Rounded Rectangle: संज्ञापन वृत्तपत्रविद्या  पदविका अभ्यासक्रम
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. 
   
                                                            
                                                           
विद्या
“सकाळ”
वृत्तपत्र कार्यानुभव अहवाल

***********************************************************************************
विश्वनाथ अर्जुन साठे
रोल नं.३०
***********************************************************************************

*अनुक्रमणिका*

Ø प्रास्ताविक
Ø वृत्तपत्राचे नाव आणि त्याविषयी माहिती
Ø कार्यानुभव
Ø प्रसिद्ध झालेल्या बातम्या
Ø समारोप



प्रास्ताविक –

                                                संज्ञापन वृतपत्रविद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला वृत्तपत्रातील वार्तांकन सकस पद्धतीने आले पाहिजे यासाठी कोणत्याही वृत्तपत्रात किमान दिवसातील चार तास असे पंधरा दिवसांचे एकूण साठ तास काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. आणि संज्ञापन वृत्तपत्र विभागाने दिवाळीतील वेळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील कार्यानुभवासाठी राखून ठेवला आहे. संज्ञापन वृत्तपत्र विभागाच्या ऋणात राहू इच्छितो की, या अभ्यासक्रमातील कार्यानुभवाच्या तरतुदीमुळे या काळात मला  “सकाळ”  या वृत्तपत्रानेही परवानगी दिल्यामुळे  काम करण्याचा अनुभव मिळाला. आणि नवीन विविध विषय, आशय आणि प्रत्यक्ष वृत्तपत्रातील काम शिकण्याचे तंत्र अनुभवता आले. त्यच बरोबर काही गोष्टी शिकताही आल्या.
                                                मी २०१३ साली पुण्यात आलो. पुण्यात कुठे कोणते कार्यक्रम आहेत या माहितीपासून तर महत्वाच्या घडामोडी आणि, कविसंमेलन, व्याख्याने , अशा सांस्कृतिक  कार्यक्रमाची माहिती तसेच आणि बातम्यांतून राजकीय, आर्थिक, बाबतीतील माहिती तसेच शब्दकोडे सोडविण्यापार्यंत वृत्तपत्राचे वाचन करायचो. म्हणून त्यामुळे सकाळ वृतपत्र नेहमी आवडीचे राहिले आहे. तेव्हापासून तर आजच्या कार्यानुभावाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सकाळ वृत्तपत्र वाचतो आहे. यामध्ये बोधकथा, पहिल्या पानावरच्या बातम्या,  ऐतिहासिक माहिती, प्रासंगिक, अग्रलेख अणि अग्रलेखाजवळचे महत्वाचे  लिखाण, साप्ताहिक, संपादकीय, तसेच दर रविवारचा सप्तरंग पुरवणीचा लिखाण खजिना वाचनातून लुटतो आहे. होय माझ्यासाठी तरी हा खजिनाच आहे.
                                                 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन वृत्तपत्रविद्या पदविकेला  प्रवेश घेतल्यापासून वृत्तपत्राचे वाचन आणि त्यातील बातम्यांचे निरीक्षण, मनन, चिंतन, तसेच त्याविषयीचे मत तयार करण्याचे कौशल्य या पदविकेच्या अभ्यासातून शिकायला मिळाले. या आणि एम. ए. मराठीच्या दोन वर्षातील वाचनांच्या अनुभवावर वृत्तपत्रातील कार्यानुभावाला सामोरे जाणे तितकेच महत्वाचे वाटत होते. म्हणून ज्या वृत्तपत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि तांत्रिक कौशल्याचा वापर केल्या जातो,  एक सर्वसमावेश विचारदृष्टी त्या वृत्तपत्राच्या ऐतिहासिक विचारसरणीत आहे,  अशा  “सकाळ”  वृत्तपत्रात कार्यानुभव करावा हे मनात ठरून घेतले होते.










वृत्तपत्राचे नाव आणि त्याविषयी माहिती

“सकाळ”

                                                                 सकाळ (वृत्तपत्र) हे भारताच्या पुणे शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. डॉ. नानासाहेब परुळेकर यांनी पुण्यात एक जानेवारी १९३२ रोजी सुरू केले. २१ सप्टेंबर १९८७ पासून या वृत्तपत्राचा ताबा पुण्यातील उद्योजक मा. प्रतापराव पवार यांच्याकडे आला. सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक असून, त्याच्या आवृत्त्या सोलापूर, कोल्हापूर  मुंबई, नाशिक, जळगावऔरंगाबाद, आणि नागपूर तसेच अकोला  या शहरांतूनसुद्धा प्रसिद्ध होतात. सध्या सकाळ हे महाराष्ट्रातील आघाडीच्या खपाच्या दैनिकांपैकी एक आहे. वृत्तपत्र म्हणून सुरू झालेला सकाळ आता बहुमाध्यमसमूह झालेला आहे.



सकाळ वृत्तपत्र समूहाची इतर प्रकाशने-
दैनिके- सकाळ टाइम्स (इंग्रजी), अग्रोवन, गोमंतक (गोवा), गोमंतक टाइम्स (गोवा)

दूरचित्रवाणी- साम वाहिनी

'सकाळ' वृत्तपत्राच्या आवृत्त्या - पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नागपूर, नंदुरबार, पुणे, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, अकोला, बेळगाव, जळगाव, नांदेड, रायगड, सांगली, सिंधुदुर्ग आदि.


'सकाळचे संपादक-
  • ना. भि. परुळेकर - १ जानेवारी, १९३२ ते ३१ डिसेंबर, १९४३
  • रामचंद्र बळवंत उर्फ बाबासाहेब घोरपडे - १ जानेवारी, १९४४ ते २० फेब्रुवारी, १९५१
  • ना. भि. परुळेकर - २१ फेब्रुवारी, १९५१ ते ८ जानेवारी, १९७३
  • श्रीधर उर्फ एस. जी. मुणगेकर - ९ जानेवारी, १९७३ ते १४ ऑगस्ट, १९७४ (कार्यकारी संपादक)
  • श्रीधर उर्फ एस. जी. मुणगेकर - १५ ऑगस्ट, १९७४ ते ९ फेब्रुवारी, १९८५ (संपादक)
  • व्ही. डी. रानडे - १० फेब्रुवारी, १९८५ ते ३० एप्रिल, १९८७
  • एस. के. कुलकर्णी - १ मे, १९८७ ते ३१ जुलै, १९८७
  • विजय कुवळेकर - १ ऑगस्ट, १९८७ ते ७ ऑगस्ट, २०००
  • अनंत दीक्षित - ८ ऑगस्ट, २००० ते १५ जुलै, २००५
  • यमाजी मालकर - १६ जुलै, २००५ ते ९ मे, २००९
  • सुरेशचंद्र पाध्ये - १० मे, २००९ ते १ डिसेंबर, २०१०
  • उत्तम कांबळे - १० मे, २००९ ते ३१ जुलै, २०१२ (मुख्य संपादक)
  • श्रीराम पवार - १ ऑगस्ट २०१२ पासून (मुख्य संपादक)
                                         सकाळ टुडे स्थानिक पातळीवरील बातम्यांसाठी 'सकाळ'ने स्वतंत्र पुरवणी सुरू केली. या पुरवणीसाठी 'सकाळ'ने 'टुडे' हे इंग्रजी नाव वापरले. २००६-२००७ या कालावधीमध्ये 'सकाळ'च्या महाराष्ट्रातील सर्व आवृत्त्यांमध्ये स्थानिक बातम्यांसाठी 'टुडे' पुरवणी प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली. या बदलाची सुरुवात 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीपासून झाली. 'पुणे टुडे' ही पहिली पुरवणी १४ ऑगस्ट, २००६ रोजी प्रसिद्ध झाली. रोज मुख्य अंकाबरोबर ही १० किंवा १२ पानी पुरवणी प्रसिद्ध होते. यामुळे स्थानिक पातळीवरील बातम्या आणि जाहिरातदार यांना नवे शब्दपीठ उपलब्ध झाले. ईसकाळ.कॉम - अधिकृत संकेतस्थळ, ॲग्रोवन.कॉम,  दैनिक गोमंतक कॉम,  साम टीव्ही.कॉम इत्यादी संकेतस्थळ व नवीन आधुनिक माध्यमांचा उपयोग सकाळ करत आहे.
                                                 सकाळ ”  वृत्तपत्रात बोधकथा, पहिल्या पानावरच्या बातम्या, ऐतिहासिक माहिती, प्रासंगिक, अग्रलेख अणि अग्रलेखाजवळचे महत्वाचे लिखाण, साप्ताहिक, संपादकीय, आर्थिक, राजकीय, क्रीडा, कला, सांस्कृतिक विषयाची माहिती वाचयला मिळते. तसेच दर रविवारची सप्तरंग पुरवणी, सकाळ साप्ताहिक इत्यादी एडिशनमधून नवनवीन माहिती, समीक्षा व आशयाची बांधणी कशी असते याची सखोल व अर्थपूर्ण माहिती वाचनातून मिळत जाते.












कार्यानुभव-


                                                ३१ ऑक्टोबर २०१८ हा वृत्तपत्र कार्यानुभवाचा पहिलाच दिवस. खुप आनंदाची बाब म्हणजे आज प्रत्यक्षपणे ‘सकाळ’च्या जिल्हा मुख्य कार्यालयात जायला मिळाले. कार्यालयाची इमारत आणि आतले वातावण अगदी आनंदमय  व प्रेरणादायी वाटले.  सहाजिकच हातातले प्रवेश विनंती पत्र घेऊन संपादकीय व्यक्तीकडे जायचे होते. गोल वर्तुळाकार बैठक व्यवस्था ही संपादकीय व्यक्तींसाठी होती असं समजलं. डोईफोडे सर संपादक होते. इथे पहिल्यांदा संपादकांशी बोललो. त्यांनी कुलकर्णी सरांशी भेटायचे सांगितले.  त्यांना भेटून कामकाजाचे स्वरूप समजून घेतले.  त्यानंतर  संपादक संभाजी पाटील सरांशी चर्चा झाली. त्यादिवशी  सकाळ कार्यालयाचे कामकाज, संपादकीय व्यवस्था, बातमीदारी आणि  जिल्हा बातमीदारी, आणि विभागीय बातमीदारीचे स्वरूप आणि बैठकव्यवस्था समजून घेतले. नंतर  ‘सकाळ’  सभागृहात आमच्या  कामकाजाविषयीची चर्चा झाली. आठवडाभर बातमी करण्यासाठी प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी जाऊन बातमी आणायची असा निर्णय झाला.
                                                दुसऱ्या  दिवशी एव्हाना संज्ञापन विभागातील माझ्यासोबत शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनीही ‘सकाळ’  वृत्तपत्रात कार्यानुभावासाठी प्रवेश केला होता. हे दिवाळीचे दिवस होते यामुळे बर्यापैकी ‘सकाळ’चे कर्मचारी  दिवाळीनिमित्त रजेवर होते. आणि कार्यालायीन कामकाजाचा बोजा जिल्हा संपादकावर आपसूकच उतरला होता.  दिलेल्या वेळेवर कार्यालयात गेलो तेव्हा मंगेश कोळपकर ह्यांना भेटायला सांगितले.  त्यांनी “ बातमी तयार करण्यासाठी बाहेर जावे लागणार आहे.  त्यासाठी प्रसाद पाठक सर तुम्हांला माहिती सांगतील.  ती ऐका आणि आजच्या आज बातमी लिहून द्याल अशी तजवीज करा,”  असे सांगितले.  पाठक सरांशी बोलून, माहिती घेऊन आम्ही,  देवयानी,  दिनेश, रविकिरण आणि मी असे तिघे बातमीसाठी गेलो.  दिवाळीच्या दिवसात मंडई भागातील बाजारपेठ कोणकोणत्या वस्तूंनी सजली आहे याची माहिती घेतली. बाजारपेठेतील किंमती,  खरेदी, विक्री, व्यावसायिकांशी बोलून चर्चा करून बातमी तयार केली.  ही माहिती गोळा करतांना  याचवेळी बातमीसाठी एक विषय नजरेसमोर होता. पोटाच्या भुकेसाठी उत्तरप्रदेशातून आलेला तरुण या भागात जाकेट विकत होता. त्याच्याशी बोललो तेव्हा कळले की, तो शिकलेलाही नाही. त्याची सर्व माहिती घेवून बातमी तयार केल्यानंतर संपादकाना दाखविली. जी बातमी करायला गेलो होतो त्या बातमीबरोबरच दुसरी एक बातमी तयार झाली होती.
                                                 हा आठवडा बातम्या गोळा करून आणण्यात गेला. बातमी करायला गेल्यावर त्या त्या भागातील व्यक्ति,  संस्था   अधिकारी,  कर्मचारी,  संघटनांशी संवाद साधता आला. यामुळे सुसंवाद आणि संज्ञापन यातील अंतर्गत संदर्भ कळून येत होते.  व्यवहार्य पातळीवरील व सर्वसामान्य जनतेतील संवाद आणि वृत्तपत्र माध्यमांसाठी लिखाणातील तत्व,  बातमीचे मूल्य व त्यासाठी लागणारी कठोर परिश्रमाची क्षमता समजून येत होत्या. त्या क्षमतांची तोंडओळख घडून येत होती.
                                                 कोळपकर सर सांगायचे की, “बातमी रचना आणि आशयाला धरून लिखाण आहे की,  नाही यासाठी त्या बातमीला अनेकवेळा लिहून पहिले पाहिजे, बातमी वाचली पाहिजे, त्याची मेल,  ईमेल,  हार्डकॉपी बातमी सिस्टममध्ये टाकता आली पाहिजे. नोंद करता आली पाहिजे.”  त्यावेळी  “सकाळ मिडिया सिस्टममध्ये”  बातमी कशी टाकावी याचे कौशल्य ते शिकवीत होते.  सोबत  बसून काही बातम्या एडिटिंग करायचे कौशल्य समजून घेत होतो.  प्रत्यक्षपणे कम्प्युटरला बसून त्या बातम्यांचे लिखाण व सिस्टिमध्ये टाकण्याचे प्रयत्न खुप काही शिकवून जात होते.  हा अनुभव खुप महत्वाचा होता.  “ सकाळ”  वृत्तपत्राच्या प्रतिबिंब पुरवणीसाठी बातमी करण्याचा अनुभव यावेळी आला.  दत्ता सारंग आणि माधुरी यांनी वेळोवेळी माहिती आणि बातमीची रचना करवून सांगितली.  तेव्हा त्या आठवड्यात आम्ही कोथरूड परिसरात बातमीसाठी गेलो होतो.  कोथरुडमध्ये मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु आहे.  या पार्श्वभूमीवर तेथील व्यावसायिकांच्या,  सामान्य नागरिकांच्या,  कामगारांच्या आणि दुकानदाराच्या आणि ग्राहकांची मानसिकता त्यांच्या समस्या...अपेक्षा....सूचना....तक्रारी... निवेदने व मनातल्या गोष्टी समजून घेवून त्यातील योग्य व चांगले बदल आणि त्याचबरोबर त्यांच्या म्हणण्याला ‘सकाळ’ प्रतिबिंब पुरवणीतून मांडता आले.  ही बातमी नावासह आलेली होती. नावाने आली म्हणून काही फार आनंद नव्हता.  पण त्या कामगारांच्या समस्या आणि म्हणण्याला वृत्तपत्रात कुठेतरी जागा मिळते आहे याचे अप्रूप आणि चांगले वाटणे साहजिक होते.
                                                फावल्या वेळात ग्रंथालयातून मागील बातम्यांचे वाचन आणि इतर पुस्तकांचे वाचन करायाला मिळाले.  जिल्हा संपादकांशी चांगली ओळख आता झाली होती.  वर्तुळाकार व्यवस्थेत बसणाऱ्या संपादकांशी बोल्याचा इतका योग जुळून येत नव्हता. पण निरंजन आगाशे सर,  सुनिल माळी सर हे इन्स्टिट्यूटला शिकवायलाच असल्याने त्यांची समोरासमोर भेटगाठ होत होती.  आगाशे सर संपादनाचा विषय आणि बातमीचे लिखाण यातील फरक समजून सांगितल्याने ‘अग्रलेख’ यालाच मोठी बातमी म्हणणारा मी आता ते लिखाण ‘संपादकीय लेख’ असतात  ही समजूत पक्की करत होतो. 
                                                या आठवड्यात पत्रकांच्या बातम्या करण्याचे काम हातात होते. त्यात निधनवृत्ताच्या काही बातम्या होत्या. निधनवृत्ताच्या काही बातम्या ह्या खुप लहान किंवा व्यक्तिपरत्वे त्याच्या वृत्तपत्रातील बातमीचा आकार ठरत असे. त्या व्यक्तीचे कार्य,  समाजातील स्थान, नातेवाईक आणि मृत्युचे कारण, वय  आदि महत्वाच्या माहितीसह निधन वृत्त करावे लागे. या काळात सिनेअभिनेत्री लालन सारंग यांचे निधन झाले. या निधनवृतासाठी नाटक,  साहित्य,  संगीत,   दिग्दर्शन,  कला व सांकृतिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीच्या प्रतिक्रिया घेता आल्या. त्यांच्या त्या निधनवृत्ताबद्द्ल त्या त्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींशी बोलता आले. अशावेळी भावनिक न होता प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीकडून त्या मयत व्यक्तीचे विविध पैलू जाणून घेऊन वृत्त तयार करावे लागते हे शिकायला मिळाले.  संघटना आणि त्याच्या कार्याच्या बातम्या होत्या. श्रमिक,  कामगार संघटनेचे काही पत्रक होते. विविध मागण्याचे पत्र पालकमंत्र्यांना ते पाठविण्यात आलेले होते.  त्याची एक प्रत ‘सकाळ’ वृत्तपत्रामध्ये  बातमीसाठी होती.  काही बातम्या वाहतूक क्षेत्रातील बदलांच्या होत्या. ओला उबेरच्या धर्तीवर नव्यानेच रिक्षा एप्प तयार झाले होते. याची बातमी करावी लागली. कार्यक्रमांची माहिती देणारं  “ चुकवू नये असे काही”  या सदरातही  एक बातमी छापून आली. काही निवेदनांच्या बातम्या करण्याचे काम करता आले. हिवाळ्याचा ऋतू असल्याने थंडीपासून संरक्षण करणाऱ्या कापडांच्या दुकानांची व कापडांची वैविध्यता सांगणारी बातमीही करून झाली होती.
                                                स्पेशल स्टोरी करण्यासाठी संपादकांनी सांगितले.  विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रातील माहिती नाही त्या क्षेत्रातील माहिती घेऊन ही स्पेशल स्टोरी करायची होती. कोळपकर सर आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद झाला. त्यातून एक विषय असा निघाला की  “वजन वाढवा... किवा वजन घटवा”  या विषयावर मला बातमी करायला मिळाली. हे विषय मला अत्यंत नवीन होते. माझ्या साधारण आयुष्यातले हे नवीन जीवनजाणीवांना अगदी अनोखे अनुभव होते. गरिबीने कधी आयुष्यात वजन वाढू दिले नाही आणि श्रीमंतीही इतकी नाही आहे की वजन घटवण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून हा बातमीचा विषय मला नव्याने हाताळायचा होता. विविध व्यायामशाळा, त्यांचे संस्थाचालक,  मालक,  व्यायाम कारायला येणारे त्यांचे सदस्य यांच्याशी चर्चा करावी लागली.  जिम लावलेल्या विद्यार्थ्यांशी बोलायचे होते. वसतिगृहात राहत राहणाऱ्या आणि वजन वाढवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांशी बोललो. काही कामाधंद्याला,  नोकरीला असलेले मित्र यांच्याशी आरोग्याच्या बाबतीत बोलणे झाले. आणि बातमी केली.  ही बातमी तयार करतांना संपादकांनी खुप एडीट करून बातमी केली होती. ही बातमी जिल्हा मुख्य पानावर छापून आली होती. आणि यावेळी महत्वाच्या सुचनाही ऐकाव्या लागल्या. त्या सूचना माझ्या बातमी लिखाणात कौशल्य प्राप्त करण्यासाठी आणि पुढील लिखानाच्यावेळी आयुष्यभर उपयुक्त ठरतील.
                                                सायंकाळी खुप वेळ थांबल्यामुळे इतर वृत्तपत्राचे वाचन होत होते. शिवाय उशिरा येणाऱ्या बातम्या आणि त्याविषयीची चर्चा कानावर पडायची. संपादक डोईफोडे सरांशी असेच एकवेळ बोलणे झाले की, लेख लिहितांना काय काय आणि कोणत्या कोणत्या  बाबींचा अभ्यास व सराव केला पाहिजे, असे बोलणे झाले. त्यादिवशीची चर्चा अत्यंत उपयुक्त होती. डोईफोडे खुप शांत स्वभावाचे तितक्याच शांततेने त्यांनी त्या प्रश्नांचे उत्तर दिले. अग्रलेख,  मुख्य  लेख, त्याचा आशय, विषयाची मांडणी आणि उपआशयाची सुसंगती  तसेच वाक्यरचना,  व्याकरणाचा योग्य उपयोग,  म्हणी व त्याच्या कोट्या आदि बाबतीत सखोल चर्चा झाली. संपादक मंडळ सतत आपल्या विषयात तल्लीन असत.  पण काचेच्या खालून एक नजर बातम्या लिहिणाऱ्या इंटर्नशीपच्या विद्यार्थ्यावर पडायची.
                                                २३ तारखेला श्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल  बालेवाडी येथे ‘सकाळ’ माध्यमसमूह  सहकारी असलेल्या कबड्डीचा सामना पाहण्याची संधी मिळाली. हा एक चांगला व प्रेरणादायी अनुभव होता. या दरम्यान जयंतीच्या आणि कार्यक्रमांच्या बातम्या लिहित होतो. या वृत्तपत्र कार्यानुभवाच्या कालावधीत विविध अनुभव हाती आले. त्या अनुभवातून शिकायला मिळाले. बालगंधर्व, पत्रकार भवन, एस. एम. जोशी सभागृह इथे होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळाली. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आणि निवेदनांच्या बातम्याही करता आल्या.
                                                तिसऱ्या आठवड्यात बातमी बऱ्यापैकी लिहिता येऊ लागली. काही बातम्या छापून आल्यानंतर वाचल्यावर कळू लागले की, बातमीत काय काय उणीवा आहेत,  किवा  बातमीच्या आशयाला न्याय देण्यासाठी आपण काय काय  केले पाहिजेत. अश्यावेळी संपादकांशी चर्चा करणे मला गरजेचे वाटत होते. आणि बातमीचे लिखाण वेळेच्या वेळेत करणे हेही समजत होतो.  या काळात ‘सकाळ’ कार्यालयाची व तिथे काम पाहणाऱ्या अनेक व्यक्तिमत्त्वांशी ओळख होत होती. ‘सकाळ’ कार्यालयात  बिनधास्त आणि वेळ मिळाला की शब्दकोडे सोडवीत बसणारे “ गायकवाड”  आहेत. त्यांच्या सोबतीला तिथेच जाड भिंगाची चष्मा असलेले  “साठे”  नावाचे कर्मचारी आहेत. बऱ्याचवेळा त्यांच्याशी हितगुज करायला मिळायचे. बातमी मिळवून आलो की पायऱ्या चढून वर आले की, वाटेतच यापैकी एकाची भेट व्हायची. हसून व्हायचे. त्यांच्याशी चर्चा करतांना खुप मनमोकळे ते बोलत असत.  हे दोन व्यक्तिमत्वाकडून मला  नकळपणे  कामावरील निष्ठा आणि  “ जेव्हा जेव्हा फावला वेळ मिळाला की अभ्यासात मग्न राहिले पाहिजे...”  हे शिकायला मिळाले.
                                                बऱ्याच बातम्या एकट्याला कराव्या लागल्या. त्याचे अनुभव हे एकट्याच्याच वाट्याला ठेवायचे आहेत. परंतु बर्याच बातम्यांचे लिखाण सहकार्यांच्या मदतीनेही झालेले आहेत. यामध्ये देवयानी भिंगारकर, दिनेश सोनावणे, रविकिरण बोढरे, विलास सर यांच्या सोबतीनेही  काही बातम्या लिहिल्या. मुख्य म्हणजे बातमीला तयार करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन  “लोकेशनल व्युव्ह”  घ्यावा लागत असे. त्याबाबतीत तेथील  नागरिक, व्यावसायिक , पादचारी, चालक , मालक,  संस्था, संघटना, आणि बातमीच्या विविध माध्यमांशी बोलावे लागे.  त्या त्या ठिकाणी जातांना या सहकार्यांच्या वाहनांची खुप मदत झाली. सातारा रोड परिसरातील वाहतुकीच्या व इतर समस्या जाणून घेण्यासाठी एकवेळ जावे लागले. ती बातमीही प्रतिबिंब पुरवणीला मुख्य पानावर छापून आली.
                                                तरीही मला ह्या बातम्या करतांना असे जाणवत होते की, आपण केवळ शहरांच्या बाबतीत बातम्या करतो आहोत. त्याचा अभ्यास करतो आहोत. कारण एक बातमी कारायची म्हणजे त्याच्या विविध अपैलूंचा अभ्यास करणे गरजेचे असते. अश्यावेळी नाना विचार डोक्यात थैमान घालत असत. ज्या  शहरातल्या समस्यांच्या बाबतीत आपण बातमीदारी शिकतो आहोत त्या पार्श्वभूमीवर मात्र याच शहरात दुष्काळामुळे ग्रामीण भागातून लोंढेच्या लोंढे भाकरीच्या शोधात येत आहेत. आणि त्या अनुषंगाने माझ्या बातम्या ह्या केवळ शहरी समस्यांच्या ठाव घेत आहेत का ?  असाही एक खोल प्रश्न पडला. आणि दुष्काळसंदर्भात आणि शहराकडे स्थलांतरीत झालेल्या मजुरांच्या बाबतीत लिहिलं पाहिजेत असाही एक विचार येऊन गेला.  त्यांच्या जगण्या  मरणाच्या आणि संघर्षाच्या बाबतीत समजून घेतले पाहिजे असे काळजातून वाटत होते. बातमी करण्याच्या भटकंतीत अनेक लोकांशी भेटी व्हायच्या. बोलणे व्हायचे आणि त्यांच्या अस्तिवाचा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहायचा. वाटायचे की, हे लोक गावातून शहरात येतात . त्याच्या जगण्या मारण्याची आपण अभ्यास करणारे दखल का घेत नाही...?  व्यावसायीक, उद्योगधंदे आणि श्रम बाजारपेठा त्यांच्या अस्तित्वाचा,  श्रमाचा,  ताकदीचा आणि मनुष्याबळाचा केवळ वापर करत असते. तटपुंज्या मजुरीच्या मोबाद्ल्यावर ते जगत असतात. जीवनाची गुजराण करीत असतात. कारण त्यांनी गाव, घर सोडलेले असते. ही सल कायम बातमीदारी करतांना बोचत होती. संपादकांशी यावर चर्चा केली आणि बातमीसाठी औद्योगिक वसाहती, कंपन्यांचे क्षेत्र, कामगारी वसाहती,  बसस्थानके, रेल्वेस्थानके, खाजगी वाहतूकीच्या स्थानकांच्या ठिकाणी जाऊन दुष्काळामुळे  किती प्रमाणात लोकं हे शहरांकडे स्थलांतरीत होत आहेत.का स्थलांतरीत होत आहेत. यम्क़ग्चि कारणेआणि त्याविषयी प्राथमिक माहिती मिळवीत होतो. रात्रीच्यावेळी खाजगी वाहने, एसटी महामंडळ, रेल्वेने मजुरांचे लोंढेच्या लोंढे शहराच्या स्थानकांवर उतरून मिळेल तिथे रात काढतांना दिसत होते. नातेवाईकांकडे, शहरांतील पुलाखाली, मोकळ्या वसाहतींच्या मोकळ्या जागेत किंवा झोपडपट्टी भागात ही मंडळी प्रामुख्याने दिसून येत होती. त्यांच्या जगण्याची उमेद व कामाची, मजुरीची, भुकेची व्यथा डोळ्यांसमोर होती. याविषयीची एक बातमी झाली. त्यांचे प्रश्न मांडले पण संघर्ष अजून सुटला नाही. ही एक खंत पिच्छा सोडत नाही. ज्यावेळी टाटा मोटर्स, महिंद्रा, प्याको , जय हिंद, बजाज अश्या कंपन्यांच्या सी. एस. आर.च्या माध्यमातून निर्माण होणारा खर्च आह दुष्काळासांठी वापरल्या जात आहे अशी एक माहिती मिळाली. त्या शोधात मी टाटा मोटर्सच्या कलासागर या समाजिक उत्तरदायित्वाचे काम करणाऱ्या संस्थेकडे गेलो. नवीन प्रकल्पाची माहिती घेतली. तेव्हा असे कळले  की,  दुष्काळाने ग्रासलेले आणि ज्यांना शहरात येऊनही हाताला कामं नाहीत अश्या बेरोजगार तरुणांसाठी टाटा मोटर्स सामाजिक विकास संस्था आणि कलासागर यांनी मिळून प्रशिक्षणाचे वर्ग सुरु केले आहेत. त्यामध्ये ड्रायव्हिंग, परवाना आणि त्याबातीत कंपनी क्षेत्रात काम मिळवून देणे, तसेच महिलांसाठी हस्तकला,  गृहोपयोगी वस्तूंची निर्मिती प्रकल्प आदि विविध योजना आणि प्रकल्पांची माहिती मिळाली. जी जी बेरोजगार मंडळी या बातमी करण्याच्या काळात भेटत होती त्यांना ही माहिती सांगत होतो. आणि अक्षरशः काही तरुणांनी ड्रायव्हिंग क्लासेस चालू केले आहेत. ते विनामुल्य  शिकत आहेत. इतरत्र भटकण्यापेक्षा काहीतरी ते शिकत आहेत याचा आनंद या वृत्तपत्र कार्यानुभावाने दिला हे मोलाचे समजतो.
                                                      




                                           






समारोप –


                           ३१ नोव्हेंबरला एक महिना संपत होता. वृत्तपत्र कार्यानुभव संपला असे मला वाटत नाही. कारण आपण कधीही,  कुठेही,  वयाच्या कोणत्याही टप्प्यावर शिकतच असतो.  या एकाच महिन्यात खुप काही शिकायला मिळाले. नाना अनुभव गाठीला आहेत.  बातमी लिखाण करायाला लिखाणाचा सराव, वाचनाची अखंडता, आपला जनसंपर्क, त्यांच्याशी करण्यात येत असलेल्या संवादाचे कौशल्य, विषयाला न्याय देण्याची कला,  मांडणी आणि वृत्तपत्राची ध्येयधोरणे समजून घेतानाच संपादक व सहकारी यांच्याशी असलेले वैचारिक भावनिक,  मानसिक, भावनिक  पातळीवरील स्नेह्संबंध याचे ताळतंत्र राखावे लागते.  नेमके हे या काळात समजून येऊ लागले होते.  ९ डिसेंबरला ‘पुणे हाल्फ म्यारेथौन’ आयोजित केली होती. यासाठी  “ सकाळ माध्यम समूह ”  या बातमीच्या वार्तांकनास जाणार होता. यावेळी आमच्यासारख्या नवख्या, शिकाऊ विद्यार्थ्यांना सकाळ वृत्तपत्राने वार्तांकन करायला बोलवून घेऊन काही जबाबदाऱ्या दिल्या. त्यामुळे चांगली बाबी शिकायला मिळाल्या.
                                 संज्ञापन वृत्तपत्रविद्या पदविका विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. उज्वला बर्वे आणि अभ्यासक्रमाचे समन्वयक
डॉ. सुनिल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली या वृत्तपत्रीय कार्यानुभवाची संधी मिळाली त्यांचे ऋणात राहू इच्छितो.
 


-विश्वनाथ अर्जुन साठे
       संज्ञापन वृत्तपत्रविद्या पदविका विभाग
       सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे







                       सुनिल माळी                                                                                 डॉ. उज्वला बर्वे
संज्ञापन वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रम, समन्वयक                                                          संज्ञापन वृत्तपत्रविद्या विभाग, प्रमुख
              सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे.                                                                 पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.






Comments

Popular posts from this blog