★★★कुंगाबाई शाहू - प्रेरणेची पाखरमया★★★

"कुठं भिजला का नाही भिजला
खोसला लंगोटा पुढं निंघला
तीन बोटाचा लंगोट घालून
चालला रे तू तोंड वासून
म्या पुसतो तुला आता
काय राहिलं तुह्या मांघं आता ?"
                           आजाराने पुंजाबा नेमकाच मेला व्हता. त्याचं मढं बांधतांना सगळ्यांनी पाह्यलं. जगण्यामरण्यातला संघर्ष तिनं पाह्यला. तिनं सगळं आयुष्य स्वाभिमानी जग्लं. उर्लेलं जगत हाये.
"निंदन - खुर्पनं केले. सुग्या - सरया केल्या. हैब्रीडं सोंग्ले, पाडले, बांध्ले, सुड्या रच्ल्या, दाने पाटलाच्या घरात घात्ले."
"भाकर तुकडा मिळाला नाही तव्हा रानभाज्या पिळून-चुरगाळून खाल्ल्या माय!"
"जीवावर बेतलेले कामं केले पन; सबुद कोन्हाचा लावून घेत्ला नाही."
ती म्हणते,
"गड्या, "जबान चांग्ली पाह्यजे त्याच्यावर ह्यो ख्योळ हैं सग्ळा!"
"सिरबड - बिरबड काट्यांनं कुंपन करून घेत्लं परांतु
आप्ल्या जीव्नालं काटीकुपाटी नाही तू घरालं काटीकुपाटी का लाव्तू?"
"खळं होईल रे सग्ळं!"
                           तिचे जीवनाविषयीचे संदर्भ काळाला चिरून जातात तर काही मर्मभेदी विवेकाने टिकून राहतात. ती काळजाच्या चिंतेने बोलली,
"घरं करा रे घरं! काळ्जात घर करा !"
"तुम्च्या सिमिटाच्या भित्तीलं तडे जातील पन विश्वासानं लिप्लेल्या काळजाच्या घरालं आधडे पन उडणार नाहीत!"
                           तिचा विश्वासावर इतका विश्वास हाये. जीव्नाच्या स्वाभिमानी जग्न्यावर इतका खोलवर विश्वास हाये. निखळ नात्यागोत्याच्या संबंधांवर तिचा विश्वास कर्कच्चून बांध्लेला असल्याने ती बिंधोक जगण्याचं तत्वज्ञान साध्यासरळ शब्दांतून व्यक्त व्हत राहते. तिचं बोलणं काळ्जाला भिडतं. कारण ती जग्न्यातले अन वास्तवाचे अनुभव नजरेसमोर ठेवून अभिव्यक्त व्हते. निस्सिमपणे बोलती व्हते.
                           तिला तुकोबांच्या अभंगाचा लै अभ्यास. तो अभंग ती रोजच्या दैनंदिनीत जगते. बिनदिक्कत जीवन जगून ती सुकासुकी मरन मांघंत फिरते हाये.
"कळना अस्सो का कोंडा
भुकेच्या घालून तोंडा"
                           हे म्हणतांना तिचा हात तोंडाजवळ जातो. जणू काही ती घास भरवून खाते हाये अशी हालचाल करते. तुकारामांच्या म्हणण्याला ती जिवंतपणाच्या खुणा आणते. ती सहजपणे बोलली,
"रात्रंदैन आम्हाँ इद्धाचा पासंग"
                           असे तुकोबांचे निर्भीड अन जगण्यातचे तत्व सांगणारे अभंग तिच्या घाटमाथी बोलीत ती सांग्ते. तुकारामांच्या अभंगातला एखादा तोडगा बोलीत घेऊन ती तिचं म्हणणं पारखून ठेवते. तसेच ती त्या म्हणण्याला सातशे नव्हे तर संतांची परंपरेच्या इतिहासाचा वारसा लावत सदोहरण महत्व प्राप्त करून देत राहते.
तिलं सहज म्हणलो,
"का वं तू कित्ती शिकली?"
"हे सगळं तुलं कसं ठाऊक?"
तिनं खोलवर गेलेली नजर मह्याकडं फेक्ली. अन खाल्च्या व्हॉटाची चुंभळ करत ती म्हणली,
"आर्र बाप्पा, कश्याच्या शाळा अन कश्याचं काय?"
"तव्हा बुरा वखुत व्हता आता कुत्रं तुकडा खाता खायेना
भाज्या पिळळ्या मीठमिर्चु पाण्यात परतून भिनि खायना"
भिनि हा शब्द नवा होता. न राहवून म्या म्हणलो,
भिनि म्हंजे क्काय वं?
"आर्र भिनि म्हंजे जीव! जित्ता जीव!"
तिचे जगण्यातले काही शब्द तिचे स्वतःचे हायेत. ती अर्थ अन त्यामागचा मर्म त्यात शोधत जग्ते.
"रिपोर्ट" ला ती "रपेट" समजते,
"केसेस" ला ती "केसी" म्हणते.
                           तिच्या जाणिवा खोलवर आहेत. त्या खोलच्या मुळाशी जगण्यामरण्याची भ्रांत आहे. तिचं असणं म्हणजे काळाचं निरूपण करता येण्यासारखं आहे. म्हणून ती म्हणत राहते.
" जाईल ह्यो बी काळ गर्भार!"
"माय्ब्बाई मलं तर यावं आत्ता मरन!"
"येईल का वं महाराज मरन, सुकासुकी?"
"जीवाचा इनाकारन तरास नक्को दुसऱ्या!"
महाराज यावर म्हणतात
"दुःखाचं शरीर घर हैं काया कंचन करले...!"
"जीव वाघाटाच्या जाळीत हैं सहजा सहजी तुटत नाही!"
"तुम्ही म्हणाल हे महाराज कोन?"
"जिवंत जीवाला हे वाघाटाच्या जाळीत का टाकतात?"
"अन सहजासहजी जीव तुटत नाही म्हणजे काय?"
त्त हे लिहितांना म्या लिहीन अन तुम्ही वाचतांना वाचत रहाल,
"महाराजांना भेटल्यासिवा महाराज कळनार नाहीत." "समजनार नाहीत."
"उमगनार नाहीत."
"सहजासहजी ते महाराज नाहीत."
तिलं म्हणालो
"रंग सुंदर असतात का वं?"
"का सुंदरतेचा कोणता रंग?"
ती खळकन हास्ली. टचकन डोळ्याच्या खोबणीतून पाणी तरळलं, ती बोलली,
"भोरी म्हैस अन पाण्यात बैस
गोरी नको कळी बेरी बरी...!"
"उन्हाळा लागला की गांजरचं!"
"रंग सोंदर नसतात."
"सोंदर आस्सा कोंताच रंग नाही.
असं तिचं साधं-सरळ म्हणणं.
"म्या म्हणलं आपुन क्काय अर्थ घ्याव?"
"जे येचुन घेयाचं आस्तं तेच येचुन घेता येतं!"
                           ती जमिनीवरचे दाणे येचावे तसे बोटांचे आकार करत बोलली. ती म्हणजे, स्पष्ट बोलणारी, मेलं म्हणजे वाईट बोलू नये तरीही ती ही रीत मोडते. जे हाय ते बोलती.
पुंजाबा मेला तेव्हा ती बोलली की,
"मेरी मुर्गी एक टांग व्हता त्यो!"
"जे हाय ते बोलायला क्काय लाजलज्जा!"
"घरालं काट्याच्या फांदुऱ्या लावाय्चा. लहान लेकरांच्या पायात काटे रुताय्चे. भडंभडं लेकरं रडाय्चे. लेकरांच्या रडण्याचा कोलाहल ती पाहू शकत नसे. ती लेकरू उचलून कडेवर घेई. पायातला रुतलेला काटा उपसून काढी. तोंडातला थुक्का बोटावर घेऊन ती लेकरांच्या पायावर लावी. तपासून पाही.
"काटा चपकला तर नाही नं."
"खुडला का नाही."
"रगात थांबलं का नाही?"
पोरं रडायला लागले की तिचा जीव कळवळतोय.
ती बोलून जाते,
"तुझा बाप तुला नसे ठाव
शोधून माय घे आधी...!"
                           तिचं हे म्हणणं म्हणजे मार्मिक तितकंच सत्याच्या शोधनातलं जंत्रीयुक्त तत्वज्ञान. तिच्या या बोलण्याने डोसक्यात विचार चमकला.
"आपल्या हृदयात जे असतं ते सारं पांगुन दिलं पाहिजे!"
बीज रुजतं. रोपटतं. फुलारतं. पुन्हा नव्या रुपांतराने बीजारून जातं. हे बीजारून जाणं तिच्या सांगण्या - बोलण्या - वागण्या - जगण्यात हाये.
कधी कधी ती बोलता बोलता मलूल होती. तितकीच ती धीरगंभीरपणे बोलून जाते.
"म्या म्हणून का ऱ्हावं...?
म्या मलूल का ऱ्हावं...?"
ती तिच्या बापाची आठवण सांगते.
                           "आर्र बाबू, या आख्ख्या गावात नसंल आस्सा मव्हा बाप व्हता. हक्काचं जे हाय ते हक्कानं खाय्चा. जित्त्या जीवाची त्यालं लै आस. जीव उपासी राहू नये म्हणून खंट्या खंदाय्चा. वळणं घालाय्चा. बाभळी पाडाय्चा. सर्पन करून द्याय्चा. या कामाच्या मोबदल्यात वरच्या गावातून दाळ - दाना मिळाय्चा. लोकं देत व्हते. मयाळू व्हतं गाव त्या पासंगी. पण सणासुदीलं गाव नेमधरम बाळगाय्चं. रूढी पाळून व्हतं गाव.
अखाडानंतर गावात लक्षुम्या बसल्या. दोन दिवस गोरगरिबांना कोर्कुटका सुटला नाही वरच्या गावाकडून. सगळं वातावरन भुकेनं तुंबलं.
                           मह्या बापानं खंटी खंदली. शाहू त्याचं नाव. कष्टाचा मोबदला मांघाय्लं शाहू ह्यो साहेबराव पाटलाच्या घरी गेला. अन म्हणी,
"पाटील!" आंब्यावाल्या वावरात चवदा हात खंटी झाली दो दिवसात!"
"पर घरात तोंडालं लावाय्ला दाना नाही."
"लेकरं भुकेनं याकुळ व्हया लाग्लेत."
"दुर्डीत भाकरीचा तुकडा नाही राह्यला."
"आमी कामं केलेत त्त त्याचं काही द्या."
"दाळ - दाना पदरात घाला."
"आम्चं कष्टाचं जे व्हइल ते आम्चं आमाला द्यावं!"
                           दारात महार आलाय अन सणासुदीचं मांघू लाग्लाय. हेच पाटलाला पटलं नाही. देलं त्त धरम तुटतो. घरातली लक्षुमी महारांच्या घरी जाईल. आपल्यावर दिस फिर्तील. या अंधश्रद्धेनं पाटील बोलला,
"लष्मीम्या बस्ल्यात घरात. दाळ- दाना देता येनार नाही!"
दैवार हैं, घरातल्या अन्नाचा कन घराबाहीर पडता कामा नये!"
"धरम बाटंल! धरमाच्या इरुधात जाता येनार नाही."
"तीन दिस जगा कसेपन. कुठं मरान खात नाही मांगा - महारालं!"
                            शाहू फन्फंला. आधीच दो दिसाचं भुकेलं मन. पोटात भाकरीचा तुकडा नाही. लहानसहान लेकरं उपास्पोटी निजले. कामं करून कामाचा मोबदला नाही. अन उपर ह्ये धरमाचं भारुड ह्यो पाटील आय्कवाय्लं लाग्लाय?
"आर्र मुका!"
शाहू कळवळून म्हणाला,
"लाकडाच्या खुट्ट्या करून लष्मीम्याच्या गांडीत घातल्या. अन त्याहिच्यापुढं नाना परकार निवद लावला का?"
"लाकडाच्या लष्मीम्या खातात का ते आनपान?
"जित्त्या जीवालं आन नाही."
"ह्या आम्च्या खऱ्या लष्मीम्या आन्नावाचून मरायलं लाग्ल्यात."
"जिवाय्ची काही कीव हाय का नाही?"
"जीव जग्ला नाही त्त धरम पण जग्नार नाही!"
"तुम्च्या भूकांड्या व्हो जीव जित्ता नाही त्त देव पन नाही!"
"बंबूऱ्यावर बांधतो आस्सें देवख्येव!"
"दाणे द्या!"
"आम्च्या कष्टाचं चीज आम्च्या हाती द्या. आम्चा जित्ता जीव ह्योच देव हाय त्यो जेवला म्हणजे आम्ही जग्तो.!"
                            शाहू जिवाच्या आकांतानं बोलला. साहेबराव पाटलालं शब्द जिव्हारी लाग्ले. त्यो आतून मलूल झाला. पाटील घरात गेला अन त्यानं बाचकंभर दान्याचं पोतं शाहूच्या पुढं - वसरीत उभडं केलं. शाहू ह्यो पाटलाच्या नजरेत रोखून बोलला,
"जीव ह्योच त्त देव पाटील.!"
"अन शाहूनं माय, धोतराच्या सोग्यात सगळे दाने भरले. घरी आनले. आमी जात्यावर दळून घेतले. त्या दिवशी पोटभर जेवणं केली."
"आसे काळ बाबू पहिले. लोकं सपश्ट बोलत. चार - दो रोज रागफुसी. पण गाव असं वैर बाळगत नव्हतं. पुन्ह्यांदा काळजाची मया गावात खेळायची."
ती बोलत व्हती तव्हा तिच्या डोळ्यातून आसवं घळघळू लाग्ले. म्या ईच्यार करत व्हतो,
"ते वघळ कश्याचे आस्तील?"
"बाप - शाहू महाराचे का त्याच्या जग्न्याच्या रीतीभातीचे?"
"पाटलांनं देलेल्या अनाजाच्या आठवणींचे की गावाच्या काळजकोर मयेचे?"
"का व्यवस्थेने देलेल्या दुःखाचे?"
"का ते आसवं व्यवस्थेशी संघर्ष केल्याचे आस्तील?"
ती आता जीवानिशी म्हणते,
"जीवाची घाण सोसू पन तंटेबखेडे नक्को!"
"शाळा कटुन शिका रे बाबा व्हो. गरिबी हाटवा!"
"आप्ल्यालं पानी पन दुरून होतं. सारा इटाळ होता रे पोरा."
"आता हातचं पानी पितात.बाबासाहेबांसारखं शिका!"
त्यो लंडनला गेला. तिथून आला.सगळ्या भारतात गेला त्यो. लंडहून आला बाबासाहेब. त्यानं पोटचं लेकरू मेलं त्त पाह्यलं नाही.
" मरू दे म्हणी मेलं त्त."
"रमाबाई म्हनाजाय, देवा ह्ये आप्लं एकुलतं एक पॉर्गं मेलं. तुम्ही पाह्यलं बी नाही."
"जाऊ देनं म्हणी, येकासाठी इतली भारता कुठं द्याची टाकून म्हणी, इतली जीवन हैं त मंग, याहीलं द्याचं टाकून अन याहीलं धराचं. म्हंजे आस्सा त्यो माणूस व्हता बापा!"
"संघर्ष तुटंल येक्दा!"

                            तुकाराम - कबीर- चोखा - लहुजी वस्ताद - फुले - शाहू - आंबेडकर - अण्णा भाऊ साठे ही महाराष्ट्रातील विचारधारा तळागाळात नेणाऱ्या अन तत्वनिष्ठ जगण्याऱ्या कुंगाबाई शाहूसारख्या कैक जाणकार अजून जिवंत आहेत. त्यांना भेटून - बोलून - समजून घेऊन प्रेरणेची पाखरमया काळजाला भिडते.
त्या दिवशी गावी आलो होतो. अशीच भरकटत कुंगाबाई आली.
"कधी आला माय गावी?"
म्हणून दारात उभी राहून बोलली.
म्या म्हणलं,
"दारात उभी राहूनच ख्यालखुशाली घेणार हैं का?"
"आत ये च्या पी. बस. जीवाला थोडी इसरांती दे!"
                           ती आत आली. मायनं च्या केला च्या पिला तिनं. तिनं च्याबरुबर भडभड बोलून व्यक्त झाली. वाटतं कैक दिवसांचं तिला बोलायचं असावं पण ऐकणारे - ऐकूण घेणारे - समजून घेणारे तिला सापडत नसावे. सगळं गाव तिला येडीपिसी कुंगाबाई म्हणतात. ती स्वतःला बोलता बोलता म्हणी,
"महं नाव पिसू कुंगाबाई शाहू!".
"तिला म्हणलो कोन म्हणतंय वं तुला येडीपिसि?"
तू तर लै अभ्यासू हैं...तुला अभ्यासणारा अभ्यासक नाही.!"
म्या बाबाच्या तोंडातील कबीर - कमाल यांचा सवालज्वाबदेही दोहा आठवत होतो.

"चलती चक्की दिखे कबिरा रोये
दो पाटण के बीच शाबूत बचा न कोय...!"
-कबीर

"चलती चक्की दिखे कबिरा क्यूँ रोये
जो खुंटे को पकडे उसका बाल भी बाँकां न होय...!"
-कमाल

मह्या आता नवा दोहा विचारात येऊ लागला...

"चले चक्की बचेपिसे - पिसेबचे धान रे कबिरा कमाल
हैं आज भी कछु जवाब विश्वा देत समझान कछु सवाल!"
-विश्वा

-विश्वनाथ साठे[9921056462]

Comments

Popular posts from this blog