“अण्णाभाऊ साठेंची मूलगामी विचारधारा”
                                                                                

प्रास्ताविक 

                               गुन्हेगार जात म्हणून ज्या व्यवस्थेने जीवन जगण्यास प्रयोजित केले त्या मांग नावाच्या समुहात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. हा जन्म घेणे जर अण्णाभाऊंच्या हातात असले असते त्तर ते उच्चभ्रू जातीत जन्मले नसते का? अण्णाभाउंना उपेक्षित जीवन जगावे लागले.  तसे  जीवन त्यांच्यावर भारतीय समाज व्यवस्थेमुळे लादल्या गेले. आणि ही समाजाची मानसिक, सामाजिक, नैतिक, आर्थिक होरपळ अनुभवा आली. जगावी लागली. वाटेगाव शाळेतील चटके त्यांनी सहन केले नाही. तर उलटपक्षी मास्तराच्या डोस्क्यात दगड भिरकावला. आणि यामुळे संघर्षाच्या मुळात शिक्षण झालेच नाही. आणि पोटासाठी  वाटेगाव ते मुंबई पायीच प्रवास करावा लागला. कारण जिथे खायलाच पैका अडका नाही तिथे गाडीभाडे द्यायला कोठून दीडदमडी आणावी?
                                “मुंबईचा प्रवास भयंकर त्रासिक होता. हाताला फोड आणि पोटाला धोंड असा हा जीवघेणा संघर्ष अण्णाभाऊ जगले. आणि रस्त्यावरच्या पाट्या, सिनेमांचे नावे, भज्याच्या पेपरवरील बातम्या  आणि त्याहीअगोदर ज्ञानेशाकडून धार्मिक ग्रंथ ऐकूण, ओळींवर बोट ठेवून अक्षरफोड करून घेतली. आणि अनुभवांचे लिखाण करू लागले. यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या सहित्यातून जिवंत जाणिवांचा ठाव घेणारी शैली निर्माण झाली.” *(१) पुरुषसत्ताक व्यवस्थेने तमाशाला शोषण पद्धतीचे वळण लावले त्या तामाश्याला जगण्याचे साधन आणि कलामूल्ये जपणारी परंपरा आहे असे निर्विवाद सत्य अण्णाभाऊंनी लोकसाहित्याच्या जाणीवेत बहाल केले. तामाश्याला त्यांनी लोककलेचे प्रारूप प्रदान केले. म्हणून नव्या युगाचा तमासगीर म्हणून जनतेने त्यांना आपले मानले.  यासाठी त्यांनी प्रस्थपित मूल्यांशी झगडावे लागले. वैचारिक मांडणी केली. यासाठी परंपरागत शाहिरीला नवा आयाम दिला.  गणगौळणीला आणि वंदन देवतेला न करता जिवंत हाडांमासाच्या माणसाला प्रथम कवनी जागा निर्माण केली. छत्रपती शिवराय, जिजाऊ, मायभू आणि शेतकरी, कृषीवल संस्कृती आणि गणसंस्कृतीला स्थान दिले आहे. ह्या मुलत्व जीवन ऐतिहासिक जाणिवा लक्षात घेण गरजेचे आहे. याचवेळी त्यांचे पोटासाठी दाहीदिशा मुंबई पालथी घालणारे अण्णाभाऊ मुंबईच्या मलबारी आणि बकाली अश्या दोन्ही वस्त्यांची सुखदुखे जागत्या डोळ्यांनी पाहत रहिले.
                               “जे जगलो, जे पहिले, आणि जे जे अनुभवले तेच लिहिले आहे. कल्पनेचे पंखे लावून मला भराऱ्या मारता येत नाहीत.वास्तवाचा न्यायभूमिकेने शब्द लिहिला.”*(२) असे अण्णाभाऊंच्या लिखाणाचे साहित्यमूल्ये होत. म्हणून लेखनातून दाहक वास्तवाचे अनुभव वाचकांच्या जीवनजाणिवांना येतात. आणि ते दाहक जीवन अण्णाभाऊ जिवंतपणी जगले. आणि हा दलिती जीवनाचा लादल्या गेलेला विखर गाठीला बांधून आपल्या लिखाणाला प्रस्थापित साहित्याखेरीज दलित साहित्याल मानवतावादी साहित्यत्त्वाशी बांधील केले. नकारवादी जगाला नवा चेहरा देण्याचे महान कार्य अण्णाभाऊ यांनी केले. त्यांच्या साहित्यातून नवी जीवन जाणिवांचा उहापोह निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळते. यामागे त्यांचे जीवन जगण्याचे मुक्त राजमार्ग अनुसरण अनुभवायला मिळते. त्यांच्या साहित्यातील नायक नायिका आणि महत्वाची पात्रे अन्यायाला वाचा फोडणारे अश्या विचारांचे आहेत. न्यायाची भूमिका घेणारे आहेत. आणि म्हणून चळवळीच्या इतिहासातील ते वास्तववादी चित्रण दलित जीवनाचे प्रतीक बनले आहे. १९५० चा 'खुळंवाडी' हा कथासंग्रह शोषित, पिडीत आणि दारीद्र्याने गांजलेल्या जीवांचे कथन सांगणारा आहे. त्यानंतर 'बरबाद्या कंजारी' हा कथासंग्रह आला. यातून महानगरीय बकाल वस्तीत आपलं जीवन कंठणाऱ्या फिरस्त्या मानवी वसाहती जेव्हा शहराच्या अकर्षाणाचा केंद्रबिंदू ठरतात तेव्हा त्यांच्या डोस्क्यावून विजेचे तार सुख घेऊन जातात तसेच दुखाचे चटके घेवूनही जात असतात. महानगराचा हा वाढत जाणारा चेहरा कसा दुखः आणि वेदना घेवून जगत आहे. आणि याच महानगराचा एक चेहरा हा सुखाच्या दुलईत लोळत आहे. हा आर्थिक, सामाजिक, मानसिक, शारिरी आरोग्याच्या आणि वैचारीकतेने विकलांग होत चाललेल्या समाजाचा आलेख शब्दांच्या माध्यमातून त्यांनी रेखाटला आहे. आबी, कृष्णाकाठच्या कथा, भानामती, गजाआड असे अनेक कथासंग्रह अण्णाभाउंनी हातोटीने लिहिले. यातील बहुतेक पत्र त्यांच्या जीवनात कुठेन कुठे भेटले, जीवन जाणिवांच्या नेणिवांच्या पातळीवर ग्रासल्या गेले म्हणून अण्णाभाऊंनी वेगळी नातेसंबंधाची नाळ राखत साहित्यांच्या जगात उतरवले आहे. नायकांच्या मूल्यात्मक संघर्षाच्या खराखुरा इतिहास अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून अभ्यासायला मिळतो कारण साहित्य हा समाजाचा आरसा असतो आणि हा आरसा स्वच्छ नीतिमत्तेच्या आधारावर निर्मिलेला आहे. 


अण्णाभाऊ साठेंचा सौंदर्यशास्त्रीय दृष्टीकोन-
                               अण्णाभाऊचे सौंदर्यशास्त्र हे नितीमत्तेला निसर्गाच्या सत्याचा आणि न्यायाचा ठसा घालणारे असे आहे. मुंबईचे वास्तव हे बकाल वैदासिन्य आणि भाकरीसाठी मौताग झालेल्या सजीव प्राण्यांच्या जीवावर बेतलेले आहे. हा काळ त्यांच्या मूलगामी विचारधारेला कणखर करत नव्या समाजाची घडी बसवणारा असा आहे. कारण १९३५ पासूनच जागतिक स्तरावर मानवी वसाहतींवर भांडवलशाही विचारधारेने आक्रमण करणे सुरु केले आहे. एकीकडे अस्तित्ववाद पिकलेला आहे. मरण आणि माणूस हे नाते अगदी जवळ आहे. आणि मरणाच्या भूमिकेतून जगणारी आणि जगण्याच्या उर्मीतून नव्या जगाच्या मुल्यांची रुजवणूक करणारा हा मानवी समूह विविध तत्वाच्या विचारधारेने ग्रासून जात आहे. सहाजिकच या सर्व बाबींचा प्रभाव बड्या शहरांवर पडत आहे. मुंबई या पडसादातून वाचेल अशी परिस्थिती नाही. बेकारी, दारिद्र्य, महागाई, आणि कुपोषणाचा विळखा गरीब, मागास, आर्थिक विषमता असलेल्या जनतेला बसत आहे. मृत्यू जरी पुढ्यात असला तरीही जगण्याची जबर इच्छा असलेला जीव हा विजेच्या तारेवर, दगडी खाणीत, कोळश्याच्या खानाकामात, आणि डोंगर फोडत जगत आहे. आपला जीव मृत्युच्या दाढेत टाकत आहे. आणि हा जीवनमृत्यूचा खेळ अण्णाभाऊ साठेंच्या डोळ्यापुढे उभा आहे. वास्तवाच्या जगण्यातून लिहिणारा लेखक हे दुःखाचे जहाल विष पचवीत असणारे जग डोळ्यासमोरून घावून काल्पनिक जगाची निर्मिती करेल हे शक्य नव्हते. कारण तत्वांचा लढा हा वास्तवाच्या परिघातून जाणारा आहे. आणि वास्तव हे सत्य असते. सत्याला नाकारणारे अण्णाभाऊ यांचे तत्वज्ञान नाही. सत्याला पदराआड ठेवू कल्पनेचे भोपळे स्साहीत्यासाग्रव्र तरंगतांना अण्णाभाऊंच्या तात्त्विक विचारसरणीला पटणारे नव्हते.
                                                        सामाजिक सत्तेने गुन्हेगार म्हणून संबोधल्या गेलेल्या माणसांनीच या गोरगरीब जनतेला परिघाबाहेर फेकले आणि त्यांना जगण्याच्या नियमांच्या समूह माध्यमातून बहिस्कृत केले. कारण या समाजाकडे उद्योगी साधने नाहीत. आणि भांडवली व्यवस्थेने श्रमाच्या माध्यमातून शाषन आणि शोषण करणारी नितीमत्ता जगण्याच्या पद्धतीत आणली. 


मानवतावादी दृष्टीकोण आणि विश्वात्म विचारसरणी-
                               मुंबईच्या बकाल वस्तीत जीवन जगण्याचा आणि जगण्याची जबर इच्छा असलेला गुन्हेगार जमातीतल्या माणसाचे आणि त्याच्या जीवन जाणिवांचे जिवंतपणे अनुभव कथेतून अण्णाभाऊ साठे यांनी साकारलेले आढळतात. मूलतः अण्णाभाऊंच्या कथातील माणसे जीवनसंघर्षात खंबीरपणे असतात. जातीयसमाज व्यवस्थेने निर्माण केलेल्या सामाजिक विषमतेविरुद्ध त्या माणसाचा अहोरात्र झगडा चाललेला असतो. आणि हा झगडा केवळ कथेतला नायक करत नसून वास्तवात लेखक करत आहे. त्याच्या आजूबाजूचा समाज करीत आहेत. अण्णाभाऊ साठे करत आहेत. विषमतावादी व्यवस्थेला नकार देऊन समतावादी, स्वातंत्र्यवादी, मानवतावादी, मूल्यांचा परिपोष करणारी  विचारसरणी अण्णाभाऊ साठे आपल्यासमोर ठेवतात. एकूणच त्यांचे साहित्य हे समतावादी आणि  मूलतः मानवतावादी दृष्टीने निर्माण झालेले आहे. समाजाच्या दृष्टीने गुन्हा करायला लावणारी पण समाजाची पर्वा न करणारी ही बेडर काळजाची माणसे स्मशानातील, सोनं कोंबडीचोर, थडग्यातील माणसं, बरबाद्या कंजारी, रामोशी, विष्णुपंत कुलकर्णी यासारख्या  कथांतून दलितांच्या व्यथा वेदना व्यक्त करणारे अण्णाभाऊ वैचारिक रीतीने बंडखोर व आग्रही मातादी ठरलेले आहेत. ही बंडखोरी मानवतेला पूरक अशी बंडखोरी आहे. या कथानकातली नायक नायिका आणि इतर पात्रे न्यायासाठी पुढे झाली आहेत. संघर्षसाठी आपला लढा पूर्णपणे जोमाने लढणारी आहेत.
                               पोट भरण्यासाठी काहीही करणारी ही जमात आणि जगण्याचे मार्ग बंद झाल्यामुळे मेलेले मढे, मढयातील सोने वर उकरून काढणारा भीमा स्मशानातील सोनं कथेठिकाणी असं म्हणतो, "की मुंबई चाळून मला काम मिळालं नाही. पण राख चाळून सोनं मिळालं. माझी चुल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे?"*(३) या प्रश्नाचे उत्तर भीमाला गवसले. तेव्हा त्याला मिळालेले “सोने स्मशानातील” हेच सत्य जीवन जगण्याचे गोरगरिबांचे तत्कालीन मार्ग आहेत. त्यांना व्यवस्था कुठेही कामाला लावणारी नाही. कारण गोरगरीब हे मुळात अस्पृश्य आहेत. हीन आहेत. दलित आहेत. म्हणून भीमाने त्यासाठी त्यांनी केलेला कोल्ह्याउदांबरोबरचा आणि रानकुत्र्यांशी जो संघर्ष दिला. या झगड्यातून दर्शविलेला विरोध हा सामाजिक परिस्थितीचा व तिच्या शक्यतेचा व्यवस्थेशाहीशी आहे. मुळात लेखाकाधी विचारसरणीचा तो पाया आहे. आणि हा मुलभूत जगण्याच्या तत्त्वातून आलेला पायाभूत विचार अण्णाभाउंच्या साहित्यातून प्रखरपणे आढळतो. अंततः तो इथे माणसासाठी उमटवतो. एकीकडे अन्नान्नदशा व संघर्षाची मूलभूत पीडन दाखवणारी मालक वर्गाची मनोभूमिका जातीला  अन्याय सहन करायला लावून, साहून भांडवलशाहीने पोटासाठी लाचार बनलेल्या परिस्थितीचा शिकार बनलेली माणसे होत. उदाहरणार्थ कोंबडीचोर मधील गंगाराम म्हणतो, “मला घर नाही. दार नाही. पोट पुढे आणि मी त्याच्या मागे असा धावतो आहे. तर चोरी नको तर काय करू?"*(४) कोंबडीचोर मधील गंगाराम पोटासाठी गावकऱ्यांच्या घरांपुढे, उष्ट्यासाठी अंगणात ताटकळत बसलेला आहे. असाच महारमांगाच्या आयुष्यात अस्पृश्यतेच्या सामाजिक प्रश्नापेक्षा आर्थिक विषमतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे अण्णाभाऊंच्या साहित्यात अति हाल - अपेष्टा हलाल झालेला अनुभव हा अधिक ताकदीने व्यक्त झालेला दिसतो. त्या दैन्य दारिद्र्य दुरावस्था यांनी जागून काढलेल्या माणसाच्या निर्देशक आहेत. भुकेच्या निर्देशक आहेत. 


वसाहतवादी व्यवस्थेचे विच्छेदन- 

                              बव्हंशी विचार करता असा आक्षेप असतो की, अण्णाभाऊंच्या विचारसरणीला मार्क्सवादी व्यवस्थेने झपाटलेले आहे. इथे प्रकर्षाने मांडावे वाटते की, सकल मानवांचा कल्याणकारी आणि हितावह विचार करणारा मानवतावादी दृष्टीकोन हा कुठल्याही इझमला बळी ठरू शकत नाही. अण्णाभाऊ यांना विचाराने 'मार्क्सवादी' म्हणणे किती योग्य? कारण जगाच्या विचारधारेच्या रचनेचा आढावा घेतला तर मार्क्सवादी विचार काही राष्ट्रामध्येच आढळतो, फोफावतो आहे. बाकी जगभर मार्क्सवादी विचार का पोचला नाही हा सवाल आहे. अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट मार्क्‍सवादी विचारसरणीशी वेगळेपणाने बांधलेले होतेच होते. याचा अर्थ ते मानवतावादी नव्हते असे म्हणणे यथार्थ योग्य ठरणार नाही. पण त्यांच्या कथातून दलित साहित्याचे सामाजिक भान राखणारे विचार जास्त प्रतीत झालेले दिसून येतात. समाजव्यवस्थेने सोडविलेल्या आणि उरलेल्या उपेक्षित वंचित माणसाबद्दल त्यांच्या मनात अपार करून प्रेम व तेवढीच दया होती. त्या माणसाची सृष्टी ते जी त्याची आपली सृष्टी समजून होते. एके ठिकाणी ते लिहितात, “प्रतिमेला वास्तवाची गरज असते. आणि ती असणे आवश्यक असते. अनुभूतीची जोड नसेल तर आपण तर आपण का लिहितो? याचा पत्ताच लागणार नाही. ज्यांच्याविषयी मी लिहितो ती माझी माणसं आहेत. त्यांना जवळून पाहिलं आहे. अनुभवलं आहे."*(५)
              निव्वळ कल्पनांचे पंख लावून भरारी मारणाऱ्या कलावादी साहित्यिकांना अण्णाभाऊ यांचा जीवनाचा जीवनवादी दृष्टिकोन मार्गदर्शक ठरणारा असा आहे. अशा जीवन वास्तवाला घासून स्पर्श करणारी अण्णाभाऊंच्या लेखणीची प्रस्थापीत व्यवस्थेने कधीच दखल घेतली नाही.  त्यांना उपेक्षित ठेवले गेले. कारण जी लेखणी मुळात उपेक्षित जगाचे प्रतिनिधित्व करत होती. त्यांची दुःखे, वेदना आणि प्रेम चितारत होती. श्रीमंतीच्या रंगाने बरबटलेल्या शहरात उध्वस्त होऊ पाहणाऱ्या बेरंग माणसांचं जगणं चित्रित करत होती. जीवन किडने सांगत होती. प्रस्थापित व्यवस्थेवर धडाडेउडत होती. माणसाचे जिन्यामरण्याचे प्रश्न मांडत होती. मानवाचे  प्रस्थापित व्यवस्था शोषण करत होती. आणि हे शोषण केवळ आण्णाभाऊ साठे यांनी सांगितल्यामुळे त्यांना बंद करायचं नव्हतं. हा युगायुगाचा शोषणाचा धंदा प्रस्थापित व्यवस्थेला चालूच ठेवायचा होता. म्हणून आण्णा भाऊ साठे प्रस्थापित व्यवस्थेत उपेक्षित राहतात. माणसाचे प्रश्न मांडणे सोडले नाहीत तर ते लुटारू होतात. दरोडकर बनू शकतात. सामाजिक विकृती होतात. अशी सरकारी दरबारी फर्मान निघतात. हेच अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचे मार्मिक आहे. या माणसाची प्रश्न माणसं सोडू शकत नाहीत. व्यवस्था सोडू शकत नाहीत. मग व्यवस्था त्या माणसाचे शोषण का करते? का करावे त्यांचे शोषण व्यवस्थेने? अशी प्रश्न अण्णाभाऊ साठे आपल्या साहित्यातून विचारांच्या आधारावर व्यवस्थेला करू पाहतात. मग माणसं जीवानिशी सोडवण्याची जबाबदारी कोणाची? कोण या सामाजिक समतोल राखण्याची भूमिका घेणारे आहेत? विष्णुपंत कुलकर्णी ही दुष्काळावर भाष्य करणारी दुष्काळाच्या परिस्थितीवर बोलणारी कथा असेच सत्य घेऊन येते. महारांना चेतावणी देत विष्णुपंत सांगावा करतात की, “कसेही करून जगा. पण तुम्ही कुत्र्यासारखं मारू नका. काहीही झालं तरी तुम्ही तर माणसे आहात." मांग महार मठकर यांचा वाडा, बेडसगावचा खजिना लूट करून ते लोकं गुन्हेगार म्हणून अटकेत पडतात. तेव्हा प्रांत साहेबाला विष्णुपंत कुलकर्णी जाऊन बजावतात. “लोकांनी अराजक माजवने हे मला मान्य नाही. पण दुष्काळाचा व तिचा बंदोबस्त केला नाही तर प्रत्येकाला कुत्र्याच्या मौतीने मरावं लागेल. किंवा लुटारू होऊन जगावं लागेल. आणि कुत्र्यासारखं मरणारा माणूस नाही.”*(६) यातून अण्णाभाऊ यांचे स्वाभिमानी बंडखोर वृत्तीचे मत अभिव्यक्त होते. मानवाविषयीची तळमळ इथे प्रकर्षाने जाणवते. जिवंत माणसांचे जगण्याविषयीचे हाल त्यांना बघवत नाहीत. उद्विग्न न होता ते क्रांतिकारी विचारशैली आपल्या साहित्यातून वाचकांसमोर ठेवतात.
                      

मानसिक पातळीवरील संघर्ष आणि मुलतत्ववादी भूमिका- 

           निळू मांगाची कथाही अशीच प्रत्ययरूप आली आहे. त्या वेळच्या राजकीय तत्त्वप्रणालीवर धारदार वैचारिकतेचे घाव घालणारी ही कथा आणि कोंबडीचोर, बेरड म्हणून बदनाम पावलेला रामू म्हणतो, “तुमचं सरकार चोर पकडते. पण चोराला चोरी का करावी लागते. असा विचार करीत नाही!” असे तो तत्त्वज्ञानही सांगतो. याच प्रकारच्या फरारी व जिवंत काडतूस, बंडवाला, सावळा ही माणसं गुन्हेगार वृत्तीची. पण त्यांना खंत नाही. मनात अपराधीपणाची भावना नाही. आपण चोरी करतो. ते न्याय आहे. हक्काचे आहे. तसेच त्यांना वाटते. म्हणून ती माणसं जगण्यासाठी समाजाची अशी झुंज देतांना आक्रमक बनतात. उदाहरणार्थ रामोशी, अकबर, ईमानदार, ईमानदार यांच्या इनामदारांच्या अंगावर कुऱ्हाड घेऊन जाणारा, अलीम,  चार माणसाचा जीव घेणारा आपला प्राण उधळून देणारा रानगा ही आक्रमक माणसे आहेत. त्या कथेच्या नायकांना न्याय मिळणे तत्कालीन वास्तवाची परिस्थिती होती. आणि हा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न अण्णाभाऊ साठे नि त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून म्हणजे समाजाच्या नवीन दृष्टिकोनाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडला आहे. हा न्याय म्हणजेच साहित्य निर्मितीमूल्य आणि निर्माण अभिव्यक्ती जीवन जाणिवांच्या समवाय परस्परसंदर्भ सिद्धांताला सहमती मिळणारे वास्तव होय.
                                  अस्तित्ववाद आणि मूल्यात्म धोरण ह्या दोन्ही वादाने तत्कालीन जीवन पिळून निघालेले आहे. तो काळ वैचारीकतेने पेटलेला आहे. याचवेळी अण्णाभाऊ हे विचारशील अंगाने नव्या अनुभूतीची आणि जीवन जाणिवांच्या परिवर्तनवादी संस्कृतीची ठेवण करत आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या विचार तत्त्वातून अवतरलेली आणि निर्माण झालेली ही माणसं होती. तीच ही माणसे त्यांच्या जीवनाच्या एका टप्प्यावर त्यांना भेटलेली, त्यांच्याशी संबंधित असलेले, त्यांचे विचार पूर्वीइतकेच सत्यतेने होत. म्हणून जीवनाला ग्रासून गेलेल्या ह्या व्यक्ती होत. पण मात्र काही व्यक्ती आणि व्यक्तीविशेषनामे कलेच्या माध्यमात विलक्षण अशा स्वरूपाचे अवास्तव निर्माण झालेली असावीत का? असे  वाटतात. इरेनं गाढव खाल्ले, रामोशी, रानगा, ही माणसे इतंभूत मनाची वाटतात. इंदुमती शेवडे म्हणतात, “या माणसाच्या आकर्षणामुळे अण्णाभाऊंच्या कथा, कविता, कादंबऱ्या रोमॅण्टिक बनतात. त्यांची लाडी, आबी, भानामती, यातील ही दुनिया प्रत्येयकारी वास्तव वाटत नाही. ही दुनिया अण्णाभाऊंनी प्रभावी भाषेत रंगवलेली आहे. उत्तरार्धातील कथा अधिकाधिक सरस वाटू शकत नाहीत. कृत्रिमतेचा प्रभाव दिसून येतो. अण्णाभाऊंच्या मूळच्या वैचारिक पिंडाला रोमँटिक आधुनिकता वादाचा प्रभाव आहे काय? असा वाटायला लागतो.” हा आक्षेप जितका खरा वाटतो तितकाच वास्तव लिखाण व जागतिक मानवतावादी व्यूह घेतलेला समाजी चेहरा तत्कालीन पिढ्यांच्या पचनी पडलेला नाही. त्यात इंदुमती शेवडे यांची संभ्रमावस्था निर्माण व्हावी असे निर्मिती प्रक्रियेशी समीक्षात्मक धोरण योग्य वाटत नाही. 


साहित्यमूल्ये आणि निर्मितीप्रक्रिया सहसबंध- 

           अण्णाभाऊंच्या पात्र निर्मितीतील स्वभावामध्ये लाक्षणिक क्षमाशील वृत्ती उदारमतवादी वृत्ती व भोळेपणा, साधेपणा, धीटपणा, गंभीरता आणि शेवट सत्य करण्याची वृत्ती या मानवी स्वभावी तत्वांचा परिपोशी खच्चून भरलेली लक्षणे दिसून येतात. त्यामुळे  सारखी शुद्ध भावना अधिक प्रभावी आणि तीव्र जशास तसे असल्याचे जाणवते. त्याच्या जीवनाचे हितानुन्वे भाग पाडले. असावे म्हणून व्यक्ती कथा पात्रे व साहित्य पात्रे तत्वाच्या लढ्याच्या आणि सामाजिक संदेश असतात. निर्भेळ असतात. संघर्षाला उद्युक्त करणारी ती बंडखोर विचारसरणी तेजस्वी आणि कणखर अशी आहे की, “भीती नाही. ती खोटी नाही. ती रणशूर आहेत. कणखर आहेत. संघर्षसाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे आहेत. ही अण्णाभाऊ यांना भेटलेली माणसे आपल्या जीवनामध्ये जशी होती तसी त्यांनी रेखाटलेली आहेत. आपल्या साहित्यातून उभी करताना त्यांनी जशास तशी उभी केली आहेत. कारण की त्यांचे वास्तवाचे लिखाणतत्त्व त्यांनी सोडलेले नाही. कादंबरीतल्या संवादाने आणि पात्रअनुभूतीने अण्णाभाऊ मधील खऱ्या कलावंताची ओळख करून दिली. 'बरबाद्या कंजारी' या प्रस्तावनेत ते म्हणतात, “माझी जीवनावर फार माया असून मला माणसं फार आवडतात. त्यांची सर्व शक्ती महान आहे. ती जगतात. जगालाही जगवतात. त्यांच्या बळावर जगाचा पसारा चालला आहे. त्यांची झुंज त्यांचे हिमैतपणे जगणे यावर माझा विश्वास आहे. त्यांना विद्रूपकरून टाकणे मला आवडत नाही. नव्हे मला भीती वाटते या माणसांना वैफल्याच्या नावाखाली विद्रूप करू नये. वैफल्य हे तलवारीच्या सा धुळीसारखे असतं. ती धूळ झटकून टाकल्यावर तलवार लखलखीत करता येते."*(७) ही त्यांचीच भूमिका होती पण पुढे प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर प्रकाशकांनीही त्यांच्या स्वभावाचा फायदा घेतला. त्यामुळे नंतर 'लाडी', 'भानामती', सारख्या सामान्य कथा पुढे त्यांनी लिहिल्या. परंतु त्या कथाही नवी धोरणे घेऊन होत्या. जीवनाच्या मूलगामी विचारांचा आठव होता. निसर्ग आणि मानवसानिध्याच्या आणि त्यांच्या अतूट नात्याच्या संबंधावर कुणीही घाला घालू शकत नाही. अशी त्यांची विचारधारा होती. जीवनजाणिवा आणि तत्वप्रणालींच्या माध्यामतून निसर्गसबंध आणि मानवी जीवनसाहचर्य अण्णाभाऊ यांनी अप्रतिम विचारांच्या ठाई काबीज केलेले आहे. हे विसरता कामा नये. “अण्णा भाऊंच्या साहित्यातील जाणिवा ह्या अस्पृश्यतेसारख्याच ज्वलंत प्रश्न निर्माण होण्याऐवजी आर्थिक प्रश्नांभोवती गुंफलेल्या आहेत. दलितत्त्वाचा त्यात परिपोष पूर्णपणे आला का नाही? हा प्रश्न तसेच आर्थिक विषमता व भुकेची भीषणता अधिक प्रखरपणे तसेच व्यक्तीरेखाटनावर भर जोमाने आला आहे. मात्र त्यार्थी दलित जाणिवांचा ठाव दिसून येत नाही.” अशी आंबेडकरवादी साहित्य प्रवाहातील आणि ग्रामीण साहित्यप्रवाहाच्या विचारधुणीराची विक्षेपी भूमिका असते. अश्याप्रकारचे अण्णाभाऊंच्या साहित्यनिर्मितीच्या बाबतीत आक्षेप आहे. परंतु दलितांचे सांस्कृतिक - सामाजिक मागासलेपण हे माणूस म्हणून समाजात राहिलेल्या, भुकेने व्याकूळ झालेल्या बहुसंख्य माणसाचे सांस्कृतिक मागासलेपण आहे. त्याचे कारण म्हणजे ववास्तविक आर्थिक विषमतेत आहे. हे अण्णाभाऊ साठे आपल्या साहित्याच्या आणि विवेकाच्या अंगाने विचारातून स्पष्टपणे मांडत राहतात. हे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक दृष्टीकोणाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक जीवनजाणिवांवर सुद्धा प्रकाश टाकणारे आहे. अण्णाभाऊंचा व्यक्तिगत दृष्टिकोन हा सामाजिकदृष्ट्या मानवतावादी दृष्टिकोन सांगता येण्यासारखा आहे. या परिस्थितीवर आंबेडकरवाद आणि मार्क्‍सवाद आर्थिक विषमता आणि सामाजिक समता आणि एकतेतून परिवर्तनाची भूमिका साधण्याचा मार्ग अवलंबतात. हेही सत्य नाकारता येणार नही. तेव्हा आपसूकच हे विक्षेपी आक्षेप गळून पडतात.  

                                
आंबेडकरवादी भूमिका आणि मार्क्सवाद तत्वप्रणाली- 

                                 अण्णाभाऊंनी या नजरेतून समाजाकडे न्याहाळले नसते तर त्यांच्यातील पिढीजात कलावंत व सृजनशील लढाऊवृत्तीचा सामाजिक कार्यकर्ता समाजापुढे आदर्श घेऊन उभा राहिला नसता. हेही तितकेच सत्य आहे. कारण त्या काळाबरोबर आंबेडकरी जाणिवा ह्या अण्णाभाऊंना भाकरी मिळवून देणाऱ्या संघर्षाच्या ठिकाणी आपसूकच कमीपणाने येत होत्या. त्याउलट तिथे मार्क्सवादी प्रभावीपणे आपली भूमिका भुजंगेफनीपण उभे करत होता. औद्योगिक जगाचे हे द्योतक होते. जे जे अण्णाभाऊंनी डोळ्याने बघितले ते ते वास्तव विवेकाने लिहित राहिले. हाताला फोड येऊनही कामे करून जगले. भाकरीसाठी मौताग होत राहिले. हे अनुभव त्यांच्या कथेच्या नायकांना न्यायाची भूमिका घेणाऱ्या निर्मिती आणि मूल्य निर्माण करणाऱ्या अभिव्यक्ती जाणिवांच्या परस्परसंबंध सिद्धांताला सहमती मिळणारे असे वास्तव आहे. दलदलीत जीवन पाहिले, अनुभवले आणि जगले त्या दलित जीवनाच्या नव्या जीवनजाणिवांना औद्योगिक आणि भांडवली जगाच्या आरशाने मार्क्सवादी चेहरेपणाचे दर्शन अण्णाभाऊंनी दाखवून दिले. ते म्हणत, “मी जीवन जाणिवांच्या लढ्याच्या घाटात कलेचा चेहरा प्रखरपणे निर्माण केला. आज पर्यंत जात - समाज - वर्ग - समूह हा बिनचेहर्‍याचा - गुन्हेगार - अस्पृश्य - दळीत होता. त्याला साहित्याच्या शब्दात नवजीवन देऊन संघर्ष - स्वाभिमान आणि जगण्याची मूल्ये म्हणजेच विवेकाने जगण्याची बखर देऊन संघर्ष करण्यास इथपर्यंत आणून सोडले. पुढे त्यांनी लढत रहावे.” अण्णाभाऊ यांनी जगण्यासाठी हालचाल - श्रम - सत्कृत घडामोडी बहाल केल्या. येथील श्रमशील वृत्तीला नव्या धर्मशाही - भांडवलशाही विचारवंतांनी ज्यात विवेकवृत्तीने साहित्याच्या माध्यमातून जागा दिली ती मुळात वसाहतवादी अर्थव्यवस्थेची सत्ताकेंद्र धूर्त खेळी होती. हे अण्णाभाऊंच्या साहित्याने आणि विवेकाने दाखवून दिले. म्हणून त्यांच्या साहित्यातून परंपरागत मूल्यविरोधाचा संघर्ष दिसून येतो.
                                  प्रस्थापित परंपरेने निर्माण केलेल्या प्रथा – रीती - पद्धतीच्या वाईटातल्या वाईट गोष्टीला अण्णाभाऊ साठे यांच्या वैचारिक तत्त्वप्रणालीने तोड बसू लागते. आणि ही तोड व्यवस्थेला मान्य नाही म्हणून ते कधीकधी बंडखोरवृतीने लिखाण व लिखाणातून हा विद्रोह ठेवतात. हा मानवतावादी दृष्टिकोन असल्याकारणाने भाकरीसाठी झगडणार्‍या किंवा बेडसगावचा खजिना लुटणारे माणसं झुंजारपणे आपले जीवन जगत असतात. कारण अण्णाभाऊ साठे असे म्हणतात की, “भाकरी पेक्षा इभ्रत श्रेष्ठ आहे. इभ्रतीला जपलं पाहिजे." म्हणून त्यांच्या नायिका प्रसंगी लढाऊ व संघर्षाचा मार्ग अवलंबताना दिसतात. त्यांच्या कथा भाकरीपेक्षा इभ्रतीच्या सुष्टदुष्ट प्रवृत्तीवर प्रबळपणे प्रहार करून प्रस्फोट टाकतात. आजच्या दलित साहित्यातील विद्रोही क्रांतीमूल्यांची पहिली मुहूर्तमेढ अण्णाभाऊंच्या साहित्याने व विवेकवादाने, विचारधनाने लावलेली या ठिकाणी दिसून येते हे त्या क्षेत्रातील क्रांतिकारी बंड आहे. म्हणूनच ते दलित साहित्याने पहिले विद्रोही शिल्पकार ठरतात. 

निष्कर्ष- 

तत्काळीं जितका अस्पृश्यतेचा सामाजिक प्रश्न तितकाच आर्थिक विषमतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे अण्णाभाऊंच्या साहित्यात अति हाल - अपेष्टा हलाल झालेला अनुभव हा अधिक ताकदीने व्यक्त झालेला दिसतो. त्या दैन्य - दारिद्र्य - दुरावस्था यांनी छानून काढलेल्या माणसाच्या निर्देशक आहेत. भुकेच्या निर्देशक आहेत. भारतीय जनतेच्या आर्थिक, मानसिक, भावनिक, नैतिक, राजकीय, तात्विक,  शारिर शोषणावरील विरोधत्व निर्देशित करणाऱ्या आहेत. 

अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट मार्क्‍सवादी विचारसरणीशी वेगळेपणाने बांधलेले होतेच होते. याचा अर्थ ते मानवतावादी नव्हते असे म्हणणे यथार्थ योग्य ठरणार नाही. पण त्यांच्या कथातून दलित साहित्याचे सामाजिक भान राखणारे विचार जास्त प्रतीत झालेले दिसून येतात. 

समाजव्यवस्थेने सोडविलेल्या आणि उरलेल्या उपेक्षित वंचित माणसाबद्दल त्यांच्या मनात अपार करून प्रेम व तेवढीच दया होती. त्या माणसाची सृष्टी ते जी त्याची आपली सृष्टी समजून होते. 

दलितांचे सांस्कृतिक - सामाजिक मागासलेपण हे सांस्कृतिक मागासलेपण माणूस म्हणून समाजात राहिलेल्या, भुकेने व्याकूळ झालेल्या बहुसंख्य माणसाचे आहे. त्याचे कारण म्हणजे आर्थिक विषमतेत आहे. हे अण्णाभाऊ साठे आपल्या साहित्याच्या आणि विवेकाच्या अंगाने विचारातून स्पष्टपणे मांडत राहतात. 

आजच्या दलित साहित्यातील विद्रोही क्रांतीमूल्यांची पहिली मुहूर्तमेढ अण्णाभाऊंच्या साहित्याने व विवेकवादाने, विचारधनाने लावलेली त्यांच्या साहित्यातून दिसून येते हे त्या क्षेत्रातील क्रांतिकारी बंड आहे. म्हणूनच ते दलित साहित्याचे पहिले विद्रोही शिल्पकार ठरतात. 

           
संदर्भ:-
१)शंकर भाऊ साठे - ‘माझा भाऊ अण्णाभाऊ’ -  व्यक्तिचित्रण -  सुगावा प्रकाशन - १९८२ (प्रस्तावना)
२)अण्णाभाऊ साठे - 'फकिरा' - कादंबरी -  (प्रस्तावना)
३)अण्णाभाऊ साठे - 'स्मशानातील सोनं' -  कथा (इ.दहावी)
४) अण्णाभाऊ साठे - 'कोंबडीचोर' - कथा 
५)अण्णाभाऊ साठे - 'स्वप्नसुंदरी' - कादंबरी (मनोगत)
६) अण्णाभाऊ साठे - 'विष्णुपंत कुलकर्णी' - कथा - 
७)अण्णाभाऊ साठे - 'बरबाद्या कंजारी' - कादंबरी -  (प्रस्तावना) 

-संशोधक विद्यार्थी-
              -विश्वनाथ अर्जुन साठे (संपर्क-९९२१०५६४६२)
                                                                                                   -ई-मेल-   sathe7869@gmail.com

                              ***समाप्त***

Comments

Popular posts from this blog