★★★काळ घुत्कारतो आज उद्याही★★★

                            "हा काळ कामगारांचा जळजळीत हुंकार घेऊन घुत्कारतो आहे. जगण्या - मरण्याचा संघर्ष या काळात उभा आहे. आता हा संघर्ष शोषव्युववर्तुळ रचनेची दृष्टी घेऊन चिकित्सिला तर तो श्रमबाहुल्य जीवांवर लादलेला संघर्ष ठरू लागतो. मृत्यूच्या दाढेत जीवांना दबा धरून बसल्यासारखा हा काळ अजगरासारखा विळखा घालून लोळतो आहे.

                           जगण्यासाठी जगाचं विस्थापन होते. आज काळाने विस्थापणाचं बीज पोटात घेतलं आहे. येणारा काळ अनेक स्थित्यंतरे घडवून आणणारा असा आहे. ही स्थित्यंतरे जितकी भौतिक असतील तितकीच ती मानसिक, शारीरिक, आर्थिक, जैविक आणि धार्मिक असतील. जगण्यासाठी ज्या हालचालींच्या प्रक्रिया आहेत त्यात श्रमाच्या अधिष्ठानाला स्थान देता येईल. श्रमाशिवाय अनुरेणुतही अभिक्रिया होत नाही. ह्या बाबीला रासायनिक अभिसरण श्रमिक प्रक्रिया आपण म्हणू शकतो.

                           श्रमाच्या प्रक्रियेतून निघणाऱ्या ऊर्जेने ह्या जगाची परिवर्तने होत आली आहेत. "रूपांतर - संवर्धन - संगोपन - विघटन - वाढ - विच्छेदन - विभाजन" अशी प्रक्रियाच श्रम या घटकांच्या संयुगाने विभागून गेलेली आहे. आणि मानवी जीव या प्रक्रियेत गतिमान आहे. तुम्ही श्रमाच्या बाबतीत कामगार ही संज्ञा वापरात आणली. त्या संज्ञेचे स्वरूप परिवर्तनाचे शक्तीस्थल आहे. मग हे श्रम बौद्धिक मानसिक वा शारीरिक, भावनिक अशा प्रदीर्घ गुंतागुंतीच्या कप्प्यातून निर्माण झाल्याचे अभ्यासायला मिळते.

                            विज्ञानाच्या संशोधनाने श्रमाच्या पद्धतीत जो बदल झाला त्यामागे यांत्रिक पद्धतीत बदल होण्याची कारणे कारणीभूत आहेत. या सहसंबंधाने श्रमाची भौतिक मूल्ये बदलली. श्रमाची आर्थिक, नैतिक, भावनिक, सामाजिक, मूल्येही बदलली. श्रमाची विभागणी मानव अधिक यंत्र अशी होत गेली. यंत्र आणि मानव यांच्यातील श्रम आराखडे आजच्या तुलनाशास्त्रात नव्याने मांडताही येतील. मात्र हे सत्य तपशिलाने घ्यावे लागेल की, श्रम हे सजिवंत प्रक्रियेचे एकक ठरते.

                            काळ पाहतो आहे, जीवावर बेतणारे असंख्य श्रम करणारी अनंत जीव दडपणाच्या बेछूट लहरीतून जीवनाचे क्षण अन क्षण जगत आहेत. हे दडपण वैयक्तिक तसेच ते सामाजिकही आहे. हे दडपण व्यवस्थेशाहीचे आहे. सत्ताशाही - राजतंत्राचेही आहे. भीतीच्या काळ्याश्यार अंधारातून मानवी जीव जिवंतपणाचे क्षण जगत आहे. मनोवैज्ञानिक सत्य असं आहे की, जोपर्यंत हिंसेला, हालचालीला आणि सजीवांच्या क्रोधवृत्तीला दडपून ठेवले जाते किंवा नियंत्रित ठेवल्या जाते तितक्या ताकदीने त्या वृत्ती अनियंत्रीतपणे उसळून निघतात. "प्रोटेस्ट" करू लागतात. आगीसारखे भपके मारू लागतात.

                           "श्रम करणारा कामगार म्हणजेच मानवी जीवांचा काळावर असा ऱ्हास होणं यथोचित बरं नाही!" असे विधान करणेही शोषव्युववर्तुळ रचनेचाच भाग होऊ शकतो. मात्र सौंदर्यशास्त्रीय दृष्टीने यातील नैतिक अशा भावनेचा आपण अर्थ घ्याल. हा काळही परिवर्तन होईल!"

@जागतिक कामगार दिन
@महाराष्ट्र स्थापना दिन

-विश्वनाथ साठे[9921056462]

Comments

Popular posts from this blog