★★★शोषणाचा तिढा अन नितीतत्वांचा लढा★★★
"किती खोलवर विचार करतात माणसं..."
"आणि काय जगत असतील.निस्सीम.पूर्णांशाने...!"
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातून शिकत असतांना त्यावेळी साहित्याचा अभ्यास करताना काही महत्वाच्या साहित्यकृतीही वाचनात येऊन गेल्या. विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. मनोहर जाधव सरांच्या तासाला तर आंबेडकरवादी मतप्रवाहाचे विश्लेषण अगदी आग्रहाने ते सांगतात. अस्मितादर्शचा इतिहास, नामांतर चळवळ, दलित साहित्याच्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि सामाजिक स्तिथी सांगताना खूप खूप गोष्टी खूप मार्मिक व समीक्षेची साधने हाताळत सांगतात. त्याबाबतीतही तुमच्या विषयी माहिती आणि वैचारिक साहीत्य विषयी सखोल अशी चर्चा घडून येई.
"तिमिरातुनी तेजाकडे" हे सदर नियमित वाचत आलो आहे. पहिल्यांदा याचा मला खूप जड शब्दशः अर्थाने चिकित्सक अभ्यास अवघड वाटत होता. पण वाचत होतो ते काहीतरी मोलाचे आहे म्हणून अवघड करून करून ठेवलेले असते ही लहानपणाची वेडी धारणा घेऊन वाचत होतो.
एक लेख दोन तीन वेळी वाचून घ्यायचो. हे लेखन आणि "फिरस्तीकार" उत्तम कांबळे सरांच्या लेखाखेरीज राजन गवस सरांचंही लेखन आवडत होतं. तेही वाचू लागलो. ते विचार काहीतरी सांगू पाहत होते. यशवंत मनोहर यांच्या कवितेतील शब्द पुन्हा पुन्हा स्मरतात,
"कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे..!" या वाक्यात मला गाव, माझं घरचं शाऱ्यातल्या खालच्या एका गावाच्या दुःखाचं टळटळीत जिणं फोडासारखे वेदनामय जाचन वाटतं. हा रोग आपलाच आहे काय? बिमारी फैलवणारा. खरंच अजून शिक्षणाच्या प्रवाहाची धार या तळातल्या माणसाने पाहिली नाही. म्हणून की काय असे वाटू लागते, अजूनही गावकुसात धनिकांनीे ठरवून ठेवलेले गुलामी जीवन रहाटगाडग्यासारखे सुरूच आहे. ही काळाची शोकांतिका आहे असं वाटतं. असा अडाणी समाज आणि ग्रामीण जाणिवा असतांना तुमच्यासारखी विषयांची जाण असणे आज गरजेचे आहे आहे. ती जाणिव तळागळपर्यंत पोचली पाहिजे असे वाटते.
सामाजिक सत्तेने गुन्हेगार म्हणून संबोधल्या गेलेल्या माणसांना जनतेने परिघाबाहेर फेकले आणि त्यांना जगण्याच्या नियमांच्या समूह माध्यमातून बहिस्कृत केले. कारण या समाजाकडे उद्योगी साधने नाहीत. भांडवली व्यवस्थेने श्रमाच्या माध्यमातून शोषण करणारी नितीमत्ता जगण्याच्या पद्धतीत आणली. एकीकडे अन्नान्नदशा व संघर्षाची मूलभूत पीडन दाखवणारी मालक वर्गाची मनोभूमिका जातीला अन्याय सहन करायला लावून, साहून भांडवलशाहीने पोटासाठी लाचार बनलेल्या परिस्थितीचा शिकार बनलेली माणसे होत. उदाहरणार्थ कोंबडीचोर कथेमधील गंगाराम म्हणतो, “मला घर नाही. दार नाही. नाही पोट पुढे आणि मी त्याच्या मागे असा धावतो आहे. तर चोरी नको तर काय करू?" कोंबडीचोर कथेमधील गंगाराम पोटासाठी गावकऱ्यांच्या घरांपुढे, उष्ट्यासाठी अंगणात ताटकळत बसलेले अनेक महारमांग या अस्पृश्यतेसारख्या सामाजिक प्रश्नापेक्षा आर्थिक विषमतेचा प्रश्नाशी झुंजत असतात. त्यामुळे अति हाल-अपेष्टा हलाल झालेला अनुभव हा अधिक ताकदीने त्या साहित्याच्या परिप्रेक्ष्यात व्यक्त झालेला दिसतो. त्या व्यक्तता दैन्य दारिद्र्य दुरावस्थेने व्यापलेल्या माणसाच्या निर्देशक आहेत. भुकेच्या निर्देशक आहेत.
सौंदर्यशास्त्राचा व नीतिशास्त्राचा उल्लेख आहे तो खोलवर अर्थाअर्थी सम्यक मूल्यव्यवस्था निर्माण करण्यासाठीचा असा विचार आहे. कारण की सौंदर्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून जे वाचत आहे, जे वास्तवात समाजात आहे त्याची ताळमेळ बसत असतानाच किंवा सखोल विश्लेषनीय हिशोब केला तर प्रस्थापित नीतिशास्त्र उलथून टाकावे असे वाटते. कदाचित हा विचार प्रवाहाचा प्रभाव आहे असे अभ्यासाअंती समजू लागते तेव्हा विचारांत तटस्थता येते. परंतु प्रस्थापित सौंदर्यशास्त्र हे शास्त्रदर्जा असलेले असतांना पडलेल्या बाजूचा ते विचार कधीच करतांना दिसत नाही. उलट त्याची बाजू बुजवून टाकण्यात शिवत्व ते मानत आहे. केवळ गोऱ्या कातडीचा शिवात्म दृष्टीने विश्लेषण आणि नीती सांगणाऱ्या शास्त्राला एकलखुऱ्या शास्त्राचा दर्जा द्यावा लागेल. आधाराच्या घराला जसे मोडायचे त्यासाठीआधारच काढून घेतला जातो. तसे हे प्रस्थापित सौंदर्यशास्त्र रंगाधर्माच्या कमीपणावरून मानवी घटकाला न्यून समजत जाते. आणि जगण्याचा जणू हक्कच हिसकावून आपली अस्तित्वता टिकवत राहते. वास्तविक पाहता रंग हे तर निसर्गतःच मिळतात. त्यात गोरेपान असणे हे सौंदर्यनिकष कसे ठरू शकेल? तसेच काळेपणा हादेखील सौंदऱ्याचा विषय कसा ठरेल? हे समजून आहे. पर्यायी आंबेडकरवादी सौंदर्य शास्त्र म्हणणे उपयुक्त ठरते का असाही सवाल आहे; कारण आंबेडकरवाद हा समता, बंधुत्व, न्याय व मूल्यजाणिवा निर्माण करणारा विचार आहे. त्यात हुकूमशाहीचे विरोध करणारे आणि समतेचा जागर घालणारे तत्त्व आहे. बाजारू मानसिकता निर्माण करून गुलामी व्यवस्थेचे पाईकत्व लादणाऱ्या सौंदर्याला जनतेने चुकीच्या भ्रमाने डोक्यावर घेतले आहे. हा भ्रम असा की, जे सौंदर्य मुळात अव्याख्येय आहे. अविश्लेष्य असे आहे. त्याची व्याख्या करता येत नाही. हे प्रस्थापित्व निर्माण करणाऱ्या शास्त्राला शास्त्र म्हणून अभ्यासकांनी का अंगीकारावे?
अभ्यासक या नात्याने प्रस्थापित आणि विस्थापित्व निर्माण करणाऱ्या बाजू उचलून का धराव्यात? असा सवाल उभा राहतो. या संवाद-वाद-विरोध तत्वाला समतोलता आली पाहिजे.
"रंगावंग्या दुनियेत कातडीला किती अनाठायी महत्व दिले जात आहे? की जी कातडी सरणाच्या पहिल्याच भपक्यात जळून ठिक्करकबाब होते. करपट वासानं नेस्तनाबूत होते. बाजारू मानसिकतेने रंगाचेही जातधर्म तयार केले आहे. काळं आणि गोरंभोरं हे कदापि सौंदर्य होऊ शकणार नाही. ते तर निसर्गतःच निर्माण होणारे रंग आहेत. त्यातल्या एकालाच सौंदर्यतत्व मानणे कितपत योग्य? मात्र सौंदर्यकल्पनांनी जाणिवांच्या कोटीवर रंगाची डाईंग करणारी विचारसरणी हे जाणायला तयार नसते. यामागे सामजिक नितीतत्व उभे आहे. की ज्या नितीशास्त्राला इथे भारतीय परिप्रेक्षात प्रेरीत होतांना धर्माच्या पदरात जागा मिळते. सौंदर्याविषयीच्या सामाजिक जाणिवाही थिट्या आणि विषम स्वरूपाच्या तत्वाने वसवल्या आहेत. लैंगिक समानता या तत्वज्ञानात नाही. मुळात पाहता सौंदर्याची व्याख्याच करता येत नाही.ते अव्याख्येय आहे. अविश्लेष्य असे आहे. त्याला कोणत्याच प्रकारच्या कसोटीत बसविता येत नाही. सौंदर्य ही बाब गुणात्मक असून केवळ ती बाह्यांग किंवा अंतरंगावर अवलंबून नाही. चांगुलपणा आणि विवेकाच्या सत्य वापरावर सौंदर्य विराजमान होत असते.म्हणून आज शैक्षणिक अंमल प्राप्त प्रस्थापित असलेल्या सौंदर्यशास्त्राची फेरमांडणी करावी लागणार आहे.
रावण आणि शबरीचे सौंदर्यशास्त्र नीतीच्या अंगाने मांडणे गरजेचे असतांना स्त्रीदेहाच्या विटंबना करणाऱ्या प्रस्थापित सौंदर्यशास्त्रास्र शास्त्राचा दर्जा मिळावा? हा प्रश्न डोक्यात होता. विचार करत होतो. साहित्याचा अभ्यास करताना फर्ग्युसन कॉलेजच्या मराठीचे प्रा. आगळे सरांशी तासांमधून चर्चा घडत होती. तुकाराम-कबीर यांनी दिलेले नीतीतत्व सद्याच्या सौंदर्यशास्त्रातून निर्मित होत नाही. तर आजचे नितीतत्व हे उलटपक्षी बाजारू विचारसरणी सामाजिक नीतिमत्तेच्या बाजूने उभी राहते आहे. आज वास्तवात सम्यक शिकवणी कमी कमी होऊ लागली आहे. या काळात शरद पाटील यांचे सौंदर्यशास्त्र वाचून झाले आहे.
प्रतिमा आणि प्रतीकांचा लढा आता मूल्यांकडे झुकलेल्या काळात जे जगतो त्या भाषेची मांडणी साहित्याने आणावी तेव्हा वास्तवाला न्याय देता येईल. 1990 नंतर खाऊजा धोरण अर्थव्यवस्थेत आले. आणि जगाची दिशाच बदलली. जगण्याच्या पद्धतीने नवे वळणं घेत नवा अर्थकरणाचा पायंडा पाडला. जे जगणं बदललं ते लिखाणातून अभिव्यक्त केलं जावं. आजचा कास्टिंजम जातीने नाही तर अर्थकारणाचा मुखवटा घालून आहे. अर्थक्रांतीच्या ध्रुवाला वळविण्याचे षडयंत्र आहे. नव्वदिपूर्वीच याची पातळीयुक्त घडी बसविण्यात आलेली आहे. यामुळेच मानवी मूलभूत गरजा भागविण्यासाठी ज्या नव्या विचारांचा शिरकाव झाला तो शहराने मोठ्या प्रमाणात उभा आहे. यात मुख्यत्वेकरून सेक्सवर्कर, हमाल, भिकारी, कष्टकरी, मजूर, कामगार यांना वापरून ब्युरोक्रोसीला पूरक व्यवस्था निर्माण केल्या गेली. गरजा भागविणारी यंत्रणा उभी राहिली. कारण नव्वदीच्या काळात स्थलांतरितांचे प्रमाण हे बहुसंख्य आहे. गावातला गरीब व मजूर शहराने धावू लागला. त्याच्या शारिरीक, लैंगिक गरजा भागविण्यासाठी व्यवस्था निर्माण झाल्या.
कामगारी, श्रमिक, मजूर, कष्टकरी तळहातावर ज्यांची पोटे असतांना किंवा जे भूक भागविण्यासाठी जिवाचे रान करत आहेत. ते लोकं बाह्य आकर्षित सौंदर्यासाठी इभ्रतीचे लचके पैशावारी बाजारात विकणार्या मानसिकतेला आर्थिक मक्तेदारीने ग्रासून घेतले आहेत. हा काळ किती छचोर जिणं जगवीत आहे. याने जीव पिळवटून निघावा असा एक प्रस्तर सामाजिक जाणिवांच्या विश्लेषणात आढळतो.
या टप्यावर सांगू इच्छितो की, यानुषंगाने प्रस्थापित साहित्यिक नवख्यांना वारा लागू देत नाहीत. हे अनुभवांती सांगतो. आर्यपूर्व भारतीय सिंधू संस्कृती विषयीचा विचार अत्यंत मोलाचा वाटला. म्हणजे 19व्या शतकातील महात्मा फुलेंनी परखडपणे विचार मांडला तो विचार मूल्याधिष्ठित व सर्वानुमते समानतेचा विचार ठेवला होता. जे सांस्कृतिसापेक्ष तत्वज्ञान दिले गेले. त्यानुषंगाने आपले विचार आजच्या पिढीसाठी मोलाचे वाटतात. फलप्रमाण्यवादी जॉन ड्युई पटू लागला आहे. ती काळाची गरज आहे. असे सांगतांना डी.एन.ए.ची संदर्भितेही निगरगट्ट विचारसारणींशी लागेबांधे सांगू लागतात. हे नाही पटले तर विद्यार्थी न होणे सोयीस्कर. संविधानाबद्दलची नव्या पिढीकडून असणारी अपेक्षा आणि कर्तव्ये अमच्यासारख्या नवख्यांना समजून सांगणे किती मोलाचे आहे. हे विचार पटत जातात. कारण संविधान नष्ट करणाऱ्या विचारसरणीच्या सत्तालोलुप हुक्मि व्यवस्थेच्या काळात मानव जगत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय असेल तर तो फक्त संविधानी शब्दानेच आहे. हे पुढील पिढीस कळत जातात.
प्रामुख्याने डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेल्या गावाच्या व्याख्येत नवी धोरणं आली आहेत. खालचे आणि वरच्या गावचे जातींवार जे विभाजन होते ते दृढ झाले आहे. जितक्या जाती तितके गावचे तुकडे पडले आहेत. हितसंबंधावर आधारलेला गावगाडा एकीकडे नष्ट होत असतांना तितक्याच कसोटीच्या आधारावर समाजाला तडे बसत आहेत. गरजेचे अर्थकारण घेऊन असलेला गाव आज विसंगत झालेला वाटतो. आणि नव्या अर्थकारणाचा छाप गावावर बसला आहे. पूर्वीचा गाव कसा निर्माण झाला. झाला त्याची बुद्रुक, लहान, मोठं, वाडी, वस्ती, कसे झाले हे साहित्याने हेरलं पहाणे गरजेचे आहे. खेड्याकडे चला हा गांधीचा आणि खेडे सोडून शरहराकडे या हा आंबेडकरी विचारांचा विरोधाभास समजला पाहिजे. गावाची आवकळा कशी व का झाली आहे हे लक्षात घेऊन नवे उत्तरं शोधले पाहिजे.कारण व्यथावेदना तिथे रडत आहेत. त्याची कारणे या नव्वदीनंतरच्याअर्थ, समाज, धर्म, राज, नीती, शिक्षण, आरोग्य, राजकारण या ध्रुवीकरणात दिसून येतात. गावातील विषमता अजून कुठे नष्ट झाली? समानतेची वागणूक कोणत्या समाजाला मिळते. अजूनही दलितांवरील अन्याय-अत्याचार माणुसकीच्या नात्याने थांबले आहेत का? गुलामी नष्ट झाली आहे का? मालक व मजूर संघर्ष शांत झाला आहे का? असे आज अनेक प्रश्न तसेच आहे. ते सुटलेले नाहीत. आणि एकीकडे गाव बदलत आहे. आधुनिक यंत्रसामुग्री तिथे येत आहे. गावही काही अर्थाने डिजिटलायझेशनकडे वळत आहे. स्मार्ट होत आहे मात्र मानसिकता ही अजूनही देवळात धर्मत्व आणि अंधश्रद्धा निर्माण करण्यात तल्लीन आहे. माणसाला माणूस म्हणून नाही तर प्राण्यासारखी वागणूक देण्यात धर्म मानत आहे. हे चित्र बदलण्याचे आव्हानं लिहिणाऱ्या- वाचणाऱ्या- बोलणाऱ्या तसेच अभिव्यक्त होणाऱ्या माध्यमांवर, व्यक्ती, समूहांवर पडलेले आहेत. काल इतिहासात नव्हत्या तितक्या समस्या ग्रामसंस्कृतीवर येऊन ठेपल्या आहेत. म्हणून गावातल्या विषमतेवर परखंडपणे लिहिलं पाहिजे. वास्तव मांडलं पाहिजे.
इकडे शहरांना सूज आली आहे. येणाऱ्या स्थलांतरचा भरणा शहरी भोपळ्यात होतो आहे. आणि हा भोपळा फुगून जातो आहे. नव्या समस्या व प्रश्न निर्माण होत आहेत. शहराकडे येतांना वेशीवर जात गळून पडते आणि पुन्हा गावात जातांना ती वेशीतच अंगाला चिटकते. गावातून अर्थकारणाची धग बसलेल्या पाटलालाही इथे शहरात येऊन कामगारी जिणं जगणं भाग पडते आहे. की जो एकेकाळी धनिक आणि दौलतज्यादा असणारा गावकुसात होता. भांडवली अर्थव्यवस्थेने उत्पादन, विक्री, हिशोब, नफा, तोट्याचे राजकारण मानवी मुलभूत गरजांना दुय्यम ठरवून औद्योगिक विकासाला खतपाणी टाकण्याचे आज कोणत्याही देशात चित्र डिअर आहे. जगाचे अर्थ, समाज, राजकारण याला जबाबदार आहे. यामुळे पर्यावरणाचा तोल बिघडतो आहे. मानवी जीवनमान घटत आहे. आणि आरोग्ययंत्रणा खिळखिळी होतांना पुढे येत आहे. काळ झपाट्याने बदलत आहे आणि याला जोडून मानवी हालचालीही तत्परतेने बदलाची भाषा स्वीकृत करत आहेत. या आव्हानांचा तिढा सोडवण्यासाठी यत्न घेतले पाहिजेत. काळ आकलन केला जावा.
विवेकशील माणूस घडविणे आणि अन्यायाविरुद्ध लढा देणारे साहित्यिक, व्यवहार, आणि विचार तयार करणारा तात्विक विचार हा आज तितकाच अमूल्य आहे. शोषणयुक्त व्यवस्थेत पिढीचे अस्तित्व व मूल्यात्मक संघर्ष शब्दानिशी आयुष्यभर विचारात कोरल्या गेला आहे.
……………………………………
संदर्भ:-
अ)उत्थानगुंफा - यशवंत मनोहर
आ)फिरस्ती लेखमाला - उत्तम कांबळे, सप्तरंग, सकाळ
प्रकाशन
इ)आंबेडकर चळवळीतील अंतर्विरोध
ई)दलित साहित्य सिद्धांत: स्वरूप
उ)सौंदर्यशास्त्र - कॉ. शरद पाटील
ऊ)कोंबडीचोर - कथा - अण्णाभाऊ साठे
ए)धर्म आणि साहित्य - प्रा. आगळे
टीप - बालगंधर्व रंगमंच, पुणे येथे मा. यशवंत मनोहर
सरांशी भेट व चर्चा.
-विश्वनाथ साठे (9921056452)
sathe7869@gmail.com
संशोधक विद्यार्थी - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
Comments
Post a Comment