स्मरण शंकरभाऊंचे...!
-----------------------------
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे धाकटे बंधू शाहीर शंकर भाऊ साठे यांचा आज २४ वा स्मृतिदिन. व्यवस्थेविरुद्ध लढत लढत वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी आजच्याच दिवशी १५ मार्च १९९६ रोजी आपल्या मायभूमीत सांगली जिल्ह्यातील वाटेगावात अखेरचा श्वास घेतला होता. २६ आॅक्टोबर १९२५ रोजी वालुआई आणि भाऊराव सिद्धोजी साठे यांच्या पोटी शंकरभाऊंचा जन्म झाला. त्यांचे आजोबा सिद्धोजी राघोजी साठे ( १८४८- १८९९) हे मुंबईचे प्रसिद्ध बांधकाम कंत्राटदार होते. स्वकष्टावर त्यांनी टाकवे गावात ५४ एकर शेतजमीन खरेदी केली होती. सिद्धोजी यांना भाऊराव हा एकुलता एक मुलगा होता. सिद्धोजी यांच्या अकाली मृत्यूमुळे भाऊरावांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान इंग्रज सरकारने मांग जातसमूहाला कायद्याने गुन्हेगार घोषित करून तीन वेळची हजेरी लावली. मांगांची धरपकड सुरू केली. पकडलेल्या मांगांना तारेच्या कुंपणात (डिटेंशन सेंटर ) बंदी बनवले जात होते. अशातच इंग्रजांचा हस्तक असलेल्या टाकवे गावच्या शेतकर्याने भाऊरावांच्या शेतजमिनीवर बळजोरीने कब्जा केला. त्याच्या ताब्यातून आपली शेती सोडवून घ्यायचा प्रयत्न भाऊरावांनी केला मात्र तो टगा बधला नाही. खुशाल कोर्टात जाऊन माझ्यावर दावा दाखल करा आणि शेती सोडवून घ्या, असे तो भाऊरावांना म्हणायचा. या जोरजबरदस्तीपुढे भाऊराव हतबल झाले आणि त्यांनी मुंबईची वाट धरली. दरम्यान भाऊराव-वालुबाईंना पाच अपत्य झाली. पैकी एक मुलगा ताप येऊन लहानपणीच वारला. भागूबाई, तुकाराम (अण्णा ) , शंकर आणि जाईबाई अशी चार मुलं घेऊन भाऊराव मुंबईला निघाले. वाटेगाव ते पुणे व्हाया सातारा असा पायी प्रवास करत हे कुटुंब पुणे रेल्वे स्थानकावर पोहचले आणि शिकार्याच्या जाळ्यात आपसूक शिकार अडकावी तसे हे कुटुंब इंग्रजी हेराच्या नजरेने हेरले आणि कल्याणजवळच्या इंग्रजी डिटेंशन सेंटरच्या छळछावणीत बंदिवान झाले. दोन अडीच महिने तिथे राहून मोठ्या शिताफीने एका अफगाणी पठाणाच्या मदतीने हे कुटुंब रातोरात निघून मुंबई लोकलने भायखळा रेल्वे स्थानकावर उतरले. तेव्हा शंकर भाऊ सहा सात वर्षांचे असतील आणि तो काळ १९३१-३२ चा. मुंबईत आल्यावर म्युनिसिपल शाळेत शंकर आणि जाईबाई जाऊ लागले पण पंधरा दिवसांतच शंकर भाऊंचे शिक्षण संपले कारण मुंबईत जातीय दंगली सुरू झाल्या. हिंदू- मुसलमान वाद पेटला आणि शंकर भाऊ मुसलमानी चाळीत म्हणजे चांदबिबीच्या चाळीत राहात होते. म्हणून ती चाळ सुटली आणि जाई आणि शंकरभाऊंची शाळाही सुटली. पुढे मुंबईहून हे कुटुंब वाटेगावी आले आणि १९३८ मध्ये अल्पशा आजारात भाऊराव गेले. तत्कालीन रिवाजाप्रमाणे त्याच वर्षी अण्णाभाऊंचे लग्न झाले. दरम्यान शंकर भाऊ अण्णाभाऊंच्यासोबत पुन्हा मुंबईला आले. १९४१ मध्ये त्यांना करीमभाॅय सूतमिलमध्ये नोकरी लागली. तेव्हापासून अण्णाबरोबर तेही कम्युनिस्ट पार्टीचे वर्कर बनले. दरम्यान १९४२ च्या धामधुमीतच शिराळा पेटा गावातील किसनराव सकट यांच्या जनाबाई नावाच्या मुलीशी शंकर भाऊ साठे यांचा विवाह झाला. अण्णाभाऊंच्या लालबावटा कलापथकात पूर्णवेळ सहभागी होण्यासाठी १९४४ साली शंकर भाऊंनी मिलमधील नोकरीचा राजीनामा दिला. तेव्हापासून अण्णाबरोबर संपूर्ण देशभरात शंकरभाऊंचे शाहिरी कार्यक्रम झाले. दरम्यान इप्टा या थिएटर्स चळवळीत शंकर भाऊ साठे यांचा बलराज साहनी , ए. के. हंगल , के. ए. अब्बास आदी चित्रपट कलावंतांशी जवळून संबंध आला. १९४७ साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते नागपूर येथे लालबावटा कलापथकातील शाहीर म्हणून शंकर भाऊ साठे यांचा सत्कार करण्यात आला. त्याच वर्षी वीर वामनराव जोशी यांनी अमरावती येथे शंकर भाऊंचा सत्कार झाला. १९६२ मध्ये शंकरभाऊंनी फकिरा चित्रपटासाठी सहदिग्दर्शन केले. ७ आॅक्टोबर १९६६ रोजी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. या दांपत्याला चार मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्ये होती. पैकी आशा नावाच्या मोठ्या मुलीचेच लग्न झाले होते. उर्वरित तीन मुली उषा, चित्रा आणि रेखा तसेच मुलगा संजय अशा चार लेकरांना घेऊन शंकर भाऊ ठाण्यात राहात होते. ठाणे महापालिकेचे तत्कालीन अध्यक्ष सुप्रसिद्ध गीतकार पी. सावळाराम हे शंकर भाऊंचे मित्र होते. त्यांनीच शंकरभाऊंना महापालिकेत वाॅचमेन म्हणून नोकरी लावली होती. मात्र अण्णाभाऊंच्या सांगण्यानुसार तीही नोकरी शंकरभाऊंनी सोडून वाटेगावची वाट धरली. कारण गावी अण्णाभाऊंच्या पत्नी कोंडाबाई , मुलगा मधुकर ही दोघंच राहात होती. त्यांच्या देखभालीसाठी अण्णांनी शंकरभाऊंना गावी पाठविले. १९६६ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन वाटेगाव गाठले. अण्णाभाऊंचा शब्द शंकरभाऊंनी कधीच मोडला नाही. अण्णाही शंकरवर जीवापाड प्रेम करत असत. त्या दोघाभावांचा पत्रव्यवहार आजही उपलब्ध आहे. त्यातून त्यांचे बंधुप्रेम दिसून येते. फकिरा चित्रपटासाठी अण्णांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली मात्र ऐनवेळी मित्रांनी दगा दिला. जीवाभावाची साथीदार जयवंताबाई अण्णांना सोडून दुसरीकडे राहायला गेली. जवळच्यांनीच केलेला विश्वासघात जिव्हारी लागला. अण्णा खचले. शेवटच्या आजारात १९६८ साली जेव्हा शंकर भाऊ त्यांना भेटायला गेले, तेव्हा अण्णांनी आपला आवडता पेन शंकरभाऊंच्या हातात देताना सांगितले , " शंकर हा माझा आवडता पेन मी तुला देत आहे. या पेनने मी खूप लिहिले आहे. तू हा जपून ठेव. " १९६९ ला अण्णा गेले आणि त्याच पेनने " माझा भाऊ अण्णा भाऊ " अण्णांचे चरित्र शंकरभाऊंनी लिहिले.पुढे खूप उशिरा या ग्रंथाचे प्रकाशन पुण्यातील सुगावाचे प्रकाशक लेखक विलास वाघ यांनी पुण्यात टिळक स्मारक मंदिरात २८ नोव्हेंबर १९८० रोजी केले.त्यानंतर शंकरभाऊंनी मागे वळून पाहिले नाही.एकच काडतूस , सूड , घमांडी , काळा ओढा , सगुणा , हंबिरा , जग , सावळा , लखू , बायडी , बाजी आणि सुगंधा अशा बारा कादंबर्या लिहिल्या. पुण्यातील विद्यार्थी प्रकाशन संस्थेने त्या सर्व प्रकाशित केल्या. याशिवाय काही कथा,लावण्या, गाणीही शंकरभाऊंनी लिहिली. शंकर भाऊ साठे हेच अण्णाभाऊंचे पहिले चरित्रकार. अण्णाभाऊंच्या नंतर पायाला भिंगरी बांधून ते महाराष्ट्रभर फिरले. त्यांनी लोकांची सुखदुःखे समजून घेतली. १९९३ साली त्यांचा मुलगा संजय याचे अपघाती निधन झाले.सूनबाई माहेरी गेल्या. त्यानंतर स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायची वेळ या महान शाहीर आणि लेखकावर आली . पण ते डगमगले नाहीत.कुणावर विसंबून राहिले नाहीत. आयुष्यभर अण्णाभाऊंचे विचार जगाला सांगत राहिले. अण्णा भाऊ साठे, कार्ल मार्क्स आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी, स्वाभिमानाने ते जनतेच्या भल्यासाठी झटत राहिले. अशा या महान योद्ध्याला स्मृतिदिनानिमित्त माझे विनम्र अभिवादन...जय भीम, लाल सलाम...!
- डाॅ. मारोती कसाब.
संदर्भ - " शंकर भाऊ साठे : व्यक्तित्त्व आणि कर्तृत्त्व , लेखक मारोती कसाब, प्रतिमा पब्लिकेशन्स, पुणे. प्रथमावृत्ती - १५ मार्च २०१८

Comments
Post a Comment