***प्रेस व्हिजिट***

"जेव्हा सीमावर्ती भागात संमेलने असतात...!"

"महाराष्ट्राच्या भूमीतून ते येत आहेत.असू देत थंडी काय होते.जिव्हाळ्याची माणसं. थांबायला हवे.इतक्या दूरवरून येतात.बोलतात.आपुलकी असते.गोडबोलानं मया करतात.आज थांबलो म्हणून काय झाले.!"
असा इचार करत अन डाव्या हातात गाडीची चावी फिरवत भरमा बेळगावच्या रेल्वे ठेसनात थांबला होता.साडे सहाला पोचणारी हुबळी एक्सप्रेस आज उशिरा म्हणजे सव्वा तासानं  बेळगावला आली.चढेकरू अन उतारू, लोटालाटी असं काही नव्हतं.निवांत तीन चार जोडपी,त्यातल्या एकाच्या हातात छोटी मुलगी, दोन लहान मुलं,एक म्हतारा डब्यातून उतरले.साऱ्या डब्यात अशीच अन इतकीच चढावढीची गर्दी.त्या जोडप्यापाठोपाठ आम्ही उतरलो.
                 सूर्य वेगळ्याच दिशेनं निघू लागल्याचे जाणवत होतं.पिवळट सोनेरी किरणं ठेसनावर रेंधकु लागली.हिवाची धुकं रुंधत आभाळात जिरत होती.काही काळ गाडी थांबली अन पुढं पळती झाली.आमच्या वाटेवरच बसलेला भरमा दिसला.दिसताक्षणी कडाडून दोघांनाही मिठी मारली.अन एक ठेसनावरचं क्लिक घेण्यासाठी पोलिसाने मदत केल्याचे आभार मानून आम्ही चालू लागलो.
               आम्ही पुढं चालू लागलो.रविवारचा बजार नेमकाच गाडीघोड्यातून उतरत होता. माळवंचिळ्वं,दाळधान्य,चीजवस्तू मांडल्या जात होत्या.इथं बाजार म्हणजे ना दलाल ना आडत्या.शेतकऱ्यानं पिकवायचं आठवडी बजारात विकायला आणायचं.मजूर,कामगार, गरीब खरीददार वस्तीतला हा स्टेशनजवळचा बजार डोळ्यात भरत होता.कुणी काळेभोर वांगे,टमाटे,मेथीजुड्या आणल्या होत्या.तर कुणी लसलसीत कांदापाथ,हिरवा टप्पूर हरभरा,तुरदाळ,मटकी,जवस,तीळ,मोत्यावानी दादर,जेवारी,हिरव्या,लाल मिरच्या सारं सारं तिथं आणलं होतं.रस्त्याकडेला चीजवस्तू लावत बसलेल्या एका बाईला विचारलं,
"ढवळीशिप्पीत जेवारी हाय जी.जेवारी किती रुपये किलो..?"
तर त्या म्हणाल्या,फक्त अठ्ठावीस रुपये पोरा...!"
त्या बाईचा चेहरा आशेनं पाहत होता.
पलीकडून एकजण आला अन त्यानं थैलीभर कंदापाथ घेतली.अन घासाघीस करत पंधरा रुपये त्या बाईच्या हातात देत निघून गेला.तिनं ते पैसे तागड्यालं,मापटालं,कपाळालं लावून पायाजवळच्या पोत्याच्या तोंडकप्यात सरकवले.किंचितशी लकेर चेहऱ्यावर तरळली.
आम्ही म्हणलो.
"आम्ही इथं दूरवरून आलो.जेवारी कश्यात न्यावं..??"अन पुढं चालू लागलो.
                    स्नेहालय संस्थेवर उतरलो.गिरीश जींची महाराष्ट्रातून बाहेर संस्था त्यातली बेळगावची एक.तिथून आवरून कार्यक्रम स्थळी पोचलो.कधी कॉफी न घेणारा मी पण भरमानं मोठ्या कसोसिच्या आग्रहानं प्यायला लावली.इकडे कार्यक्रमात नास्ता झाला.केळी,शेव,लिंबूपोहे,खाल्ले.सत्राच्या व्याख्यानात-मुक्ता मनोहरांचं सत्र,भालचंद्र कांगो सर,उत्तम कांबळे सर,सतीश काळसेकर सर,अच्युत माने सर,किरण ठाकूर सर,उद्धव कांबळे सर,मालोजीराव अष्टेकर सर,तानाजी ठोंबरे,दळवी सर,प्रसाद सर,आदी दिगग्जांची  वाणीनिपुन निघणारी चर्चा कानाने काळजाच्या टिपकागदावर टिपत होतो.
                       कॉ.पानसरेंच्या कार्याची ही धुरा पुढं नेणारी मंडळी झटून होती.आठवे कॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन,बेळगाव असे हे संमेलन खानापूर रोडजवळ-मराठा मंदिर सभागृहात होतं.साहित्यविषयांची विविध शैलीने चिकित्सा आणि आत्मभान जागृतीच्या दृष्टीने साहित्याचा मीमांसा करणारा वाद,संवाद चर्चात्मक विचार घडून आला.नवं बरंच काही काळजात कोरल्या जात होतं.साहित्य, व्यवहार,संवेदना,स्वभान,सामाजिक न्याय,चळवळी,प्रबोधन अश्या एक नव्हे कैक अंगाला स्पर्शून जाणारी विचारमंथनाची जाणीव इथे घडून येत होती.
                    दुपारभोजन करतांना तरुण जोडप्यात विषय चालला होता.ते गंभीर होत बोलत होते.हळूच ताट हातावर घेत तिकडं गेलो.अन दुरून ऐकत होतो,
"कालचा सांस्कृतिक कार्यक्रम चांगला झाला.शितलताईंचा आवाज कर्नाटकभर दुमदुमला.असे प्रबोधनाचे गीतं अन पोवाडे हरहामेश इकडे व्हायला पाहिजेत.पण हे बरोबर नाही झालं....!"
दुसरा म्हणला,
"काय रे काय नाही बरोबर...???"
"अरे सचिन दादाला संरक्षण विभागाने बेळगावात येण्यास परवानगी दिली नाही...!"
ते बोलत होते...
                           दुपारच्या वेळात मान्यवरांचे कविसंमेलन पार पडले.
                    अभिप्रार्यार्थ माया पंडितांच्या विचारठेवणीतील शब्द कानावर पडले.आल्या आल्या कानावर पडलं होतं की यांचे कालचे उद्घाटनाच्या दिवशीचे मनोगत उच्चप्रतीचे होते.आज ते अनुभवून झालं.सुक्ष्म, काटेकोर,चपखल व्यक्तता त्यांच्या शब्दात जाणवत होती.
                        संमेलनाचा निरोप झाला नि आम्ही सर्वजण बाहेर पडलो.बेळगावच्या स्नेहींच्या त्या भूमीत नवं जग उभं होतं.नवे अनुभव तरारून येत होते.नवं काहीतरी शिकवत होते.तसे नवे प्रश्न पण होते...उत्तर लपविलेले.
           "दूर देस मायेचा गोड गोडवा बोलीचा
            माय रक्ताच्या नात्याचा भार डोईचा..!"
त्या बंगरुळ हायवेच्या कडेने मधुर ओळींची लकेर घुमत होती.त्या आवाजाच्या दिशेनं कान टवकारल्या गेले.अन चालता चालता लक्षात आलं की,एक थोडीसी वयानं झुकलेली स्त्री आपल्या डोस्क्यावर काड्याचं पेंडकं घेऊन झपाझप पावलं टाकत घर जवळ करत होती,तिलं वझ्यानं काही वाटू नये म्हणून ती थोडी हसत गाणं म्हणत चालली होती.आम्ही विचार करत चाललो होतो.
                           "माय झं..... संयुक्त महाराष्ट्र चळवळ,स्वातंत्र्यकाळ,पंचवार्षिक साठीच्या धकाधकीचा काळ,नवा भूखंड अन सिमारेष्यांनी ओरखडे करून चिघळून टाकलेला बेळगाव आज नव्या दमनसंस्कृतीनुसार नि नव्या प्रश्नांच्या काटेरी कुंपणात उभा आहे.नुसता बेळगाव नाही तर तत्कालीन निपाणी,कारवार,डांग,उमरगाव हे तर आहेच बरोबर येळ्ळूर,बैलहुंगल,खानापूर ते
बिडी-कित्तूर हे शहरवजा शहरं व्यवस्थेशाहीच्या झळींनी ग्रासल्या गेली आहेत. श्रम,भूमी,हिस्सेगिरी,भांडवल,वर्गवर्चस्ववाद,दलाल,गुंडशाही,वर्चस्ववाद,मक्तेदारीयुक्त शैक्षणिक अवस्था व सामाजिक अस्थिरता अन यात भरडल्या जाणारा,दलील झालेला समूह हा मोठ्यासंख्येनं जगत आहे.बहुलकतेने हा शिक्षण आणि अर्थकारणाने अजूनही खालच्या पातळीवरच उभा आहे.यामुळे मजूर म्हणून घरातली कमाई आणि गरजा भागविणारा एक वर्ग तयार झाला आहे.खरे तर तो वंचित अशा स्वरूपात मोडतो.प्रामुख्याने ज्या प्रवाहाच्या दिशेत त्याने विकासाची मेख उभी करावी त्याच दिशेच्या प्रवाहाने उखडून टाकलेलं असतं.
                          गावगावतली तरुणाई शहराच्या औद्योगिक जाळ्यात खेचली जात आहे.असे आजचे ग्रामश्रमशक्तीच्या विभागणीचे वास्तवचित्र या क्षेत्रात हमखास दिसून येते.शेतीहीन मजुरांचे लोंढेच्या लोंढे मोठया संख्येने मिळेल त्या कर्जाच्या,व्याजाच्या अन सावकारी उसनवरीच्या पैश्यावर शहरं गाठत आहेत.मिळेल त्या कामावर गुजराण करीत आहेत.नाना कष्टाची कामे अन जीवावारचे धोके पत्करून संघर्ष करीत आहेत.यामुळे शहरी जीवनाचेही फावते.शहरी प्रश्न मिटतात.म्हणून या मानवी अधिकारहनन व श्रममुस्कटदाबी वृत्तीच्या संस्कृतीविरुद्ध कुणीही ब्र काढत नाही.थोडंथिटकं शिकून सवरून शहर धरलेल्यांचे वेगळे सुख नाही असे म्हणणे विवेकाने चुकीचे धरल्या जाईल.
                 मागच्या कैक संमेलनातून सीमेच्या आणि भाषेच्या प्रश्नात अडकलेली शहरे व गावे यांची जोडणी व्हावी.ते आपल्यात मिसळावे.सीमा रुंद व्हाव्यात आणि आपल्या साहित्याचा प्रसार,प्रचार वाढवा,सीमेवरील जी परराज्यसत्तेची अधिसत्ता आहे ती उठावी नि तिथे आपली अधिसत्ता रुजावी या उद्देशाने केवळ घोषणा,नारेबाजी,हातवारे आणि चर्चेची साहित्यव्यवहारात खबलल्बात चाललेली आहे.जी काही राजकीय,सांसथात्मक टोलवाटोलवी चालू आहे.यातून प्रस्थापित आणि विस्थापित वेगळे आहेत हे सांगणे गरजेचे नाही.वर्षांनुवर्षे होणारी मोठमोठी संमेलने आणि साहित्यमेळावे या वास्तवाला न्याय देऊ शकले नाहीत.कदाचित ह्या थरावरील न्याय आणि सत्य जाणणारी साहित्यमीमांसकच घडले नाहीत अशी शंका मनात विषारी पाल उभी करते.
                           राजकीय विचारसरणी आणि शासनकर्ती विचारप्रभूती सीमावर्ती प्रश्नांना आणि समस्यांपासून अलिप्त आहे असे नाही.कारण या दलदलीतच त्यांची नवी पिके येत असतात.उद्या हे सीमेवरील क्षेत्र आपल्या अधिकार क्षेत्रात आली तर निवडणुका, मतदान,मतदार,विकास प्रश्नांची सोडवणूक,संरक्षण,तसेच मानवी हक्क आदी बाबतीत अग्रमताने पुढे असणारी राजकीय अराजकीय धोरनेही आहेत.म्हणून सीमावर्ती प्रश्न संसदेच्या तारांकीत प्रश्नात कैक काळचा आ वासून दाताचं पाणी गिळत बसलेला आहे.
                   आमच्या पुढ्यातून एक काळाठिक्कर माणूस किराणा दुकानातून इडलीच्या पिठाची किंमत विचारून सरकला.डाव्या रस्त्याच्या आत तो गेल्या दिशेने बराचवेळ तिकडे लक्ष होतं.कैक दिवसांची बुजलेली आठवण मनांवर उकरल्या गेली.एकदा मित्राला सहजपणे हसून म्हणलो होतो की,
"कंट्या तुम्ही हे डांबराचं काम करता.डांबर अंगावर उडालं तरी काही कळत नाही ब्वॉ....?"
त्यो थोडा हसून पण खोल सुरात बोलला,
"हो मित्रा,डांबराचा अन आमचा रंग सारखाच.
महाराष्ट्रातल्या भोऱ्या कातडीसारखा काचेत  तर नाही न राहू शकत.इथे रस्त्यावर काम करायला उतरावंच लागतं.नाही तर रोजीरोटीचं कसं भागल...??
                   त्याच्या उत्तरात प्रश्न होता.कैक दिवस या विचाराच्या कहात बुडालो होतो.नाना विचारात रत होतो.कालांतराने कळत होतं की,
"रंगावंग्या दुनियेत कातडीला किती अनाठायी महत्व दिले जात आहे???की जी कातडी सरणाच्या पहिल्याच भपक्यात जळून ठिक्करकबाब होते.करपट वासानं नेस्तनाबूत होते.बाजारू मानसिकतेने रंगाचेही जातधर्म तयार केले आहे.काळं आणि गोरंभोरं हे कदापि सौंदर्य होऊ शकणार नाही.ते तर निसर्गतःच निर्माण होणारे रंग आहेत.त्यातल्या एकालाच  
सौंदर्यतत्व मानणे कितपत योग्य?मात्र सौंदर्यकल्पनांनी जाणिवांच्या कोटीवर रंगाची डाईंग करणारी विचारसरणी हे जाणायला तयार नसते.यामागे सामजिक नितीतत्व उभे आहे.की ज्या नितीशास्त्राला इथे भारतीय परिप्रेक्षात प्रेरीत होतांना धर्माच्या पदरात जागा मिळते.सौंदर्याविषयीच्या सामाजिक जाणिवाही थिट्या आणि विषम स्वरूपाच्या तत्वाने वसवल्या आहेत.लैंगिक समानता या तत्वज्ञानात नाही.मुळात पाहता सौंदर्याची व्याख्याच करता येत नाही.ते अव्याख्येय आहे.अविश्लेष्य असे आहे.त्याला कोणत्याच प्रकारच्या कसोटीत बसविता येत नाही.सौंदर्य ही बाब गुणात्मक असून केवळ ती बाह्यांग किंवा अंतरंगावर अवलंबून नाही.चांगुलपणा आणि विवेकाच्या सत्य वापरावर सौंदर्य विराजमान होत असते.म्हणून आज शैक्षणिक अंमल प्राप्त प्रस्थापित असलेल्या सौंदर्यशास्त्राची फेरमांडणी करावी लागणार आहे.
थोड्या वेळानं भरमा बोलला.
"काय सरकार, कश्यात गुंग आहे तुम्ही???
"-इडलीत.....!"
"नाही.... इच्यार करत होतो की,भाषेच्या प्रसारप्रचारापेक्षा इडलीनं आंध्रप्रदेशातून कर्नाटक महाराष्ट्र लवकर गाठला काय.....?"
सारेच हश्या पिकवू लागले.हाश्यातून रेल्वेच्या डब्यातला पहाटेच्याच्या प्रसंगाची आठवण झाली.आमच्या सिटजवळचा उंचापुरा अंगात काटकुळा पण नाकानं तरतरीत इसम मारवाडीत बोलत होता.रात्रीला गुजरातवरून कर्नाटकला जात होता.
"काई होंबे ...म्हारों राज्यमां एक तो काम करियों आदमी मिलों नई."
दादा बोलले,
"क्यों..??"
"सब ब्यापार माईं झुजत है...
और बंबई सरीका गुजरात करना चाहत है....!"
त्यानं नाकावर हात फिरवत खुलासा केला.
"दे दे नं रे भाड्या....हमे कोई कामपें नही लगाता ...तो.. तो मांगते है..??
"ये हराम का काम है क्या..मांगना तो पडेगा ..???"
मागच्या बाकावरील प्रवाश्यांना पैशांची मागणी करत दोन तृतीयपंथी आमच्या बाकाकडे आले.
दादा त्या मारवाड्यालं म्हणले.....
"लो इस्कों लागातें काम पें ......?
अन मारवाड्यानं नाकावर रुमाल धरला.त्यानं हसत त्यातल्या एकाच्या फुगलेल्या छातीकडं एकटक कटाक्ष टाकला.त्या पाहाटव्यातही कैक विचार मनात चीर टाकत होते.
                  तृतीयपंथीजीवन आणि स्त्रीजीवन या काळाच्या विश्लेषणात बव्हंशी पुरुषसत्ताक विचारसरणीने पडद्याआड राहील.कारण आज स्त्रियांना हक्काधिकार,प्रबोधन आणि हितकारक मूल्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे.रस्त्यारस्त्यावर उतरावं लागत आहे.हा काळ मातृसत्ताक अधिकरणाचा नाही.पुरुषप्रधान संस्कृतीचा हा काळ अधिराज्य गाजवीत आहे.म्हणून ही वंचना त्यांच्या ठायी येत राहते.पुनरुत्पादन करणं हे बाईपणाचं स्त्रीत्व शोधणारी पुरुषी विचारसत्ता तृतीयपंथीय जीवांना केवळ भोगाच्या उपाशी नजरेने पाहत असते.हा लिंगभेदभाव केवळ बेळगाव-कर्नाटकात सापडेल असे नाही.तो मानवी समूहाच्या केंद्रीय परिघात उगवत राहतो.म्हणून लिंगभेदभावें तृतीयपंथीयांनाही जाचाची कळ सोसावी लागते आहे.मूलभूत अधिकार मिळविण्यासाठी त्यांची रोजची धरपड आहे.खरे पाहता इथे या तत्वावर पुढच्या काळासाठी लैंगिक समानता आणणारं सौंदर्यशास्त्र निर्माण करावं लागणार आहे.
माध्यमांनी हिजडयांच्या केलेल्या उदात्तीकरणाची आज वैचारिक आणि वास्तवदृष्टीने समीक्षा करणे  गरजेचं ठरतं आहे.
                 सामाजिक एकता आणि समानता लोकशाहीला भक्कम करणारी मुल्ये आहेत.सामाजिक जीवनात यामुळे सलोखा आणि सामाजिक न्याय तत्वावर एकमेकांचा एकमेकांशी जनाधार प्राप्त होत असतो.परंतु या मुल्यांची जागोजाग पायमल्ली करत त्या अनुषंगाने असलेली कायदेही धाब्यावर बसविणारी विचारसरणी सामाजिक हालचालीतच असते.ती संपत्ती आमिषे आणि गुंडशाहीच्या राजकीय खेळीने पोसल्या जाते.सामाजिक अस्थिरतेने समाज पोळून निघत आहे.यामागे अज्ञान,दारिद्र्य,भूक,हिंसकवृत्ती आदी कैक कारणे सापडतील.म्हणूनच विषमता ही रुजत जाते.सामाजिक आरोग्य हे महारोग्यासारखे झाले आहे.
              आज खरे तर मुल्यात्मक शिक्षणाच्या कमतरतेने सामाजिक मानसशास्त्र हे विकलांग झाले आहे.विवेक हरवत चाललेल्या, समाजनिर्मितीचे लक्षणे या काळाच्या पटलावर ठळकपणे जाणवत राहते.ऐहिक सुखापोटी डोंगरफोड करायला लावणारी शैक्षणिक मूल्ये मानसिक आणि वैचारिक पातळीवर कमकुवत झाली आहेत.वरचष्म्यातून पाहणारा मध्यमवर्ग आणि धनदांडग्यांच्या सामाजिक जाणिवा मारल्या जात आहेत.एकेकाळी हाच पोशिंदा असलेला वर्ग आज तळ्याकाठावरील डोळेझाकी करणाऱ्या मगरासारखा भासत आहे.
                   भटक्या विमुक्तांच्या जीवनाची वाताहत तर सामाजिक स्थिरतेच्या प्रश्नसमस्येपेक्षा नामानिराळी आहे.स्वाभिमान,स्वातंत्र्य,न्याय,मूल्यांधिष्ठित सामूहिक मानवी जीवन,आणि एकरूपता इथे प्रखरपणे उभी राहील असा हा समाज तयारून नाही.सामाजिक जाणिवांचा परिपोष त्यांच्या ठायी नाही.तो प्रामुख्याने असमान अश्या स्वरूपात जाणवत राहतो.काही पैश्यांखातर पोटची आब्रू विकणारी पंचाईत आणि भटकी सामजिक मानसिकता ही यातनामय जीवनक्रम अक्रमीत आहे.विकासाच्या आणि भरभराटीच्या कोसोदूर त्यांचे जगणे आहे.केवळ पोटासाठी फेरा पाडणारी भटकी विमुक्त जमात साहित्य,संमेलने,चर्चा,सभा,मेळाव्यांपासून वेशीबाहेर आहेत.त्यांना प्रवाहाच्या किमान ओघात आणू शकलो नाही याचीच खरी शोकांतिका काळाच्या या टप्प्यावर ठळकपणे उमटून आहे.
              भरमा,अलगोंडीचा अशोक ही मित्र मंडळी कैक दिवसांनी भेटली.त्यांच्यामुळे लिहिणारे,वाचणारे,बोलणारे साहित्यिकही भेटले.पत्रकारितेतील मित्र बोलले.पण वेळेअभावी लवकर निघून गेले.या भागात ही रक्ताच्या नात्यापेक्षाही मोलाची नाती टिकून आहेत.
                          पण एक लक्षात येत होतं की,आशावादाने टिकून जगणारी नवी पिढी नव्यानं तरारून येत आहे.पार्श्वभूमीवरील नकारात्मक भूमिका ते मोडू पाहत आहेत.भूतकाळातील वाईटाचा थाग घेऊन वास्तवाच्या कसोटीला ते चांगले देण्याची निर्णयक्षमता अंगी बाणवून आहेत.नवा इतिहास इथे प्रगमनशील दिशेने येत आहे.लिहिता वाचता समाज घडायला ही तरुण पिढी आजच्या वळणावरील महत्वाची ठरणारी आहे.जुनं वाईट,अस्तित्वहीन ते टाळत आहेत.आणि त्याजागी दीर्घकालीन वास्तवाला हितकारक असे नवं ठेवीत आहेत.काळ बदलत चालला आहे तसे प्रश्न व समस्यांना ही काळाची धार चढत आहे.याची चर लागून नवी पिढी नवा विचार करत आहेत.कधी ती लिहिन्यातून अभिव्यक्त होत आहेत.तर कधी ते बोलण्यातून,प्रत्यक्ष कृती आराखडयाने जगत आहेत.
                   वास्तविक बेळगाव हे शहर भरभराटीस आले तेव्हा त्याच्या या भरभराटीस आणण्याच्या प्रक्रियेत नाना श्रमाची अन कष्टाची इमले बांधणारी जमात रक्ताघामात नाहत होती.आज लखलखीत,चंदेरी रस्ते अन शहरीकरण झालेलं बेळगाव नवी संस्कृती व नवा इतिहास रचित आहे.काळाच्या बदलाची प्रक्रिया होत असताना इतिहास विसरल्या जात आहेच.हे केवळ बेळगाव किंवा कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवत होत आहे असे नाही तर सबंध जगाच्या इतिहासात असे होत आहे.इतिहासकारांनी हे जोखलं पाहिजे.कदाचित उद्याचा इतिहासात ह्या सूक्ष्म नोंदी विस्मरल्या जातील.

30/12/2017


Comments

Popular posts from this blog