# पोट भरण्यासाठी दुष्काळी मजुरांचा लोंढा शहरांकडे
"पाऊस अवकाळी झाला आहे.रान उदास झालंय,विहिरी नद्यानाले कोरडे ठणाणा झालेत. गवतगुळी वाळून चालली.उभे पिकं करपून जात आहेत. जितरबानं कसे जगायचे? शेतकरी,मजूर,श्रमिक रोजीरोटीसाठी शहरांकडे धाव घेताहेत.
"निदान शहरं तरी हाताला काम देतील..." ही दुष्काळी भागातून शहरांकडे कामासाठी आलेल्यांची व्यथा आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी आणि मजूर दुष्काळाने होरपळत आहे.गावात काम मिळत नाही. मुबलक प्रमाणात मजुरीच्या संधी उपलब्ध नाहीत. उत्पादन आणि विकास हे प्रमाण ढासळले आहे.आणि विकासाचा ओघ शहरांकडे आहे या मानसिकतेने मजुरांचे लोंढेच्या लोंढे शहरांकडे धाव घेतांना दिसून येत आहे.महाराष्ट्रातील बहुतांश भाग दुष्काळग्रस्त आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र,कर्नाटक आणि परप्रांतीयांचे पुण्यात यंदा दरवर्षीच्या तुलनेत सत्तर टक्के स्थलांतर झाले आहे. दुष्काळाने शहरं भोपळ्यासारखे वाढू लागले आहेत. आणि यामुळे बेकारी,दारिद्र्य,नोकरीच्या मारामारी निर्माण होतांना दिसून येत आहेत.
शहरात हडपसर-कात्रज,स्वारगेट पद्मावती तसेच शहरालगतच्या एमआयडीसीमध्ये कामगार वसाहती या स्थलांतरितांनी बजबजत आहेत. नाक्यांनाक्यांवर कामाच्या शोधात फिरणारी मजूर डोळ्यांसमोर दिसत आहेत.हाताला मिळेल ते काम स्वीकारत आणि वडापाव खाऊन ही स्थलांतरित झालेली मंडळी रात्र ढकलत आहेत.गेल्या वर्षीच्या तुलनेत शेकडा प्रमाण साठ टक्के होते ते यावेळी त्रेहत्तर टक्के इतके झाले आहे.तर खडकी-शिवाजीनगरला चौदा टक्के सरासरी,कात्रज-स्वारगेट तेवीस टक्के,हडपसर-कोथरूड छत्तीस टक्के,औन्ध-वारजे माळवाडी सत्तावीस टक्के पुण्यातील स्थायिक मजुरांपैकी स्थलांतरित होऊन आलेल्या मजुरांची टक्केवारी आहे.
हाताला मिळेल ते काम करण्याची मानसिकता आणि रोजगार मिळावा म्हणून गाव सोडण्याची तयारी या जनतेच्या काळजात आहे. हिवाळ्याचे दिवस सुरू झालेत.कुणाची तर रहायची सोय नाही.नातेवाईकांच्या घरी राहून दिवसभर किंवा रात्रपाळी करत जिणं कंठणारे जीव दुष्काळामुळे गावाकडून शहरात स्थलांतरित झाले आहेत.
नोकरीच्या शोधात असणारे तरुण मोठ्या प्रमाणात दिसतात.पेपरमधील जाहिरात आणि भिंतीवर चिटकवलेले पोस्टर्स न्याहाळत वडापाव खात खात कामाच्या शोधात ही तरुणमंडळी रस्त्यांवर दिसून येत आहे.मजुरामध्ये शेतमजूर व त्यांचे शिकलेले तरुण जास्त संख्येने आहेत.किमान हे प्रमाण सहासष्ट टक्के इतके आहे.
दुष्काळामुळे स्थलांतरित झालेल्यामध्ये विदर्भातून अठ्ठेचाळीस टक्के मजुरांचे प्रमाण आहे. शेतकरी व व्यावसायिक हे प्रमाण पंचेचाळीस इतके आहे.खान्देशातील मजूर व शेतकरी व व्यवसायिक पस्तीस टक्के पुण्यात आलेले आहेत.मराठवाडा व कोकण अनुक्रमे साठ आणि एकोणचाळीस टक्के असे आहे.दुष्काळाने सर्व महाराष्ट्र व्यापला असला तरीही काही भाग ओलिती क्षेत्रात येत असल्याने तेथील सरासरी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांचे प्रमाण कमी आहे.स्थानिक रोजगारात ते गुजराण करीत आहेत.पण शहरी भागात आलेले मजुर मिळेल ते काम करत जगत आहेत.
शहरात आलोय पण राहण्याचे कठीण होत आहे.रुमभाडे वाढलेले आहेत.परवडणारे नाहीत.आधीच परप्रांतीय मजुरांचे लोंढे शहरात दाखल आहेत.त्यांच्यामुळे काम मिळेलच याची शास्वती नाही. मजूरअडयावर मिळालेलं काम अल्पदराचा मोबदला आणि अवजड असे असते.कामाप्रमाणे मोबदला मिळत नाही.कारण शहरात कामगारांची संख्या वाढली मात्र हाताला काम उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे. घरभाडे करून मुलांचे शिक्षण करावे की गावाकडे वयोवृद्ध नातेवाईकांना पैसा पाठवायचा? नव्या परिस्थितीत जगायचे कसे? असा एकंदरीत प्रश्न निर्माण झाला आहे.स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.शाळा अर्ध्यावर सुटली आहे.शहरात कामगारांच्या वस्त्या वाढल्या आहेत.आलेल्या प्रत्येकाला काम मिळेल का?आणि त्यांच्या गरजा पूर्ण होतील का हा प्रश्न निर्माण झाला आहे.तरीही शहरं या लोंढयांना पोटात घेऊन विस्तारित होत आहेत.
स्थलांतरितांचे संघर्षशील काळजं बोलू लागतात तेव्हा-
"हारभरे,तुरी उभ्या वाळत आहेत.आम्ही गावाकडे शेळ्यापालन हा शेतीला पूरक व्यवसाय करायचो.पण औंदा आसा दुष्काळ काय करावं..पीक करपून गेलं? शेळ्या विकून आता बायको पोरं घेऊन पुण्यात आलोय... टाटा मोटर्स कंपनीत कॉन्ट्रॅक्टमध्ये हेल्पर म्हणून काम करून गुजराण करीत आहे.बायको पोरं जगवून म्हतारा म्हतारील घरी खर्च म्हणून हजार खांड रुपये द्याव लागतात!"
-रमेश बकाल
पिंपरी चिंचवड
"माझं गाव गडहिंग्लज.वारणीचं शेत कमी इन मिन सहा गुंठे...त्यात काय येणार? बहीण लग्नाच्या वयाची झाली आहे.पुण्यात रांजणगावला आलोय वरफुल कंपनीत मजूर म्हणून काम करतो.हातात नऊ हजार सहाशे रुपये कटुन येतात.इथे रुमभाडे दोन हजार,खानावळीच्यासाठी तीन हजार जातात.इतर खर्च हजार आणि उरलेले घरी पाठवितो!"
-आनंद कुंभार
कारेगाव(रांजणगाव)
"पुण्यात प्याम्पॅक कंपनीत काम करतो.कधी कधी बारा बारा तास काम करावं लागतं.गावाकडून आलो तेव्हा रहायला जागा नव्हती.हिंजवडीमध्ये मित्राच्या रूमला टेरेसवर झोपलो.गावाकडे पानीपाऊस नाही.या निसर्गापुढं हात टेकले.नाईलाजास्तव शहरात यावं लागतं. नाही तर गावाला कुणाला रहावं वाटत नाही?"
-श्रीकांत पांचाळ
हिंजवडी
"पोट भरायचं साधन गावाकडे नाही.शहरं कामधंदा लावतात.कंपन्यात काम मिळतात.अवजड काम आहे पण पगार मिळतो न.कितीही काम केलं तरी गावात एक ठोक रक्कम हातात येत नाही!"
-विनोद भुसे
कोथरूड
"उन्हांनं भरलेल्या दगडांचे गावात काम नाही, कोणती कंपनी नाही.रोजगार रोज मिळेल याची उणीव.कसं जगावं.रिक्षा चालवून दिवसाकाठी चार पाच सवाऱ्या मिळायच्या.पुणे चांगलं संस्कृत शहर आणि भीती नाही कोणती यामुळे पुणे धरलं.दुकानं, कंपन्यांचे गेट आणि दवाखान्याच्या पायऱ्या वलांडून काम शोधलं.काही दिवस कंपाउंडर म्हणून तर काही दिवस दुकानात माल विक्री करायला होतो.शहरं जगवतात.गावाकडं जगणं मुस्किल आहे!"
-गजानन महाडिक
वारजे माळवाडी
"पावसानं पाठ फेरली आणि असा कवाकवा येतो आहे. शेतीच्या पिकावर किती ओ भरवसा ठेवून रहावं लागलाव.म्हणून सोलापुरात एक खाजगी हॉटेलात काम केलं.तिथे पैसा कमी येतात म्हणून पुणं गाठलं.रात्रपाळी सेक्युरिटी म्हणून लागलो.काही का होईना हातात काम आहे.दुष्काळ जीवावर उठलाय बगा!"
-अर्जुन सुकळे
शिवाजीनगर
"गावाकडे वावरात काम नाही.रोजच्या रोज मजुरी हातात येईलच हे पण सांगता येत नाही.इथे विद्यापीठात बिव्हिजिकडून झाडू खात्यात काम मिळालं आहे. महिन्याकाठी पगार मिळतो.पण साऱ्या गरजा यातून भागत नाहीत!"
-सयाजी कांबळे
औन्ध
"आता एका खाजगी गाडीवर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो.सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रवास अन खोके उचलावे लागतात.गावाकडे पानीपाऊस नाही.या निसर्गापुढं हात टेकले.नाईलाजास्तव शहरात यावं लागतं. बीड जिल्ह्यात खरपूस ऊन आहे.पण तरीही गावाला कोणाला रहावं वाटत नाही?पण पोटापाण्यासाठी शहरं गाठावे लागतात!"
-रुपेश हातोळे
कोथरूड
"शहरात केटरिंगच्या कामामुळे मी गरजा भागून नेत आहे.माझं शिक्षण एम.एस्सी.चं आहे.रिसर्च करत असतांना खर्च व दैनंदिन अडचणी आहेत.पण केटरिंगला वाढप्याचे काम करून मिळणाऱ्या पैशात शिकत आहे. दुष्काळाने मोठा संघर्ष निर्माण केला आहे!"
-हनुमान समुखराव
कात्रज
*तज्ञ मंडळीचा स्थलांतरितावरील अभ्यास-
"खंडप्राय देशाच्या पार्श्वभूमीवर गरिबांची संख्या कोट्यावधीमध्ये आहे.दुर्लक्ष करण्याइतपत ती संख्या कमी नाही.सामान्य माणूस उत्पादन,उत्पन्नविहिन आहे.सामान्य माणसाच्या गरजेच्या विकासाचे नवे राजकारण,समाजकारण,अर्थकारण निर्माण करणे गरजेचे झाले आहे.उपजीविकेची कुठलीही संसाधने आणि समांतर सोईसुविधा आपल्याकडे नाहीत.जेव्हा केव्हा दुष्काळासारखी अरिष्ट्ये येतात तेव्हा ते निवारण्यासाठी उपाययोजनेबरोबर सामाजिक, आर्थिक,आणि सांस्कृतिक पातळीवर विचारमंथन, चर्चा आपल्याकडे सुरू नाही.एकूण आत्ताच्या राजकारण, सत्ताकारणाची प्रक्रिया ही समारंभ केंद्री(इव्हेंट सेन्टर्ड) अशी झालेली आहे.परंतु दैनंदिन सामान्य माणसांच्या गरजा,अडचणी आणि उपाययोजना केंद्रस्थानी आणणारे राजकारण,समाजकारण,सत्ताकारण आत्ताच्या तरुणांनी घडवायला हवे.आणि त्यासाठी सामाजिकशास्त्रातील अंतरदृष्टी वापरावी लागेल.सूक्ष्म स्वरूपाचे विचार करावे लागतील.पाऊस का पडत नाही?दुष्काळी अवर्षणाची स्थिती का निर्माण होते?पर्यावरण संतुलन बिघडत आहे का?हे तपासावे लागेल.गाव पातळीवर तृणमूल पद्धतीने तळातल्या माणसांशी समजुतीने हा दुष्काळ निवारणसंदर्भी जाणीवजागृती करणे गरजेचे आहे!"
-डॉ.श्रुती तांबे
सामाजशास्त्र विभाग-प्रमुख
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
आजच्या वास्तवात पोट भरण्यासाठी शहरांमध्ये झालेली मंडळी ही मजूर अड्यांवर थांबतात. शहरं वाढू लागले तसे मजूर अड्डेही वाढले आहेत.पुण्यात जुना फरासखाना हा वसाहतकालीन मजूर अड्डा होता. आज पुण्यात येरवडा,धानोरी गाव,नऱ्हे-आंबेगाव, सासवड रस्ता,कोंढवा-मुंढवा परिसर,वारजे नाका अश्या भागातही मजूर अड्डे निर्माण झाले आहेत.दुष्काळी तीव्रता वाढू लागताच मार्चपासून पुढील मेपर्यंत सकाळी आठ वाजल्यापासून अडीच ते साडे पाच हजार तरुण मजूर कामाच्या शोधात असतात.शहरांची अर्थव्यवस्थाच अशी आहे की,दुष्काळी कारणाने स्थलांतरित झालेली आणि कमी मजुरीवर काम करण्याची मानसिकता झालेल्यांच्या जीवावरच शहरी उद्योगधंदे चालतात. बांधकाम,खानावळी,केटरिंग, डेकोरेशन आदी व्यवसाय हे स्थलांतरित झालेल्या मजुरांच्या श्रमावरच उभी राहिलेली दिसून येत आहेत. इंटेरिअर,स्टायलिंग,सेन्ट्रीग आणि अवजड कामे कमी पैशात जास्त प्रमाणात करण्याची मानसिकता असलेले मजूर या काळात आढळतात.स्थलांतरित दुष्काळामुळे मिळेल ते काम करून पोट भरण्यासाठी शहरांकडे आलेली आहेत.संघर्ष आजूनही सुरूच आहे.....जगण्यासाठी....!"
तळटीप-
"हे केवळ एका शहराचं निरीक्षण आहे.जगात असे अनेक देश आहेत.जिथे दुष्काळाने ग्रासून-झिजून गेलेली मानवी अस्तित्वता संघर्षाची जिणे जगत आहेत.....!"

Comments

Popular posts from this blog