काल पर्वा खूप मानसिक त्रासात होतो. माहीत नाही का परंतु खूप मानसिक त्रास झाला. असे कधी तरी  होते. अशी एक मानसिकता असते. खरे तर मानव हा प्राणी जितका भावनिक तितकाच तो सामाजिक आणि जैविक आहे. त्याचे सजीवपण हा एक संवाद असतो विज्ञानवास्तवाचा. आणि त्याचे भावनिक होणे आणि तसे जगणे हा एक मानवी अस्तिवाचा प्रकार असतो. अस्तित्व आणि मानव असा एक भाग सजीवसृष्टीत अभ्यासायला मिळतो आणि हा भाग अभ्यासायचा म्हणजे मानवी अस्तित्वाचा गाभा तपासून पाहणे होय. जितकी निरीक्षणे आणि तपासणीपूर्वक पडताळणी करणे तितके परिप्रेक्ष यात उभे राहतात. आणि त्या परिप्रेक्ष्याचे अनेक असे प्रस्तर निर्माण होतात. हे परिप्रेक्ष्य समतोलदृष्टीने अभ्यासले की सजीवसृष्टी जवळून पडताळा करता येते.

पृथ्वीतलावर आणि मानवी मनाच्या तलावर जी द्वंद्वे सुरू झालेली असतात त्याचा परिणाम सर्वांश  पृथ्वीतलावर आणि मानवी मनाच्या तलावर उमटू लागतो. केव्हा केव्हा तर हा परिणाम इतका भयंकर असतो की त्याची तीव्रता मापन करण्याच्या पद्धतीत बदल करावा लागतो. हा बदल करणे त्या तीव्रतेच्या कंपनावर ठरलेले असते. ही कंपने दोलनमय असतात. तितकी मापनाची लांबी रुंदी ही वैविध्यपूर्ण गुणोत्तर ठरत असते. आणि ती द्वंद्वे मापन करण्याची तंत्रे वैविध्यपूर्ण बनवीत असते. जितकी खोली तितकी मापनाची लांबी रुंदीची सीमा अंतर.
सहसा असे घडत नाही जे घडण्यासाठी प्रेरक असते. आणि त्याची प्रेरके ते घडविण्यासाठी उपयुक्त ठरणारी असतात. काही मानवनिर्मित घडते आणि काही निसर्गनिर्मित. परंतु त्या घटितांची काही एक समीकरणे असतात. आणि ती समीकरणे ही त्या घटितांच्या निर्मितीची कारणे ठरत असतात. शक्यता ही असते की, काय घडणार आहे आणि का घडणार आहे. याची संकेतने आढळून येतात. आणि संकेतने ह्या त्या समीकरणाची सूत्रे असतात. ही सुत्रे उलगडून तपासली गेल्यास घडणार्‍या घटितांची उकल कराता येते ?
एके दिवशी पृथ्वीतळात धरणीकंप झाला. तिच्या पोटातून जी हादरे निघाली त्यामुळे सगळ्या दिशा थरकापल्या गेल्या. सगळी प्राणिमात्र काळजातून थरारली. सर्व जीवसृष्टी जीवाचा हिंदकळा करत रानोमाळ हाबकली. झाडावरची पाखरं अस्थिर झाली. त्यांची घरं उध्वस्त झाली. धरणीकंप इतुका प्रचंड होता की सागराच्या लाटा उंचच्या उंच उसळू लागल्या. जळसृष्टी डळमळीत झाली. शेवाळप्रवाळ विस्कटून गेली. इथंभूत जलचर प्राणी जिवाच्या आकांताने गर्मळू लागली. ही उलथापालथ का झाली असावी ? कोणत्या कारणामुळे ही कंपने निर्माण झाली असणार ? पृथ्वीच्या तळाशी ही अशी उलथापालथ होण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते ? एखादा कंप इतुका प्रल्हयकारी असू शकतो का ? इतका विघातक असणारा मृत्युचा सापळा असतो का ? या धरणीकंपणाची तीव्रता कोणत्या स्वरूपाची असेल ? अशी कैक प्रश्न मनाच्या पटलावर उमटू लागली. त्यात एक मनाचा तळ गाठणारा प्रश्न होता तो म्हणजे, मानवाचे काय झाले ?
निसर्गात प्रत्येक गोष्ट घडते याचा अर्थ त्या गोष्ट घडण्याला कारणे असतात आणि ही कारणे कोणती असतात ती त्या घडणार्‍या गोष्टीची उकल करत असतात. यथोचित काय घडणार आहे आणि का घडणार आहे याची संकेतने आढळून येतात. संकेतने ह्या त्या समीकरणाची सूत्रे असतात. ही सुत्रे उलगडून तपासली गेल्यास घडणार्‍या घटितांची उकल कराता येते. हे विवेचन आपण मागील भागात अभ्यासले आहे. घडणार्‍या बाबींचा तपशील जर विवेकाने तपासला तर त्या घटनांची घटिते आणि त्या घटितांच्या मागील कारणे लक्षात येवू लागतात. कारणे आहेत म्हणून ती गोष्ट घडते आहे आणि कारणे संपली म्हणजे घडणार्‍या घटितांची शृंखला तुटल्या जाते. घटितांचा भविष्य संपतो. परंतु कारणे आहेत म्हणून त्या करणांना सांभाळत बसलो तर ?
विविध भाव भावनांचे विविध स्तर असतात. त्या स्तरांना त्या भावनांचे कंगोरे निर्माण झालेले असतात. त्या कंगोर्‍यांना जेव्हा स्पर्श होतो तेव्हा त्या त्या भावनांची चर लागते. ते चर बोथट, टोकदार, लवचिक तथा चपखल असतात. त्या कंगोर्‍याची बोथटता, टोकदारता, लवचिकता तथा चपाखलता ही त्या कंगोर्‍याची अंतरिक तथा बाह्यतम भूमिका असते.
आपण बाळगलेली सावधानता ही आपल्याला त्या त्या घटितांपासून दूर नेत असते. आणि ही दूर नेणारी प्रक्रिया घटितांचा परिणाम व स्वरूप एका दुसर्‍या टोकावरुन अभ्यासायला मिळवून देते. पृथ्वीतलावर झालेला धरणीकंप आणि त्यातून होणारी हानी याचा परिणाम व स्वरूप त्या सगळ्या प्राणिमात्रांना झाला की नाही माहिती नाही परंतु मानवाने त्या परिणाम स्वरूपांचा विचार केला आहे. आणि  म्हणूनच निसर्गातील प्रचंड संकटांशी सामना करत तो एथवर आला आहे. सजीवसृष्टीत मानव आपले अस्तित्व टिकवित आला आहे. त्याचे हे महाप्रयत्न डार्विनचा सिद्धांत आहे का ? की त्याही आधीचे  हे जीवनमूलक तत्वज्ञान आहे ?
एखादे तत्वज्ञान का वापरात येते किंवा वापरात आलेली तत्त्वज्ञानाची कृतीसिद्धांतने ही त्या वापराचे मूल्यभान दर्शवित असते. मानवी जीवन हे मूल्यभानाची कृती. जीवन जगण्याच्या पद्धतीत तत्त्वज्ञानांच्या वापराची कृती अंतर्भूत झालेली असते. आणि या कृतीसिद्धांतनाचे मूल्यांकन त्या तत्त्वज्ञानाच्या वापरावर होते. जीवन जगतांना जी कृतीसिद्धांतने आणि त्या कृतीसिद्धांतनाचा विचार मानव करत असतो त्या कृतीचे तत्वज्ञान आधी मानवी मेंदूत निर्माण झालेले असते. या तत्वज्ञानाची परावर्तने दर पिढ्यांवर होतात. ही परावर्तने होत असतांना मूल तत्वज्ञानात फार मोलाचा आणि सुक्ष्म बदलाव होत असतो आणि हा बदलाव काळाच्या परिप्रेक्ष्यात अत्यंत महत्वाचा असतो. म्हणजेच आजचे तत्त्वज्ञान आणि मुळचे तत्वज्ञान यात आज तफावत जाणवते परंतु याला बारकाईचा अभ्यास असावा लागतो. आजचे तत्वज्ञान हे मूळच्या तत्वज्ञानाचे मूळ स्वरूप आहे का ? 

-विश्वनाथ साठे ( 9921056462)

Comments

Popular posts from this blog