“लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी | जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी"
                                            सुरेश भटांनी लिहिलेल्या ह्या गीताची आठवण प्रत्येक मराठी भाषादिनाला झाल्या वाचून राहत नाही. कोणताही साहित्य प्रकार निर्माण होताना त्यामध्ये तेथील समाजाचे प्रतिबिंब हे पडत असते. त्याचप्रमाणे हे गीत लिहिताना देखील आजूबाजूची परिस्थिती, समाजाचा कल लक्षात घेऊनच भटांनी याची रचना केलेली असावी. २०व्या शतकात ही कविता लिहित असतानाचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र यामध्ये बराच बदल झालेला आपल्याला दिसून येतो. तेव्हा आपण मराठी बोलतो याची लाज कोणाला वाटत नसे पण आज २०१८ मध्ये मात्र आपल्याला यामध्ये फरक पडलेला दिसतो.
                                           पूर्वी फक्त उच्च जातीतल्या माणसांना संस्कृत येत आणि सामान्य माणसांना मराठी येत. संस्कृत मधील साहित्य सर्वसामान्यांना समजावे यासाठी सर्व संतांनी, थोर व्यक्तींनी प्रयत्न केले हे आपल्या सर्वांना माहित आहेच पण आज तिच मराठी नकोशी वाटायला लागली; या सारखे मोठे दुर्भाग्य नाही.
                                           पुणे. पुण्याची मराठी ही प्रमाण मराठी मानली जाते, शुद्ध मराठी मानली जाते, न च्या जागी ण, फुडे नाही तर पुढे अशा चुका तोंडावर सांगणारे पक्के पुणेकर आता मात्र तुळशीबागेत जाऊन ‘भैया ये कीतनेको दिया ?’ असे विचारताना दिसले तर नवल वाटायला नको. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान असतो, आदर असतो, पण मग दोन मराठी भाषिक  लोक समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात हिंदी किंवा इंग्रजीमध्ये संवाद का साधला जातो..? याचे उत्तर म्हणजे आपण मराठी बोललो तर आपल्याकडे तुच्छ नजरेने तर बघितलं जाणार नाही ना ? (जसे हिला / ह्याला इंग्रजी / हिंदी येत नसेल.)
                                          आजच्या काळात राहण्यासाठी मराठी सोबतच हिंदी आणि इंग्रजी येणे गरजेचे आहेच काळाची गरज आहे, पण त्याच्या किती आहारी जायचे हे आपल्या हातात असते. आपली आई कशीही असली तरी आपल्याला तिची कधी लाज वाटत नाही मग तिने शिकवलेल्या भाषेची लाज का वाटावी..?
                                          आणि या सर्व वातावरणाचा परिणाम आपल्या मनावर होऊन आपल्याच मातृभाषेबद्दल न्यूनगंड निर्माण होतो, परिणामी समाजात ज्या भाषेला दर्जा आहे ती भाषा बोलण्याला प्राधान्य दिले जाते.
                                         आज आपल्याला इंग्रजी A to Z न अडखळता क्रमाने सहज आठवतं पण शाळेत शिकलेली बाराखडी आणि मुळाक्षरे क्रमाने आठवतात का..? आणि या प्रश्नांचे खरे उत्तर समजल्यावर आपण आपल्याच भाषेला किती ग्राह्य धरतो हे लक्षात येते.
                                         मराठी भाषेला वाईट दिवस आले आहेत, मराठी भाषा संपुष्टात आली आहे, मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत, वगैरे वगैरे वगैरे.. पण ह्या परिस्थितीला एका दृष्टीने आपणच जबाबदार आहोत का ..? आणि याचे उत्तर हो असे आले तर आपल्या भाषे कडे गंभीरपणे बघण्याची वेळ  आली आहे अस म्हणावं लागेल.
                                        जर संवादाची ही परिस्थिती असेल तर श्रवणाबद्दल काही बोलायलाच नको. त्यामुळे आपल्या सर्वांना लाभलेले हे भाग्य आता फक्त कवितेतच न राहता आपल्या रोजच्या आयुष्यातही उतरावे ही माफक अपेक्षा..
                                         याबद्दलची आपली काही मतं असल्यास जरूर नोंदवा.. धन्यवाद
                                                                            - -धनश्री

मराठी वाचनाचा मुद्दा नाहीये यात. एकंदर वाचनच कमी झालंय त्यात मराठी वाचन अजूनच कमी. वाचनाने ही जाणीव होते की आपली भाषा किती संपन्न आहे. भाषेबद्दल गोडी निर्माण होते.
-सुजित काळे

आपल्याला इंग्रजी लिहलं बोलल म्हणजे सर्व गुण संपन्न असा समज आहे त्यामुळे आपली मराठी काही वर्षानी नाहीशी होण्यासा  वेळ लागणार  प्रत्येकाने ठरवले की मराठी माणसशी मराठी तुनच  व्यवहार करायचा तर काही तरी होऊ शकते. नाही संस्कृत सारखे मराठीची अवस्था होण्यास वेळ लागणार नाही.
- रेश्माजी परितेकर

मुंबई, पुणे सोडता महाराष्ट्रात कुठेही उगाच हिंदी किंवा इंग्लिश बोलणारे मराठी भाषिक दिसण्यात नाहीत. म्हणून मराठी कालबाह्य होतेय वगैरे असं काही मला वाटतं नाही. शुध्दतेचा अट्टाहास सोडल्यास, चांगलेच दिवसं चालू आहेत मराठीला. माझ्या-तुझ्यासारखे आहेतच की जे मराठीच बोलतात. बसं तर. वाचणं कमी झालंय हेही खरं वाटतं नाही. कारण त्याचीही काही आकडेवारी नाहीये.
- हरेश

आजचं बघा..
काल होळी झाली आज धुलवड..
सण आपला, उत्सव आपला, तो सण साजरा करणारे आपण भारतीय
पण ह्या सणाच्या शुभेच्छा मात्र Happy Holi असं म्हणून द्यायच्या..
- धनश्री

खुप सुंदर विचार समोर ठेवलेस तू.

- सागर सुरवसे

प्रथमतः धन्यवाद धनश्री....मनातली खदखद बाहेर टाकली...खरंच आज मराठी अस्मितेविषयी कुणी फारसं बोलत नाही..आधुनिकीकरणाच्या या युगात मराठीला गौनत्व येत आहे...तुझ्या मताशी सहमत आहे..कारण इतर भाषेच्या धुंदीत आपण आपल्या मातृभूमितील मायबोलीला विसरत आहोत.....त्या गीतासंबंधी जास्त बोलणे नाही.वरवर मया वाटण्या करणारं ते गीत आजच्या शतकाचे वेगळे रूप घेतले जात आहे....आज त्याचे संदर्भ वेगळे लागतात.आपण मराठी बोलतो म्हणजे नेमकं काय करतो.तर मला म्हणावसं वाटेल की आपण संस्कृतीला पुढे नेत असतो.आपल्या सामाजिक जाणिवांना भाषेच्या माध्यमातून अस्तित्वात आणत असतो.आपल्या नैतिक भावनेला भाषेच्या जोरावर टिकून ठेवत असतो.प्रमाणिक पणे सांगतो.आपण ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी आपली भाषा  तोकडी वाटायला लागते..कारण इतिहास याला साक्ष आहे.इंग्रज आले भाषेच्या अधिपरियावर त्यांनी अधिराज्य केलं.आणि त्यांनी त्याची भाषा पेरली..इथे पेरली असे म्हणेन कारण ही भूमी त्यांची नव्हतीच मुळात.कारण ते परकीय क्षेत्रातून आलेले.मात्र त्यांनी भाषेचा असा पोखर केला की आज आपले नातू,लेक,पतरुंड इंग्रजी शिकून चाकरमानी व्हावेत यासाठी आपण झटतोय.इंग्लिश शाळेच्या नरड्यात लाखाने पैसा कोंबून अर्थहीन होत आहोत.पुढे यांना धड मराठी संस्कृतीही सांगता येत नाही नि इंग्रजी ही.मधेच भपोळ्यासारखे ते होतात.

खरे तर ही ग्लोबलायझेशनची मुसीबत आहे.जागतिककरणाने एक वेगळा फास लावला आहे प्रत्येक क्षेत्रात ...मात्र तो गळ्यातला ताईत आहे असेंचजचे वास्तव दिसते आहे.आम्हांला भाषेच्या संदर्भात जाणीव नाही की आपण आपल्या भाषेबरोबर इतिहास,भूगोल,शोध,सांस्कृतिक वारसा नि हक्क,सामाजिक जाणिवा,इव्हन नोकर्या,अधिकारता,ज्ञान नि अस्मिता हरवून चाललो आहे....तू आज बोलतं केलं या प्रश्नाला...थँक्स...पुढील काळात यावर एक लेख लिहितो आहे.....चर्चा करत राहू.....💐💐

Comments

Popular posts from this blog