***अण्णा भाऊ साठे समजून घेतांना-भाग-एकतीस***
गेल्या शंभर वर्षांपूर्वीपासून ते आजतागायतच्या सर्वोतोपरी परिस्थितीच्या वास्तव जाणिवांपर्यंत सर्वंकष - सखोल आणि सत्यत्येपर्यंत जाणे म्हणजे विविध दृष्टिकोन - कैक पैलूंनी पडताळून - जोखून मांडत राहणे ही जिवंतपणाची मती.
हे वर्ष तुकाराम भाऊ साठे या व्यक्तिमत्वाच्या जन्माचं शंभरी उलटलेलं वर्ष. या शंभर वर्षाच्या काळानं कैक बाबी पोटात लपेटत आपलं अजस्त्र - ठाशीव - चमकुरं असं अस्तित्व कालपटलावर उमटवलेलं आहे. जितकं ते अजस्त्र - ठाशीव - चमकुरं असं आहे तितकंच ते न्यून - तकलादू - रंगहीन असं अस्तित्व आहे हे ही या अर्थाने लपित कळायला हवं. पुढील काळावर या शंभर वर्षाच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा रेखीवपणे असणार आहेत. ह्या रेखीव - कोरीव काळाचं भान विसरून कोणताही अभ्यास करणे काळ समजण्याकरिता हितावह नसेल.
व्यक्तिव्यक्तितील विकारांच्या लहरी शारीरिक - मानसिक - भावनिक - नैतिक - आर्थिक - सामाजिक - राजकिय - भौतिक बदलांनी उफाळण्याचा काळ आजही आहे तसाच आहे. इव्हन विकारांच्या लहरींचा वेग आता दुणावल्या गेलेल्या अवस्थेत आहे. रोज कित्त्येक अन्यायकारक बाबी खांद्यावर घेत समाजजीवन काळावर पुढे पुढे ढळत आहे. लोभ - मत्सर - काम - क्रोध - मोह - हिंस्त्रता हे विकारांचे स्तर पशूंच्या पातळीवर गेले आहेत. व्यक्ती विरुद्ध व्यक्ती अशी सामाजिक एकलगती होण्याच्या स्थितीत सामाजिक एकता भंग होत आहे. आता केवळ व्यक्ती आणि व्यक्ती अशी नभातील ताऱ्यांसारखी पुंजकीय सामाजिक टिंबांची स्थिती आहे. सामाजिक ऐक्य या काळाच्या पोटात आहे.
घरात नव्या वस्तूचीजा आणल्या तर त्यांच्या चिठ्ठ्या आणि अंगात घालायच्या कपड्यालत्त्याला दिलेल्या पैशाच्या पावत्या कंबळात खोसून त्या जपादून ठेवणारा समाज आज स्वाभिमानाचे जीवन व्यतीत करत आहे. गाडी - माडी - वाडीत तो आनंदाने जगत आहे. पहिल्या पिढ्यांना गुलामीचे जीवन कंठत पुढच्या पिढीचे परिवर्तन करण्याचा काळ यात कैक पिढ्यांचे शारीरिक - मानसिक - भावनिक - नैतिक - आर्थिक - सामाजिक - राजकिय बलिदान आहे. गावाच्या खालच्या भागात म्हणजे हागमुतानं उचमळलेल्या प्रदेशात हाकल्ल्या गेलेला समाज आज गावात आणि पंचक्रोशीतील मानमरतब घेत उजळ माथ्याने वावरत आहे.
हयात माय्बाप, जी हुजूर पाटील, चावडीवर पंचापुढे सकाळ दुपार संध्याकाळ अशा तीनवेळा हाजेरी देणारा समाज आज चौकाचौकात स्वाभिमानाने आपलं अस्तित्व ठेवत आहे. परंतु याच काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक द्वेषभावना इरात जपून ठेवून वागणारा व्यक्तींचा टिंबात्मक समूह वरवर शांत असला तर आतून धुमसत आहे. त्या धुमसणाऱ्या समाजाच्या विकारांच्या आंतरिक लहरी काळावर अन्यायाची पूड बांधू पाहत आहेत. मागील काही काळाच्या घटनांवर नजरक्षेप टाकला तर असं नोंद करता येईल की, अस्थिरता, हिंस्त्रता, अन्याय, क्रोध, द्वेष, ह्या मानसिक अवस्था वर तोंड काढत आहेत. या टप्प्यावर आपण बदलती सामाजिक मानसिकता पडताळून घेऊ शकतो.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सानिध्यात मानवी संवेदनांवर क्रिया - प्रतिक्रियांचे प्रभावीकरण झाले आहे. मानव आणि यंत्र यांच्यातील कृत्रिम - अकृत्रिम सहसंबंध संकल्पना अजून उपयोजित मानसशास्त्र उकलू पाहत आहे. म्हणून श्रम - उपयोगिता आणि मूल्यात्मक व्यवहार यातील मानवी हस्तक्षेप व तंत्रज्ञान गती यांची व्यवस्थित सांगड बसायची बाकी आहे. अण्णाभाऊंना अपेक्षित असलेली वैश्विक आणि वर्गीय मानवतावादी मानसिकता अजून गर्भार अवस्थेत आहे. हे नक्की की, वर्गीय मानवतेला वैश्विक मानवतावादी संकल्पनेचे अधिष्ठान आहे. मानवतावादी विचारशैली या काळाच्या हुसळणीत उचंबळून येत आहे.
ज्या विचारांना काळ, रूढी, परंपरा, समाजवास्तव, अर्थकारण, बाधीत करते असे विचार मागे सारून पुढील कित्त्येक कालावधीसाठी अण्णाभाऊंच्या वैचारिक ठेवणीतील मानवतावादी विचारांचा साठा विवेकी अनुसारणाने जगला पाहिजे.
-विश्वनाथ साठे
[9921056462]
Comments
Post a Comment