****"आंबेडकरी चळवळीतील वामनदादानंतरचे साहित्यिक रवींद्रजी धोत्रे काळबिंदूवर विसावले.....!"***
सह्याद्रीच्या कडेकपारीतून आणि घाटाघाटातून दर्यादिल जिंदा आवाज आणि डॉ.बाबासाहेबांच्या तत्वाने फुलीत झालेला विचार कालच विसावला.महाड तालुक्यात लाडवली गाव.महाराष्ट्र आणि आंबेडकरी विचार जिथे जिथे पोचला तिथल्या मराठी भाषिक लोकांच्या काळाजापर्यंत अन्यायाविरुद्ध बाणेदार आवाज आणि परिवर्तनाचे करारी शब्द घेऊन जाणारे रवींद्रजी धोत्रे यांचे शुक्रवार दि ९/११/२०१८ ला सायं.६.००वाजता दुःखद निधन झाले.
"आपण तर केव्हाही जगू.इतरांसाठी जगलं पाहिजे आणि असं जगणं म्हणजे परिवर्तनाचा पाया होय...!" हे विचार डोक्यात ठेवून धोत्रे लिहीत राहिले.शासनाकडून मदत ना कोणाकडून आधार घेतली नाही.यामुळे हालाखीचे जीवन धोत्रे जगत होते. शिवराय,फुले,शाहू,आंबेडकर,अण्णाभाऊ या महापुरुषांच्या जीवनावरच त्यांनी सातत्याने आपली लेखणी गिरवून आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असतांना शब्दांची श्रीमंती स्वतःच्या प्रगल्भतेने खिशात ठेवली.काळजात जपली.
विद्रोही शाहीर,गजलकार वामनदादा कर्डक यांनी आपलं जिणं आंबेडकरी चळवळीसाठी गीते,गझल लिहिण्यात,गाण्यात वाहून घेतलं.त्या विचारांच्या मागे पाठिंबा देत रवींद्रजी यांनी चळवळीची,महापुरुषांची आणि अन्यायाविरुद्ध न्याय मागणारी,वंचितांच्या वाचा बोलणारी गाणी लिहिली.
महाराष्ट्राच्या अनेक सुप्रसिद्ध गायकांनी ही गाणी गायली.ज्यात प्रल्हाद शिंदे,विठ्ठल उमप,प्रवीण निकाळजे,शकुंतला जाधव,भजनसम्राट वामनबुवा खोपकर,श्रावण यशवंते,रेश्मा सोनावणे आणि महाडचे विलासबुवा देशमुख या दिग्गज गायकांनी धोत्रे यांची प्रेमगीत,शायरी,सवाल जबाब,भीमगीते गायली.
"झालास तू बलवान बाबा भिमामुळे,
मिळे तुला तो मान बाबा भिमामुळे...!"
अशी भीमगीतं तर
"ज्यानं केलं या जीवनाचं कल्पतरू
गौतमा तूच माझ्या गुरूचा गुरू....!"
आणि
"पहाटे पहाटे उठवतो मला,
माझा बाय नवरा नटवतो मला...!"
अशी लोकगीते अजरामर आणि सुरात रूपांतर झाली.चवदार तळे मुक्तीचं वास्तव पाहणारं दर्यादिल ठिकाण आहे आणि इथे काठावर दिवसाचा कैकाळ रवींद्रजी घालवत होते.संग्राम न्याहाळत होते.
"हे असं म्हणतंय चवदार तळं....!"
तर
"कवडीच ज्ञान नाही कायद्याच
जो तो बघतोय आपल्या फायद्याच...!"
अशा रचना लिहून चळवळ व परिवर्तनाची धुरा अजरामर करून ठेवली आहे.त्यांची
अनेक गीते ध्वनिमुद्रित,पुस्तकांच्या रुपात तर अनेक गीते गायकांच्या गळ्यातून लोकांच्या हृदयातून खेड्यापाड्यांत,गोरगरिबांच्या,चळवळींच्या आणि परिवर्तनाच्या वाटेवर राजदिवा म्हणून उभी आहेत.
महाड चवदार तळे सत्याग्रह,भीमजयंती,बुद्ध पौर्णिमा,धम्मचक्र प्रवर्तन दिन,६ डिसेम्बर,मनुस्मृती दहन दिन अशावेळी त्यांनी आपली स्वतःची गीते भिम अनुयायांना ऐकवून प्रबोधनाची चळवळ जिवंत आणि धगधगती ठेवली होती.कारण एकीकडे ते गाणं बोलताना केवळ शब्दातूनच बोलत नव्हते,तर त्यांच्या देहबोलीतून ते गाणं घेऊन लोकांपर्यंत पोहोचवायचे.
रवींद्र धोत्रे यांचे शिक्षण मुंबईत झाले. बी.जे.देवरूखकर मार्गावरील मराठी महानगरपालिका शाळेत जेमतेम सहावीपर्यंत शिक्षण झालेल्या धोत्रे यांना या वयातच गाणी लिहिण्याची बूज निर्माण झाली.आणि ती आयुष्यभर राखली.मुंबईत बेस्टमध्ये सफाई कर्मचारी म्हणूनही त्यांनी नोकरी केली.नोकरीत असतानाच आपली ही आवड त्यांनी सोडली नाही.अशा काळातच जयंताबाई आडे या गायिकेने रवींद्र धोत्रे यांना सिनेमाच्या चालीवर गीत लिहिण्यास प्रवृत्त केले.
ज्या बी.डी.डी.चाळीत शाहीर विठ्ठल उमप राहत होते त्याच चाळीत रवींद्र धोत्रेही राहत होते.हा छंद वाढीस गेला आणि नोकरीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे नोकरी गमवावी लागली.त्यातच घरातील दोन मुले आणि आई अशी तीन माणसे एकाच महिन्यात दगावली.यामुळे रवींद्र धोत्रे यांना आपले कार्यक्षेत्र सोडून 1981 साली गावी यावे लागले.गावी देखील जगण्याचे साधन नव्हते.जागा विकत घेवून घर बांधावे लागले.
वयाच्या 83 व्या वर्षीही रवींद्र धोत्रे यांनी आपला छंद जोपासला होता.मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात गाठीशी काही नसल्याने ते गरिबीच्या चादरीत उघडे पडले.दारिद्र्याच्या खाईत लोटले गेले.
त्यांच्या नसण्याने शिवराय,फुले,शाहू, आंबेडकरी साहित्य चळवळीत खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.लिहितं राहून परिवर्तनाची बूज राखणं ही त्यांच्या शब्दांसाठी आदरांजली असेल.

Comments

Popular posts from this blog