★★★ कसं सगळं व्यक्त होऊ?★★★


माहितीय मला की, "हम्म. खरंय. लिखाण बंद पडायला नको. लिखाण हेच जिवंतपण आहे माझं!"
तुम्ही म्हणाल, "जे जमेल तसे कर!"
"पण म्हणून म्हणलो, कसं सगळं व्यक्त होऊ?"
हेही म्हणाल तुम्ही की, "काळ सगळे शिकवतो ना?"
"हम्म. हो सगळं शिकवितो तो काळ. आणि अनुभव पदरी टाकतो तोही काळच. एकेकाळी एक व्यक्ती मला म्हणाली की, 'तुझे लिखाण हे तुला जास्त ओळखते तुझ्यापेक्षा!"
"ह्यावरही कसं व्यक्त होऊ? हे विधानही कुणीतरी अनुभवानेच म्हणलं आहे न की, "ऐक दिवस असा येऊ दे जेव्हा मी तुझ्या नावाची स्वाक्षरी घेईल!"
म्हणलो, "आटोग्राफ घ्यायचाय न."
"लेखकाचा, असं म्हणायचं मला?"
"अच्छा!"
"त्याचाही घेईल. त्यात काय? मी काय असाच नाही घेणार तूला तेवढे मोठे बनावे लागेल."
"बरं? इथं असंख्य प्रश्न होते. काळ बोलेल यावर. आम्ही काय बोलावे सद्या तरी?"
"मुख्य म्हणजे 'मोठ्ठं' म्हणजे काय हो ब्वॉ? समजलं नाहीय अजून मला आता लहानाचा मोठ्ठलाट झालो हे क्काय?"
"तूम्ही आहात न प्रेरणा देणारे विश्वाला!"
"माझ्या शब्दा पूढे तूझे दू:ख खूप मोठे रे, तरी पण "स्वत:ला सावर रे, तूला खंबीरपणे रहावे लागेल आईसाठी, बाकीच्यांसाठी. काळजी घे." तुम्ही असंही म्हणाल. आणि असंही म्हणाल."
"झोप लवकर तू विचार नको करू, जास्त विचार केला की, तूला झोप नाही येणार!"
"खरं तर झोप कशी येणार सगळे डोस्क्यात विचार फिरतात घारीसारखे एकटुक ."

"सायंकाळी आम्ही फिरायला जायचो न. बाबांची आठवण आलीय शांत बसलोय. कसं सावरू हो मायला. माय रात्री बेरात्री उठून बसते. रडते, म्हणते, तू का झोपला नाहीस अजून? सांगू का हे? की, मला जास्त झोप येत नाही. बाबा सारखे आठवतात."

"मला माहिती आहे तुम्ही असं म्हणणारे आहात की, "तू असे केले तर त्या अजून दूख होईल. तू जर सावरला नाही तर त्यांना तू कसे सावरेल? तू विचार केल्याने तूला जास्त त्रास होईल."

एक सांगू का, "डोक्यात सतत बाबांचे विचार असल्याने डोळे लवकर विझत नाहीत. आज त्यांचा रेकॉर्ड केलेला आवाज ऐकला. अनुभवलं. बाबा समोर आहेत, बोलताहेत पण दिसत नाहींयत. माय झोपी गेलीय, तिच्या जवळ बसलो आहे. रात्र निशनिशाने चढते आहे आणि मी निशेला चिरून अमग निघालो आहे निचर."

"हम्म. आम्ही ताटात जेवतो तेव्हा ती काही घास खाते."

"जास्त त्रास तू करून घेतलास तुझा तर त्यांना पण त्रास होईल. असं करू नकोस" असं तुम्ही म्हणाल.

"विचार नको काही!"

"विश्वा आर्त खचून गेलाय हो ब्वॉ!

तुम्ही हेही म्हणाल, "आम्हांला जास्त तूला नाही सांगता येईलच असं नाही. तू उठला तर तू सगळ्यांना सावरेल."

"पण विश्वाचं असं खचून जाणं बरं नाही सगळ्यांसाठीच. खचू देत उभं राहता येईल. काळाने खचवलं आहे. उभं रहावं लागणार आहे विश्वाला खंबिरपणे आता.

"का रे कोणी नसल्यावर त्यांची आठवण येते तर ती व्यक्ती असल्यावर का नाही?" असं सहज विधान करणारे तुम्ही आहात."

सांगतो तेही ऐका, "नसल्यावर नसते म्हणून असल्यावर असण्याची किंमत, प्राण्या समज असल्यावाचून जपणे नसण्याची किंमत!"

"आठवण तीक्ष्ण शीणक असते काळजातली...!"

या काळात तुम्ही विश्वाला धीर दिला पाहिजे, समजवून सांगितलं पाहिजे, "खंबीरपणे लढायला तयार रहा" असं सांगितलं पाहिजे, अगदी परखडपणे.

"का बरं?"

विश्वा सांगतो न की, "विश्वाला समजवा की, "वास्तव नाकारता येत नाही बाळ!"

"आणि ऐक हो बाळ, एकही शब्द तूला दुखवू शकतो म्हणून कमी संवाद तो. तू पडेल पण नंतर सावरेल. हे पण माहिती आहे, तू आमच्यापेक्षा समजूतदार आहेस. आम्हांला नाही समजवता येत तुला केव्हाही!"

"हो का? अहो ब्वॉ. माझं काय? बसावं विचार करत खोलवर. कसं सगळं व्यक्त व्हावं हे."

"आठवणी, विचार भावना असतात ना, त्या येतात ना. त्या व्यक्त होत जा." असं सहजपणे तुम्ही म्हणाल. माहितीय मला पण तुम्हांला हे माहिती आहे का?"

"रात्र जीवावर कहर करते. आमच्या कित्ती गप्पा गोष्टी व्हायच्या, भजन व्हायचे, चर्चा व्हायच्या, पारख व्हायची,
कधी इतका वेळ देऊ शकलो नाही दहावीनंतर. आता हे पाच महिने त्यांच्या जवळ होतो न.
"बा म्हणजे आभाळ!"

"सगळे क्षण आनंदाचे असेल त्यांच्यासाठी!"
असा विचार कराल तुम्ही.


"होणं!"

"मी शेतात फिरायला गेलो होतो एके दिवशी तर ते माय ला म्हणत, "कबीर आलेत आपली सेवा करायला या काळात!" माय त्या दिवशी सायंकाळीच मला ही गोष्ट सांगत होती, "बा असे म्हणाले तुला!"

"इतका आनंद. कसा व्यक्त होऊ सांगा न तो आनंद. पण आता कुठेय? काही नाही? सगळे क्षण आनंदात होते ते."

"आईला पण त्रास होईल तूला असे पाहून.
आयुष्यभर असा असणार का तू? या काळातही छातीवर दगड ठेवून तुम्ही असं निर्भरपणे म्हणाल मला."

ऐका "बा आता विश्वासात, जिव्हाळ्यात, प्रेम, मया, दया, शील, करुणा, संतोष, ज्ञान, मुक्त विचार आणि भावपूर्ण संवाद, आपुलकीत, असणार आहेत.

बा म्हणाले मला की, "माझ्या नसण्यात तुला खंबीरपणे उभे रहावे लागेल. माझ्या मागे असावं लागेल सत्यानिशी. हा एक काळ आहे."

"त्यांनापण आनंदी ठेवायचे ना तूला. तूलाच सगळ्यांना सांभाळायचे आहे. तूच असा असेल तर कसे बाहेर काढशील सगळ्यांना दुःखाच्या?" इतकं प्रेरक तुमचं व्यक्त होणं असेल."

"हो. मला बा सारखं खंबीर आयुष्य जगावं लागणार आहे आता. त्यांना कळत नव्हतं तेव्हापासून त्यांच्या बापाची सावली नव्हती म्हून लै मया केली आम्हांवर बा ने."

"तुम्हां सगळ्यांचं म्हणणं पटतं मला, हा काळ आहे. आणि दुःख काळावर झिजत चालतं.!"

"आईला जीव लाव जास्त. त्याना आधार दे. बाबा चे स्वप्न असेल ना? तूला मोठे बनलेले पाहायचे असेल ना त्यांना?" या जंव्जाळात तुम्ही उतरवाल.

"हम्म. ते मला प्रोफेसर, डॉक्टर, साहेब म्हणायचे माहितीय का हे सगळ्यांना? असं काहीतर सांगेन तुम्हांला विश्वा पण खरं तर वेगळंच."

"यातला मात्र एक शब्द तुम्हांला मी सांगितलाच नाही.
मात्र किती निष्णात तुम्ही? तो विषयच शब्दाने गुरफटून पुढचं विधान केलंत. माझे स्नेही इथं मला प्रेरक असतात. मला स्नेह केल्याचा आनंद इथं होतो की, आपण न सांगितलेली गोष्ट ते आपसूक ओळखतात. सांगतात की, "हे हेच आहे म्हणून. तो हाच शब्द असेल म्हणून."

म्हणून म्हणलो, "कसं सगळं व्यक्त होऊ?"

"लेखकपण ना?"

"तुम्हांला आवडेल विश्वासोबत असायला, विश्वा जो जगतो ते ते जगायला."
"का नाही आवडणार? नेहमीच आवडत आलंय आताही आवडेल रे. इतकं नैसर्गिक तर आम्हांलाही आवडतं मग ते तुझ्यासोबत असेल तर नक्कीच आवडेल."

"माझं एक म्हणणं राहून गेलं. मला माफ करा मागे तुम्हांला त्या ठिकाणी भेटलो नाही तेव्हा. माझी धावपळ मला शांत बसू देत नाही आणि आता बघा न कित्ती शांत बसलोय, जणू की, कैकदा माझ्याकडून तुम्हांला त्रासही झाला असेल?"

ऐका, "मला खरं तर तुमच्या घरी येऊन सगळ्यांसोबत तुम्हांला पहायचं होतं, बोलायचं होतं, समजून घ्यायचं होतं जे पाहिलं, बोललो, समजून घेतलं!" कधी कधी असं हृदय आतून पोखरत राहतं. का बरं?

"नाही. असं काही नाही. आम्ही केव्हाच विसरलं ते नको इतकं मनाला त्रास देत जाऊ तू. मागच्या गोष्टी कायमसाठी विसरू. नकोयत आता त्या परत परत काढायला." असं तुम्ही लगेच म्हणता.

"माहितीय तुम्हांला, मी त्या दिवशी एक जास्तीचं धपाटं खाल्लं होतं, तूम्ही आग्रह केला होता."

"येडं काय काय ठेवलंय. अजून आठवण? पन होतेच किती पातळ ते? आम्ही तर सहज सातआठ खाल्ले असते घरी असते तर. पण तू होतास म्हणून नाय खाल्लं.
स्वतःच्या आनंदात? तुझा नव्हता आनंद?"

"इव्हन जो आंनद तुमचा होता तो आनंद माझा होताच हे विश्वाने जाणलं होतं, अनुभवलं ते सगळं. तुमच्या आनंदात माझ्या आनंदाची वाढ झाली हो."

बा म्हणत, "कित्ती मयेचे हायते सगळेच, आम्हांला भेटवं बाबू, ज्यांनी आमच्या पोटच्या मुलाची काळजी घेतली, दो घास भरविले. वेदनेच्या काळात सहभागी झाले."

"भेटवलं न मग त्यांच्या बाबू ने!"

"बाबांचे विचार, विश्वास, जिव्हाळा आपल्याला जिवंत ठेवायचा आहे!"

"लै काही संपलंय. शब्दांत नाही सांगू शकत. काळावर खंबीरपणे उभं राहणं विश्वाला मोलाचं वाटतं."

"विश्वा इतका तुटलाय आतून की, कसं सांगू तुम्हांला?"

"आम्ही जितकं जगलो त्यात जितकं बाबांना अनुभवलं तेच. पण तू, तुला कळतंय तेव्हापासून आत्तापर्यंतचं सगळे अनुभव आठवण करत असणार?"

"कळतंय बाळा नको रे इतका तुटू. तुझं खंबीर राहणं हेच आपल्या सगळ्यांनसाठी योग्य असणारे!" असं भावनिकपणे तुम्ही मला म्हणाल.

"काळ कसा किती छळतो समजत नाही, पण काळाचा हा छळ योग्य नाही जो शांत, प्रक्षुब्ध, प्रज्ञ, विवेकी, आणि स्थितज्य असतो तो काळावर निष्णात असतो, खचत नाही, डगमगत नाही." हे सगळ्यांना माहिती असावं.

"काय बोलू कळत नाही. निःशब्द होऊन वाचण्यापलीकडे काही सुचत नाही आम्हांला."

"बाबांनी आपल्यांवर लै जीव लावला रे या काळात."

"होणं. आणि म्हणूनच अजून जास्त त्रास होतोय
काळीज दाटून आलंय. पण रडू शकत नाही."

"ना. डोळे असवाने भरलेत. रोज डोळे फार दुखून, लालसर झाले की, झोपेची हुल चढते तोपर्यंत सगळी आयुष्याची चित्र चित्रफितीसारखी फिरत राहतात." तुम्ही म्हणायचे की, "विश्वा तू खूप संवेदनशील आहे. ते अनुभवतोय, संवेदनशील जगणं अनुभवतोय. तुम्ही म्हणायचे तेव्हा समजत नसे."

"तूच एक आधार आहेस आई अन आमच्या सोबतीचा विश्वा!"

"हो आहेसच न. मग त्यासाठी त्रासच करून घ्यावा असं नाही ते पावलोपावली कळतंय - दिसतंय आम्हांला."

"पण या संवेदनशीलतेला बाबांनी विवेकाची सतसंगत दिलीय. खंबीरपणे लढाऊ बाणा दिलाय, जिव्हाळ मया दिलीय असं खचनं नाहीं योग्य."

"म् इतकं कळतंय तर का त्रास करून घेतोय रे विशु?
ऐक ना, "तुझ्याकडे यायच्या आदल्या रात्री आम्ही बराच वेळ विचार केला की, तिकडे आल्यावर तुला कसं फेस करू? काय म्हणून समजूत घालू तुझी? तुझ्यात डोळ्यात बघण्याचं बळ मिळावं इतकंच वाटत होतं रे. थोड्या वेळासाठी वाटलं की, गाडीतून उतरल्या उतरल्या तुला येऊन घट्ट मिठी मारून मन मोकळं होईपर्यंत रडावं."

"नको खचून जाऊ इतका!"
"नको बाबा इतकं खचून जाऊ तब्बेत बिघडेल अशाने. परत आजारपण वगैरे नको, नको प्लिज शांत हो बरं आधी." अशी तबियत बिघडण्याची घाबरगुंडी माझ्या काळजात भरवाल तुम्ही सगळे.

"तुला जागत असलेलं बघून आईची तगमग होते. विचार कर, आजारी पडली तर काय होईल तिचं?"

"तुम्ही गाडीतून उतरले तेव्हा माझं काळजी हपकलं. बाबांना काय सांगू हेच कळत नव्हतं. कारण ते नव्हते. कोणत्या भाषेतल्या शब्दांचा उपेग करावा? कळत नव्हतं. मी काळजातून चरकलोय तेव्हाचा. वाचा खुंटली आता."

"आणि तुम्ही सगळे घरी आले तेव्हा माय हंबरडा फोडत होती. इथे तर काळीज फाटलय. सांगा कोणतं व्यक्त होऊ? कसं रडू आवरू? कसं सगळं व्यक्त होऊ? मायच्या मागे रडत होतो, इतकंच. कंठ मोकळा नव्हता. त्यात हुंदके होते. डोळे पाझरलेले."

"उतरताना अक्षरशः पाय जड झाले होते. किती तरी वेळानंतर तुमच्याकडे बघितलं असेल आम्ही? हिंमत नव्हती तुझ्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची. जिथं गाडी टर्न करायला सांगितलं प्रदीपने आणि एकदम तू दिसत होता, तेव्हा छातीत धस्स झालं, विशु तुझी अवस्था बघून."

"तुझं रातभर जागून रडणं अशाने आजारी पडशील बाळा. ते खूप महागात पडेल आम्हांला. म्हणून म्हणतो आहोत की, सावर स्वतःला आम्ही कुणीच नाही तिथं. ह्याची पण खंत आहेच."

माहितीय तुम्हांला? बा म्हणाले की, "आम्ही नसतांना रडू नका." बा चे हे शब्द आता समजून घेतले पाहिजेत. मन ऐकत नाही, काळीज समजून घेत नाही. पण बा कित्ती खंबीरपणे म्हणालेत बघा न?"

"हो जसें काही त्यांच्या तोंडून काळ बोलला. आपण बाबांचे विचार जगुयात. नाही रडायचं, मायला आणि कुणालाच हतबल नाहीं होऊ द्यायचं. सगळ्यांना जिव्हाळा, विश्वास, मया लावायची."

"हो पिलू हेच सांगतो आहोत आम्ही कधीचे फक्त शब्द हे नव्हते आमचे."

"हो, राजा हो. तुमचं हे सांगणं मला मोलाचं आणि प्रेरणादायी आहे."
"मग ऐक ना तुझ्या राजाचं."
"डोक्यात सतत बाबांचे विचार असल्याने डोळे लवकर विझत नाहीत!"

"विश्वा आर्त खचून गेलाय. पुन्हा पुन्हा हेच सांगतो."

"नको रे बाळा असं तूच खचून गेला तर आईला कोण सांभाळेल? तूच आहेस आता आधार सगळ्यांचा विसरतोय तू?" अशा विधानाने एकवेळ मला तुम्ही विसरळभोळा करून टाकाल. पण, "सगळं कसं विसरता येईल?"

"नाही हो! विश्वाला काहीही विसरता कामा नये. हे विसरता कामा नये की, आधाराच्या मुळीने असं आधारहीन असणं बरं नाही. विश्वा आता आधार असणारी मुळीच समजा!"

"आम्ही समजतो आहोत रे येडं, पण तू असा बोलला की, मग डोकं हलतं, मग काही सुचत नाही. तुझ्याशी काय बोलून तुला शांत करावं?"

"कशात जीव रमवावा?"
"तुला जे आवडेल त्यात रमायचं!"

"खरं त्त बाबांनी आत्ता आपल्याला हसवावं. कशात उणीव ठेवली त्यांनी? हे आयुष्य केवळ हसत ठेवलंय त्यांनी. आयुष्यात विश्वा रडला नव्हता कधीच."

"शांत झालोय काळजातून. व्यक्तच होतायत नाहीय. कंठ दाटून आलाय."

"हो खरंय तुमचं. त्यांचं खळखळून हसणं तर आमच्या कानात नेहमीच घुमत राहतं. खूप जवळून ऐकलंय बाबांना आम्ही."

तुम्हांला माहितीय, बाबा म्हणायचे, "आता सगळे येतील. मस्त हासू. गप्पा करू. गाणं गुणगुणायला लावू सगळ्यांना." कित्ती काय काय होतं ते! मला म्हणायचे न ते हे सगळं तं कित्ती हसतमुख उजळ आनंदी चेहरा व्हायचा त्यांचा.

"सगळं अर्धवट राहिलंय आपल्या आयुष्यात बाबा नाहीत तर सगळं कसं थांबल्यासारखं वाटतंय रे!" असं तुम्ही या काळात म्हणाल.

"तुम्ही सर्वजण आलात तेव्हा माझे शब्द गारद झाले. कोणत्या शब्दांनी सांगायचं होतं मला बाबांना की, तुमची सगळी गणगोतं आलीत. पहा तिला, बोला, हसा खळखळून, गाणी म्हणा, आंनद लुटा, बेमुराद अन बेहिसोबी जगा."
पण यातलं काहीही सांगू शकलो नाही त्यांना. तुम्ही सर्वजण त्यांना प्रिय होतात तेव्हा लौकर का आला नाहीत? हा मह्या आंतरकाळजाला जाळणारा प्रश्न विश्वा तुम्हांला करतो आहे. द्या उत्तर!"

"त्यांचा जिव्हाळा, विश्वास, मया आपल्या जगण्यात आहे. ते आपल्या विचारांत आहेत. काही नाही अर्धवट राहणार."

"अर्धवट काहीही नसतं हो ब्वॉ. जेही काही असतं ते पूर्ण असतं."

एक सांगू, "ते म्हणायचे, लेकरू आपल्या घरी म्हणा वा काळजात येणार आहे तर त्याला जीव लावावा. जीवाचा घोट अन पोटचा गोळा तोडून देतात त्या जीवाला का मया करायची नाही? इतकं स्पष्ट बोलायचे ते. जीवांचा जिव्हाळा लै होता हो त्यांना!"

"बाबांनी लै अमूल्य जगण्याचं तत्व दिलंय विश्वाच्या आयुष्यात!"

"कुणालाच दुःख नसावं!" असं जे माझं म्हणणं असतं न, ते त्यांच्या जगण्यातलं तत्व आहे. "इतरांचंही दुःख नष्ट करावं" हे मला बाबांनी खंबीरपणे शिकविलं. जरी आपण दुःखात पडत असलो तरीही!"

"अशात तोंडातल्या फोडांनी सगळं डोस्कं, तोंड गरम झालंय. मघाशी मला बोलता पण येत नव्हतं."

माहितीय तुम्हांला, "आपण ज्याला जीव लावतो न तो जीव आपण आपला म्हणूनच समजतो न? बा म्हणत, "जीव सारखे असतात ज्यावर जिव्हाळा लावला जीव आपला काय अन तो काय एकच न? एक बुंद का सकल पसारा. आपले नसलेले जीवही आपलेच असतात. सुक्ष्मतेचा अनुरेणू समजला पाहिजे बस!"

"सगळ्यांना हे जीवाचं तत्व समजतं का माहीत नाहीय पण बाबांनी आपल्याला हे जगण्याचं तत्व दिलंय!"

"आणि हे सत्य की, ज्या जीवावर जीवाचा जिव्हाळा हाय त्याला किंवा तो जीव आपल्याला दुःख नाही देऊ शकत आयुष्यभर. जिव्हाळा असला की दुःख दिल्या जाऊ शकत नाही. जिव्हाळ्याच्या काळजात दुःखाचा शब्द जन्मतच नाही!"

"आपण जोही विचार केला तो केव्हाही चांगलाच केला आहे. आपल्या कोणत्याही कृतीविचाराने कुणीही दुःखी होऊ नये असं आपल्याला जगायचं आहे."

"आपल्या सर्वांच्या वागण्याजगण्याने आणि असण्याने सर्वांना आनंद होईल असं आपण जगुयात. बा अशा जगण्यात राजी असतात. जिवंतच असतात!"

- रत्नार्जुनसुत - विश्वा-

Comments

Popular posts from this blog