“अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राची सामाजिक भूमिका”
प्रास्ताविक -
समाजच्या विकासाच्या टप्प्यात कला, विचार, समीक्षा, प्रबोधने, मानसिकतेची उकल करणारी तत्वे व सर्व प्रकारच्या शोषणाचे अडसर दूर करणारी प्रभावी मूल्ये पोषक ठरत असतात. साहित्य मूल्ये ही मानवी जीवनव्यवहारावर प्रभावी अंमल करीत असतात. नव्या काळासोबत नवा कोरा चेहरा घेऊन येणारी मूल्ये आणि त्यांची उपजावू विचारांची जन्मभूमी, कलाकार, साहित्यिक, लेखक आणि निर्माणाची शैलीरचना यांच्यासाठी सर्वस्तरावरील वातावरण पोषक असणे मात्र तेव्हढेच महत्वाचे. शोषणाचा विचार हा या पोषक वातावरणाला मुक्त असू देत नसल्याने त्याची समीक्षा - संशोधने काळपरत्वे व्हायला हवी. त्या त्या परिस्थितीची आणि विचारांची विश्लेषित करण्याची भूमिका निर्लेपपणे व्यक्त व्हावी.
साहित्याला असे अनुकूल वातावरण निर्माण करून देण्याचे तसेच समाज परिवर्तनाला राजरोस राजमार्ग बहाल करण्याचे कार्य तसेच शोषणाला नकार देत मासिके सहाय्यभूत ठरतात. त्याच धर्तीवर ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकाचा समाज मनावर प्रभाव निर्माण झाला आहे. शोषणाच्या प्रस्थापित विचारांना सुरुंग लावत मराठी साहित्य विश्वात प्रेरणादायी विचार या कालखंडावर केलेला आहे. शोषणाच्या वृत्तीने ग्रासलेल्या मानवकेंद्रीत धर्माच्या विचारानांही विचारविश्व समृद्ध करण्यासाठी या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ मासिकाने मदत केली आहे. साहित्य हा समाजाच्या मनाचा आरसा अशी समज केल्यास त्या आरश्यावर पडणारी धूळ, त्याचे अंधुकहोणे ह्या बाबीदेखील लक्षात घेता येते. आणि साहित्यातून उमटणारे समाजाचे प्रतिबिंब आणि त्याविषयी निर्माण होणाऱ्या शलाका तपासता येईल. विविधांगी सामाजिक मिती दृष्टीस येतील. साहित्यातून दिसणारा समाज आणि समाजातून निर्माण होणारे साहित्य असे देखील निरीक्षण – समीक्षण करता येतील. सामाजिक बदलांच्या परिप्रेक्षात साहित्यातूनही वैविध्यपूर्ण विचारप्रवाह त्या त्या काळात निर्माण झालेले आहेत. आणि हे प्रवाह त्या त्या कालखंडाचे विचारबिंदू असतात. त्यांच्यातील रोध – विरोध, संघर्ष – प्रतिसंघर्ष, सम – समानता आणि विरोधाभास संशोधकवृत्तीने तपासता येतात.
अविवेकी विचाराने होणारी समाजाची अवनती टाळत अन सर्वार्थाने होणारे सजीवांचे शोषण थांबवत पुरोगामी तत्वाची, विचारांची संकल्पना घेऊन आणि सामाजाच्या सर्वांगीण विकासउत्कलनाचा वारसा घेणारी ‘अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ’ महाराष्ट्राच्या धरतीवर निर्माण झाली.समाजामध्ये हा प्रबोधनाचा प्रवाह अखंड सुरु असतांनाही समाजाचे शोषण थांबत नाही. धर्म, राजकारण, अर्थकारण, औद्योगिकीकरण आणि भांडवली जगाने केलला शोषणाचा व्यवहार नष्ट होत नाही. समाजात एका बाजूला विज्ञानाची प्रगती तंत्रज्ञान आधुनिकतेचे वारे तर दुसऱ्या बाजूला धर्म, जात, रूढी, बुरसटलेल्या परंपरा, प्रतीगामित्वाचे विचार तसेच अंधश्रद्धा यांचे प्राबल्य आहे. अशा विरोधाभासमय कालखंडात मानवी जीवन व्यतीत होत आहे. अशावेळी मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना व्हावी, समाजाला नवी - परिवर्तनवादी सकलकल्याणार्थ दृष्टी यावी, समाज विचारप्रणव व्हावा, विज्ञानाची कास बाळगून शोषणाला नकार देणारा सामाजिक - मानसिक - भावनिक विकास व्हावा. एकूणच मानवाच्या मनुष्यत्वाच्या आड येणारा आणि त्यांचे सजीव असण्याचे हक्क नष्ट करणारा दांभिकपणा कमी होऊन परिवर्तनाच्या विचारांचा ठाव मांडणारा विचार ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ चळवळीने प्रयत्नपूर्वक निर्माण केलेला आहे. तो सातत्याने ‘अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ’ आणि चळवळीचे ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे जोपासण्याचे - वाढविण्याचे कार्य करत आहे.
१९९० नंतर वार्तापत्राची ध्येयधोरणे -
महाराष्ट्रामध्ये १९९०च्या काळात लहान - मोठ्या अंधश्रद्धेच्या घडणाऱ्या गोष्टींवर विचार केला जावू लागला. त्या घटना घडल्यानंतर क्वचितच अशा घटनांना वर्तमानपत्रात प्रसिद्धी दिली जायची. त्यावेळी माध्यमांकडेसुद्धा अशा घटनांकडे बघण्याचा न्याय्यपूर्ण कृतीकार्यक्रम आणि दृष्टीकोण निर्माण झालेला नव्हता. त्या माध्यमांकडे जर पुरोगामी विचारांचा पत्रकार असेल तर तो ती घटना वृत्तपत्रातून छापून आणायचा. आणि त्या घटनेला न्याय मिळवून द्यायचा. पण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्या घटनेची प्रत्यक्षपणे चिकित्सा करून, त्याची पोलखोल करून त्यातील वैज्ञानिक सत्य काय आहे? ते लोकांना सांगायची. कार्यकर्ते कृतिशील होते तसे आजही आहेत. कार्यकर्त्यांनी केलेली कृती व वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून मिळालेले सत्य, त्यांचे रिपोर्टिंग ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या’ अंकात छापले जायचे त्यामुळे मासिक नुसते बोलकें शब्द नव्हे तर ते कृतिशील असे कार्य आहे.
या कारणे मासिकातून वैज्ञानिक लेख, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार - प्रसार करणारे साहित्य, समाजातील अंधश्रद्धांचे स्वरूप, वाईट रूढी, वाईट परंपरा, घातक अशा पद्धती ज्या आहेत; त्या परंपरांना, अंधश्रद्धांचे निर्मूलन करण्यासाठी प्रबोधन करणे हा उद्देश ठेवून ‘लेखनातूनच प्रबोधन’ अशी पद्धती मासिकाने वाड्मयीन भूमिका अंगीकारली. "धर्मातील अंधश्रद्धा बुवाबाजीची भांडाफोड, धर्माचे अवडंबर, मंदिराची { देवाची } दहशत, बडव्यांपुजारींची, बुवा - बाबांची शोषणाची भूमिका, समाजातील अज्ञान, हतबलता, जादूटोणा, मंत्रतंत्र आणि भीतीच्या मानसिकतेला केलेल्या आव्हानांचा समाचार आदी घटकांवर अत्यंत परखड, तठस्थ, वैज्ञानिक भूमिका वर्तापत्रातून मांडलेल्या असतात."*(१) मानवनिर्मित संस्था, प्रभावशाली घटकयंत्रणेच्या चर्चेच्या केंद्रावर घेतल्या असून यातून अयोग्य - अवैज्ञानिक, इष्ट - अनिष्ट, शोषण - मानवी वृत्तीप्रवृतीचे विच्छेदन केले आहे. तत्वानिशी विश्लेषण केले आहे. प्रसंगी कार्यकर्त्यांचे जीवन गतप्राण झालेले आहेत. हे करत असतांना ह्या गोष्टी समाजाला समजाव्या, त्या जनतेच्या वाचनात उतरून त्यासाठी कार्य करणारी परिवर्तनवादी साखळी तयार व्हावी म्हणून वार्तापत्र खेडोपाडी, वाड्या - वस्ती - तांड्यावर गेले.
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत महाराष्ट्र्रातील वार्तापत्रे, नियतकालिके, पाक्षिके, साप्ताहिके यांच्या उद्देशाने नवी वळणे घेतली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हे समाजमाध्यमे अभिव्यक्तीची कडा बदलू पाहत आहेत असा हा ‘खाउजा’ काळ. शासकीय, धार्मिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि जैविक ताळतंत्रातून बदलाच्या मिती निर्माण होऊ लागल्या. समाजात होणाऱ्या उलथापालथ आणि त्यांचे साधकबाधक होणारे परिणाम, स्वरूपाची मांडणी जशी नव्वदी अगोदर केली जायची तशी आता जागतिकीकरण प्रक्रियेने त्यांची घडी बदलली. समाजमाध्यमे आणि घटित यांच्यातील परस्परसंबंध मांडणीचा हिस्सा खाजगीकरण – उदारीकरण – जागतिकीकरण या सिद्धांतानीशी मांडला जाऊ लागला. ‘सत्य – नीति – मूल्य’ या तिन्ही संकल्पना या काळात नव्याने तपासल्या जाऊ लागल्या. अभिव्यक्तीची प्रचलन आणि मांडणीची तंत्र अशी समीक्षणे याच काळात लिहिली जाऊ लागली. समीक्षेच्या संकल्पना थोड्याबहु विचाराने चळल्या गेल्या.
अंनिस वार्तापत्राची कार्यकृती आराखडे -
‘वार्तापत्राची’ साहित्य आणि विज्ञान, प्रबोधन आणि वाड्मय स्वरूपाची चर्चा सुरू होती. कार्यकर्ते हे वार्तापत्राचे लेखक झाले. त्या काळात मान्यवर लेखकांकडून लेख मिळवणे आणि तेही अंधश्रद्धा या विषयावर अवघड होते. कारण ह्या विषयातच महाराष्ट्र खरं तर नवीन काम करत होता. आणि याकडे लक्ष घालायला कोणीही तयार नव्हते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याकडे पाहणारे कोणी नव्हते म्हणण्यापेक्षा हे प्रमाण लघु होते. त्या काळात अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने ही भूमिका घेतली आहे. हा पुरोगामी महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा पर्वप्रवाह होता. पुरोगामी विचारसरणी महाराष्ट्रात होतीच. संत, सुधारकांचा वारसा, समाजसुधारकांची विचारसरणी होती. पण अंधश्रद्धा निर्मूलन त्यातला एक छोटासा भाग जो की, विज्ञानास पुढे आणत अविवेकाला भंग करू पाहणारा विचार मोठ्या चळवळीत रूपांतरित झाला. धर्मातील अनिष्ट प्रथेवर आणि रूढींच्या - विरोधात लिहावे, मासिक सुरू करावे असे होत नव्हते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ते करून दाखवले. चळवळीला वैचारिक जी मशागत लागते ती मशागत महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणीनेच दिलेली आहे. कार्यकर्त्यांनी स्वतःची क्षमता वाढवून अभ्यासू भूमिका व्यवस्थित राखून, वैचारिकता आत्मसात करून देण्याचे कार्य वार्तापत्राच्या भूमिकेतून दिसून यते.
‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे मासिक वाचकापर्यंत जाते. ते गेल्यानंतर ते त्यांना आवडते. "अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ कशी आहे? हे त्यांना समजते. आणि त्यांना असे वाटते की, ही चळवळ सर्वसामान्य माणसाची आहे. त्यात माझासुद्धा काही छोटासा प्रयत्न - सहभाग असावा. या हेतूने ते तिथे स्थानिक लोकांशी संपर्कात राहतात. सभेत हजर राहतात. अंधश्रद्धा व विज्ञान विषय समजून घेऊन त्यावर चर्चा करू लागतात. अंधश्रद्धा निर्मूलन वर्तापात्राला मदतही करतात. आणि प्रसंगी छोट्या मोठ्या प्रश्नांची उत्तरेही मागवतात. छोट्या मोठ्या घटनेत प्रत्यक्ष कृतीही करतात."*(२) ह्या मासिकाच्या प्रवाहाने संघटनेत आलेले कित्येक कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत. संघटनेतील काही कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या राज्यसमितीवरही आहेत. नव्या तरुणांना या प्रवाहात, संघटनेमध्ये आणायचे काम सुद्धा मासिकाच्या प्रेरणादायी हेतूने झालेले आहे. केवळ ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ रसास्वाद - वाचक- प्रतिसाद आणि वाड्मय आस्वाद असे एकांगी भूमिका न राहता कृतीशीलता हा प्रतिसाद राहिलेला आहे. म्हणजे साहित्याच्या प्रांतांतील एखादे वार्तापत्र केवळ साहित्याचे मापदंड निर्माण करत नसते तर ते जनसामान्यांच्या प्रबोधनयुक्त विकासाचे कृतिशील असे विचारप्रवाह निर्माण करते याचे सक्षम उदाहरण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र होय. याचा अर्थ असा नाही की वार्तापत्राच्या मर्यादा, उणिवा नाहीत.
‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकाचे वाड्मयीन मूल्यमापन त्याचबरोबर सामाज ज्या नैतिक मूल्यांवर उभा असतो अशा नैतिक आणि आणि सर्व प्राणीमात्र कल्याणार्थ मूल्यांच्या प्रतिस्थापनेसाठी घेतलेली भूमिका अभ्यासायला मिळते.
स्त्री मुक्ती चळवळ आणि शोषणासंदर्भात वार्तापत्राची भूमिका -
भारतीय समाज मुख्यत: पुरुषप्रधान राहिला आहे. अर्थात, केरळमधील नायर, मंगळूरमधील शेट्टी, बंगाली समाज व काही भटक्या जमातींमध्ये स्त्रीप्रधानतेचे प्रमाण दिसते. परंतु काही ठिकाणच्या लोकजीवनात स्त्रियांना सार्वजनिक जीवनातील सहभाग नाकारण्यात आला. या पार्श्वभूमीवर भारतात स्त्रियांची भूमिका, त्यांचे शोषण, न्याय्य अधिकार यावर आधारित चळवळी व संघटना उभ्या करण्याचा अंनिस वर्तपत्राचा प्रमुख विषय राहिला आहे. “परंतु, सर्वसामान्यपणे विचार करता, भारतीय समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान असल्याचे प्रकर्षांने जाणवते. तद्वतच, अनेक रूढी, परंपरा (अनेक धर्मातील) यांमुळे स्त्रियांवर अन्याय, शोषण, सामाजिक विभक्तीकरण झाल्याचे दिसते. स्त्रीमुक्तीची चळवळ आधी शारीरिक हिंसाचाराबद्दल बोलत होती, त्यानंतर मानसिक हिंसाचाराबद्दल बोलू लागली. घरात मोकळा श्वास न घेता येणं हा देखील हिंसाचारच आहे, याविषयी देखील मांडलं जाऊ लागलं."(३) भारतीय समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान दिल्या गेले आहे. वेदोक्त विधींपासून ते शैक्षणिक स्थानापर्यंत स्त्रियांचे प्रश्न भारतीय परिप्रेक्ष्यात अजूनही लक्षणीय अवस्थेत आहेत. शिक्षण न मिळाल्यामुळे जीवन व व्यवहार हे अज्ञानीपणाने आणि अंधश्रद्ध विवेकाने होत होते. रूढी – परंपरेतून होणारे शोषण तर ती निश्चित पद्धत आहे आणि त्याला आपण विरोध करता कामा नये अशी मानसिकता स्त्रीवर्गाची भारतीय समाज, धर्म, परंपरा व्यवस्थेने निर्माण करून ठेवली असण्याचा काळ होता. परंतु पुढील काळात म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुढाकाराने मुलींना शिक्षण तथा सामाजिक स्थान बहाल झाल्याने शोषणापासून त्या थोड्या का होईना दूर झाल्या आहेत.
महाराष्ट्रात मुरळी - देवदासी प्रथेविरुद्ध वार्तापत्र आणि कार्यकर्त्यांनी आवाज उठविला आहे. आंदोलने केली आहेत. आणि मुरळी - देवदासी प्रथा बंद व्हावी म्हणून शासनाकडे वैविध्यपूर्ण मार्गाने प्रयत्न केल्याचे वार्तापत्रातील त्या त्या काळातील मुरळी - देवदासी प्रथेसंदर्भात आलेल्या लेखावरून अभ्यासायला मिळते.
"देवदासी अर्पण करण्याचा समारंभ ‘शेंस’ विधी म्हणून ओळखला जाई. शेंस विधी हा लग्नसमारंभासारखाच असे. फरक फक्त इतकाच, की वर म्हणून पुरुषवेषातील मुलगी असे. केव्हाकेव्हा लग्न हे एका तलबारीशी किंवा कट्यारीशी होत असे. काळाच्या ओघात त्या रखेल्या म्हणून राहत. त्यांना नृत्य–गायनाचे विशेष शिक्षण देण्यात येत असे. त्यांच्यापैकी काही यशस्वी आकाशवाणी गायिका, चित्रतारका व नाट्य–अभिनेत्री झाल्या. अशा तऱ्हेने देवदासींचे दोन गट पडले : कलांवतिणी वा नायकिणी आणि भाविणी. पुरुष हे नाईक आणि देवली म्हणून ओळखले जात." *(४) स्त्रीवर्गावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या घटना व त्याविषयी आवाज उठवण्याचे कार्यही वार्तापत्राच्या इतिहासात ठळकपणे आले आहे.
जटा निर्मूलन आणि लैंगिक शोषण -
देवाला सोडलेल्या मुलींचे शारीरिक शोषण सर्रास होत होते. त्याविरुद्ध खेड्यापाड्यांत पथनाट्ये होत होती. "चंद्रगुत्तीतील नग्नपूजेविरुद्ध जनजागरण चालू होते. पण प्रत्येक खेड्यात एक गोष्ट प्रामुख्याने निदर्शनास आली ती म्हणजे खेड्यातील गौडर लोक पथनाट्याला विरोध करत होते . एका खेड्यात तर काठ्याकु – हाडी घेऊन ते कार्यकर्त्यांवर धावून आले."*(५) उत्तम कांबळे यांचे 'देवदासी आणि नग्नपूजा' या विषयावरील संशोधन ग्रंथलिखान तत्कालीन वास्तवाचे रेखाटन करते आहे. यानुसार त्या त्या भागात प्रबोधन करणारा युवकवर्ग तयार झाला आहे. हा युवक वर्ग शोषणाच्या परंपरा आणि प्रथांना विरोध करत त्या बंद करण्यासाठी विविध पातळीवर कार्यरत होऊ लागले लआहे.
"अनिष्ट रूढी, परंपरा, टगेगिरी यांना आळा घालण्यासाठी सामाजिक गटांतर्गत काही सकारात्मक नियम तयार केले जातात - काही होत असतात. जस-जसा समाज उत्क्रांत होत जातो तस-तसे नियमात बदल आवश्यक असतात. पण जातपंचायतीच्या नियमांमध्ये मात्र प्रबोधित पुरोगामी धारणा भावकी, गावकी ठेवत नाही कारण त्यांचे सामाजिक, राजकीय हितसंबंध त्यात गुंतलेले असतात."*(६) जातपंचायत आणि स्त्री शरीराचे लैंगिक शोषणाविरुद्ध प्रखर मताच्या आणि परिवर्तनवादी विवेकवाद असणाऱ्या लेखमाला अंनिस वार्तापत्र तथा सकाळ सप्तरंग पुरवणीतून छापून आल्या आहेत. आज समाजात जटा निर्मूलन पूर्णपणे झाले आहे असे म्हणता येणार नाही. परंतु समाज जनजागृतीतून शिकू लागला आहे. वाईट प्रथांना आणि शोषण असणाऱ्या रूढींना समाज दूर फेकू लागणारा हा काळ आहे. साहजिकच वार्तापत्राचा वाटा या कार्यात मोलाचा असा आहे. अंनिस वार्तापत्राने समाजात विवेका जागृती निर्माण केली आहे. समाज उन्नत व्हावा आणि आपल्या होणाऱ्या शोषणाला त्याने नकार करावा अशी शिकवण यानुषंगाने जनतेकडे जात आहे.
कैक दिवस डोक्यावरील केसांना तेल न लावल्याने आणि व्यवस्थित न विंचरल्याने डोक्यावरील केसांत जट निर्माण होतात. आणि ह्या जटा मेंदूच्या कार्यक्षम संचलनाला घातक ठरतात. शारीर हालचाली मंदावते आणि मानवी विकास खुंटतो. याविषयी जटा निर्मूलन करण्यासाठी प्रबोधने आणि ग्रामसभा घेत या प्रथेतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्रात विविध प्रयत्न झाले. स्त्री पुरुष समानतेचा विचार निर्माण करत सामाजिक तथा धार्मिक अशा अंधश्रद्ध प्रथा परंपरा मोडतांना महाराष्ट्र विवेकवादी जगतो आहे.
१९८९ च्या कालावधीनंतर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापयरतील वैचारिक संकल्पनेतून वैज्ञानिक, सामाजिक, भाषिक आणि सांस्कृतिक आविष्कार - स्वरूप साहित्यक्षेत्रात विकसित झाले. नव्याने वैज्ञानिक दृष्टीने संवाद सुरू करणारे 'अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र' च्या साहित्यव्यवहाराने जनमानसातील विचार प्रगल्भ होऊ लागला. यामुळेच मासिकातील तात्विक विचार, सामाजिक, वैचारिक, सांस्कृतिक, प्रबोधन अभिसरणाचे आणि जागृतीचे कार्य 'अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा'मधील कथांनी, आत्म प्रेरणेने, निष्ठेने कशाप्रकारे केले याचा शोध घेण्याचा हेतू प्रस्तुत अभ्यासात करणार आहे. जागतिकीकरण आणि सामाजिक वैचारिकता या कालखंडात 'अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र' मध्ये लिहिणारे लेखकांनी विविध वाड्मय प्रकार हाताळलेले दिसतात. त्यात कथा, काव्य, वैचारिक साहित्य, इत्यादी साहित्यप्रकार प्रकर्षाने जाणवायला लागतात आणि म्हणूनच आजही कथा ह्या नव्या नव्या रूपबंधात आणि रचनेत आकारात दिसत आहेत. काव्य तसेच वैचारिक साहित्यामध्ये जो प्रबोधन पूरक विचार येतो आहे, तो प्रकर्षाने या मासिकाच्या वैचारिक भूमिकेतून येतो आहे. विशिष्ट स्थल - काल आणि काळ यांच्या चौकटीत न राहता वैश्विक, तसेच भौगोलिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक परिसरात घडत असणाऱ्या घटनांमधून आणि सामाजिक परिप्रेक्ष्यातून कथांचे वातावरण, भाववृत्ती, कथानक, पात्र, निवेदन, पद्धती, भाषा, आशय इत्यादी इ. घटक या मासिकातून अभ्यासले जाणार आहेत. यामुळे मानसशास्त्रीय घटक, कालसापेक्षता आणि काळखंडाचीही मर्यादा लक्षात घेणे गरजेचे आहे.
निष्कर्ष -
१९८९ पासून प्रकाशित होणारे ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे मासिक लोकप्रिय होत तर गेलेच परंतु सामाजिक क्रांतीचा प्रवाह या मासिकाने निर्माण केला आहे. चळवळींचे बांधनीसुत्र या मासिकाच्या तत्वांतून उमटून दिसते आहे.
सामाजिक उन्नतीचा मार्ग आणि साहित्याचा कोश फोडत ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ परिवर्तनाचा विचार जन मानसात रुजवीत आहे हे नाकारता येण्यासारखे नाही. सामाजिक, आर्थिक, मानसिक, भावनिक, वैज्ञानिक दृष्टिकोन, नैतिक, शैक्षणिक प्रबोधनाचा विचार ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे मासिक देत राहते.
समाजातील विवेकवाद स्वीकारलेल्या कार्यकर्त्यांनी स्वतःची क्षमता वाढवून अभ्यासू भूमिका व्यवस्थित राखून, वैचारिकता आत्मसात करून देण्याचे कार्य वार्तापत्राच्या भूमिकेतून दिसून यते.
आजही समाजात भूतप्रेत - भानामती यांची मानसिक - भावनिक भीती दाखवून त्यापासून निवारण्यासाठी आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण उघड घडत आहे. मुरूळयांचे लैंगिक शोषण, शिक्षणाच्या परिघात वावरण्यापासून वंचित असलेले पोताराज भुकेच्या आकांताने दारोदार, रस्तोरस्ती भटकतांना दिसतात. देवधर्माच्या नावावर होणारी शोषणाची यंत्रणा सर्रास सुरु आहे. शोषणाचा गाडा अव्याहतपणे चालूच आहे. समाज ‘शोषण’ हे ‘शोषण आहे’ हेच मानायला तयार नसल्याच्या काळ आजही आहे.
‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे मासिक सामाजिक आणि वाड्मयीन स्तराला वैधानिक आणि वैज्ञानिक दृष्टी, वैचारिक बुद्धिप्रामाण्यवादी बैठक, तात्विक चर्चा, विवेकवादी विचाराचा, विवेकाचा, आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा आराखडा मांडत आलेले मासिक आहे. याचसाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकाचा प्रवास, लेखकांच्या भूमिका आणि समाजवास्तव, वेगळेपण, त्यामध्ये हाताळलेले विषय - आशय - शैली आणि त्यामुळे जन मानसावर निर्माण होत असलेले प्रभाव - परिणाम यांचा मेळ सकारात्मक आणि तठस्थपणे जाणून घेतला तर अधिक मोलाचे ठरेल.
आज समाजात जाती, धर्म, संस्कृती, भाषा, प्रांत या मानव जातीच्या तुलनेत एकूणच कमी महत्वाच्या घटकांवर दरदिवशी काहींना काही तरी वाद - विवाद, हिंसा, दंगली, शोषण मग हे कोणत्याही पातळीवरचे असो होत आहेच हे वास्तव. या परिस्थितीत एका बाजूला मानव तर दुसऱ्या बाजूला मानवनिर्मित संस्था, व्यवस्था, संघटना यंत्रणा यांच्यात चढाओढ लागली आहे. ‘मानवासाठी सर्वच’ हा सिद्धांत मागे पडतो आहे. आणि ‘सर्वांसाठी मानव’ अशी संज्ञा समोर येतांना दिसत आहे. जे की बहुतांश योग्य नाही.
चळवळीचे साहित्य आणि साहित्यातून चळवळींसाठी मिळणारी मूल्यांची रसद यांच्या विवेकवादी ठेव्यांवरून समाज संस्कृतीचा वारसा ठरत असतो. त्यामुळे ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ने समाजाचा गाभाघटक { Core Element } विवेकी, परिवार्तनवादी विचार याला आपला केंद्रबिंदू मानले आहे. याच दिशेने वाटचाल केलेली आहे.
वास्तव जगण्यात घडणारे प्रसंग, घटना, रोध - विरोध, धर्मांध वृत्तीतून शोषणाचा वाहणारा प्रवाह, माणसाला विचारप्रणव करणारे विषय, वैज्ञानिक दृष्टीकोन, योग्य - अयोग्याचा ठाव, ज्वलंत समस्या इ. सामाजिक घटकांना व जाणिवांना प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने समाजात असलेली अंधश्रद्धा कमी केली. पारंपरिक मूल्यासंदर्भात समाजाला डोळसपणे विचार करायला शिकविले आणि चुकीच्या श्रद्धा त्यागून अनेक विवेकी संकल्पना समाजात रुजवल्या. धार्मिकता, देव - दैवीकता, धर्म, रूढी, समजुती यातील कर्मकांडाच्या माध्यमातून होणारी सर्वसामान्यांची पिळवणूक थांबवण्याचे काम अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने केले.
संदर्भ:-
(१)नरेंद्र दाभोळकर - 'प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे' - (डी.व्ही.डी.) निर्माते -
मॅग्नम ओपस कंपनी.
(२) नरेंद्र दाभोळकर - 'श्रद्धा-अंधश्रद्धा' राजहंस प्रकाशन,
२००२
(३) डॉ. विद्या बाळ - 'मिळून साऱ्या जनी' (नियतकालिक अंक)
पाचवा, जानेवारी १९९१
(४) स. द. पुणेकर ; स्नेहल फाटक; अच्युत खोडवे - 'मराठी
विश्वकोष संदर्भ' , ('मराठी विश्वकोश')
(५) उत्तम कांबळे - 'देवदासी आणि नग्नपूजा' लोकवाड्मयगृह
प्रकाशन, २०१० (ISBN:10)
(६) कृष्णा चांदगुडे - 'जातपंचायती व बहिष्कार विरोधी'
कायदा' (लेख-परिवर्तनाचा वाटसरू, अंक-२०१७, )
-विश्वनाथ अर्जुन साठे (संपर्क-९९२१०५६४६२)
-ई-मेल- sathe7869@gmail.com
***समाप्त***
Comments
Post a Comment