस्तावनेत एकंदर शूद्राच्या परिस्थिती संदर्भात जी विधानं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहेत त्यांची सिद्धांतने म्हणून बाबासाहेबांनी हे संशोधन केलेले आहे. हे मौलिक संशोधन पुढील पिढीसमोर ठेवताना त्यांनी विविध संदर्भ ग्रंथांची, पुस्तकांची, जुन्या टिप्पणीची नोंद घेतलेली आहे. याचबरोबर त्या टिप्पणीच्या नोंदी घेतांना त्यातल्या बारकाईने चुका, त्रुटी, घालघुसडपणाच्या बाबी आणि त्या त्या संहिता रचनाकारांच्या सामाजिक, आर्थिक, भावनिक, धार्मिक, स्वजातीहिताच्या संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वाचकांसमोर मांडत दलितांचे म्हणजेच शूद्रांचे होणारे शोषण हे नेमके कोणत्या काळ, अवस्था आणि कालखंडापासून होत आहे? याचा एक जाज्वल्य इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे. महाभारताच्या पर्वातील पैजवान नावाचा शूद्र आणि त्या संदर्भात आलेले वर्णन यावर आधारित सूत्रांचा सिद्धांत मांडून शूद्रांची उत्पत्ती कशी झाली? हा व्यवस्थेने अनुल्लेखाने टाळलेला प्रश्न मांडला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मांडतात. याकरिता चौकस बुद्धीने विचार करतात. त्याचबरोबर ते हिंदी आर्य समाजातील चौथ्या वर्णाची नोंद निर्माण का झाली? आणि खरे तर हा चौथा वर्ण म्हणजे शूद्र हा अस्तित्वात होता का? तो निर्माण केला त्याहीपेक्षा खरे म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीनच वर्णांची मीमांसा वेदोक्त असतांना वर्ण चौथ्या शूद्रांची उत्पत्ती झाली कशी? या प्रश्नाचे मूळ स्थान बाबासाहेब शोधतात.

          ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद अशा प्रकारच्या धर्मसूत्रांनी बांधलेल्या सिद्धांताची मीमांसकपणे फेरतपासणी करतात आणि या सिद्धांतनात आलेल्या पुरुषसत्ताक अधिसत्तेच्या पुरुषसूक्ताचा परखडपणे समाचार बाबासाहेबांनी घेतला. 'पुरुषसूक्त आणि पुरुषी अधिमक्ता वेदांमधून सांगितलेली आहे त्या विरोधात त्या काळात बुद्धांशिवाय कोणी ब्र काढलेला नाही आणि याबरोबर खुद बुद्धाला ही रचना खिळखिळी करता आलेली नाही' हेही सत्य बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगू पाहतात. म्हणजेच काय तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा ज्या चार जाती म्हणजे वर्ण आज आपण बघतो त्यातील पहिल्या ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीनच जाती म्हणजे प्रमुख वर्ण होत. परंतु या तीन जातींपैकी शूद्रांच्या वर्णाचा जन्म कसा झाला? शूद्र ही वर्णव्यवस्था कशी उत्पन्न झाली? शूद्राची अवस्था काय होती? शूद्रांची अनावस्था का झाली? आणि शूद्राला पिळल्या कसे गेले? शूद्राला दास - गुलाम कसें बनवले गेले? याची मीमांसा वेदांपासून ते बाबासाहेबांच्या कालखंडापर्यंत या पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यासायला मिळते.

"शूद्र पूर्वी कोण होते?" या प्रश्नार्थक सिद्धांतनामधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्माची चिकित्सा करतात. धर्माने हेतू पुरस्कर लिहिलेल्या ग्रंथांची सखोल चिकित्सा करतात. आणि त्यात आलेलं शोषणाचे षडयंत्र उलगडून दाखवतात. म्हणजेच धर्मवाड्म हे ब्राह्मणी श्रेष्ठत्व व हक्क सांगणारे आहे. ते चुकीचे आणि भेदयुक्त आहे हा दृष्टिकोन इथे पहावयास मिळतो. इतिहासकाराची वृत्ती कशी असावी? याविषयी सुद्धा ते या लिखाणात उर्धुत करतात. या पुस्तकाच्या सिद्धांतना मधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय उपखंडामध्ये असलेल्या मानवी अस्तित्वातील शूद्र या संकल्पनेची पुनर्मांडणीकरण करताना ते इतिहास पण बघतात यावेळेस ते विविध वेदांचा मिथकांचा, पर्वपरंपरासंकेत, संहिता आणि त्याचबरोबर पुराणमतवादी विचारसरणीचा अभ्यास करत उकल करतात. महाभारत संहितेतील पैजवान हा शूद्र आणि त्याचे उत्पत्तीचे मूळ स्थान शोधताना बाबासाहेब आंबेडकर मानवी उत्पत्तीच्या बाबतीत इजिप्तच्या संस्कृतीपर्यंत जातात. बायबलच्या प्रत्येक वचनांपर्यंत जातात. पुरुषसूक्त काळाच्या समाजरचनेपर्यंत जातात. त्याचे विश्लेषण करतात. ही चातुर्वण्य  व्यवस्था मानवी हक्काला शोषणाचे षडयंत्र बनवतांना निर्माण केल्या गेलेली एक कालसंहिता आहे. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य यांची गुलामी शूद्रांनी करावी असा दंडक ज्या वेदात उल्लेखित आहे. त्या वेदांच्या नियमावलीला पाळणाऱ्यांना शूद्रांच्या अस्तित्वाच्या बाबतीत डॉ. आंबेडकर प्रश्न करतांना म्हणतात, "या समाजरचनेला परमेश्वराचे हक्क मूलभूत मानवाला बहाल केल्यानंतर चातुर्वण्य व्यवस्थेने समाजाचे गट पाडून शोषणाची शृंखला निर्माण केली." द थेरी ऑफ सोशल डिव्होशनच्या संदर्भानुसार विश्वोत्पत्तीचा जुना करार आणि बायबलचा जो काही आधारभूत स्तंभ आहे; तो स्तंभ बाबासाहेब आंबेडकर ऋग्वेदकाळच्या विविधांगी वर्ग निर्मितीच्या संकल्पनेला जोडू पाहतात. पुरुषसुक्तात सांगितलेल्या वर्णव्यवस्थेच्या शोषण षडयंत्राला उघड करू पाहतात. तीनही वर्णांची श्रमाची कामे शूद्र वर्णाने जुलूम झाले तरी कोणताही ब्र न काढता चोख करावी अशा गुलामीच्या पद्धतीची चिकीत्सा करून सांगतात.

टोळी युगात जो संघर्ष होता तो संघर्ष अन्न, वस्त्र, निवारा आणि जगण्याच्या नवीन पद्धतीच्या शोध - बोध - विरोधाचा होता. हा काळ म्हणजे जाती विभाजनाचा काळ नसताना सुद्धा हे विभाजन वर्णव्यवस्थेने आलेलं आहे. व ते ऋग्वेद, सामवेद, आहे अथर्ववेद, यजुर्वेद आणि त्याचबरोबर ब्राम्हणे व पुराणात संहितेतसुद्धा आले आहे. हे विभाजन का करावे वाटले? माणसाची अशी गुलामीपणाची जिणे का निर्माण करावी लागली? असे प्रश्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथे विचारतात आणि या प्रश्नाला उत्तर देताना असते राष्ट्र मोठे की जातीविभाजन मोठे? असा मौलिक प्रश्न बाबासाहेब आंबेडकर वर्णव्यवस्था निर्माण करणाऱ्या ब्राम्हणांना विचारतात.

          ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या जाती व्यवसाय आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या मानवी कृतींच्या संदर्भात उत्पादित झालेल्या जाती आहेत. जाती व्यवसायाने बांधल्या असून अर्थकारण, समाजकारण आणि त्याला जोडून येणारे मानवी वर्तन त्यांचे समूह म्हणजेच जातीची उत्पत्ती. असा एक शृंखलासंदर्भ बाबासाहेब आंबेडकर विश्लेषित  करतात. परमेश्वराची सेवा करणे हा जसा भक्तीचा धंदा बनतो. तसे सामाजिकतेचा गुलामी धंदेवाईकपणा ह्या जाती व्यावसायी जगात असतात. चातुरवर्णी व्यवस्थेमध्ये असलेल्या विषमतावादी यंत्रणेबद्दल असे सडेतोड विधान करतांना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "वर्ण समान नाहीत. मग वर्णांना जन्म घालणारा, वर्ण म्हणून बहाल करणारा तो समान कसा? धर्मव्यवस्था ही माणसा - माणसांमध्ये भेद करणारी आहे. ही धर्म व्यवस्था चातुर्वण यंत्रणा निर्माण करून शोषणाची परंपरा अहोरात्र सुरू ठेवणारी आहे."

डॉक्टरांचा समाजशास्त्रीय दृष्टिकोन खूप मोठा स्तर असलेल्या प्रतवारीचा आहे. ते पहिल्यांदा गूढ प्रश्न करतात. त्यातल्या घडामोडी सांगतात. त्यांचे परिणाम शोधून त्याची उकल करतात. आणि त्या परिणामांची कारणमीमांसा करताना त्या प्रश्नाच्या संदर्भात असणारे हितसंबंध, हक्क, अधिकार, नियम, बंधने आणि त्याला जोडून येणाऱ्या सवलती या सर्व शोषणाच्या शृंखलामय यंत्रणेच्या कोटी आहेत. असे शब्दशः ते अर्थ काढतात. वेद व त्याला जोडून असणारी शोषण परंपरा, पुराण आणि त्याला जोडून येणारी गुलामीची परंपरा, स्त्रीदास्य आणि सामाजिक, आर्थिक, नैतिक, धार्मिक, शारीरिक शोषण परंपरा. माणसाकडून माणसाचे हे सर्रास होणारे शोषण उकलून सूक्ष्म पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर वाचकांसमोर ठेवतात. कळवळून आपुलकीने आणि पोटतिडकीने सांगतात.


पहिल्या प्रकरणामध्ये शूद्र वर्ण व सवर्ण म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य का निर्माण केलेले आहेत? त्यामागील भूमिका व प्रस्तुत काळाचा ध्येयवाद काय आहे? अतिशूद्रांचे व शूद्रांचे अधिकार कोणते आहेत? तत्कालीन असणारे हक्क होते ते आज कोणत्या पातळीवर गेले आहेत? या संदर्भात विवेचन झालेले आहे. शूद्रांच्या उत्पत्तीची वेदोक्त कारणमीमांसा शोधून काढत शोषण शृंखलेची चादर बाबासाहेब फाडतात. ही चादर कशी कदृ ढेकणांनी माखलेली आहे. आणि ही कदृ ढेकणे मानवी सजीवांचे रक्त शोषण कसं करतात? अर्थ शोषण कसं करतात? भाव शोषण कसं करतात? विचार शोषण कसे करतात? माणसाच्या हक्कांचे शोषण कसं करतात? यांची उकल बाबासाहेब तटस्थ राहून करतात.

दुसऱ्या प्रकरणामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चतुर्वर्णांची उत्पत्ती प्रजापती - ब्रह्मदेवापासून झाली आहे असे धर्मग्रंथ सांगतात. म्हणजेच या चार वर्णाची उत्पत्ती व्रात्त्यापासून झाली. एक विरोधाभास वेदांमध्ये सापडतो की, एकाच ग्रंथात अनेक उत्पत्तीसंदर्भात भिन्न स्पष्टीकरण आलेले आहेत. उत्पत्तीचा सिद्धांत अथर्ववेदामध्ये वेगळा आहे. तर ऋग्वेदामध्ये वेगळे रूपक घेऊन येत आहे. सामवेदामध्ये निराळ्याप्रकारचे निमित्त आहे. यजुर्वेदामध्येसुद्धा आणखीन वेगळ्या पद्धतीने हे सिद्धांत आलेली आहेत. ही पूर्वपुरोहितांची लबाडी बाबासाहेब उघड करतात. यार्थी "ब्राह्मण ग्रंथ वाङ्मयाच्या कसाला उतरत नाहीत." असं मॅक्समुलर सांगतात. "अहंकारी भाव व असबंध विचार प्रगत समाजात असे वाड्मय तयार होऊ शकत नाही." आणि ते वाङ्मय उत्पन्न केले गेले ही वस्तुस्थिती कठीण आहे. ब्राह्मणी धर्मग्रंथाची पोलखोल उघडपणे व विना संदर्भाची सामग्री म्हणून सत्यता पडताळणी प्रस्तुत प्रकरणात केलेली आहे. शूद्र उत्पत्ती कशी झाली याबद्दलची सुस्पष्टता आणि स्पष्टीकरण देण्याची ब्राह्मण ग्रंथात कोणताही दृष्टिकोन असल्याची चर्चा वेदात नाही.

तिसरे प्रकरण सूत्रांचा सामाजिक दर्जा व ततसंबंधी ब्राह्मणी ग्रंथ दृष्टिकोन अशाप्रकारचे आहे. वेदकाळात असणारी अपात्रता दर्शक बंधने व ती बंधने भंग केल्यास मिळणारी शिक्षा याचा तपशील या प्रकरणामध्ये आला आहे. होमासाठी वापरले जाणारे गाईचे दूध शूद्रास मिळू नये अशी नियमावली कथक व मैत्रायणी या संहितेमध्ये आपल्याला सापडते. शूद्रांशी यज्ञावेळी बोलू नये. शूद्रांनी उपस्थित राहू नये. यज्ञाच्या वेळी शूद्रांच्या सोबत बोलू नये. ब्राम्हणांनी वा ब्राम्हणाला दान देऊ नये. शतपथ ब्राह्मण व कथक संहिता यामध्ये हे नियमबंध आढळतात. शूद्र हा दुसऱ्यांचा नोकर आहे. याशिवाय त्याला हक्क अधिकार नाहीत. त्याला कोणतेही काम करता येणार नाही. असे कडक नियम पंचवीस ब्राह्मण या संहितेत आहेत.

धर्मसूत्रात सांगितलेल्या नियमबंधनाचा संबंध आपस्तंभ, वशिष्ठस्मृती, मनुस्मृति, विष्णूस्मृती गौतमधर्मसूत्र, बृहस्पतीस्मृती, ब्राम्हणे, नारदस्मृती, श्रुती  इ. संहितेमध्ये सापडतो. चार वर्ण जे आहेत त्यांचा उत्पत्तीउल्लेख मनुस्मृतीतील अध्याय एक श्लोक एकतीस या ऋचामध्ये सापडतो. मुख्य म्हणजे चारवर्णांची उत्पत्ती कशी झाली त्या संदर्भात विवेचन आलेले असे आहे - मुखातून ब्राह्मणांची, बाहुतून क्षत्रियांची, मांड्यातून वैश्य यांची तर तळपायातून शूद्रांची उत्पत्ती  झाली. असा मुख हे श्रेष्ठ असून बाहू त्याचे संरक्षण करणारे दुय्यय अंग तर मांड्या ह्या धंदेव्यावसायी व्यवस्थेचे निर्गमक असून पाय हे सर्व शरीराची गुलामी करणारे असतात म्हणून शूद्र हे गुलाम असून त्याचेकडून कडक नियबंधनात कामे करून घेणे अशी उत्पत्ती त्यामध्ये सांगितलेली आहे.

मला माझ्या व्यक्तिगत आयुष्यातील प्रसंग  सांगावा वाटतो की, बाप आणि माय गेले तेव्हा विष्णूस्मृतीतील कोणताच नियम लागू झाला नाही. त्यांच्या मृत शवाला उचलून नेण्यासाठी जातीतील लोक लागतात हे नियमच जिथे लागू होतात ती परिस्थिती नव्हती. यंत्राच्या काळामध्ये चारचाकी अंबुलन्स त्या ठिकाणी आली होती.

ज्ञान आणि शौर्य ही श्रेष्ठत्वाची बाब आहे त्याचबरोबर संपत्ती आणि वयमान हे सुद्धा श्रेष्ठत्वाची बाब आहे असे धर्मग्रंथ नियम सांगतो. मनुस्मृती आणि विष्णुस्मृती बहुजनांसाठी घातक आहे. त्याचबरोबर गौतमस्मृतीसुद्धा तितकीच घातक आणि विषारी विचारांची आहे. धर्मलंड हा शब्द बाबासाहेबांनी ब्राह्मण ग्रंथातून घेतला आहे. तीन वर्णांचे सेवादास्यत्व शूद्र म्हणजे शेवटचा वर्ग यांनी करणे हा संदर्भ अध्याय एक आणि पान क्र.  सत्यांशी ते एक्यांन्नव या श्लोकानिशी मनुस्मृतीत आला आहे.

मनुस्मृतीच्या अध्याय क्र. आठ श्लोक क्र. तीनशे सहासष्ट यक ओळीत असा उल्लेख आहे की,  "उच्च जातीय स्त्रीप्रेम याचना शूद्राने जर केली असेल तर त्याला देह दंडाची शिक्षा देणे आणि  संभोग केला असल्यास लिंग तोडून ठार मारावे अध्याय क्रमांक आठ श्लोक क्रमांक तीनशे चौरेहत्तर या ओळीत अशी निर्दयीकृत्यभावना आहे.

रोमन साम्राज्यामध्ये जातीव्यवस्थेचा संबंध अभ्यासून बाबासाहेब या पुस्तकात सांगतात की, "१) अमीर उमराव आणि सामान्य लोक, २) स्वतंत्र गुलाम,३) नागरिक व परदेशी, ४) जन्मजात हक्क मिळवणारे व जन्मानंतर काही मार्गाने हक्क मिळवणारे,५) ख्रिस्ती व धर्महींन अशाप्रकारची समाजरचना अस्तित्वात आहे.
पूर्वी रोमन लोक धर्महीं होते. भाडोत्री पैलवान फौज त्यांच्याकडे (ग्लॅडी फोर फोर्स)  होती. ख्रिस्ती धर्मप्रसाराने सामाजिक व धार्मिक, आर्थिक अधिकार वाटप झाले. ज्यू धर्महीन लोकांवर जुलूम सुरू झाला. गुलामांना स्वतंत्रता, नागरिकत्व, कुटुंबसंबंध, व्यापार, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, अधिकार रोम साम्राज्यात नव्हते. रोमन नागरिकांचे हक्क अधिकार याविषयी चर्चा या प्रकरणात आलेली असून रोमन व ब्राम्हणी वेदोक्त समाजरचनेतील चिकित्सा आहे. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, कौटुंबिक, नागरि, स्वतंत्र इ. गोष्टी रोमन साम्राज्यातील महत्त्वाच्या बाबी आहेत. रोमन कायदे व ब्राह्मणी कायदे यामधला फरक या प्रस्तुत प्रकरणात आला आहे. फौजदारी खटले हे शिक्षाच्या बाबतीत रोमन व ब्राह्मणी कायद्यामध्ये वेगवेगळी तफावत आहे. शिक्षा वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. एकीकडे ती जातीय आहे तर एकीकडे ती सामाजिक, धार्मिक, कुटुंबसंबंध व व्यवस्थेवर आधारित आहे. ब्राह्मणी कायद्यात केवळ शूद्रांना कडक शिक्षा सांगितलेली आहे. शूद्र सोडून जे तीन वर्ण आहेत ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना वेगवेगळे शिक्षा आहे. दंडाच्या रकमा जसा वर्ण श्रेष्ठ तश्या कमी आहेत. मात्र शूद्रांना अत्यंत हालाखीची आणि कठोर असे शिक्षा आहे आणि दंडाच्या रकमाही दुप्पट आहेत. याउलट रोमन साम्राज्यात कायद्याच्या अनुषंगाने त्या गुलामांना शिक्षा आहे त्या भारतीय शूद्र माणसापेक्षा सौम्य प्रमाणात आहेत. जरी ब्राह्मणी आणि रोमन साम्राज्याची धर्मविषयक भूमिका काही अंशी समानअसमान असली तरी सुद्धा रोमन साम्राज्यातील गुलामापेक्षाही भारतातील शूद्र माणसाला कठोरपणे वागविले जाते हे सत्य.

ब्राह्मणी व्यवस्थेने घातलेले अपात्रता दर्शक नियम बंधने नष्ट करणे या आव्हानाची ही परिस्थिती सापेक्ष सुधारणा होती. आणि काळावर ही अपात्रता दर्शक बंधन बंद होत होती. संविधानाने तर हे सगळे ब्राम्हणी शोषणाचे कारभारच नष्ट व्हावेत यासाठी लोकसत्ताक व्यवस्था निर्माण केली आहे हे आपण जाणतो.


प्रकरण चौथ्यामध्ये शूद्र आणि ब्राम्हण यांचा संघर्ष सांगितलेला आहे. 'सोदरी' हा शब्द काय इतिहास सांगतो व त्यांचे जातीकरण वर्णसंस्थांमध्ये कसे स्वरूपमय झाले? युरोपियन ग्रंथकरांनी जे शूद्रौत्पत्ती संदर्भात सिद्धांत केलेली आहेत. ते सिंद्धांत कसे चुकीचे आहेत. उलटपक्षी या सिद्धांताच्या बरोबर काही मतभेद पण आहेत. या मतभेद उलगडून पाहतांना बाबासाहेब आंबेडकर संशोधनाची सिंथेटिकपणाची भूमिका घेत म्हणजेच गुणशोधन डी. एन. ए., आर. एन. ए., गुणक्षेत्र शोध, रक्त, चेहराठेवण, पेशी इ. संदर्भात हे संशोधन सखोल आणि मानववंशाच्या शोध परंपरेने येतात. म्हणजेच अनुवंशिकपणे मिळालेले विशेष गुणधर्म यांच्यामध्ये दिसून येतात अशा लोकांचा समाज अशी व्याख्या 'वंश' म्हणून करता येईल. यामध्ये १) डोक्याचा आकार = लांबी / रुंदी, आकार / उंची २) केस व डोळे = रंग ३) अंगकातडी = रंग ४) शरीराचा बांधा ५) नाक.  यावरून कोणत्या प्रदेशात कोणत्या वंशाचे लोक राहतात याविषयी कातडीचा वा रंगाचा महत्त्वाचा भाग समजला जातो. उदा. - हवामान व प्रदेश पर्यावरण इ. वर सुद्धा ह्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे लांब डोके = उभट चेहरा (लंबुळा चेहरा) असेल. आखूड डोके = गोल चेहरा (गोटूळा चेहरा) असेल  रुंद डोके याचबरोबर डोके, कवटी, तोंड, जबडा, केस, डोळे, शरीरबांधा, नाक, हाडे, रक्त आणि भाषा इ. च्या पद्धतीने सुद्धा वंशाचा अर्थ संशोधन करता येतो. याचबरोबर वंश ठरवण्यासाठी केवळ भाषा व शरीरचना महत्वाची नाही. हल्ली बोलली जाणारी भाषा व त्यांची मातृभाषा, मूळभाषा त्याचा कोश व समान शब्द, अर्थ, संवेदना यांचे स्थान दर्शवणारा पर्यावरण किंवा प्रदेश त्याठिकाणी असणारा वंश हा तोच मूळ वंश असेल का? अशीही एक संशोधनाची लंगडी भूमिका समोर असते. येथे बेनके नावाच्या शास्त्रज्ञाने असे संशोधले आहे की, अस्वल - लांडगा हे प्राणी आणि बीच, बर्थ ही झाडे ज्या युरोपियन थंड प्रदेशांमध्ये आहेत तिथे आर्य लोक राहत असत. तर त्याचबरोबर सिंह - वाघ -  उंट हे प्राणी आणि पाम, नारळ, हे आशिया समतोष्ण प्रदेशामध्ये हिंदी इराणी लोक राहायचे असे बेनके यांचे मत आहे. याचे तथ्य शोधणे गरजेचे आहे.

बाळ गंगाधर टिळक सुद्धा मत मांडतात "उत्तर ध्रुव व आर्थिक ध्रुवावरच्या वर्तुळावरील जे लोक मूळचे राहत होते ते आर्य होते" असे त्यांचं म्हणणं होतं. परंतु हा दावा सबसेल खोटा आहे. त्या तत्कालीन वास्तवाला किंवा परिस्थिती, पर्यावरणाला धरून नाही. इतिहासाला धरून नाही. हे बाबासाहेब आंबेडकर सांगतात. सत्य पर्यावरणीय इतिहास तपासता "घोडा हा वैदिक परंपरेने जखडल्या गेलेला आहे. या संदर्भात पहायला गेले तर अश्वमेधापासून तर महाभारताच्या सारथीला मिळालेले घोडे इथपर्यंत सांस्कृतिक संदर्भ त्यास लागलेले आहेत. परंतु आर्टिक ध्रुवावर घोडे अस्तित्वात होते त्याचा पुरावा काय? किंवा उत्तर ध्रुवावर आर्य लोक राहत नसून ते दुसरीकडेच कुठेतरी होते. जिथे त्यांना घोडे उपलब्ध होते." याची भूमिका वेदांमधून लक्षात येते म्हणून टिळकांचे संदर्भ लंगडे पडतात

'आर्यांनी हिंदुस्थानावर स्वारी केली आणि शूद्रांवर गुलामगिरी लादली' अशा प्रकारचे युरोपिनांचे जे काही ग्रंथ प्रामाणिक मत आहे हे ग्रंथ प्रामाण्यक मत कम्युनिझमसाठी भारतामध्ये वापरले जातात. म्हणजे भारतात ब्राह्मण हे सर्व भांडवली जगाचे झालेले आहेत. ईश्वर - धर्म - पूजा - विधी सर्व भांडवलदारी व्यवस्था झालेली असलेल्या काळात भांडवली ब्राम्हणशाही आज अस्तित्वात आहे. व ते धर्माची पोक्त भीती भोळ्या जनतेवर लादून धर्मभांडवलदार झाले आहेत. त्यांना विरोध करणे हे कम्युनियमचे काम असते. ही विचार संकल्पना रशियन म्हणजेच युरोपियन ग्रंथकारांनी लादलेलं हे मत की, 'आर्य हिंदुस्तानावर स्वारी करून आले आणि शूद्रांना त्यांनी गुलाम केलं.' सपसेल हा सिद्धांत खोटा आहे.

शब्दांचे संदर्भ व संप्रेषण प्रक्रियेवर प्रकाश टाकतांना बाबासाहेब आंबेडकर यांनी काही निर्देश दिले आहेत की, "अर्थवाचक, पंथवाचक, वंशवाचक, धर्मवाचक, कर्मवाचक, नीतिवाचक, शरीरवाचक, वंशवाचक,  शब्द असतात. त्यांचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या संदर्भात घेतल्या जाऊ शकतो. आणि असतो म्हणजे गृहीतीकरण कसोटीला लागणे. त्याचे कारण मीमांसा असा होतो. केवळ अर्थ शोधणे आणि त्याचे परिणाम शोधणे असे ज्यावेळेस आपण संशोधन करायला लागतो त्यावेळेस शब्दाचे अर्थ इतके भिन्न असतात की ते संशोधनासाठी वेगवेगळ्या पद्धतीला नेऊन ठेवतात. 'संस्कृत पासून सर्व भाषा निर्माण झाल्या असतील तर त्या वैशिष्ट्यपूर्ण भाषा बोलणारे लोकही एकाच वंशापासून उत्पन्न झाले असावेत. कारण तो वंश मूळची भाषा संस्कृत आहे हे गृहीत धरेल व त्याची भिन्नता ही मूळ एक स्वरूप सम आहे हे सत्य असेल. असा आपण भेदमुक्त शोध लावतो. मात्र असे नाही वास्तवाशी शूद्र व ब्राम्हण संघर्ष आहे. तर हा जातीवाद का उभा केला ब्राह्मणांनी? असाही सवाल बाबासाहेब निर्धोकपणे ब्राह्मणी व्यवस्थेला या पुस्तकाच्या माध्यमातून विचारतात.

संशोधनाच्या भूमिकेसाठी अजून बाबासाहेब असे सांगतात की, "गृहीतक उत्तम रीतीने मांडणे हा शास्त्रशुद्ध चिकित्सा पद्धतीचा महत्त्वाचा मुल्यतत्त्वी विचार आहे. म्हणजे गृहीतक मांडताना ते गृहीतक विश्लेषण करून त्याच्या विचारामध्ये फरक करणे शक्यता जाणणे, मूळार्थाचा शोध घेणे आणि त्याचबरोबर त्या गृहीतकाला पूरक असे पुरावे शोधणे म्हणजे संशोधनाला न्याय देणे.
'आर्यवंश अस्तित्वात होता याचे पुरावे वेदात मिळत नाहीत.'  'आर्यांनी स्वारी करून दास, दस्यू लोकांना गुलाम केले' हे सिद्धही होत नाही. 'आर्य, दास, दस्यू यांच्या वांशिक भेद होता' हे ही पुरावे गृहीत धरले जात नाही. 'आर्य रंगाने दास, दस्यू यांच्यापेक्षा निराळे होते' असा दाखवणारा एकही पुरावा वेदात नाही.

पाचव्या प्रकरणात आर्य विरुद्ध आर्य संघर्ष अशी चर्चा बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. म्हणजेच "आर्यांनी हिंदुस्थानावर स्वारी केली व दास, दस्यू यांना जिंकले. हा सिद्धांत म्हणून बहुजनांसाठी काळसर्पच आहे. तो ठार करणे गरजेचे आहे. तो चेचने गरजेचे ठरते आहे.  ऋग्वेद व अथर्ववेद हे दोन्ही वेद आर्यांच्या दोन भिन्न गटांनी लिहिल्याने त्या दोघांना स्वीकार करण्यात ब्राह्मणांचा विरोध होता. म्हणून वरील ग्रांथिक मत मान्य करणे योग्य व इतिहासकारक ठरत नाही."

या प्रकरणात मनूच्या आणि मनुस्मृतीच्या संदर्भात माहिती आलेली आहे. दिशा व मानवी उत्पत्ती, डोक्याची उत्पत्ती, कवटीचा आकार इ. संदर्भात नव्याने माहिती आलेली आहे. म्हणजे ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, पुराण महाभारत, रामायण, विष्णूस्मृती, ब्राम्हणे नारदस्मृती, गौतमस्मृती, श्रुती इ. प्रकारच्या संहिताचा आडवा उभा विश्लेषणकारक संदर्भसुद्धा या पुस्तकांमध्ये आलेला आहे. 'सोमवंशी लोक अग्निपासून जन्मले विष्णुपुराणमध्ये सांगितले गेले आहे.' 'अत्री हा ब्राह्मणाचा मुलगा असून तो सोमवंशी म्हणजे चंद्राचा बाळ आहे' असेही विष्णुपुराणांमध्ये मांडले गेले आहे. या मानव वंशाच्याशास्त्र पद्धतीने सरळ पाहणी केल्यास सर हरवर्ड रिस्ले एकोणीसशे एक या साली यांनी मांडलेली सिद्धांतन काही वेगळे आहेत असे म्हटले. म्हणजे चार भिन्न वंशिय लोक द्रविड, आर्य, मोगल आणि सिटीजन लोक अशा प्रकारचा एक सिद्धांत सर हरवर्ड रिस्ले हे मांडतात.

          मानव वंशशास्त्रामध्ये काही महत्त्वाचे शास्त्रज्ञ की जसे की, टॅपिनर, डी.एल.फल. बी. टोपीनार्ड, मॅक्समुल्लर, प्रोफेसर रिस्ले सर हरवर्ड, डॉ. गुहा इ. नी मानववंश शोधण्याच्या संदर्भात काही ठोस ठोकताळे पुढे केले. त्यात केस, बांधा, रंग, आकार, वजन, उंची, रुंदी, कवटी आणि हाडे, रक्त, भाषा, इ. वंश शोधनाच्या संदर्भात महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर भाषेच्या दृष्टीने सुद्धा वंशाला पात्र ठरणारे संशोधन या लोकांनी केलेले आहे. जसे की, "अल्पाइन लोक आर्य पदवीला प्राप्त ठरतात."

          भाषेच्या दृष्टीने युरोपियन ग्रंथकार यांच्या सिद्धांताचे म्हणणं असं आहे की, "ऋग्वेद यांच्यात वैचारिक एकत्रितपणे म्हणजे 'वंशआर्य' आणि 'आर्यवंश' अशा दोन्ही प्रकारचे शब्द ते युरोपियन ग्रंथकार वापरतात. युरोपियन ग्रंथकार आर्य यांचा कोणता गट हा भारतावर स्वारी करतो व दास व दक्षिण जिंकतो हे स्पष्टपणे सांगत नाहीत. त्यात दुमत धरत राहतात. एकूणच काय आर्यविरुद्ध आर्य संघर्ष अशा पद्धतीने निर्माण झालेला होता." असं बाबासाहेब सांगतात.



सहाव्या प्रकरणात शूद्र आणि दास यासंदर्भी युरोपियन ग्रंथकारांचा सिद्धांत कसा फोलल ठरलेला आहे हे स्पष्ट डॉक्टरांनी सांगितलेले. आहे ज्या ठिकाणी पाण्याची मुक्तता व प्रकाशाचा ज्ञानउजेड अपरंपरा आहे. त्या ठिकाणी दास दस्यू शूद्रांची उत्पत्ती सांगणारी संदर्भिते आहेत. अशा प्रकारे मांडणी बाबासाहेब करतात. धर्मसूत्र भाग एक व दोनमध्ये काणे असे म्हणतात की, शूद्रांची उत्पत्ती ही भारत भूमीमध्येच परकीय टोळ्या आल्यानंतर झालेली आहे. 'अरण्यक' नावाच्या ग्रंथात ब्राह्मणांचे डोके शूद्रोत्पत्ती संदर्भात इतके चक्रावून गेले आहे की, खरा अर्थ त्यात सापडत नाही. म्हणजेच शूद्र हे विशेषनाम आहे. त्यानुसार तो शब्द आहे. तो अनुसाधित शब्द नाही. ब्रह्म, विष्णू, मार्कंडेय, ब्राम्हणे, पुराण हे सुद्धा शूद्र शब्दाला विशेषनाम घोषित करत नाहीत.

'राजा सिकंदरसोबत युद्ध करणारी जी टोळी होती तिचे नाव 'सोदरी' असे होते. शूद्र पूर्वीचे त्या टोळीचे होते.' असे इतिहास संशोधक लॅसन असे म्हणतो की, "विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्ये ही शूद्रांची टोळी राजा सिकंदरसोबत युद्ध करत होती. आणि ती टोळी युद्ध करण्यामध्ये माहीर होती.


'हवन्या' मेंढ्याचा बडा कळप बाळगणारा शाइस्ता. चकाकणारा,तेजस्वी, राज्य करणारा, 'क्षी' म्हणजे पर्शियन भाषेत चकाकणे तेजस्वी होणे, राज्य करणे.  शाइता हा पार्शियन संस्कृतीचा पोशिद्यान घराण्याचा राज्य संस्थापक होता. 'शाइस्ता' हा शब्द दास या शब्दाशी मिळताजुळता आहे. दास हे हिंदुस्थानातील मुख्य मूळचे रहिवासी नव्हते.

'शूद्र' हा शब्द ऋग्वेदात केवळ एक वेळ वापरला गेला आहे. प्राचीन कालच्या वैदिक वाङ्मयात शूद्रांसंबंधी काही एक उल्लेख आढळत नाही. पुढील ऐतिहासिक वाङ्मयात शूद्रांसंबंधी भरपूर उल्लेख आढळतात. शूद्र व दास, दस्यू निरनिराळे होते.

'संस्कार गणपती' ग्रंथात पान क्र.आठशे साठ यामध्ये शूद्रांना उपनयन करण्याचा विधी अधिकार आहे.

पान क्र. दोनशे सात यामध्ये मॅक्समुलर यांनी "असेंटस संस्कृत लिटरेचर' लिहिले आहे की,
'कवष ऐलूस याने ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळात अनेक ऋचा लिहिलेल्या आहेत. मुख्यत्वे म्हणजे तो शूद्र होता." त्याचबरोबर मॅक्समुल्लर असं सांगतो, "एखाद्या विषयाची अर्थशास्त्रीय मांडणी करणे सुद्धा संशोधनाचे उपयुक्त अंग व वैशिष्ट्य ठरते. म्हणजेच गुलाम आणि मालक यांचा अर्थव्यवहार मांडताना त्याविषयाचे संशोधन सुद्धा महत्त्वाचे आहे."


प्रकरण सातमध्ये असा संदर्भ येतो आहे की,  'शूद्र पूर्वीच्या क्षत्रिय होत!'
शूद्र पूर्वीच्या क्षत्रिय होत हे विधान सिद्धांतन करताना बाबासाहेब यांनी तीन मुद्दे निर्माण केले आहे ते असे, १) शूद्र पूर्वी आले होते. २) शूद्र क्षत्रिय वर्णांचे होते. ३) शूद्रांचा क्षत्रिय वर्णात इतका प्रबळ समाज होता की, प्राचीन काळाच्या प्रमुख प्रबळ आर्य जातीतील बऱ्यापैकी राजे हे शूद्र होते.

महाभारतातील शूद्र पैजवान नावाच्या गृहस्थाची वर्णने आलेली आहेत त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे महाभारताचे एकूण दोन प्रत आहेत. त्यातील एक उत्तर भारतातील आणि दुसरी दक्षिण भारतातील दक्षिणाप्रत यावरून कृष्ण व त्याच्या तत्वांचा अंगीकार - प्रचार - प्रसार प्रयागेपासून ते कन्याकुमारी पर्यंत दिसून येतो. त्याचबरोबर उत्तरेतील रावणाबद्दल असलेले विचार आणि दक्षिणेमध्ये असलेले रावणाबद्दलचे विचार.  यामध्ये जी तफावत दिसून येते ती या दोन प्रतिमधून सापडते. वरील विधाने संयुक्त वाटते असे वरील धरून चालण्यास हरकत नाही की, 'पैजवानाचे अस्तित्व शुद्ध करणे. तो कोण होता? शूद्रांची अजून कोणत्या वर्णांच्या स्वरूपात विभाजने झालेली होती का? म्हणजेच पैजवानाचा मुलगा सुदास व त्याचा पुरोहित विश्वामित्र यास पैजवान बिजवान मुलगा भगीरथ हा विदर्भ राजाचा वंश. त्याने गंगा - भगीरथी पृथ्वीवर आणली. याकरिता विदर्भातील नद्यांची पाहणी तितकीच महत्त्वाची ठरते. इथे नद्या व त्यांचे प्रवाह संशोधनाला वाव आहे. परंतु ही नदी आजच्या विदर्भामध्ये दिसत नाही. विदर्भात कोरडा दुष्काळ दिसतो. या अर्थानेसुद्धा महाभारताचा अभ्यास करणे गरजेचे आहे. 'तैतरिय ब्राह्मण' या ग्रंथांमध्ये कोणत्या याचे वर्णन येथे आहे की, सुदास हा आर्य होता. तो भारत लोकसमूहातील म्हणजे भारतटोळीचा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मत असे आहे की, "शूद्र ही एक टोळी होती. आर्य यावेळी इतर टोळ्याप्रमाणे बाहेर हिंदुस्थानातून येऊन वसाहत करून राहिले. असे जे ग्रंथकारांचे मत आहे ते बरोबर असावे पान क्र. एकशे सहासष्ट यात उल्लेख केला आहे.

प्रकरण आठवे यात वर्णांची संख्या यासंदर्भात विवेचन आले आहे. तीन की चार? मुळात प्रश्न हा असा पडतो की ब्राह्मण, क्षत्रिय, आणि वैश्य  वर्णांची एकूण तीन असतांना शूद्रांना चौथ्या वर्णात ढकलून संख्या तीनवरून चार केल्या गेली आहे. मुळात चार आहेत का? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तीनच वर्ण यांचा उल्लेख वेदांमधून आढळतो. म्हणजे चातुर्वण प्रमेय हे चुकीचे व बनावट आहे. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. शूद्र जर क्षत्रिय होते तर वर्ण तीनच राहतात. म्हणजे ऋग्वेद तैतरिय ब्राह्मण, शतपत ब्राह्मण यामध्ये असे म्हटले आहे, "हे केवळ तीनच वर्ण होते!" मग चौथा वर्ण ज्यावेळेस उत्पन्न झाला त्यावेळेची परिस्थिती काय होती? शूद्रांची अवहेलना का झाली? आणि शूद्रांना असे जगणे का मिळाले? या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर चर्चा करतात. ऋग्वेदात पुरुषसूक्त जे आलेले आहे हे ऋग्वेद संपूर्ण लिहून झाल्यानंतर आलेले आहे. आणि ते घुसडले गेलेले आहे. याचा पुरावा आहे. पुरुषसुक्तातील भाषा, वृत्त, शैली, प्रार्थनामय भागांशी आलेला जो काही व्यावहारिक भाषेचा लहेजा  आहे तो वेद लिहिण्याच्या कालखंडातील नाही. पुरुषसूक्ताचा 'डाय म्हणजे ढाच्या' जो आहे तो आधुनिक नूर घेऊन आलेला आहे. संस्कृत भाषेचा जो काही व्यवहारिकदृष्टीने प्रसार प्रचार झाल्यानंतर जी संस्कृत भाषा वाचांनी पक्की झालेली आहे त्या समाज व्यवहारांमध्ये ही भाषा रुळलेली आहे. त्यानंतर त्या भाषेत अपभ्रंश - भ्रांश - बदल आला आहे हे साहजिकच. तद्नंतरची भाषा म्हणजे पुरुषसुक्त. हे पुरुष सूक्त ऋग्वेदात नव्या रूपाने आलेले आहे. म्हणजे पुरुष सूक्ताचे व्याकरण आणि त्यामधील नादमाधुर्य बघता ती उत्कर्ष बिंदूला पोहोचलेली आहेत. पुरुषसूक्ताचे अंतरंग भाषेच्या मांडणीदृष्टीने प्रगल्भ असून संस्कृत भाषेच्या वापरातील अत्यंत उच्चप्रतीततील प्रमाणभूत भाषेचा प्रभाव त्या रचनेत दिसून येतो. शास्त्रीय पद्धतीने तपासल्या गेल्यानंतर दहाव्या मंडळातील नववी ऋचा जास्त नव्या पध्दतीने रचल्या गेली आहे. त्याचबरोबर ती आधुनिक आहे. तत्सम विषयक परिभाषिक शब्दसुद्धा आले आहेत. जसे की, वसंत, ग्रीष्म, शरद हे क्रमवारीत आलेले आहेत. 'ग्रीष्म' म्हणजे 'उन्हाळा' हा गावठी शब्द संस्कृत शब्दाला वेगळ्या पद्धतीने दिसून येतो. परंतु संस्कृत मधून 'ग्रीष्म' हा शब्द नवा उमेद आणि नवा धर्म घेऊन त्या विषयांमध्ये बसविलेला आहे. 'वसंत' हा सुद्धा साम्य अर्थ घेऊन या विषयांमध्ये आपल्याला दिसून येतो, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात.

          ऋग्वेद दंडसंहिता, अथर्ववेद दामसंहिता, सामवेद सोमसंहिता आणि यजुर्वेद शुक्ल आणि कृष्ण असे ज्यामध्ये भेद आहेत अशी वेदांची भेदसंहिता आहे. परंतु त्यांचे विषय धार्मिक नसून वेदांच्या मताविरोध्य आहेत. त्याचबरोबर उपनिषदे त्याला धरून येतात यामध्ये पुरुषसूक्त, वाजयिसेनीसंहिता,तैतरिय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, ब्राम्हणे, मैत्रीयाणि, तैतरिय कथ्थकसंहिता आहे अशा प्रकारची ज्या काही संहिता आहेत त्या काळातल्या संहिता ह्या पुरुष अर्थाने मांडणीच्या तत्वात आल्या आहेत. ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद शब्द मांडणीच्या कळा अत्यंत वेगळ्या असून ऋग्वेदातील पुरुषसूक्त ही शोषण यंत्रणा असून तत्कालीन नियत कायद्यांच्या पुस्तकांनी ही बंधने आणि जखडून ठेवलेली आहे. मग यामध्ये रूपबंध कसा येतो आहे? की या ऋग्वेदाची जी काही रचना आहे ही रचना आणि पुरुष सूक्तातील शब्दरचना यामध्ये तफावत दिसते ती का आहे? त्याचा इतिहास कालखंड तोही तपासून घेणे महत्त्वाचे आहे. नाविन्यता आणि धारणा त्याच्यात काय तत्व धरून आल्या आहेत?


इतिहातील नाविन्यतेच्या रचनेत बदल नवा आशय व विषय भाषेमधील सुधारणांच्या माध्यमातून बदलतो हे कळून येते. काळखंड ज्याबरोबर आलेल्या धारणा, मीमांसा, संकेत, नितीसंकेत व मान्यता - अमान्यता आणि नावीन्यता यांच्या रूपरेषा हेतुपुरस्सर पुरुषसुक्तात आलेल्या आहेत. ह्या रचनाबाह्य आणि रचना सम अशा प्रकारच्या दिसून येतात का? तर अगदी ऋग्वेद आणि पुरुषसूक्ताच्या बाबतीत नाही. ऋग्वेदातील अकरावी ऋचा ही घाल घुसडीचे उदाहरण आहे. म्हणजे या वृत्तांमध्ये प्रश्नोत्तराचे स्वरूप आहे. वास्तविक पाहता ऋग्वेदाच्या काही भागांमध्ये जी रचना आहे ती पुरुषसूक्तांच्या रचनेमध्ये दिसून येत नाही. तिची व्याकरण नादमाधुर्यता, भाषा, भाषेचा वापर, शब्द, जोडून येणारे प्रत्ययसंदर्भ अत्यंत वेगळ्या पद्धतीचे आहे. अत्यंत उत्कृष्ट पद्धतीला ज्यावेळेस संस्कृत येथे वापरात आहे त्या काळचे हे पुरुषसूक्त आहे. काही काळानंतर ते ऋग्वेदामध्ये जोडल्या गेले आहे. प्रस्तुत प्रकरणांमध्ये एकेकाळीत तीन वर्ण अस्तित्वात होते. शूद्र हे दुसऱ्या वर्णाचे म्हणजे क्षत्रिय वर्णाचे होते. अशा प्रकारची चर्चा स्पष्टीकरणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहेत.

प्रकरण नववे यामध्ये ब्राह्मण विरुद्ध शूद्र असा बाबासाहेबांनी एक प्रमेय ठेवलेला आहे. शूद्र क्षत्रिय होते. म्हणजे त्याकाळी तीनच वर्ण होते. ते चौथ्या वर्णनात आपोआप आले नाहीत. दुसऱ्यांकडून म्हणजे शोषण षडयंत्राकडून ते चौथ्या वर्णामध्ये घातल्या गेलेले आहेत. प्रमेयावर प्रश्न निर्माण करायचे की, का? किती? कसे? कुठे? कधी? कशासाठी? म्हणजे प्रमेयातून जी साधक - बाधक चर्चा करता येते आणि जे संशोधन करायचे असते त्यामधून निर्माण होते. ब्राह्मण शूद्राचा झगडा का आहे? ब्राह्मण शूद्रांचे विरोधी का आहेत? ब्राम्हण शूद्र झगडे कशामुळे झाले आहे? मग ब्राह्मण विरुद्ध शूद्र असा जो काही आत्ताचा वास्तव समज आहे तो यामध्ये दिसून येतो. उदा. वशिष्ठ विरुद्ध विश्वमित्र. 'हरिवंश' या कथेमध्ये सत्यव्रत उर्फ त्रिशंकू असा झगडा आलेला आहे. राज्य, अर्थ, आणि शरीरधर्म या अर्थाने हा झगडा आहे. पान क्र. एकशे सत्तावीस ते तीनशे अष्ट्याहत्तर. पृथ्वीवर ज्याप्रमाणे दुःखाने क्रोधाग्नि निर्माण होते अशा प्रकारे शूद्राच्या आणि ब्राह्मणाच्या संदर्भात असलेले विरोध संघर्ष आपल्याला पाहायला मिळतात. अंबरीशच्या कथेतसुद्धा नरबळी करण्यासाठी तडजोडी होतात. "यज्ञात तो नरबळी द्यायचा" असे वेळी कथेत विषयवस्तू आलेली आहे 'अशुभ', 'शकुन' असे शब्दार्थ देखील अंधश्रद्धेचा विषय वस्तू घेऊन त्यात आले आहेत. विश्वामित्र व वशिष्ठ यांचा विरोध संघर्ष असणारी ही कथा तत्कालीन ब्राह्मण पुरोहित आणि क्षत्रिय पुरोहित असा संघर्ष दर्शवते. न्यूयॉर्क व्हॅल्यू पान क्र. एकशे पन्नास. विश्वमित्र आणि वशिष्ठ यांच्यातील संघर्ष हा तत्कालीन लोकसाहित्याच्या संदर्भात क्षत्रिय पुरोहित जाणिवांचा संघर्ष आहे. ग्रामीण जीवनातील धार्मिक विषयक लोकसाहित्यात एकांगीपण आलेले आहे. पूर्णत्वाचा अभ्यास नसल्याने त्यात मिथके, भाकडे मॅथ् आणि सांगोपांगी गोष्टी आलेल्या आहेत. बऱ्याचअंशी ते अंधश्रद्धाळू साहित्य म्हणूनही ओळखले जाते. श्रावण महिन्याच्या संदर्भात ज्या काही तोंड परंपरेने चालत आलेल्या गोष्टी आहेत त्याच्या माध्यमातून लिखित झालेले लोकसाहित्य बारी, भजन, खंडणमंडनकाव्य, अभंग, गवळणी आणि भारुडे किंवा बहुरूपीच्या संदर्भात त्यांनी तयार केलेली कवने यामध्ये जे मॅथ् आलेले आहे ते सरळ एकांगीपणाने आलेले आहेत. ब्राह्मणांबरोबर झगडा करणारा राजा पहिला निमी.निमीनंतर शहाणपुरव, सुदास, सुखमा इ. राजांनी ब्राह्मणांसोबत त्या त्या काळात झगडा केलेला आहे. आपल्या हक्कासाठी लढवणूक केलेली आहे. पुढच्या काही प्रकरणामध्ये याचा संदर्भ येतो आहे.

दहाव्या प्रकरणात 'शूद्रांचे अधःपतन' अशा प्रकारचा एक आशय येतो आहे. शूद्रांना ब्राह्मणांनी क्षत्रिय या दुसऱ्या वर्णनातून खाली ओढून चौथ्या वर्णात म्हणजे शूद्र वर्णात ढकलले. या क्रियेला करताना काही वर्षांचा काळ गेला. काही पिढ्या लोटल्या. मुख्यत्वे करून काही नियमनं या बंधनात होती. यात उपनयन विधी करण्याचा नकार हे तंत्र ब्राह्मणांनी वापरले. मुळात काही तंत्र वापरण्याचे कौशल्य ब्राह्मणांनी अंगीकारले होते. त्यामध्ये शोषण हा मुख्य विषय होता. शोषण करून आपल्या व्यवस्थेची यंत्रणा कशी चालल्या गेली पाहिजे असा विचार उपनयन विधी न करण्याच्या संदर्भात येतो. उपनयन विधी म्हणजे काय?  ज्ञानदान, वेदांचा अभ्यास करणे, वेद शिकवणे. म्हणजे ज्ञानदानास नकार दिल्या गेला. हा उपनयन विधी करण्याचा अधिकार फक्त ब्राम्हणाकडे ठेवला. पुर्वी गवताची काडी देऊन विद्यार्थी होता येतं. त्या प्रक्रियेची आज काय परिस्थिती झालेली आहे? म्हणजे उपनयन विधीची आजच्या परिस्थितीमध्ये काय स्थिती झालेली आहे याविषयी वेगळ्या अर्थाने नव्या संशोधनाला वाव आहे. उत्तरीय म्हणजे शरीराचा वरचा भाग झाकणासाठी परिधान केलेले वस्त्र. वस् म्हणजे शरीराचा खालचा भाग झाकण्यासाठी परिधान केलेले वस्त्र. 'जैन साहित्य का इतिहास' नथुराम प्रेमी यांच्या पुस्तकांमध्ये काही सिद्धांतनं आलेली आहेत. ही सिद्धांत सांगताना त्यांनी संभाव्य अक्षर घेतले. त्यांची स्वतःच उत्तरे शोधून ती दिलेली आहे. हे उत्तर देताना काही प्रश्न निर्माण करणे आणि त्याचे 
उत्तर देणे अशी रचना त्यात आहे. सिद्धांताचे आवर्तीकरण करताना सिद्धांताला भरभक्कम असे पुरावे निर्माण करणे हे नथुराम प्रेमी यांच्या जैन साहित्य का इतिहास या पुस्तकाचे वैशिष्ट्ये आहे. वेगळी वैशिष्ट्ये असलेल्या या पुस्तकाचा रेफरन्स बाबासाहेबांनी घेताना स्त्री - शूद्रांनाही उपनयन विधी, वेदांचा अभ्यास करण्याची मुभा, जानवे घालण्याची इच्छा इ संदर्भात माहिती घेतली आहे. आणि त्याचा संदर्भ एकोणीसशे चाळीसच्या 'पुरुषार्थ' या मासिकामध्ये आलेला आहे.  शिक्षणाचा आणि दक्षिणाचा अधिकार ज्ञानाचा अधिकार हा उपनयन विधी प्राप्त अधिकार आहेत. म्हणजेच तो संपत्ती मिळवण्याचा अधिकार आहे. उपनयनविधी नाकारल्याने यज्ञ दक्षिणा मिळवण्याचा अधिकार नाकारला गेला व शूद्र अधोगतीला गेले. सरळ सरळ शूद्र वेदाच्या अभ्यासाविना अज्ञानात पडले. अज्ञानाच्या अंधारात पडले. शूद्रांविरोधी हा सूड उगवला खरा म्हणजे ब्राह्मण संघटनांनी. कारण की, त्यांचे उपनयन विधी नाकारने हे पुरोहितपणा करण्याचा ब्राह्मणाचा एकमेव हक्क शूद्रांना देणे होय. म्हणून ब्राम्हणांनी उपनयन आणि पुरोहितपणाचा हक्क स्वतःकडे ठेवलेला होता. हा हक्क हिसकवल्या म्हणजे अनधिकृतपणे कोणी उपनयन विधी केला तर शिक्षा केली जायची. वेदांचा अभ्यास केला तर त्याच्या विरोधात कायदेशिक्षा तशा कडक शास्ते निर्माण केलेली होती.

          हिंदी आर्य समाजात धार्मिक शासन पद्धती कोणत्या प्रकारची होती याची मीमांसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर करतात त्यात असं संशोधनार्थी करत आहेत की, या हिंदी आर्य समाजामध्ये बौद्ध धम्मातील विचारसरणीला विरोध करून ती विचारसरणी नष्ट करण्यासाठी हे ब्राह्मणांचे षडयंत्र कसे सुरू होते? याचा संदर्भ ते चि. वि. वैद्य, भांडारकर, केनेवड यांच्या साहित्यामध्ये दर्शवितात. सगळ्यात महत्त्वाचं हा पुरोहितपणा आणि शोषण षडयंत्र पाहण्याकरिता आपल्याला एक उदाहरण पाहणे गरजेचे आहे. "शिवाजीचे मित्र बाळाजी आवजी यांनी मेवाडच्या सिसोदया घराण्यातून वंशावळ जुळून शिवाजी क्षत्रिय आहे हे सिद्ध केले; परंतु हिंदूंचा दर्जा कोणता? ठरवण्यासाठी  ब्राह्मणांच्याच हातातील निर्णय महत्त्वाचा होता. शिवाजी क्षत्रिय नाही हे ब्राम्हणांनी तडीत केलेले होते. म्हणजे शिवाजीराजा क्षत्रिय आहे हे सिद्ध करण्याकरिता खुद्द शिवाजीला राज्याभिषेक करून घ्यावा लागला. त्यांनतर केलेला दुसरा राज्याभिषेक हा राज्याभिषेक नसून तो जादूटोणा विधी होता. हा संदर्भ कोकणातील निश्चलपुरी ब्राह्मणाने पहिल्या राज्यभिषेकामुळे घातपात सांगितला आहे त्याकरिता हा दुसरा जादूटोणाविधी होता असा सत्य इतिहास आहे. तो इतिहास आणि त्याचे लिखित पुरावे इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात व्हॅल्यू एक्स वन यात आले आहेत. याची मूळ कॉपी बेंगॉल रॉयल एशियाटिक सोसायटीच्या लायब्ररीत सापडली. ते काव्य मूळ शिवाजी राजांच्या काळात असलेल्या एका कवीचे होते."

ब्राम्हणांनी होण वंशाचे वंशज राजपूत, परदेशी लोकांच्या यांच्या करवी बौद्धधम्माचा पढाव केला. होण भारतीय उत्तरेत आले तेव्हा बौद्धधम्माची चलती होती. बौद्धधम्म विचारांचा पाडाव करण्याकरिता ब्राह्मणांनी वेद रचले (वेदांच्याही आधी बौद्धतत्वज्ञान प्रचलित होते हे विसरता कामा नये म्हणजे बौद्धधम्म पाडाव पुढे कोणी केला हे विवेचन कळून येते.) परमेश्वराने दिलेल्या आज्ञने प्राचीन वैदिक ऋषींच्या नेतृत्वाखाली शुद्धीच्या गंभीर विधीने आणि दिक्षेने काही लोक अग्नीतून उत्पन्न केले ही आधारभूत कथा 'परमार, परिहार, चव्हाण, चालूक्य' या चार जाती कुळ म्हणून मानल्या जातात त्यांच्या उत्पत्तीभोवती गुंफलेले आहेत. विल्यम क्रुक यांचे 'वैदिक हिस्ट्री ऑफ मेडिकल इंडिया' रोमन कॅथलिक लोकांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे सिद्धांत आहे. त्यातील सिद्धांत म्हणजे पोप धर्मगुरू, धर्मपंडित पाखंडी लोक जनतेकडून पैसे घेऊन त्यांच्या पापाचे क्षालन करून त्यांना शुद्ध करणे, त्यांना मोक्षप्राप्ती करवून देणे अशाच प्रकारची प्रक्रिया भारतीय समाजामध्ये ब्राह्मणांनी रुजवलेली आहे. यापेक्षा ब्राह्मणांचे वेगळे कसब कोणते? निर्णय विकणे हाच ब्राह्मणांचा कसब. म्हणजे शिवाजी राजा क्षत्रिय होता की नाही?



'शिवाजी क्षत्रिय होता' हे सिद्ध करण्याकरिता गागाभट्टाने काही खजिना घेऊन जो शिवाजी राजांचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले त्यामध्ये बऱ्याच अडचणी उभ्या केल्या होत्या. जसे की, तो क्षत्रिय घराण्यातला नाही.वय वाढल्याने संस्कार होणार नाही. उपनयन विधीचं वय उपवर झाल्यामुळे होत नाही. बऱ्याच प्रकारच्या अडचणी त्यांनी निर्माण केल्या. परंतु त्या अडचणी पुढे कालांतराने जी दक्षिणा म्हणून मिळालेली रक्कम आहे त्या रकमेपोटी सुटल्या म्हणजेच त्यांनी निर्णय विकला.

प्रकरण अकरावे यात 'समेटाचा वृत्तांत' आशा प्रकारची चर्चा आली आहे. ब्राह्मण शूद्र संघर्ष समेट झाला का? आणि शूद्र अजून किती अधोगतीला जाण्याची स्थिती आहे? त्याची कारणे कोणती? याची मीमांसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रकरणांमध्ये करतात. एका व्यक्तीच्या अपराधाचा ससेमिरा अपराध हा टोळीचा अपराध असतो म्हणून शूद्रांचा अधःपात करणे ही प्रथा चालत आलेली होती. वास्तविक पाहता टोळीचा अपराध म्हणजेच एका शूद्र किंवा काही शूद्र राजांनी ब्राह्मणांचा जो काही त्या विरोधाच्या विरोधात केलेला छळ. त्या विरोधाचा सूड म्हणून त्या शूद्र टोळीचा, वंशाचा विरोध करणे म्हणजे ब्राह्मण शूद्र संघर्ष. वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण मिळून एक्यांन्नव लोकांनी ऋग्वेदाच्या ऋचा लिहिल्या आहेत. पर्याय या राजाने ब्राह्मणांना सळो की पळो करून ठेवले होते. म्हणून ब्राह्मण हे शूद्रांवर चिडून आहेत. कारण हे राजे ब्राम्हणाच्या निर्णयाने जन्मशूद्र होते. समेटाच्या काही कथा महाभारताच्या पर्वात पाहायला मिळतात. पण त्या कथा एकांगी कशा आहेत? कथा रचनाकारांच्या भूमिका कोणत्या आहेत? यावरून त्या कथेची रचना कळते. पोक्त भीतीयुक्त शोषण कळते.
उदा. - १)भारत टोळी आणि त्रित्सु टोळी यांच्यातील संघर्ष. ही विश्वमित्र यांची आहे. वशिष्ठ ऋषी यांचाही एक समुदाय आहे.महाभारतातील आदीपर्वात येतो.
२) भृगुलोक आणि कृतीवीर्य राजा असा जो क्षत्रिय आणि ब्राह्मण संघर्ष आहे. तो महाभारताच्या आदीपर्वामध्ये म्हणजेच या कथेमध्ये आलेला आहे. हा समेटाचा एक वृत्तांत आहे.
३) और्य व क्षत्रिय राजा यांच्यातील संघर्ष. ३
४)कृतीवीर्यचा मुलगा आणि हैदय लोकांचा राजा यांच्या विरोधात जो परशुराम यांनी संघर्ष चालविला व महाभारताच्या वनपर्व भागामध्ये येतो.
५) वशिष्ठ आणि कलमष्पाद यांनी जो काही संघर्ष केला तो महाभारताच्या आदीपर्वामध्ये दिसून येतो.
६) इवाक्शु कुळात जन्मलेला राजा सौदास आणि वशिष्ठ असा जो काही संघर्ष आहे तो अनुशासन पर्व महाभारतामध्ये येतो.
७) सुदासवंश जो राजा आहे तो ब्राह्मणांसोबत विरोध करतो आहे. तो शांती पर्व या महाभारताच्या भागांमध्ये येतो. या सातही कथेमध्ये ब्राह्मणांचा उदोउदो आणि क्षत्रियांची मानहानी याशिवाय कोणतेही कारण सापडणार नाही. म्हणजे या समेटाच्या वृत्तांतकथा ज्या महाभारतामध्ये आलेल्या आहेत त्यामध्ये ब्राम्हणांनी एकांगीपणे महाभारतातील कथापर्व लिहिताना जी भूमिका ठेवून शूद्रांचा सूड घेण्याकरिता जी भूमिका आहे ती अत्यंत जहाल शोषणाची आणि सूडपणाची आहे.

          ब्राह्मण आणि शूद्र नामशेषच केली नाहीत तर संतती वाढू नये म्हणून शूद्रांना ठार मारले. गरोदर स्त्रियांना सुद्धा तितक्या निर्दयपणे ठार मारले. शूद्र - अतिशूद्रांना गढ्या - मढ्यात ढकलून जिवंत गाढले - जाळले. (गावशिवेतील ज्या बुरुज, गढ्या, माड्या, इमले वा वाड्याच्या पायाचे खोदकाम केल्यास त्यात मानवी निगरगट्ट सांगाडे सापडतात.)* परशुरामाची कथा आपल्याला समजते. क्षत्रियांचा सगळा समूळ वंशनास करण्याकरिता परशुराम कुऱ्हाडीच्या पात्यांनी सर्व क्षत्रियांचा निपात करतो केवळ एकवेळ नाही तर तब्बल एकवीसवेळा निःपात करतो. पृथ्वी क्षत्रियवंश नष्ट करतो. ही कथा जी आलेली आहे त्यात ब्राह्मण व शूद्र यांच्यातील एकीचा समेट कधी झालाच नव्हता. शूद्र हे मूळचे क्षत्रिय होते असे बाबांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या संशोधनुसार तो संघर्ष कायम आहे. यात समेट दिसत नाही. यार्थी समेट झालाच नाही म्हणून शूद्रांच्या असंघटपणा, अधोगती, दैन्य - दारिद्र्य, अज्ञान आणि सामाजिक अधोगती या कारणामुळे आज पण आपल्याला दिसून येते.


          प्रकरण बारावे "सिद्धांताची कसोटी" या विवेचनात बाबासाहेब आंबेडकरांनी जे मत मांडले आहे ते संशोधनाची अतिउच्च बाब आहे. यासाठी यथोचित जी प्रकरणांची शीर्षके दिलेली आहेत ती अत्यंत बोलकी आहेत. त्या प्रकरणाच्या शीर्षकावरूनच प्रकरणांमध्ये मांडलेले सिद्धांत काय असतील? त्याच्या मीमांसा करण्याच्या ज्या भूमिका आहेत त्या कोणत्या स्वरूपात असतील याचे आशयविश्लेष अर्थ शीर्षकांमध्ये दिसून येते. एकूणच शूद्रांची उत्पत्ती आणि त्यांची अधोगतीची कारणे यांची मीमांसा करणे, या कारणांचा शोध घेत ततसंबंधी शूद्रांना जन्मानंतर ब्राम्हणांकडून मिळालेली वागणूक  चर्चा घडवून आणणे ही बाब यात पडताळायला मिळते. शूद्र जमातीत जाणीव जागृती करणे हा  या प्रबंधाचा मुख्य हेतू होता हे बाबासाहेब याठिकाणी सांगतात. यासाठी ते साखळीचे उदाहरण देतात तंतोतंत लावतात. त्यांच्या शब्दांत, "साखळी ही तिच्या सर्वात जास्त मोडकळीस आलेल्या दुव्यापेक्षा जास्त मजबूत नसते!" आणि म्हणून त्यांनी या सिद्धांताला म्हणजे 'शूद्र पूर्वी कोण होते?' हे सिद्ध करण्याकरता जे काही पुरावे आणि पुराव्याला जोडून येणाऱ्या ज्या काही साखळीशी पुरावे त्यांचेकडे असतात. त्या कड्या एक जरी दुवा हा मजबूत नसला तर साखळी मजबूत नसते तरीसुद्धा इतर कड्यांवर त्याची मजबुती टिकून असते. हे बाबासाहेब या पुस्तकाच्या निर्मितीउद्देशावरून संशोधकापुढे न्याय ठेवतात.

          प्रत्येक गृहीतांचे मूल्यमापन करावे लागते. मिळालेल्या पुराव्यांवर मूल्यमापन ठरत असते. आणि त्या गृहीत आणि गृहीतकांची पुरावे एकत्र करून सामूहिक मूल्यमापन करणे गरजेचे असते. सिद्धांत, अनेक आधारभूत दुवे आपल्या सोबत बाळगावीत. साखळीचा कडा जुळेल असे ते घ्यावेत म्हणजे संशोधनाची साखळी कच्ची राहू शकत नाही. पुराव्याचा अचूकपणा इतका कसोटीचा असला पाहिजे की, तो इतरांना पटवून द्यायला पाहिजे. तो देता आला पाहिजे. अचूकपणा सर्व कसोटीला उतरू शकला पाहिजे. जिथे पुरावा लंगडा पडतो तिथे अनुकूल अशा संभाव्य प्रबळ गोष्टींचा पाठिंबा पुराव्यासाठी मिळवावा लागतो. तो सर्व दृष्टीआड करता कामा नये. सिद्धांत कितपत बळकट व प्रबळ आहे? त्यातला खरेपणा व कसोटीला उतरण्याची क्षमता किती आहे? हे निकष सिद्धांताला उत्कृष्ट बनवत असतात.

          सिद्धांत कोसोटीला पारखण्याची एक सचितवृती आणि कसोटी आखणे सुद्धा महत्त्वाचे असते असे संशोधनाच्या बाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तोलामोलाचे विधान करतात.

मांडलेल्या सिद्धांतनाबरोबरच प्रश्नोत्तर सुरू करणे ते उत्तर देताना संवेगासाहित प्रश्नांकित करणे आणि प्रश्न उपस्थित करून होतील अशावेळी उत्तरे निवडणे, पर्याय शोधणे व ती सकल सत्यता पूर्ण उतरवणे हे संशोधन करण्यातील महत्त्वाच्या टप्प्यातील एक द्वैत. प्रश्नांची जंत्री करणे, उत्तर शोधणे, त्याची क्रमाने मांडणी करणे, महत्त्वाचे प्रश्न क्रमाने मांडणी करून ते प्रश्न सोडवणे अशा प्रकारचे संशोधन योग्य प्रकारे होते. अशावेळी १)भूगोल नकाशा २)सामाजिक हालचाली ३)कालखंडातील बदल ४)विचाराचा कालखंड ५)मानवी वर्तन यांच्या भूमिकेचे संशोधन करावे लागेल.

          हिंदी आर्य लोकांचे सामाजिक संघटन चातुर्वण्य सिद्धांतावर उभारलेले असून हे वर्ण म्हणजे ब्राह्मण चतुर, क्षत्रिय लढवय्ये, वैश्य व्यापारी, शूद्र शेवट या तिन्ही वर्गाची गुलामी करणारे ठरलेले होते. अशी चार वर्गामध्ये केलेली समाजाची उतरती विभागणी होय. असे सर्वसाधारण मत आहे. परंतु शूद्राच्या प्रश्नाचे खरे स्वरूप काय आहे? किंवा त्याचा विस्तार केवढा आहे? याबद्दलची कल्पना त्या मतावरून येत नाही? समाजाची विभागणी चार वर्गात करण्याशिवाय चातुर्वण्य व्यवस्थेला दुसरे काही साधायचे नसते. हे फार निरुपृद्रवी तत्व असे मानण्यात आले आहे. दुर्दैवाने निरळाच कावा चातुरवार्णाच्या सिद्धांतात आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात 'शूद्र पूर्वी कोण होते?' या सिद्धांतनाची मांडणी करतांना आपल्याला याही काळात रोखठोक सांगतात.



निष्कर्ष -

अ) ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा ज्या चार जाती म्हणजे वर्ण आज आपण बघतो त्यातील पहिल्या ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीनच जाती म्हणजे प्रमुख वर्ण होत. परंतु या तीन जातींपैकी शूद्रांच्या वर्णाचा जन्म कसा झाला? शूद्र ही वर्णव्यवस्था कशी उत्पन्न झाली? शूद्राची अवस्था काय होती? शूद्रांची अनावस्था का झाली? आणि शूद्राला पिळल्या कसे गेले? शूद्राला दास - गुलाम कसें बनवले गेले? याची मीमांसा वेदांपासून ते बाबासाहेबांच्या कालखंडापर्यंत या पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यासायला मिळते.


ब) शूद्र आणि त्याचे उत्पत्तीचे मूळ स्थान शोधताना बाबासाहेब आंबेडकर मानवी उत्पत्तीच्या बाबतीत इजिप्तच्या संस्कृतीपर्यंत जातात. बायबलच्या प्रत्येक वचनांपर्यंत जातात. पुरुषसूक्त काळाच्या समाजरचनेपर्यंत जातात. त्याचे विश्लेषण करतात. ही चातुर्वण्य  व्यवस्था मानवी हक्काला शोषणाचे षडयंत्र बनवतांना निर्माण केल्या गेलेली एक कालसंहिता आहे. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य यांची गुलामी शूद्रांनी करावी असा दंडक ज्या वेदात उल्लेखित आहे. त्या वेदांच्या नियमावलीला पाळणाऱ्यांना शूद्रांच्या अस्तित्वाच्या बाबतीत डॉ. आंबेडकर प्रश्न करतांना म्हणतात, "या समाजरचनेला परमेश्वराचे हक्क मूलभूत मानवाला बहाल केल्यानंतर चातुर्वण्य व्यवस्थेने समाजाचे गट पाडून शोषणाची शृंखला निर्माण केली."


क) रोमन कायदे व ब्राह्मणी कायदे यामधला फरक या प्रस्तुत प्रकरणात आला आहे. फौजदारी खटले हे शिक्षाच्या बाबतीत रोमन व ब्राह्मणी कायद्यामध्ये वेगवेगळी तफावत आहे. शिक्षा वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. एकीकडे ती जातीय आहे तर एकीकडे ती सामाजिक, धार्मिक, कुटुंबसंबंध व व्यवस्थेवर आधारित आहे. ब्राह्मणी कायद्यात केवळ शूद्रांना कडक शिक्षा सांगितलेली आहे. शूद्र सोडून जे तीन वर्ण आहेत ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना वेगवेगळे शिक्षा आहे.

ड) 'संस्कृत पासून सर्व भाषा निर्माण झाल्या असतील तर त्या वैशिष्ट्यपूर्ण भाषा बोलणारे लोकही एकाच वंशापासून उत्पन्न झाले असावेत. कारण तो वंश मूळची भाषा संस्कृत आहे हे गृहीत धरेल व त्याची भिन्नता ही मूळ एक स्वरूप सम आहे हे सत्य असेल. असा आपण भेदमुक्त शोध लावतो. मात्र असे नाही वास्तवाशी शूद्र व ब्राम्हण संघर्ष आहे. तर हा जातीवाद का उभा केला ब्राह्मणांनी? असाही सवाल बाबासाहेब निर्धोकपणे ब्राह्मणी व्यवस्थेला या पुस्तकाच्या माध्यमातून विचारतात.

ई) एका व्यक्तीच्या अपराधाचा ससेमिरा अपराध हा टोळीचा अपराध असतो म्हणून शूद्रांचा अधःपात करणे ही प्रथा चालत आलेली होती. वास्तविक पाहता टोळीचा अपराध म्हणजेच एका शूद्र किंवा काही शूद्र राजांनी ब्राह्मणांचा जो काही त्या विरोधाच्या विरोधात केलेला छळ. त्या विरोधाचा सूड म्हणून त्या शूद्र टोळीचा, वंशाचा विरोध करणे म्हणजे ब्राह्मण शूद्र संघर्ष. वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण मिळून एक्यांन्नव लोकांनी ऋग्वेदाच्या ऋचा लिहिल्या आहेत. पर्याय या राजाने ब्राह्मणांना सळो की पळो करून ठेवले होते. म्हणून ब्राह्मण हे शूद्रांवर चिडून आहेत. कारण हे राजे ब्राम्हणाच्या निर्णयाने जन्मशूद्र होते.

फ) पोप धर्मगुरू, धर्मपंडित पाखंडी लोक जनतेकडून पैसे घेऊन त्यांच्या पापाचे क्षालन करून त्यांना शुद्ध करणे, त्यांना मोक्षप्राप्ती करवून देणे अशाच प्रकारची प्रक्रिया भारतीय समाजामध्ये ब्राह्मणांनी रुजवलेली आहे. यापेक्षा ब्राह्मणांचे वेगळे कसब कोणते? निर्णय विकणे हाच ब्राह्मणांचा कसब.

घ) शूद्रांना ब्राह्मणांनी क्षत्रिय या दुसऱ्या वर्णनातून खाली ओढून चौथ्या वर्णात म्हणजे शूद्र वर्णात ढकलले. या क्रियेला करताना काही वर्षांचा काळ गेला. काही पिढ्या लोटल्या. मुख्यत्वे करून काही नियमनं या बंधनात होती. यात उपनयन विधी करण्याचा नकार हे तंत्र ब्राह्मणांनी वापरले. मुळात काही तंत्र वापरण्याचे कौशल्य ब्राह्मणांनी अंगीकारले होते. त्यामध्ये शोषण हा मुख्य विषय होता. शोषण करून आपल्या व्यवस्थेची यंत्रणा कशी चालल्या गेली पाहिजे असा विचार उपनयन विधी न करण्याच्या संदर्भात येतो. उपनयन विधी म्हणजे काय?  ज्ञानदान, वेदांचा अभ्यास करणे, वेद शिकवणे. म्हणजे ज्ञानदानास नकार दिल्या गेला. हा उपनयन विधी करण्याचा अधिकार फक्त ब्राम्हणाकडे ठेवला. पुर्वी गवताची काडी देऊन विद्यार्थी होता येतं. त्या प्रक्रियेची आज काय परिस्थिती झालेली आहे? म्हणजे उपनयन विधीची आजच्या परिस्थितीमध्ये काय स्थिती झालेली आहे याविषयी वेगळ्या अर्थाने नव्या संशोधनाला वाव आहे.


संदर्भ -
१) शूद्र पूर्वी कोण होते?  - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रथम आवृत्ती - १९४६ आनंद प्रकाशन, औरंगाबाद
२) लोकसाहित्य : स्वरूप आणि समीक्षा
३) भारताचे संविधान - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संशोधन संस्था , पुणे
४) बुद्ध आणि त्यांचा धम्म - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रथम आवृत्ती - १९७०
५) धर्म आणि साहित्य - प्रा. डॉ आगळे - स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, २०१६
*सांगाडा: एक षडयंत्राचा बुज्र्वा बुरुज- विश्वनाथ साठे यांचा आगामी संशोधनपर लेख



-विश्वनाथ साठे, [9921056462][sathe.vishwanath1991@gmail.com]
संशोधक विद्यार्थी, मराठी संशोधन केंद्र - के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत.






Comments

Popular posts from this blog