***प्रवासवर्णन***
***सहल***
"पहाटव्याखाली साडे तीन वाजता उठून अंघोळ करून आम्ही तयार झालो.अन कमवा
शिकाच्या कार्यालयात गेलो.तर तिकडं काळं कुत्रं फिरकत नव्हतं.काल रात्रीच्या
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दगदगीने सर्व आळसून गेलेले.काही लवकर उठले होते.ते लवकर
पोचले होते कार्यालयाकडे.मंग पहाटव्याखाली सहल अधिकारी आबासाहेब गुंड आले.कागदपत्र
तयार झाली.गाड्या आल्या.बसाबसाई झाली.लैय धर्वड होऊन जागा मिळावी असं काही घडलं
नाही.सपशेल मोकळीक होती. मुलींसाठी व्यवस्थित
योजना होती.त्यांनाही वेगळी व स्वतंत्र गाडी होती. विद्यापीठातून गाड्या वळून खडकी फाटकातून बाहेर पडल्या. पुढं नासिक
महामार्ग गाठून भर्धाव पळत होत्या.मोठमोठ्या उच्चीच्या उच्ची इमारती मांघं राहू लागल्या. पहाटव्याचं गारवं काचेतून गाडीभर घुमत होतं.अन त्यानं मन चेकाळू लागले."
"आभाळातून सूर्य
टोंगळाभर वर आला होता. पूर्वकडून तांबडट वम उठत होती.कव्ळं ऊन पीत डोंगरं निपचित
हुडूप पडलेले.पाह्यटच उठणारे कावळे काव काव वर्डतच उडू लागले.चिमण्या चिवचिवाटत पळू लागल्या वाऱ्यावर.बगळे,पार्व्या,साळुंक्या आकाशी उंच तरंगत जाऊ
लागल्या.टिटव्या टिवत्व पुकारत होत्या.पाखरं सैर भराऱ्या मारू लागले होते.पिवळं गवत
वाऱ्यावर झुकून सलाम करीत होतं.बाभळी सुरकुतत होत्या.लिंबं, साग,चिंन्साय,चिंचा फुलार्ले झालेले.काटेरी झुडपं,डोंगराची उंच कडा त्या रुपसुंदर निसर्गानं मखुल होत होती.सृष्टीत एक
चैतन्य नांदू लागलं होतं.सारं सारं खुललेलं निसर्गाचं चित्र खुल्यादिलानं न्याहाळत
आम्ही गावकुसात पोचलो. सर्वांच्या पोटात भूक आरोह अवरोह करत भूपाळी गायन करत
होती.मंचर सोडून आम्ही घोडेगावाच्या पलीकडील टोकास थांबलो.समोरच असलेल्या एका खानावळीत नाश्त्याला
तडाखून गर्दी पडली. खानावळीजवळील आंबे
नुकतेच हिर्व्या कैरीवर आलेले. पोऱ्हापोरींनी
घाईगरबडीत मालकाची नजर हुकवून ते तोडलेच नि ती रानमेव्याची चव चाखलीच.एक हिर्वी
फोड चाखत म्या पोहे चघळत होतो.”
"घोडेगाव
मांघं टाकून गाड्या गर्गर वळणं घेत पुढं पळत होत्या.आता कुठंमुठ इमारत झळकत
होती.सारे घरं आता ठेंगणे होत होते.गावकुस त्याचं राज उलगडत होती.शिनोली
लागली.गावातून गाडी वळणाची चिरे घेत पुढची वाट न्याहाळत जाऊ लागली.शिनोलीच्या
पुढच्या रस्त्यालगतची घोड नदी वाट सोडत नव्हती.ती कायम सोबत डिंभे गावाजवळ जाऊन
थांबत होती.डिंभे गावांकडील कमान उभी करण्यात
कामगार शक्ती राबत होती.मजुरांजी शक्ती,कष्ट व घाम तिथं अतोनात
खर्ची पडत होता.इकडं डिंभे चं लहान टुमदार गाव दिमाखात धरणाच्या कुशीत पहुडलं
होतं.काही लोकं शेळ्या-मेंढ्या चरायला गावाबाहेर पडले होते.धरणाच्या पोटात वसलेलं
डिंभं तोऱ्यात नांदत होतं.त्यालं वाटत होतं, "आपल्या घरात पाण्यानं भरलेले करोडो रांजनं हाये
ब्वॉ... कश्याची फिकीर ता....!"
खरं तर डिंभेची माहिती अशी की,
डिंभे धरण-
धरणाचा उद्देश सिंचन,जलविद्युत व अडवलेल्या नद्या/प्रवाह मुख्य नदीस
आणून पाणीपुरवठा करणे.तसेच ही घोड नदी स्थान आंबेगाव ला आहे. धरणाची लांबी ८५२ तर उंची ६७.२आहे.अजून बांधकाम सुरू आहेच.मागे इ.स. १९७८ ते चालू झाले
होते.ते तब्बल १८ वर्ष चाललं. जलाशयाची क्षमता ३८२ अशी असून जलसंधारण
क्षेत्र ३५३९१ तर क्षेत्रफळ १७,५४७ आणि याचबरोबर विद्युत
उत्पादनासंबंधित व स्थापित उत्पादनक्षमता ५ मेगावॅट.महत्वाचे म्हणजे हे
डिंभे धरण पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोड नदीवरील धरण आहे.याचे बांधकाम इ.स. १९७८ मध्ये सुरु झाले व इ.स. २००० मध्ये पूर्ण झाले.या
धरणामुळे जुन्नर,आंबेगाव,घोडेगाव,डिंभे,ओतूर खोडद,रांजनी,मंचर ते शिरूरपर्यंत पाण्याचे पाट वाहतात.हा पट्टा खरे तर या भर उन्हातही
हिरवागार दिसत होता.
"डिंभे सोडलं अन आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.डिंभे धरणाला वळसा घालतांनी
चारही गाड्या आपलं धूड सांभाळत गर्व्हार बाईवानी पोटात जीव घेऊन वळसत
होती.बसल्याजागची जागा सरकत होती. प्रवासानं कोणावर तर
झोपची डुळकी अधिराज्य करत होती. डोळे तर्राटत होते.
वातावरणात एक दरप घुमू लागली.उन्हाची रग आता जाणवत
होती.पक्षी कमीकमी जाऊ लागले.ते घरटे जवळ करत होते. डोंगरं निवांत आग ओकत तळपणाऱ्या सूर्याच्या धगत निश्चल बसलेले. घोरकठोर निर्णय घेऊन एखादा साधू वा संत साधनेसाठी कैक्काळ तपत बसावा तद्वत
ते तप्त झळा सोसत अंगावर पान्गळीत झाल्या झाडाझुडुपांच्या खाली निश्चल झाले
होते.उन्हात तडकणारे दगडं आपलं आंग उघडं करून पडले.आईचनकाटा पीधार हुलगत होता.डोंगर बर्गाडीलं पिवळंधम्मक गवत गुळी वाऱ्यावर
निथळत होती.अन ते डोंगरमेव्याचं धन मुक्या जनावराला आपल्याकडं आकर्षित करीत होतं.
डोंगरावर इतक्या चटचट करणाऱ्या उन्हातही पोटाचा आकांत बुजवण्यासाठी मुके जनावर चरत
होती.ती सांगत होती, "पोटासाठी
ब्वॉ...जगण्यासाठी....ब्वॉ... दुसरं कश्यासाठी???"
रस्त्याची वळसा घालणारी वळणं लांब
पल्याच्या खुणा सोडत नव्हते.मध्येच गिर्कि घेत गाड्या नागमोडी वळणं चढूउतरू
लागल्या.एक गाडी पुढं जाऊन लगेच वाकून फेर धरत होती.तिचा फेर संपला की लगेच दुसरी
मागून लागूनच फिरकत होती.असा चक्राचा खेळ तिथं रस्त्यावर घुमत होता.पुढच्या
गाडीतील जीव मागच्या गाडीतील जीवायलं न्याहाळत होते.तर काही टारगट हिस्कळ वर्डत
होते.काही मात्र खिडकीच्या काचेतून बाहेरचं पिवळ्या सोन्यावणी भरलेलं वातावरण अन निसर्गाचं चित्र पाहण्यात दंग झाले होते.पोहे
खाल्ल्यानं पोटात खद्बद घुसळू लागली. काही निद्रेच्या
आहारी गेले.इसखंडी पोरापोरींना सांभाळून आणणे नेण्याचं इर्सिप्त कार्य आबा गुंड
सरांकडं होतं.म्हणून आबांना सारखे दमछाक करून सोडणारे भ्रमणध्वनिवर बोल पडत
होते.म्या गाडीच्या तोंडातच बसलेला असल्याने सारं चइंतर दृष्टीत साठत
होतं....!"
अन या
साऱ्याला घेऊन चालणारा चालक आपल्याच नांदात येका
हातानं टेरिंग चं चाक गर्गर घुमवत पायाखाली बिरेक दाबत होता.
"उच्ची गेल्यावर सारं
दिस्तंय गड्या...!" म्या ओझ्यालं
म्हणलं...त्यालं काहीच समजलं नाही. ओझ्या आडनावाचा मित्र.गोराभराड उच्ची सडपातळ.ह्यो एक त्त हिंदी विभागाचा त्यालं मराठी जास्त
उमगूत नव्हतं.त्यो म्हणला,
"क्या आं.... ...???होर सूनआ दे??"
"काही नाही!" बस तिथंच....!"
म्या बोललो.
"खिडकीतून पाह्य बाहीर...!"
अन त्यो डोकून पाहू लागला.
"मापोलीच्या डोंगरावर तर
दिशाभूल करणारें वळणं लागले.तिथं उत्तरदक्खन उमगत नव्हतं.सूर्य नेमका डोस्क्याउपर
आल्यानं सावल्याच्या झुकांड्या कळत नव्हत्या.एका जुनाट अन चुन्याच्या रंगात
जाहिराती लिहिलेल्या बसथांब्या नजीकच एक शेतकरी ढोरं घेऊन जात होता. त्याच्या
डोस्क्यात टोपी.काळजीनं कापलेला चेहरा अन अंगात मळकट रंगाचा कळकट खमीस.दूटांगी धोत्तर कमरेत खोसलेलं.ते पण वळ्या पडून जुनाटपण
वकत होतं. टोंगळ्यावर ते मुडपलेलं. एका हातात लाकडी पुरानं अन एका हातात बैलाचा
कासरा धरलेला.त्या बलिष्ठ जनावरचं सारं बळ त्याच्या हातात होतं.त्या ताकदिस एका
येसनींनं बांधून टाकलं होतं.पुढं राजेवाडी शिवारात ढोरक्या ढोरं घेऊन निंघाला होता.तसा
त्यो शेतकरी निंघाला होता.दोन बैलं अन एक वांढाळ वासरू.
गाड्या रस्ता कापत
होत्या.पुढं एक दीर्घ वळण घेत त्या कल्ल्या.इथून पुढं जरा सवान रस्ता लागला.अन
सवान रस्त्यावर शाळेत जाणारी मुलेमुली दिसली.इतक्या भ्रर्र्रर्र उन्हातही त्ये
शाळंची वाट सोडत नव्हते.त्यांच्यातील काहींनी आंब्याच्या क्चच्या कैऱ्या तोडून
आणल्या होत्या.त्ये सारे मिळून खात होते. काही मुली सायक्लीवरून जात होत्या.ते इचार करत होते.,
"शाळा शिकून पुढं मोठ्ठा साहेब साहैबिन व्हावं .म्हून आज
इतक्या उन्हात का व्हइंनं पण शाळा सोडू नाही ब्वॉ...!
त्या ईचारातच ते पाऊल पाऊल झपाझप टाकत पुढं निंगत होते.अन आमची गाडी
त्यांच्या वाटेने सरळकाट पळत होती.
अचानक सवानीचा रस्ता संपला.जणू काही
काराडुंगाचं जंगलच.अन पुढं घनदाट वाट आली.एकेरी वाट त्या वनात घुसत
होती.उंदरा-खोग्राचे बीळ असल्यासारखी ती वाट एका वळणाने गडप होत होती.रस्त्याच्या
दुतर्फा झाडं असल्यानं किर्रर्र अंधार दिवसा तिथं उगवला होता.भर उन्हातून वेगात
आल्या गाडीचालकाची नजर गपकन दिपत होती.
म्या आपलं बस्लो ईच्यार करत की,
"माय झं.....पुढं रस्ता हाय का नाही ब्वॉ????
का गाड्या होतात उतान्या...??
काळीज आतून चरकलं.अन मलं लहांपनातली शेळ्याकडची आठवण
झाली...........
"त्या दिवशी म्या न्याहारी करून शेळ्या सोडल्या. बाजारच्या थैलीत दीड जेवारीची भाकर अन त्याच्यावर उखळात कुटलेल्या लाल
मिर्च्याचा बुकटा टाकला.जर्मलच्या क्याटलीत तेलाची धार बुक्टयावर टाकावं म्हणलं तर
कोर्डीठन्न क्याटली झालेली.तसाच भाकरीचा पालव दीड दोन गाठी बांधून थैलीत
कोंबला.बकर्डालं वाव्रात पानी पाजण्यासाठी एक खोल कटुरा घेतला.वल्लं धुडकं करून
थंडावलेली शिशी गोड्या पाण्यानं भरून घेतली.अन शेवटालं मार्क्या तांबड्या पाठीचं
बिड्ढं सोडलं.सारे बकर्ड सांदीनं खैदोस करत सुटले.जिकडं तिकडं...
"म्या ....र्रर्रर...र ब्या ...आ ..ब्या म्याआ....”
असा वर्डा सुरु झाला.बोळांडीतून जातांनी
म्या मायलं म्हणलो,
"म्या येतो वं माये...”.
"आरे इसुबा भाकर बांधली का..????”
“भाकर ने नं माय उन्हातान्हाची.....!”
माय ची जित्ती मया त्या सुरात पघळत होती.
"हं..... घेतली...!"
म्या म्हणलो.अन म्या शेळ्या बोळांडीतून चिचखाली नेल्या.चिचखाली
शेळ्या गेल्या की आपसूक त्या मुतत.ह्यो त्याहीचा रोजचा नियम.मुतल्या की पसापसा
लेंड्या मांघं सांडत.या चिचखाली सारे शेळके भेटत.इथून आज कुठं जाचं हे ठरे.
उन्हाळ्याचे दिवस असल्यानं सारं रान मोकळंचाकळं झालेलं.चिचखालून दूरवर
रानं दिसत.गोडोनी,आंबराई, महिलकोलीचं
शिवार,भद्भदी,महात्तम तांबर,हाडूळं सारे सारे शिवार डोळ्यात भरत होते.आज भद्भदीकडं जाचं
ठरलं.तुंब्र्या, हाऱ्या अन आन्या असे आम्ही चौघं चिचखालून
निंघालो.तीस पस्तीस लहानमोठं जित्रब धरून आम्ही गाडवाटनं चाल केली.मोरकानी,मार्कि तांबडत,कानीं, धवळी
हिरी,साजे पाठरु,हाम्या नावाचा बोकड्या,चार पाच पिल्ले अन सात पाठी,काही ढोंग झालेल्या
नाकातुन शेम्बुड गळत शिकरणाऱ्या बोजड वव्याच्या,हरण्या, कातडीच्या,काळपट व्वा र्रर्रर्र म्हणलं की
थिर्र्रर्रर्रर्रर्रर्रकणाऱ्या शेळ्या त्यात होत्या.त्यातल्या त्यात थिरकत
चालणाऱ्या,कुठं कोणाची जेवारी वाळू घातली की ती न खाता त्या
जेवारीवरून चालणाऱ्या अन काही त्या जेवारीलं सप्पा करणाऱ्या हुल्लडी बकऱ्या त्यात चालल्या होत्या.काही त्त
शेंडा गाठत पळत सुटत.त्त काही धीम्या चालीनं गोगलगाईशीं पैजा जिंकू पाहत
होत्या.त्या खुरात चमक भर्ल्यावानी लंगडत चालत होत्या.कदाचित त्याहीच्या पायात
कालचा काटा चपकला असलं.असो
गाडवाट संपली अन अचानक मोठ्मोठ्ठे लिंबाची, महार्काची,अशोकाचे,वडापिपळाचे झाडं दाटीवाटीनं
थर करत होते.शेळ्या त्या शिळावणीत
"सुsssssss .....थ्रर्र्रर्रर्रर्रर्रर्रर्र
......फिरर्र्रर्रर्र्र्रर्रर्रर्रर्र ........ह्रर्र्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र
.....म्या आ.. ब्या
र्र्रर्रर्रर्रर्र.......आ....म्याआ.. sss वर्डत पळल्या.साऱ्या
रस्त्यानं धुरुडा उडाला.तुंब्र्या,पळाला,आन्यानं धूम ठोकली.हाऱ्या त बाप्पा वाऱ्यावरच सैर झाला होता. म्या हातचा कटुरा सांभाळत जरा दिडकी चाल केली.चालत चालत ईच्यार केला,
"माय झं......?"
"हाऱ्या,तुंब्र्या,आन
आन्या याहीलं इकडून जाऊद्या आपुन पलीकडून जाऊ.म् शेळ्या पलीकडून हाकर्ता
येतील..!"
म्हून म्या झाडीच्या पलीकडून जाऊ लागलो.गर्द दाट झाईच्यानं
डोळ्यापुढं एकदम अंधार झाला.सारं आंग झंन्नन्न करू लागला.वरुन खाली सरकल्यासारखं
झालं.हातातला कटुरा हारपला.बजारची थैली हातातली कस्यासोबत दंडात जाऊन फसली.शाळंची
खाकी आखूड इज्यार कर्र्रर् आवाज करत मंधातुन फाटली.
झालं होत्याचं
नव्हतं झालं.उठून पाह्यतो त्त क्काय? सपशेल म्या भामटत उभा होतो.जिकडं तिकडं बेसरमीचे हिर्वेगदाड पानानं अन
फोकानं आराटीच्या बेटांनं ती भामट उप्तरुन आलेली.तिच्यात साऱ्या गावाच्या जुनाट
फाटक्या उधडलेल्या गोधड्या,गाद्या,माती,कचरा,धुडके, फडके,खताच्या थैल्या,कुठंमूठं
दवादारूच्या बाटल्या फेकलेल्या.भामट उब्टा वास वकत होती.
ही भामट म्हणजे एके काळची इहिर.पण कालांतरानं माती,कचरा,अन इतर ढिगानं बुजून
गेलेली.भामटत नाना वनस्पती उगवून आलेली.अन जमिनीला लागूनच.म्हणजे भुईसपाट.माती सपाट
अशी खड्यात आलेली.
बेसरमीच्या खोडात
अडकलेला कटुरा काढला.हातातली थैली घट्ट पकडली.अन बेसरमीच्या फोकालं एका हातानं
धरून त्या भामटातून कसाबसा वर निंघलो.कोप्रालं चुंचून करत होतं.हात उलट केला त
रक्ताचा वघळ निंघत होता.तसाच कोराटीचा पाला वरबडून कोप्रावर घासला.अन म्या पलीकडून
सोयीनं गेलो.
इव्हन साऱ्या शेळ्या त्या गर्द झाडीत चरत होत्या. ती गर्द झाडी ती भामट झाकाळून टाकत होती.सर एक न दिसणारं जग बुजवून टाकत
होती.तस्साच ह्यो रस्त्या होता.पलीकडचं जग बुजवून टाकणारा.म्या पुढं पुढं जात
होतो.
"त्या तळत्या उन्हात नाजूक थंड हवेची लहर सर्वांग शितळतेची प्रचिती करून
गेली.अन शेळ्याकडच्या आठ्वणीतून गप्पकन म्या बाहीर आलो.येव्हाना भीमाशंकर आलं होतं.गाडी वळविण्यासाठी चालकाने गाडी बसथांब्याच्या च्या आतून
वळवून घेतली.सारे उतरले.उन्हातही वारे शीतळ वाटू लागले.चारही गाडीतील सर्व एके
ठिकाणी जमवाजमव झाली. आणि उताराच्या दिशेने आम्ही चालू लागलो.
नाना प्रकारची
दुकानं वळींनं थाटली होती.हळदी कुंकुपासून त्त गळ्यातल्या हृद्राक्षापर्यंत.त्यात
नारळ,बुक्का,लिंबू,सुवासिक उदबत्त्या,अत्तरं,गंधगोळ्या,माळा,हार,फुलं,बेलाची पानं,पेढीबत्ताश्याची आळीपाळीने गुताडलेली पालं,खव्व्याची मलाई,राजगिर्याची
लाडवं,तिळगुळाच्या वड्या,फुटाणे-लेवड्या,सुती रुमाल, कापूर,हिंगोळ, दगडी चंदन,गंडेदोरे,देवादीखाचे छायाचित्र,तसबिरी,पितळी मुर्त्या,आरपाटं,देव्हारे,भंडारा,मोकळी राख,शंख शिल्पे, सह्याद्रीच्या
कुशीतलं नानातर्हेचं मोलतोलाचं बस्तान ऱ्या दुकांनानं घेरलं होतं.नाना वस्तू तिथं
दिसत होत्या.आयुर्वेदातील जायफळ,मायफल,राई,हिर्डा, रताळी,येल्दोडे,मिरे,हिंग,गुलयेळ,काकमुळी, जेष्ठमध,चंदनाचे नाना रुपं,बेहर्डा,आवटी, अर्जुनसारडा,टळू,एरंडाचे तेल,असं सारं तिथं रोगावर इलाज म्हून इकायलं
ठेवलेलं.
हाप्सीवर हातपाय धुवून आम्ही
पुढं वळलो. झऱ्यातलं
ओघळंत निरव शांतगार पानी अंगातोंडावर पडावं तद्वत त्ये हाप्सीचं पानी होतं.लैय
वाढोळ म्या तिथं रूंघळ्लो.अन पुढचं न्याहाळू लागलो......"
"समुद्रसपाटीपासून पाऊण मैल
वर आलो.म्हणजे
तीन हजार चारशे चोपन्न फुट वर.म्या जाता जाता पेढा खायचा असा इचार केला होता.लैय
दिवसाउपर म्हणजे शाऱ्याच्या चैतातील पेढा खाल्ल्यापासून पेढ्याचा कस इसरलो होतो.तो
आज खाणार म्हणून मित्र राम पण त्यात सहभागी होता.सचिनची म्हणला की, भागीदारीत घेऊन
खाऊ.त्यात काय.पाव पण येईल वाट्याला.म्हणून पेढा घेतला.अन खात खात आम्ही पुढं
निंघालो.दगडी पायऱ्या चटचट तपल्या होत्या.खालून गरम भाप उबळत होती. प्रवासात पिण्याच्या पाण्याची
सोय झाली नाही.पोहे खाल्ल्यापासून पानी पोटात नव्हतं.म्हणून कदाचित पेढा खावा अन
गुळचट तोंड करून वल्लाई आणावी.मही नजर पहिलीच भिर्भिरी.सारं न्याहाळणारी.उन्ह
डोस्क्याउपर आल्यानं म्या रुमाल टापरीसारखा बांधला.अन एक भेदक कटाक्ष करूण
अंतःकर्णी लागला.म्या जागीच खिळलो.काही मित्र पुढं गेले.राम सोबत होता.त्याला
म्हणलं,
"पाह्य रे रामा त्ये पोर्गं.....कसं हिर्मुस्ल्यावानी पाह्यतंय
....टकंटकं......!"
"र्रर्रर्र...एकटंच हाय...!"
राम बोलला.
"हं.......!"
एक दीर्घ
स्वास् रोखलेला सोडत म्या हुंकार भरला.अन पुढं झालो.हातातल्या पेढ्याची थैली
त्याच्यापुढं केली.ते लहानगं एका जागीच उभं.काहीही हालचाल नाही काय काही चेहऱ्यावर
हावभाव नाही.पुढं केलीली थैली त्यानं घेतली.अन त्यो पुन्हा मांघं सरळ झाला.
किंचितशीत्याच्या चेहऱ्यावर एक लकेर उमटली. ती गोड लकेर मनातून सुखवल्याचा
आनंद होता.
"काय तुहं नाव रे पोरा....????"
म्या त्याच्याकडं पाहत प्रश्न केला.त्याची काहीच हालचं ना बोलचाल.
"ये बाळा....!नाव काय हाय तूहं??!"
सरळ उभा असलेला त्यानं हात मांघं दगडावर रेलून दिले.त्याक्षणी रामनं
त्याचं छायाचित्र टिपलं.ते पोर्गं काहीच बोललं नाही.बिहारमधून आलेलं त्याचं कुटुंब लिंबाखाली झोपलं
होतं. त्ये इथं सुया पोथा,गंडेदोरे अन शंखं इकायलं बसलेले आहेत.दुपारची अराम करण्याची
येळ म्हणून निवांत शीतल छायेत ते लवंडले होते.असं दुसऱ्या दुकानातील एका बाईनं कथन
केलं. ते पोर्गं फक्त राखण म्हणून तिथं उभं होतं.
"सारी अखंड
भारताची महासत्ताकची स्वप्न त्याच्या नजरेत दिसत होती!" अन त्याच डोळ्यात स्वप्नांना
जाळणारी एक देशस्थळकाळाची ज्वलंत वास्तवी विखारही ठिबकत होती.देश पारतंत्र्यातून
सुटला अन स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले.त्या सर्वार्थ स्वातंत्र्यातील विकासाची
गार झुळूकही या भीमाशंकरच्या मातीत स्थलांतरित झालेल्या या पोराच्या गालावर लपेट
मारु शकत नव्हती.
"स्वातंत्र्याची साठोत्तरी खालेल्ल्या राजकारणाने ह्या गरिबीचा
हटाव का केला नाही..?"
असा रोकडा सवाल त्याच्या स्तब्धपणात गुदमरत होता.
"अजूनही नव्या राजेशाहीचे चांगले दिवस आलेले नाहीतच मुळात
....!"
असा आरोप त्या निरागसतेत होता.
"सत्तास्थाने हुकुमी वाटू लागलेत काय..?"
असा अविर्भाव त्याच्या पहिल्या कटाक्षात जाणवला.
"उन्हानं थकल्या भागल्या जिवंत जीवांना का वाटावं त्या
चिमुकल्या पोरालं त्या शंकूगंडेदोऱ्यांच्या दुकानावर राखण ठेवायला???"
त्याच्या निश्चलतेत वास्तवाला जिवंत करणारी खळ होती.
त्याच्या गालाला ओघळता हातस्पर्श करून म्या पुढं चालू लागलो.पुढं धग्धगतं
पत्र्याचं कुंड जळत होतं.साऱ्या वास्तवाच्या प्रश्नांची त्ये राख करीत असावं
असं एकवेळ वाटलं.
त्याच्याही पुढं मंदिरात दर्शनासाठी बारी
लागलेली.वळीं ठाकलेल्या.मेंढरासारखी रांग तिथं उगवू लागली.सारे त्या मंदिराकडं वळू
लागले.म्या मित्रांच्या मागोमाग सारं न्याहाळत वाट तुडवत होतो.मंदिराच्या डावीकडून
म्हणजे पूर्वकडून नक्षीदार स्तंभ.उभा व मनोऱ्याच्या आकाराचा.दगडी
कोरीव.आखीव.हत्तीच्या सोंडा त्याच्यावर दगडात कोरीव कोरलेल्या.मंदिराच्या आतल्या
भागातील खांब कटव्ही व कोरीव कातळाच्या ठेवणीतील. त्याच्यावर सुंदर नक्षीकाम.कमळ
त्याच्यावर फुलीत कोर्लं होतं.कलेचा अजोड नमुना तिथं त्या कलाकाराच्या कलेचं
अस्तित्व उभा करीत होता.कलाकाराचे हात झडले होते.मात्र तिथं सभामंडपात आयत्या
पिठावर रेघुट्या वढणारेच जमलेले.पावतीकार,उत्पात,बडवे,भडजी,अन पैश्याच्या ढिगानं भरणारी दानपेटी असं सारं
तिथं जमून आलं होतं.ते थंडया सावलीत मांडी मारून पावत्या चालवत होते.अन त्या
उन्हात ते पोर्गं दुकानापुढं राखणदार म्हणून उभं होतं.भुस्मानच तिथं अंतर उरत होतं.आमच्यातल्या
काही मित्रांनी मनोभावे दानधर्म केला.नारळ वाहिले.बेलफुल ठेवले.नारळ फोडलं तेव्हा
ते खवूट झालं होतं.पावलं म्हून त्या मित्रानं तिथंच ठेवलं.पोटासाठी ते उन्हात
दुकानावर राखण असणारं पोर्गं डोळ्यातून टळत नव्हतं.तर इकडं भाविकांच्या रांगा कटत
नव्हत्या.म्या आत गेलो.अन गाभारा पाहिला.मान वर फिरवून घुमट तपासला.आठनऊ
वर्तुळाकार अस्तरं पूर्ण होतं घुमट निमुळता झाला होता.भिंतील हाताचा स्पर्श करत
बाहेर पडलो. गाभाऱ्यातल्या
गुदमर्त्या वासानं लवकरच सारं पाहून बाहेर आलो.सभामंडपात एक लहान बाळ खेळत होतं.त्याला
इशारे करत म्या त्यालाच खेळवत बसलो.ते एकदा म्हयाकडं पाहून हासत होतं.तर एकदा
जमलेल्या गर्दीकडं.....!"
Comments
Post a Comment