श्रुती - स्मृतींचे राजमार्ग : मराठी दलित काव्य

अनिकेत जावरे यांच्या लेखातील काही मुद्दे -

जातीव्यवहार म्हणजे लोकांच्या शारीरिक व्यवहाराचे नियमन, कारण जातीव्यवहार स्पर्श प्रकारच्या व्यवस्थेतून व्यक्त होतो.

ज्याप्रमाणे मानवी शरीरे 'जाती'च्या संकल्पनेद्वारे बांधली गेली, त्याचप्रमाणे दलित काव्याची ऊर्जा आणि ताकद 'अस्सल' दलितत्वात बांधली गेली. अस्सलपणाच्या संकल्पनेच्या आधारे अस्सल परिघावर राहून अस्सल आपल्यावर अस्सल अन्याय झाला आहे, याचे अस्सल नैतिक समाधान मिळते.

'बुर्ज्वा' शिक्षण दलित व्यक्तीत विषमतेचा प्रदेश सोडून आर्थिक सुस्थितीत स्वतः ला सापडण्याची कामना उत्पन्न करते. दलित साहित्याचा आत्मा इथे हरवला! कुणी काढला?

दलित काव्याचा उपभोग बहुतकरून न-दलित वाचक करतात. त्यांच्याबरोबर एका ताटात जेवण्यापेक्षा, आपली कन्या त्यांना लग्नात देण्यापेक्षा दलित साहित्याचा उपभोग घेणे सोपे ठरते. शब्द कितीही जवळचे वाटले तरी, साहित्यातले शब्द एकत्र जेवण्याइतके किंवा शरीरसंबंध जोडण्याइतके जवळचे नसतात..... वर्षानुवर्षे शोषल्या गेलेल्या, या सर्व निम्नवर्णी, कुपोषित लोकांचे सुंदर विद्रोही साहित्य वाचण्यापेक्षा अधिक सुनैतिक काय असणार? आमच्या पूर्वजांच्या पापांचे क्षालन करण्यास अशी आम्ही सुरुवातच केली नाही काय, दलित साहित्य वाचून आणि त्यात आनंद मानून? त्यांच्या ताटातच जेवले पाहिजे किंवा आमची मुलगी त्यांना दिलीच पाहिजे असे थोडेच आहे?

दलित काव्याचे महत्व, त्याने साहित्यात काय भर घातली हे समजून घ्यायचे असेल तर 'दलित साहित्य' ही कोटीच नष्ट करावी लागेल. दलित काव्य हे प्रथमतः आधुनिक काव्य आहे. कारण त्यातून बहिष्कृत भाषांना, उक्तींना साहित्याच्या प्रदेशात प्रवेश मिळाला.

[काळेपांढरे अस्फुट लेख (2011)]

पुस्तकाविषयी : मराठीतील सध्याच्या anti - intellectualism च्या काळात अनिकेत जावरेंचे हे निबंध मराठीत थिअरी निर्मितीच्या वाटा निर्माण करतात. प्रत्येक प्रस्थापित समजांविषयी (परंपरागत आणि पुरोगामीही) अनिकेत शंका व्यक्त करत राहतो, हीच त्याच्या मांडणीची ताकद आहे.

Comments

Popular posts from this blog