★★★श्रद्धा - अंधश्रद्धेतील 'स्पेस' समजून घेतांना★★★

मनुष्य स्वभाव हा मुळातच जिज्ञासू आहे. प्रश्न विचारणे, निर्माण करणे हा गुण प्रत्येक मनुष्याचा अंगात उपजतच असतो, उदाहणार्थ लहान मुले अनेक प्रश्न विचारुन मोठ्यांना भंडावुन सोडतात. सभोवतालच्या घटकां बद्दल असलेले अज्ञान दुर करावे अशी उत्सुकता प्रत्येकाकडे असते. त्या औत्सुकते मधुन काही प्रश्न तयार होतात, हे असेच का आणि ते तसे का नाही यांचा मागोवा घेत आपण शंकांचे निरसन करतो किंवा तसे करण्याचा आपल्या परिने प्रयत्न करतो. शंकांचे निरसन होत असतांनाच, मनुष्याला नवी माहिती मिळते, नव्या तंत्रांचा विकास होतो. या नव्या मिळालेल्या माहितीच्या आधाराने आणखीन नवे प्रश्न तयार होतात, नव्या शंका निर्माण होतात आणि विज्ञान विकासाचे चक्र सातत्याने सुरु रहाते. होणारा विकास हा न थांबणारा आहे म्हणुन सातत्याने.

एकेकाळी पृथ्वी स्थिर आहे व सूर्य फिरतो ही श्रद्धा होती. ही श्रद्धा हा भ्रम होता हे कोपर्निकस - गॅलिलिओच्या संशोधनातून सिद्ध झाले. अशा विविध भ्रमांचे निराकरण विज्ञान करीत आले आहे. आजही करीत आहे. पहावे, तपासावे, प्रयोग करावेत, कल्पना लढवाव्यात व पुन्हा तपासावे या पद्धतीने निसर्गाची असंख्य गुपिते विज्ञानाने उलगडली. ह्या कार्यात अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागला. 

सर्वसामान्य स्थितीत चूकीची कारणमीमांसा समाजात रुढ झाली तरी अधिक योग्य, अचूक वैज्ञानिक कारणमीमांसा मिळाल्यानंतर ती गळून पडते. अंधश्रध्दा दूर होतात त्याचबरोबर विज्ञानाचा विकास होतो. सगळ्या संस्कृतीमध्ये याच पध्दतीने हे घडत आलं आहे. जगाचा इतिहास हे सिद्ध करत राहतो.

निसर्गाच्या सानिध्यात असंख्य बदल घडत असतात. या बदलांचा गैर - वगैर परिणाम मानवी जीवनावर घडून येतो. आणि मानवी जीवन निसर्गनियमत्वाच्या शृंखलेतून पुढे पुढे ढळत राहतं. निसर्गातील घडणारे अनाकलनीय - आकलनिय बदल तसेच निसर्गाचे रहस्य जाणुन घेणे हा विज्ञानाचा उद्देश आहे. विशिष्ट परिस्थितीमधे, वायूचा दाब (pressure) वाढवल्यावर आकारमान (volume) कमी होते हे कळणे महत्वाचे आहे पण त्यापेक्षाही ते कुठल्या निसर्ग नियमानुसार घडते हे कळणे जास्त महत्वाचे आहे. निसर्गाचे नियम जाणण्यासाठी शास्त्रज्ञ तत्व/ सिद्धांत (Theory), गृहितक / कल्पना (hypothesis), प्रयोग (Experiment), नियम (law), पद्धती (method), निरीक्षण यांचा वापर करतांत आणि या सर्वांतुन वैज्ञानिक पद्धत तयांर होते.






अडीच ह्जार वर्षापूर्वी धर्माचा उदय झाला. त्यासोबत शब्दप्रमाण्य प्रतिष्ठित झालं. नव्हे ते अंतीम प्रमाण (देववाक्य) ठरलं. परिणमतः ज्ञान वाढलं, अचूक कारणमीमांसा मिळाली तरी बदलाला स्थान उरलं नाही. उलट बदलणे हा अधर्मच ठरला आणि अंधश्रध्दा दृढमूल झाल्या. "बाबा वाक्यम् प्रमाणप्रणाम" अशी ती श्रद्धा होती. धर्माला परिवर्तन मान्य नव्हतं. धर्माच्या गोटातील श्रद्धा परावर्तित झाल्या तर धर्म ऱ्हास पावेल अशी भीती धर्ममार्तंडांच्या फळीत निर्माण झाली. कारण धर्मातून सर्वार्थाने शक्य होणारं शोषण परिवर्तनाच्या नियमांनी खंडित होणार होतं. म्हणून धर्म, धर्माची गादी, परंपरा, नियम, श्रद्धा आणि व्रतवैकल्यांची जाचक अनुलक्षी नष्ट करत नव्हता. आणि अनुभवाने भरत चालणारं मानवी विज्ञान परिवर्तनाची मेख या धर्तीवर मारत होतं.

"धर्म आणि विज्ञान" हे बर्टान्ड रसेलचं पुस्तक नीट वाचायला हवं. धर्माचे प्रमुख तीन घटक आहेत. धर्मसूत्रं (धार्मिक तत्वज्ञान) चर्च (पुरोहितशाही) आणि नैतिक मूल्य (केवळ योनिशुचिता नव्हे) कोणत्याही समाजात अपरिहार्य आहेत. नीतीशिवाय समाज जिवंतच राहू शकत नाही आणि धर्माने त्या - त्या काळी ही नीतीमूल्ये प्रभावीपणे रुजविली, हा धर्माचा सर्वात मोठा कार्यभाग आहे. धर्म आणि नीतीमूल्ये रुजविण्यासाठी धार्मिक तत्वज्ञानाची बैठक घ्यावी लागली. जगाच्या पाठीवर मानव निसर्गाच्या नियमाने जगण्याचा प्रयत्न करून आपलं अस्तित्व जपत होता.



निसर्ग आणि मानव यांच्यातील सहसंबंध अशा आराखड्यानुसार मनोव्यापारांचा संपूर्ण आराखडा फ्राॅईडने तयार केला, आणि अनेक रोग्यांवर उपचार करताना त्याला आपल्या कल्पनेच्या खरेपणाचा पडताळा आला. तसेच आपण बोलताना, लिहिताना ज्या चमत्कारिक व एरव्ही अनाकलनीय ठरतील अशा चुका करतो त्यांच्यावर, आणि आपली स्वप्ने, दिवास्वप्ने, मनोविकृती, आपल्या सांस्कृतिक जीवनाची काही वेशिष्टये, चमत्कृतिजन्य विनोद अशा सिद्धान्तामुळे नवा प्रकाश पडला. वस्तुस्थितीच्या अवलोकनामुळे फ्राॅईडच्या अभ्युपगमाला भक्कम पाया मिळाल्याने तो मनोविज्ञानात वैद्यकशास्त्रात  महत्त्वाचा सिद्धान्त म्हणून प्रस्थापित झाला. 

फ्राईड आणि श्रद्धा - अंधश्रद्धा असा विचार तपासून पहावा. प्रश्न विचारून पहावे. इथे संशोधनाला वाव आहे. मानवी मेंदूतून निर्माण होणाऱ्या स्वयंचलित संवेदना आणि कृतींचा समुच्चय तपासला तर कॉन्सेस - सबकॉन्सेस वर्तनशास्त्र असा एक दृष्टिकोन अभ्यासल्या जातो. श्रद्धा - अंधश्रद्धा ह्या मानवी मेंदूच्या संवेदना - कृतींचे संक्रमन फलित असे समजावे. सुप्त संवेदनेच्या ऐच्छ कृतींची कृती घडवून आणल्या जाणाऱ्या क्रिया - प्रक्रिया श्रद्धा - अंधश्रद्धांच्या वर्तुळपरिप्रेक्ष्यात वावरत असतात.

संदर्भ -
फुले, शाहू, आंबेडकर समाजक्रांतीची नवी दिशा - डॉ. बाबुराव गुरव

सत्तांतर - व्यंकटेश माडगूळकर

हिंदू एक समृद्ध अडगळ - भालचंद्र नेमाडे

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र - सप्टेंबर 2020

फ्राईडचे मानसशास्त्र - अभ्यासक्रम - मानसशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

- विश्वनाथ साठे (9921056462)


Comments

Popular posts from this blog