★★★मानवी विकार आणि धर्म★★★
मानवी विकार जसे त्या त्या आयुष्यकाळी निर्माण वा उत्पन्न होतात. त्या त्या आयुष्यकाळी प्रस्थापित झालेले आकृतिबंधही त्या त्या कालपरिप्रेक्ष्यात उत्पन्न होतात. जसे ते निर्माण होतात वा उत्पन्न होतात तसे त्या त्या आयुष्यकाळाचे प्रतिपादन करीत कालांतराने आयुष्यकाळाच्या परिवर्तनाने व विकारशमन प्रक्रियेने वा विकारशयाने ते नष्ट होत जातात.
काम क्रोध मोह मद मत्सर लोभ आदी विकारातून तयार झालेले जाळे तेही नष्ट होत जाते विकारांच्या नष्टतेनंतर. विकारशमन ही एक मानसिक - जैविक - भावनिक - शारीरिक तितकीच वैचारिक प्रक्रिया आहे. आध्यात्मिक धारणांनी विकारशमनाचे अधिष्ठान घेत विकारांची नष्टता करण्याचे तंत्रही त्या त्या भूगोलात विविधांगी पध्दतीने निर्माण केले आहे. अध्यात्माला त्या विकारांची नष्टता करणे गरजेचे होते म्हणून विकारांना अध्यात्मात स्थान नाही. परंतु त्या त्या आयुष्यकाळी विकार उत्पन्न होतात हे विज्ञान आहे.
मानवी विकार हे मूलतः नसर्गिक तत्व असलेलं प्रारूप आहे. निसर्गाच्या नियमनाने सगळी चलितं प्रवाहित असतात. ह्या चलितांना अध्यात्म कसे नाकारू शकेल? प्राचीन तत्वज्ञानाच्या शाखेने गौतम बुद्ध यांच्या धम्म अनुसरणातून निवडलेल्या तत्त्वांची चिकित्सा करत या सर्वच विकारांची भूमी तपासून पाहिली आणि चार बुद्धतत्वे - अष्टांगिक मार्ग ही एक प्रक्रिया प्राचीनत्वाची विकार त्याज्य भूमिका सतत्त्येने मानवी जीवनजाणिवांवर उपयुक्ततेची असल्याचे सिद्ध झाले. या सहाही विकारांची क्लुप्ती ही दुःख या परिसीमांत आडाख्यात बसते. त्या विकारांचा हिशोब हा दुःख या सरासरीने काढता येतो. काही मोजक्या विकारांच्या बाबतीत जरी सुखाची व्याप्ती शोधता आली तरी ती कालीक असते. त्या सुखाची सार्वत्रिक आणि सर्वोतोपरी सर्वकाल प्रचिती असतेच असे नाही. म्हणून ती सुखाची अवस्था जी विकारातून प्राप्त होत राहते. त्या त्या आयुष्यकाळी ती संपूर्ण आणि सर्वकाल असेलच हे सांगता येत नाही. म्हणून दुःखाचीच प्राप्ती ही त्या मोजक्या विकारातून पुढे साकार होत राहते.
मानवी विकार जितके शारीर पातळीवर असले तरी ते तितकेच मानसिक - भावनिक आणि जैविक पातळीवरील आहेत हे विसरता कामा नये. अध्यात्माने शारीरिक पातळीवरील विकारांची नष्टता करतानाचे काही पर्यायी उपाय सांगितले ते भौतिक स्तरावर शारीरिक स्वसंवेद्य - वेदनादायी आहेतच असे नाही. परंतु शरीर आहे तर वेदना आहे आणि वेदना म्हणजे निसर्गनियम. जखमेच्या मुळाशी वेदनेची किंकर असते. त्या त्या शारीरस्तरावरील जैविक - भौतिक - मानसिक - शारीरिक - भावनिक - वैचारिक सपंन्नतेची उपाययोजना करणे गरजेचे आहे.
मानवी विकारांची नष्टता करताना अंमलात असलेला धर्म हाच विकारांच्या आहारी गेल्याचे आजच्या धर्माचे चित्र धर्मसमीक्षेने पाहायला मिळते. कारण जो जो धर्म मानवी विकार नष्ट करतो आहे. त्या धर्माच्या गाभ्यातच मानव अंतर्भूत आहे. त्या प्रमाणात धर्मात अंतर्भूत असलेल्या मानवातील विकारांची पातळी नष्टतेकडे गेलेली नसेल तर त्या त्या धर्मात असलेल्या मानवांनी सामान्य जनतेचे विकार नष्ट करण्याचे तंत्र अजूनही विकसित केल्याचे आढळत नाही. आणि म्हणूनच मंदिर - मस्जिद - गिरजाघर - प्रार्थनास्थळे यामध्ये विकारातून होणारे अन्याय अत्याचार थांबत नाहीत. हेवेदावे बंद होत नाहीत. द्वेष लुप्त होत नाहीत. हव्यास खतम होत नाहीत. ते चालूच आहेत यातून होणारे मानवी शोषण निर्धोकपणे धर्माच्या पडद्याआडून होत आहे. विकार जोपर्यंत तोपर्यंत ही शोषणाची साखळी अविरत.
संदर्भ:-
धर्म आणि साहित्य- आगळे
टिपिटक भाग -1
टिपिटक भाग-2
मानववंशशास्त्र- अभ्यासक्रम- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-विश्वनाथ साठे (9921056462)
Comments
Post a Comment