अन्सामाय हायब्रेड खुडायलं गेली. पोरगं पाजलं. त्याला अफू हुंगायला देली. ते गुंगलं. झोपी गेलं. डाल्याखाली झाकलं. वरून धुडकं झाकलं. डाल्यावर दगड ठेवून अन्सामाय डायब्रेड खुडायलं गेली. एक पाथ लागली. दुसरी लागली. पाणी पिलं तिसरी पाथ सुरू झाली. अर्ध्यावर आली. पोरगं अजून उठलं नाही. जाऊन तरी पाहते म्हून अन्सा आली. डाल्याजवळ आली. पाहते तर लालजरद कुखावानी आटाळापिटाळा डाल्यावर बसलाय. डोलतोय. फनी काढलीय.
अन्सा आता मुरझरितून उठली. तिची झ्याक उडाली. ती भानावर आली. लगबगीनं पोरगं तिनं काखेत घेतलं. अन जागा बदलली. पोरगं आता पॉटशी गुंढाळलं. ते पाठीवर पेंगुळत होतं. काळूश्या आता झोप मोड होत होता.कन्सं खुडता खुडता तिच्या अंतरंगात कैक प्रश्न धुमाकूळ घालत होते. एक कनीस ती ईबाळ्यानं चरकन कापत होती अन दुसऱ्याच क्षणी एक प्रश्न तिचं काळीज कापीत होता. अन्सा माय प्रश्न करत होती. दगड नागानं पडला कसा असलं. त्यानं काळूश्यालं काही कसं केलं नाही? हे नागाचं कुळ उरावर कसं आलं पोराच्या? पोरालं काही झालं तर नाही?
क्रमशः-
विश्वनाथ साठे(9921056462)
Comments
Post a Comment