ब्राह्मणेतरांची पत्रकारिता :
 मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात ब्राह्मणेतरांच्या तसेच दलितांच्या पत्रांनी बजावलेली कामगिरी महत्त्वाची आहे. ब्राह्मणेतरांची स्वतंत्र पत्रे निघणे गरजेचे आहे, असे महात्मा जोतीराव फुले  यांचे मत होते. महात्मा फुले यांच्या ‘सत्यशोधक समाजा’च्या चळवळीतून ब्राह्मणेतरांच्या पत्रकारितेला चालना मिळाली. ब्राह्मणांच्या हाती असलेली वृत्तपत्रे ब्राह्मणेतरांच्या तसेच दलितांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाहीत, या भुमिकेतून निघालेले पहिले पत्र म्हणजे कृष्णराव भालेकर (१८५०-१९१०) यांचे दीनबंधू. पुणे येथे १ जानेवारी १८७७ रोजी भालेकरांनी ते सुरु केले. पुढे आर्थिक अडचणींमुळे त्यांना ते चालविता आले नाही, त्यामुळे १८८० साली त्यांनी मुंबईतील तत्कालीन कामगारनेते नारायण मेघाजी लोखंडे आणि रामजी संताजी आवटे यांच्या स्वाधीन केले. लोखंडे यांनी हे पत्र मुंबईहून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. त्यांनी ते बरीच वर्षे चालविले. परंतु लोखंडे यांच्या मृत्यूनंतर (१८९७) त्याची परवड झाली व ते बंद पडले. १९०५ मध्ये दामोदर सावळाराम यंदे आणि वासुदेवराव लिंगोजीराव बिर्जे यांनी या पत्राला आधार दिला. या पत्राने ब्राह्मणेतरांचा केवळ कैवार घेतला असे नाही, तर ब्राह्मणेतरांमधील स्वत्वही जागविले. सामाजिक विषमतेला वाचा फोडण्यासाठी व बहुजन समाजातील बंडखोर प्रवृत्तीला प्रोत्साहन व दिशा देण्यासाठी या पत्राचा वापर करण्यात आला. चिपळूणकरांनी फुले यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार भालेकरांनी या पत्रांतून घेतल्याचे दिसते. भालेकरांचे लेखन चुरचुरीत होते. ब्राह्मणी पत्रांतून सत्यशोधकांचा उल्लेख सतत बाटगे, नास्तिक, धर्मद्रोही, सरकारचे बगलबच्चे असा होत असे. भालेकर त्यास समर्थपणे तोंड देत. फुले यांच्या शेतकऱ्याचा आसूडचे दोन भाग प्रथम दीनबंधूत प्रकाशित झाले. १९०५ नंतर बिर्जे यांच्याकडे या पत्राची सुत्रे होती. ‘मराठा समाजाचे शिक्षण व सुधारणा’ ही लेखमाला बिर्जे यांनी लिहिली. त्यातून ‘मराठा शिक्षण परिषद’ अस्तित्वात आली. १९०८ मध्ये बिर्जे यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी श्रीमती तानुबाई यांनी काही काळ दीनबंधू चालविण्याचा प्रयत्न केला; पण तो फारसा यशस्वी झाला नाही. पुढे १९२७ मध्ये वि. मा. नवले यांनी या पत्राचे पुनरुज्जीवन केले.

दीनबंधूप्रमाणेच दीनमित्र हेही ब्राह्मणेतर चळवळीचे मुखपत्र होते. रावसाहेब मुकुंदराव गणपतराव पाटील यांच्या संपादनाने आणि लेखनाने हे पत्र गाजले. मुकुंदराव पाटील यांनी ते तीस वर्षे चालविले. मुळात १८८८ मध्ये कृष्णराव भालेकर यांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी मासिकरुपात दीनमित्र सुरु केले. १८९२ मध्ये गणपतरावांच्या निधनाने हे पत्र बंद पडले. त्यांचे दत्तकपुत्र मुकुंदराव पाटील यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी २३ नोव्हेंबर १९१० रोजी ते साप्ताहिकरुपात पुन्हा सुरु केले. ग्रामीण भागातून-सोमठाणे येथून-हे पत्र प्रसिद्ध होऊ लागले. पुढे अहमदनगर जिल्ह्यातील तरवडी या गावाहून प्रकाशित होई. मुकुंदराव हे तत्वनिष्ठ संपादक व कट्टर सत्यशोधक होते. केवळ ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्धच नव्हे, तर काही वेळा मराठे व संस्थानिकांविरुद्धही त्यांची लेखणी चाले.

ब्राह्मणेतर चळवळीचे एक अध्वर्यू दिनकरराव जवळकर (१८९८-१९३२) यांची पत्रकारितेतील कामगिरीही महत्त्वाची आहे. शाहू महाराजांच्या इच्छेनुसार त्यांनी १९२२ मध्ये तरुण मराठा हे पत्र सुरु केले. चिपळूणकर व टिळक यांच्यावरील टीकेमुळे (देशाचे दुश्मन ही पुस्तिका) जवळकरांचे नाव गाजले. फेब्रुवारी १९२८ मध्ये त्यांनी कैवारी हे पत्र भास्करराव जाधव व जेधे बंधु याच्या प्रेरणेने व सहकार्याने सुरु केले. जवळकर लेखणीचा वापर तलवारीसारखा करीत. तिखट वाणी आणि लेखणी यांकरिता ते प्रसिद्ध होते. त्यांच्या परदेशदौऱ्याच्या काळात गणपतराव जाधव यांनी कैवारीची संपादकीय जबाबदारी सांभाळली. परदेशात जाऊन आल्यावर जवळकर बदलले आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादापासून दूर होऊन ते डाव्या विचारांकडे झुकले. शेतकरी व कामगार यांची बाजू मांडण्यासाठी ९ मे १९३१ रोजी त्यांनी तेज साप्ताहिक काढले. पण ते अल्पायुषी ठरले. अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात जवळकर यांनी केलेली कामगिरी लक्षणीय आहे.

ब्राह्मणेतरांच्या पत्रांमध्ये वा. रा. कोठारी (पुढे ते प्रभातकार म्हणून प्रसिद्ध झाले) यांचे जागरुक, भगवंत बळवंत पाळेकर यांचे जागृती आणि श्रीपतराव शिंदे यांचे विजयी मराठा यांचा समावेश होतो. कोठारींनी सत्यशोधक मतांचा प्रचार करण्यासाठी १९ जुलै १९१७ रोजी जागरुक हे साप्ताहिक सुरु केले. या कामासाठी त्यांना भास्करराव जाधव, रावबहादूर डोंगरे आणि अण्णासाहेब लठ्ठे यांचे साहाय्य लाभले. शिक्षणात मागासलेल्या जातींना स्वतंत्र मतदारसंघातून आपले प्रतिनिधी निवडण्याचा हक्क असावा या मताचा पुरस्कार कोठारी यांनी जागरुकमधून केला. १९२२ मध्ये हे पत्र बंद पडले. पुन्हा १९२५ मध्ये नव्या रुपात ते सुरु करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. भगवंतराव पाळेकर यांनी २५ ऑक्टोबर १९१७ रोजी जागृती हे पत्र काढले. दर शनिवारी ते बडोद्याहून प्रसिद्ध होत असे, तरीही त्यात महाराष्ट्रातील घडामोडींची नोंद असे. पाळेकरांनी हे पत्र सु. ३२ वर्षे चालविले. १९२९ मध्ये या पत्रास आर्थिक झळ बसली; पण त्यातून ते सावरले. त्यानंतर १ जानेवारी १९४९ रोजी ते बंद पडले. पाळेकरांवर फुले यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. ‘मराठा शिक्षण परिषदे’च्या कार्याशी ते संबंधित होते. जातवार प्रतिनिधीत्वाचा पुरस्कार करणाऱ्या जेधे यांच्या विचारसरणीला पाळेकरांनी विरोध केला. ब्राह्मणेतर चळवळ आणि या चळवळीतील नेत्यांच्या विचारांची समीक्षाही त्यांनी वेळोवेळी केली. ब्राह्मणेतर चळवळीचे आणखी एक मुखपत्र म्हणजे श्रीपतराव शिंदे (१८८३-१९४४) यांचे विजयी मराठा. १ डिसेंबर १९१९ पासून ते सुरु झाले. ‘भारत सेवक समाज’ सारखी संस्था व ज्ञानप्रकाशसारखे पत्र आपण काढावे, असे शिंदे यांना वाटत होते. राजकीय सत्ता हस्तगत करुन ब्राह्मणेतर समाजाचा राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत विकास साधता येईल, असा विश्वास त्यांना होता. ठाम मते आणि निश्चित धोरण हे शिंदे यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. केसरीविरुद्ध भूमिका घेणारे पत्र म्हणून विजयी मराठा बहुचर्चित झाले. १९३१ मध्ये शिंदे यांनी ‘शाहू सेवा सोसायटी’ ही संस्था ‘भारत सेवक समाज’ या संस्थेच्या धर्तीवर स्थापन केली. त्यानंतर विजयी मराठा त्या संस्थेच्या वतीने प्रकाशित होऊ लागले. १ जानेवारी १९३५ रोजी ते बंद पडले. १९२० मध्ये कायद्यातील नव्या सुधारणेनुसार निवडणुका झाल्या. ब्राह्मणेतर पक्षाने निवडणुकीत भाग घेतला. या निवडणुकीत प्रचाराचे साधन म्हणून विजयी मराठाने कामगिरी बजावली.

याशिवाय खंडेराव बागल यांचे हंटर (१९२५), रामचंद्र रावनारायण लाड यांचे मजूर (१९२५) या पत्रांचाही निर्देश आवश्यक आहे. हंटर हे साप्ताहिक प्रथम हरिभाऊ चव्हाण व रामभाऊ जाधव यांनी सुरु केले. पुढे एक-दोन अंकांनंतर ते खंडेराव बागल यांना चालवावयास दिले व ते त्यांनी नावारुपास आणले. मजूर या पत्राला दिनकरराव जवळकर यांचा पाठिंबा होता. ब्राह्मण आणि टिळकपंथीय हे मजूर पत्राचे टीकेचे विषय होते.

अपरिहार्य अशा गरजेतून ब्राह्मणेत्तरांची पत्रे जन्माला आली. ब्राह्मणेत्तर पक्षांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण करेपर्यंत त्यांनी धार्मिक व सामाजिक प्रश्नांना अग्रक्रम दिला. सनातनी, कर्मठ विचारांशी व ब्राह्मण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पुरस्कार करणाऱ्या  पत्रांशी या पत्रांचा सतत संघर्ष घडत असे. उदा., केसरी व भाला यांसारख्या पत्रांनी ब्राह्मणेत्तर पत्रांशी सामना केला.शेतकरी, कष्टकरी वर्गाचे शिक्षणाचे प्रश्न या पत्रांनी मांडले; परंतु कालांतराने या पत्रांतून ब्राह्मणनिंदाच प्रामुख्याने येऊ लागली. ब्राह्मण- ब्राह्मणेत्तर वादाची चळवळ सुरु राहिली, पण पत्रे मात्र बंद पडली. या पत्रांनी अस्पृश्यांच्या प्रश्नावर जेवढा भर द्यावयास हवा होता, तेवढा दिला नाही. अस्पृश्यांच्या लढ्याला प्राधान्य वा पाठिंबा देण्याची या पत्रांची तयारी नव्हती. त्यातूनच दलित पत्रकारिता जन्माला आली.

आंबेडकरपूर्व दलित पत्रकारिता
आंबेडकरपूर्व दलित पत्रकारितेमध्ये गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे आणि किसन फागू बनसोडे यांचे सामाजिक जागृतीचे कार्य मोठे आहे. त्यासाठी त्यांनी पत्रकारितेचे माध्यम जवळ केले. गोपाळबाबा वलंगकर हे पहिले दलित पत्रकार. त्यांनी अस्पृश्यांतील सर्व जातींना संघटित करुन गुलामगिरीविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले. लष्करातून १८८६ मध्ये निवृत्त झाल्यावर २३ ऑक्टोबर १८८८ रोजी त्यांनी विटाळ विध्वंसन नावाची पुस्तिका प्रकाशित केली. या पुस्तिकेत त्यांनी हिंदू समाजव्यवस्थेचे बौद्धिक पातळीवर विश्लेषण केले आहे. १८९० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या सुधारणेसाठी ‘अनार्यदोष परिहारक मंडळी’ स्थापन केली. इंग्रजांच्या राजवटीबाबत मात्र त्यांचे मत अनुकूल होते. इंग्रजी राजवट दलितांना उत्थानाची संधी देईल, अशी आशा त्यांना होती. अस्पृश्यांचा लष्करातील भरतीला करण्यात आलेल्या मनाईविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. या संदर्भात १८९४ मध्ये त्यांनी इंग्रज सरकारला विस्तृत निवेदन सादर केले. ‘अनार्यदोष परिहारक मंडळी’ वर टीका झाली, तरी त्यास ते उत्तर देत. दीनबंधू पत्रात ही टीका प्रसिद्ध होत असे. याच पत्रात गोपाळबाबाही स्वतंत्र लेखन करीत. गोपाळबाबांची पद्यरचना-जिचा उल्लेख ते ‘अखंडरचना’ असा करीत-दीनबंधूने प्रकाशित केली. दलितांचे पहिले संपादक शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे पहिले दलित पत्र (मासिक) १ जुलै १९०८ रोजी सुरु केले. सुमारे तीन वर्षे ते चालले. कांबळे यांनी आदि हिंदू हे वृत्तपत्र काढल्याचा उल्लेखही आढळतो. सोमवंशीय मित्र या पत्रापूर्वी मराठा दीनबंधू (१९०१), अंत्यज विलाप (१९०६) आणि महारांचा सुधारक (१९०७) या तीन पत्रांचा उल्लेख केला जातो. त्याचे जनकत्व किसन फागू बनसोडे (१८७९-१९४६) यांच्याकडे दिले जाते. मात्र या तिन्ही पत्रांसंबंधी काहीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांचे संपादक-संस्थापक म्हणून बनसोडे यांना श्रेय देणे श्रेयस्कर ठरणार नाही, असे दलित पत्रकारितेच्या अभ्यासकांना वाटते. कांबळे यांनी सोमवंशीय मित्रमधून व तत्कालीन इतर मराठी-इंग्रजी पत्रांतून लेखन केले. ते कार्यकर्ता-संपादक होते. अस्पृश्यता-निवारणाच्या कार्यासाठी त्यांनी सभा, संमेलने व अधिवेशने आयोजित केली. मुरळी, जोगतिणींच्या प्रश्नांना वाचा फोडली तसेच देवदासींच्या विवाहासाठी पुढाकारही घेतला. त्याचा परिणाम सोमवंशीय मित्रवर झाला. त्यात आर्थिक कारणांची भर पडली व १९११ मध्ये हे पत्र बंद पडले. सोमवंशीय मित्रमध्ये लेख, अग्रलेख, स्फुटे, बातम्या, वाचकांची पत्रे असा मजकूर प्रसिद्ध होई. समाजसुधारणा, शिक्षण, विवाहसंस्था यांविषयी कांबळे यांनी गांभीर्याने लेखन केले.राजकीय प्रश्नाबद्दल लिहिताना जहाल पक्षाचा निर्देश ते ‘नवीन दांडगा पंथ’ असा व पुढे ‘टवाळ पक्ष’ म्हणूनही करीत. शिवजयंती उत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव यांवर त्यांनी टीका केली. 

किसन फागू बनसोडे यांनीही दलित पत्रकारितेची पार्श्वभूमी तयार केली, ते ‘कर्ते सुधारक’ होते. शिक्षणाचा प्रसार आणि दलितांची आर्थिक उन्नती यांसाठी १९०३ साली त्यांनी ‘सन्मार्गबोधक निराश्रित समाज’ नावाची संस्था स्थापन केली. १९०७ साली त्यांनी मुलींची शाळा काढली व मुद्रणालय सुरु केले. यांशिवाय त्यांनी तीन स्वतंत्र पत्रेही काढली. निराश्रित हिंदू नागरिक (१९१०), विटाळ विध्वंसक (१९१३), मजूर पत्रिका (१९१८) व चोखामेळा (१९३१) या चार पत्रांमधून दलितांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी लेखन केले. हिंदू धर्म, धर्मग्रंथ आणि रुढीग्रस्त समाज हे त्यांच्या लेखनाचे विषय होते.

डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता
: डॉ. आंबेडकर  यांनी मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात दलित पत्रकारितेच्या रुपाने केलेली कामगिरी मोलाची आहे. त्यांनी मूकनायक (३१ जानेवारी १९२०), बहिष्कृत भारत (१९२७), जनता (१९३०) आणि प्रबुद्ध भारत (१९५६) अशी चार पत्रे चालविली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाज समता संघाचे अध्यक्ष होते व समता हे या संघाचे मुखपत्र होते.
डॉ. आंबेडकरांची काही समाजसुधारकांसह शाहूमहाराजांशी १९१९ साली मुंबईत भेट झाली. या भेटीत वर्तमानपत्राची कल्पना मांडण्यात आली. महाराजांना ती पसंत पडल्यामुळे त्यांनी लगेच डॉ. आंबेडकरांना अडीच हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले. त्यातून मूकनायकचा जन्म झाला. ब्राह्मणेत्तरांची पत्रकारिता दलितांच्या प्रश्नाला न्याय देऊ शकली नाही, एवढे एकच कारण मूकनायक सुरु करण्यामागे नव्हते. १९१७ साली हिंदूस्थानातील विविध जातिजमातींच्या मताधिकाराविषयी चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने ‘साउथबरो’ आयोग नेमला होता. या आयोगापुढे दलितांची कैफियत नीटपणे मांडली गेली नाही, या जाणिवेतून ते पत्रकारितेकडे वळले. मूकनायकाचे संपादकत्व त्यांनी पांडुरंग नंदराम भटकर या तरुणाकडे सोपविले. मूकनायकमधून डॉ. आंबेडकरांनी दलितांचे प्रश्न मांडले, तरी त्या काळी ते चळवळीचे मुखपत्र बनू शकले नाही; कारण मूकनायक सुरु झाल्यावर काही महिन्यांतच-म्हणजे ५ जुलै १९२० रोजी-अभ्यासासाठी डॉ. आंबेडकर लंडनला गेले. तेथून ते ३ एप्रिल १९२३ रोजी भारतात परतले. २० जुलै १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली, त्यातूनच ३ एप्रिल १९२७ रोजी बहिष्कृत भारत हे पाक्षिक पत्र उदयाला आले.
मूकनायक दर शनिवारी प्रसिद्ध होई. शीर्षकाच्या डावीकडे वर्गणीचे दर, तर उजवीकडे जाहिरात असे. किरकोळ अंकाची किंमत दीड आणा होती. का. र. मित्र यांच्या मनोरंजन छापखान्यात ते छापले जाई. अंकात पहिल्या पानावर, शीर्षकाखाली (मास्टहेड) तुकाराम महाराजांच्या अभंगातील पुढील ओळी बिरुदावली म्हणून छापण्यात येत :

काय करु आता धरुनिया भीड I निःशंक हे तोंड वाजविले II
नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण I सार्थक लाजून नव्हे हित II
मूकनायकमध्ये डॉ. आंबेडकरांनी चौदा लेख लिहिले. डॉ. आंबेडकर परदेशात गेल्यावर मूकनायकची आबाळ झाली. पुढे भटकर यांच्याकडून ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांनी सूत्रे हाती घेतली; तथापि १९२३ मध्ये मूकनायक बंद पडले.
बहिष्कृत भारतचे संपादक, मुद्रक आणि प्रकाशक डॉ. आंबेडकर हेच होते. त्याचा उल्लेख त्यांनी पाक्षिक पत्र असा केला आहे. छापखाना बदलणे, वर्गणीदारांकडून वेळेवर वर्गणी न येणे, अंक वेळेवर न निघणे या अडचणींना सामोरे जावे लागले, तरी डॉ. आंबेडकरांनी निर्धाराने हे पत्र चालविले. एका शुक्रवारी बहिष्कृत भारत व एका शुक्रवारी समता असा प्रयोगही त्यांनी काही काळ केला. बहिष्कृत भारत सुरु करण्यापूर्वी बहिष्कृत फंडासाठी डॉ. आंबेडकरांनी आवाहन केले; परंतु फारसा प्रतिसाद लाभला नाही. एकूण दोन वर्षांच्या काळात सु. नऊ महिने हे पत्र बंद राहिले. अखेर १५ नोव्हेंबर १९२९ रोजी हे पत्र बंद पडले.त्यानंतर एका वर्षात-म्हणजे २४ नोव्हेंबर १९३० रोजी-जनताचा पहिला अंक प्रकाशित झाला. देवराव विष्णु नाईक हे त्याचे संपादक होते. जनता प्रथम पाक्षिक होते; मग ते ३१ ऑक्टोबर १९३१ रोजी साप्ताहिक झाले. जनताच्या किरकोळ अंकाची किंमत दीड आणा व वार्षिक वर्गणी दोन रुपये दहा आणे होती. जनता या शीर्षकाखाली इंग्रजीत द पीपल असे लिहिलेले असे. आपल्या व्यापामुळे डॉ. आंबेडकरांना लेखनासाठी पुरेशी सवड मिळत नसे; परंतु सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांच्या संदर्भात ते आवर्जून लिहीत. जनता पत्र पंचवीस वर्षे (१९५५ पर्यंत) नियमितपणे चालले. भा. द. कद्रेकर, गं. नी. सहस्रबुद्धे, बी. सी कांबळे आणि यशवंतराव आंबेडकर यांसारख्यांनी जनताचे संपादकपद सांभाळले. जनताचे प्रबुद्ध भारत असे नामांतर ४ फेब्रुवारी १९५६ रोजी करण्यात आले. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांच्या निर्वाणानंतर या पत्रासाठी संपादक मंडळ नेमण्यात आले. संपादक म्हणून यशवंतराव आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर, दा. ता. रुपवते, शंकरराव खरात व भा. द. कद्रेकर यांनी क्रमाक्रमाने जबाबदारी सांभाळली. ३ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यावर प्रबुद्ध भारत हे त्या पक्षाचे मुखपत्र बनले. १९६१ साली हे साप्ताहिक अंतर्गत वादामुळे बंद पडले.

डॉ. आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेतून अनेक विषय हाताळले. धर्मसंस्था, धर्मविचार आणि जातींची उतरंड यांचा त्यांनी मागोवा घेतला. हिंदू समाजव्यवस्थेची आणि अस्पृश्यांच्या इतिहासाची त्यांनी बुद्धिवादी चिकित्सा केली. महाडचा सत्याग्रह, पर्वती सत्याग्रह, महारांची वतने, गिरणीमालक व कामगार, खोतीचे प्रश्न, गुलामगिरी असे अनेक विषय त्यांनी हाताळले. वृत्तपत्र हे मतपत्र असते, असे ठामपणे सांगून डॉ. आंबेडकरांनी हे लेखन केले आहे. निखळ, लख्ख मराठी भाषेत ते लिहीत. त्यांचे विवेचन तर्कशुद्ध असे. ‘हिंदू धर्माला नोटीस’ व ‘अस्पृश्यता-निवारणाचा पोरखेळ’ यांसारखे त्यांचे लेख अविस्मरणीय ठरले आहेत.
------------

Comments

Popular posts from this blog