अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्र – संपादकीय मुलाखत
 मा. राहुल थोरात – विश्वनाथ साठे
"नमस्कार!"         
"मी विश्वनाथ अर्जुन साठे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथून आलेलो आहे. आणि हे ठिकाण म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या निर्मितीचं ठिकाण. सांगली येथे आपण आहोत. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बरीच पुस्तके विचारधारा आणि तत्वांचा साठा आपल्यासमोर आहे. त्या अनुषंगाने विविध मासिके, साप्ताहिके, पाक्षिके, आपल्या वाचनात येतात आणि आपल्याला वैचारिक विचार करावा लागतो. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे पुरोगामी विचार घेऊन जाणारं महाराष्ट्रात गेली 29 वर्ष काम करणारं हे मासिक सांगली येथून प्रकाशित होत असतांना आपल्या समोर मा. व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात हे आहेत." "नमस्कार!"
वार्तापत्राचे सामाजिक आणि वाड्मयीन मूल्यमापन या अनुषंगाने आपण अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सामाजिक आणि वाड्मयीन मूल्यमापन म्हणजेच जेव्हापासून वार्तापत्र सुरू झालं. ते आजतागायत या वार्तापत्राची स्थिती काय आहे? सद्यस्थिती काय आहे? या वार्तापत्राची वाटचाल कशी होत गेली? आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं हे मुखपृष्ठ मुखपत्र म्हणून वार्तापत्र ज्यावेळेस काम करत आहे. या कामाची पार्श्वभूमी काय राहिलेली आहे? ही पार्श्वभूमी आज समजून घेणार आहोत. मी थोरात सरांना आपणाला पहिला प्रश्न करतोय की, सर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाड्मयीन प्रवाहातील प्रामुख्याने भूमिका कोणत्या राहिली आहे? आणि त्या काय होत्या?

- अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र आहे.जी समिती डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी स्थापन केली. या समितीचे ते मुखपत्र आहे. 1989 साली पुणे येथे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी "कवडसे" नावाचे एक छोटेखानी मासिक चालू केले होते. ते खरे तर त्रैमासिक होतं. त्या मासिकाचा उद्देश चळवळीमध्ये जे शाखेचे काम चालले या कामांना प्रसिद्धी देणे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना वैचारिक खाद्य पुरवणं. अशा स्वरूपाचं होतं. अत्यंत छोटे आणि सायक्लोस्टाइल पद्धतीचं हे मासिक होतं. आणि या मासिकाचे वर्गणीदार पहिल्यांदा आमचे समिती मधले त्या काळात काम करणारे ते कार्यकर्ते होते. त्यानंतर हे मासिक पनवेलला डॉ. प्रदीप पाटकर यांच्या संपादनाखाली सुरू झालं. आणि तीन-चार वर्षे हे मासिक चाललं. त्यानंतर सांगलीला डॉ. प्रदीप पाटील यांच्या संपादनाखाली हे काम 1994 पासून सुरू झालं. सांगलीतूनच तेव्हापासून तर आज पर्यंत मासिक प्रकाशित होणं सुरू आहे.

मासिकाचा उद्देश मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची वैचारिक भूमिका जनमानसापर्यंत पोहोचवणं, ह्याचबरोबर जे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चर्तुसूत्री कार्यक्रम आहेत. त्यावर काम करण्याचे तत्व घेऊन हे वार्तापत्र काम करत होते. एक म्हणजे जे शोषण. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे. महाराष्ट्र मध्ये 1990 च्या काळात लहान-मोठ्या अंधश्रद्धेच्या गोष्टी घडत होत्या. त्या घटना घडल्यानंतर क्वचितच अशा घटनांना वर्तमानपत्रात प्रसिद्धी दिली जायची. त्यावेळी माध्यमांकडे सुद्धा अशा घटनांकडे बघण्याचा कृतीकार्यक्रम आणि दृष्टीकोण निर्माण झालेला नव्हता. त्या माध्यमांकडे जर पुरोगामी विचारांचा पत्रकार असेल तर तो ती घटना वृत्तपत्रातून छापून आणायचा.आणि त्या घटनेला न्याय मिळवून द्यायचा.पण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्या घटनेच्या प्रत्यक्षपणे चिकित्सा करून त्याची पोलखोल करून त्यातील वैज्ञानिक सत्य काय आहे? ते लोकांना सांगायची. कार्यकर्ते कृतिशील होते. कार्यकर्त्यांनी केलेली कृती व वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून मिळालेले सत्य, त्यांचे रिपोर्टिंग आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या अंकात छापले जायचं त्यामुळे आमचं मासिक नुसतं बोलकं नव्हे तर ते कृतिशील असं आहे.
कार्यकर्त्यांचे लढे, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे हे लढे अल्पावधीतच लोकप्रिय झाले. कारण अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आणि आपल्या शहरा, गावा-गावातील खेडोपाडी लोकांना मासिकाचे वर्गणीदार करण्याची मोहीम जोरदारपणे सुरू केली. एक एक शाखा शंभर-दोनशे वर्गणीदार करून घ्यायची. अशा रीतीने महाराष्ट्रभर हे मासिक पोचले. मासिक पोचविण्यामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या कार्यकर्त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांची चिकाटी, त्यांची जिद्द आणि त्यांचे काम हे सर्वात महत्वाचे आहे. लोकांना वैचारिक गोष्टी वाचण्यापेक्षा कृतीप्रणव गोष्टी आवडतात. कृती झालेली आवडते. अशाप्रकारे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची सुरुवात झाली.

सुरुवातीलाच सांगायचं झालं तर, आमच्या शाखा जे उपक्रम राबवितात किंवा जे लढे देतात, ज्या भानामतीचे खटले हाताळतात, बुवाबाजीचा भांडाफोड करतात या सगळ्यांचे रिपोर्टिंग आमच्या मासिकात छापायला सुरुवात झाली. आणि ते छापल्यामुळे लोकांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आणि चळवळीचे काम नक्की काय चाललं आहे? हे कळू लागलं. लोकांपर्यंत ते काम पोचू लागलं. वाचक हे सारं वाचू लागले. समजू लागले.

एक गोष्ट महत्वाची की, मागच्या चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१५ साली आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राला २५ वर्षे पूर्ण झालेल्या कारणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं साहित्य संमेलन घेतले. ते साहित्य संमेलन पण आगळेवेगळे होतं. त्यात अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरच या संमेलनाचं नियोजन ठरलं. तसे संत साहित्य संमेलने, आदिवासी, ग्रामीण, दलित, कृषी, स्त्रीवादी, अखिल भारतीय मराठी साहित्य, संस्कृती संमेलने होत असतात. तर हे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर साहित्य संमेलन घेतलं. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आ. . साळुंखे तर उद्घाटक भाषातज्ञ डॉ. गणेश देवी आणि प्रमुख पाहुणे म्हणून फिरस्तीकार उत्तम कांबळे हे होते. त्यावेळी कांबळे सर म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलन ह्या एकाच विषयावर ही माणसं गेली २५ वर्ष काय लिहीत असतील बरं? याची एकदा आपण चिकित्सा केली पाहिजे. हा विषय एवढा मोठा आहे का? त्या एकाच विषयाला धरून २५ वर्षे हे मासिक चालतंय. मासिकाचे अंक प्रकाशित होतात. वाचकप्रिय मासिक लोकांच्या गळ्यातील ताईत होते. याचे उत्तर खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे अंक खंड १, २, ३  वाचले तर लक्षात येईल.

वार्तापत्र चे तीन खंड पंधरा पुस्तकांत आहेत. त्यात गेल्या २५ वर्षातील लेख आहेत. सगळे लेख त्यात नाहीत. मूलगामी लेख तीनशे पर्यंत त्यात प्रकाशित झालेल्या लेखकांची आहेत. जे नवीनच लिखाणात उतरले आहेत आणि वैचारिक भूमिका घेऊन लिहित आहेत. हे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. नवीन लेखक अति नवीन कार्यकर्त्यांना आणि नवीन कार्यकर्त्यांना या मासिकांमध्ये लिहिण्याची संधी देतो. प्रस्थापित लेखकांना त्यांचे लेख छापण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. पण नवोदित लेखकांच्या शब्दाला शब्दपीठ मिळायला खूप अडचण होते. त्या दृष्टीने अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापतत्राने सर्वसामान्य छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांचे असेच तीनशे कार्यकर्त्यांचे आठशे लेख छापले गेले आहेत. 

त्या अनुषंगानेच आपण दुसरा प्रश्न घेऊ की, या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या निर्मितीमागील सामाजिक उद्दिष्टाची भूमिका काय होती? त्या काळातील आणि सद्यस्थितीचे ह्या निर्मितीमागील कारणे काय होती? निर्मिती का करावी लागली?

एखादी भानामतीची कुठे घटना घडली तवर्तमानपत्रात न्यूज व्हॅल्यू म्हणून त्यादृष्टीने ती छापली जायची. घटनेवर प्रतिक्रिया म्हणून त्यांचं थोडसं विश्लेषण- वर्णन यायचं. परंतु त्या बातमीच्या मुळापर्यंत जाण्याचे कार्य अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने केलं आहे. बातमीचा पाठपुरावा घेऊन ती घटना कशामुळे घडली? या घटनेमागे कार्यकारण भाव काय आहे? खरे तर त्यामागील वैज्ञानिक सत्य कोणती आहेत? हे जाण्यासाठीच या मासिकाचे खरे काम होते. त्या घटना कशा घडतात? यांमागील विज्ञान काय आहे? हे सर्वसामान्य लोकांना व कार्यकर्त्यांना समजावून दिली जातात.

या कारणे मासिकातून वैज्ञानिक लेख, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार करणारे साहित्य, समाजातील अंधश्रद्धाचे स्वरूप, वाईट रूढी, वाईट परंपरा, घातक अश्या पद्धती ज्या आहेत. त्या परंपरांना, अंधश्रद्धांचे निर्मूलन करण्यासाठी प्रबोधन करणे हा उद्देश ठेवून लेखनातूनच प्रबोधन अशी पद्धती मासिकाने अंगीकारली.

दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट होते की, या प्रथा का निर्माण होतात? त्यामागे काय शास्त्र आहे? त्यामागील काय विज्ञान कार्यकारणभाव आहेत? विज्ञानाचा प्रचार- प्रसार करणं आणि वैज्ञानिक दृष्टिकोण यांचा प्रचार- प्रसार करणं, लोकांपर्यंत पोहोचणं अश्या दोन्ही बाजूने मासिकाचे काम सुरू होतं. अंधश्रद्धा म्हणजे नक्की काय? अंधश्रद्धा म्हणून घडलेल्या घटनांचा रिपोर्टिंग त्यात केलं जायचं. संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला त्या अंधश्रद्धा मागची कार्यकारणभाव काय असतो? तो सुद्धा आपण या मासिकाच्या माध्यमातून देत होतो. म्हणजे त्याकाळी व्याख्याते खूप कमी होते. दाभोळकरांसारख्या कार्यकर्त्यांची संख्या हातावर मोजण्या इतपत होती. की जे या विषयाचे प्रबोधन संपूर्ण महाराष्ट्रभर करू शकतील. पण तेव्हा कार्यकर्ते १९९० पर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या कामाच्या काळात कमी प्रमाणात होते. आणि काम इतके प्रचंड प्रमाणात होते. की, तेवढे कार्यकर्ते पुरेसे झाले नसते. चळवळीचे मुखपत्र म्हणून हे काम अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने हाती घेतलं. लोकांचं प्रबोधन करणं, मार्ग व विवेक दर्शन तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं, थोडक्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हे प्रवक्तेपद होतं. या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र सगळीकडे पोचत होतं. अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचं हे बी सगळीकडे पोच घेत होतं. या काळात प्रबोधनाची दरी भरुन काढण्याचे काम अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या माध्यमातून केलेला आहे.

एकीकडे ही नव्वदी चालू होती. जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली होती. या काळातच बरीच मासिके, पाक्षिके, नियतकालिके, अनियतकालिके, साप्ताहिकेसुद्धा प्रकाशित होऊ लागली. या काळातच अंधश्रद्धा निर्मूलनाची वाटचाल चालू झालेली दिसते. तर या काळातील ध्येयधोरणे काय होती? इतर मासिकांच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राची ध्येयधोरणे का ठेवलेली होती?

नव्वदीच्या काळातील गरज होती की, अशा विषयांवर महाराष्ट्रांमध्ये कुठेही मासिक नव्हतं. आणि या विषयावर त्या काळात चळवळ सुद्धा सुरू झालेली होती. चळवळीला वैचारिक पाठबळ पाहिजे असेल तर स्वतंत्र विचारांची एक मुखपत्र गरजेचं होतं. त्या काळात सगळ्या चळवळीची स्वतःची अशी मुखपत्र होतीच. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळही त्याच उद्देशाने मुखपत्र चालू करणारी एक महाराष्ट्रातील प्रमुख चळवळ होती. या चळवळीला वैचारिक पाठिंबा मिळावा आणि चळवळीला वैचारिक स्त्रोत मिळावा, चळवळीला लेखनाचे एक विचारपीठ निर्माण व्हावे. त्यानुषंगाने महाराष्ट्रांमध्ये या विषयावर मासिक नसल्यामुळे आम्ही हेच ध्येय ठेवून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीच्या नावाने अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या शीर्षकाखाली मासिक सुरू केलं. मासिकाचे शीर्षक सुद्धा सुचवले ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रा. डॉ. एन. डी. पाटील सरांनी. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हेच नाव असावं. हा आग्रह पाटील सरांनी घेतला. त्याप्रमाणे त्यांची ठाम भूमिका होती. मुंबईचे एका सभेमध्ये चळवळीतील बऱ्याच कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र सुरू करतांना त्याची वेगवेगळी नावं सुचवली होती. उदाहरणार्थ कडा”, लढा”, संघर्ष अंधश्रद्धेविरुद्ध”, विवेक”, “जागर” अशी अनेक आणावे सुचवण्यात आली होती. तर यावेळी प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, आपण जे काम करतोय. प्रत्यक्ष कामाचा उल्लेख घेतलेल्या मासिकाच्या नावाने शीर्षक असावे. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे स्पष्ट आणि परखडपणे मासिक नावाप्रमाणे असुद्या यांच्या सूचनेनुसारच या मासिकाचं अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र असं नामकरण झालं.

या काळात अंधश्रध्‍दा निर्मुलन समितीच्या आराखड्यामध्ये कार्यक्रमासाठी कार्यकर्ते अशी होती की, ज्यांच्याकडे लिहिण्याची क्षमता होती. वाचनाची आवड असणारे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीला वैचारिक पायाही देण्याची भूमिका घेणारे कार्यकर्ते लिहीत होते. वार्तापत्राने पुढचे वैचारिक तत्त्व घेऊन चळवळीची वैचारिक गरज या काळात भागलेली आहे. आणि त्या काळातले आमचे कार्यकर्ते डॉ. प्रवीण पाटकर, टी. बी. खिल्लारे, प्रभाकर नानावटी, प्रा. पी. आर. डॉ. दाभोळकर, मच्छिंद्र मुंडे, कुमार मंडपे हे वैचारिक पातळी घेऊन लिहिणारी लोक. आणि प्रत्येकाने विषय वाटून घेतलेली लोक. त्या काळात लिहू लागली. वार्तापत्र जोरदारपणे काम करू लागले. चमत्काराबद्दल मुंडे सर लिहीत होते. चमत्काराची भांडाफोड कशी होते? त्यामागे शास्त्र काय असतं? दाभोळकरांच्या तत्वांचा सार काय आहे? डे सर विज्ञानावर लिहायचे. खिल्लारे शास्त्रावर लिहायचे. अशा पद्धतीने त्या काळातली अंधश्रद्धा निर्मूलन सुरु होती. वार्तापत्राची साहित्य आणि विज्ञान, प्रबोधन आणि वाड्मय स्वरूपाची चर्चा सुरू होती. हे कार्यकर्ते वार्तापत्राचे लेखक झाले. त्या काळात मान्यवर लेखकांकडून लेख मिळवणे आणि तेही अंधश्रद्धा या विषयावर अवघड होते. कारण ह्या विषयातच महाराष्ट्रात खरंतर नवीन काम करत होता. आणि याकडे लक्ष घालायला कोणीही नव्हतं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याकडे पाहणारं कोणी नव्हते. त्या काळात अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने ही भूमिका घेतली आहे. हा पुरोगामी महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा पर्वप्रवाह होता.

पुरोगामी विचारसरणी महाराष्ट्रात होतीच. संत, सुधारकांचा वारसा, समाजसुधारकांची विचारसरणी होती. पण अंधश्रद्धा निर्मूलन त्यातला एक छोटासा भाग जो की, विज्ञानास पुढे आणत अविवेकाला भंग करू पाहणारा विचार मोठ्या चळवळीत रूपांतरित झाला. धरमातील अनिष्ट प्रथेवर आणि रूढींवर- विरोधात लिहावं, मासिक सुरू करावं असं होत नव्हतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ते करून दाखवलं. चळवळीला वैचारिक जी मशागत लागते ती मशागत महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणीनेच दिलेली आहे. कार्यकर्त्यांनी स्वतःची क्षमता वाढून अभ्यास व्यवस्थित राखून, वैचारिकता आत्मसात करून घेतली. आणि ते लिहू लागले. एक लिहिती, काम करती आणि चिकित्सा करणारी चळवळ यातून उभी राहिली.

या काळात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा वाचक, सभासद निर्माण झालेला आहे. आणि या वार्तापत्राबद्दलची त्यांची प्रतिक्रिया काय होती? ती आजच्या स्थितीत कशी आहे?

खरं तर एखाद्या नव्या प्रस्थापित विचारपरंपरेच्या विरोधाततील मासिक तयार होतं. त्यावेळेस लोक काही दिवस ते वाचून बघतात. की, नक्की काय चालंय आहे यांचे? एकदा वाचून झालं का ते परत म्हणतात की, ठीक आहे. तुमची चळवळ आता आम्हाला समजली. तर ते वर्गणीदार व्हायच्या हितात पडतही नाहीत. पण या कारणाला आमचं मासिक अपवाद ठरलं. याला मुख्य कारण म्हणजे आम्ही नुसतेच वैचारिक लेखन करून थांबले नाहीत. तर त्या वैचारिक भूमिकेला साजेसे आणि बरोबरीचे कार्यही आम्ही करत होतो. कृतिशीलता आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीच्या कार्यकर्त्यांनी अंगी बाणवली होती. लोकांना वैचारिक भूमिकेपेक्षा कृतिशील भूमिका भावते आवडते. त्या कृतिशीलतेला ते जुळवून घेतात. आणि हीच भूमिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये होती. केवळ बोलणारे किंवा नुसतंच लिहिणारे मासिक नाही. आज महाराष्ट्रात भरपूर अशी मासिक आहेत की, जे केवळ वैचारिक बोलणारे किंवा लिहिणारे आहेत. पण त्याचा प्रत्यक्षात अंगीकारयुक्त कृतिशीलता त्यात दिसून येत नाही. परंतु तुकामांच्या शब्दांप्रमाणे “बोले तैसा चाले हे वाक्य घेऊन आमचं मासिक काम करत होतं. आणि कार्यकर्तेसुद्धा तसे वागत होते. ज्यावेळेस ते धर्मचिक्कीचा करत होते. त्यावेळेस ते स्वतः सुद्धा वैयक्तिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर या सर्व अंधश्रद्धांना नाकारत होते. ही बाब वाचक प्रत्यक्ष पाहत होता. आणि त्या घटनेची मीमांसा वाचत होता. प्रत्यक्ष चळवळीचे कृती रिपोर्टिंग या मासिकात असल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचा वाचकवर्ग हा वाढतच होता.

मुख्यत्वे हे मासिक महाराष्ट्रभर पोहोच झाले. महाराष्ट्रातील असा एकही तालुका नाही की, जिथे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र सापडणार नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीचं पर्व सापडत नाही असा जिल्हा नाही. महाराष्ट्रातील जवळजवळ ३५० तालुक्यांत अंक जातो. याला पोहोचविण्यात पहिल्या पातळीतील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक व प्रेरक भूमिका मोठ्याप्रमाणावर राहिलेली आहे. खूप कष्ट, त्रास व समाजाचा रोष पत्करूनही मासिक वर्गणीदारापर्यंत पोहोचले. दररोज वीस ते पंचवीस मनीऑर्डर येत राहतात. आणि त्या मनी ऑर्डर प्रमाणे मासिक ग्रंथालयाच्या, कॉलेजच्या, विद्यार्थी, तरुण वर्गाच्या असतात. या सर्व कॉलेज महाविद्यालयात हे मासिक जातं. केवळ मासिक पोचतच नाही तर ते वाचल्या जातं. त्यावर प्रतिक्रियाही येतात. आणि काही कार्यकर्तेही निर्माण व्हायला लागतात. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आचा अंक वाचकांच्या हातात पडला की, त्यांना एक उत्सुकता असते. या अंकात या महिन्यात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने काय काम केले आहे? यावेळी काय भांडाफोड केलेली आहे? कोणत्या विषयावर चिकित्सा केलेली आहे? वाचकांची उत्सुकता असते. कारण अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय सर्वसामान्यांच्या जगण्याचा विषय. सर्वांना लागू पडणारा विषय. आदिवासी, दलित असेल, ग्रामीण असेल, स्त्रिया असतील, बालके असेल या विषयाला हे मासिक वाहिलेलं असतं. तर त्या त्या एका कम्युनिटीमध्येते अडकले गेले असते. अंधश्रद्धा निर्मूलन हे वार्तापत्र अंधश्रद्धा आणि कृतीशील चिकित्सा हा विषय घेऊन प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक धर्मातील, प्रत्येक जातीतील, प्रत्येक वयातील या मासिकाचा वाचकवर्ग बनलेला आहे. या मासिकाचं हे बलस्थान आहे. या विषयाने हे बलस्थान ठरत जातं. कारण वाचक हा अंक चिकित्सक पद्धतीने वाचतो. त्यावर परत टपाली त्यांचे उत्तर- प्रश्न- चिकित्सा व सूचनाही येत राहतात. काही प्रतिक्रिया अशा असतात की, तुमच्या मासिकाच्या सतत वाचनामुळे आमच्यात बदल झाला.” आम्हाला हा दृष्टिकोन माहीत नव्हता. तो समजला.” येत्या पत्रांना आम्ही मासिकात छापण्याचा व वाचक प्रतिसादाला एक आनंदाचा क्षण निर्माण करीत असतो. जुनी मासिके चाळली तर प्रत्येक विषयाची जुनी पत्रे, प्रश्नोत्तरे वाचायला मिळतील. माझ्या या मनातील भुताची भीती दूर झाली यापासून ते आज कालच्या ज्या चुकीच्या वैज्ञानिक उपचार पद्धती ज्या आहेत. आहेत तिथपर्यंत समजून येत जातं.” अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र मागच्या अंकात चिकित्सेवर लेख छापले. आम्ही चुकीचे पद्धतीपासून दूर झालो.” फसवी ज्ञानापासून आम्ही दूर होत आहोत.” छोट्या अंधश्रद्धा पासून ते फसव्या विज्ञान पर्यंत लोक पत्र लिहून कळवितात की, आम्ही या गोष्टीपासून बाजूला गेलो आहोत.” अर्थात या मासिकाचं कामच परिवर्तन करायचं राहिलेलं आहे. इतर मासिकांच्या बाबतीत सांगायचं झालं, तर मासिके प्रबोधनास प्रेरक असतात. अंधश्रद्धा निर्मूलन हे परिवर्तन, प्रबोधन, कृती या परिशीलनातून प्रवास करते.

जे सभासद असतात ते पुढे कृतिशील अश्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते होऊ लागतात, चळवळीत उतरू लागतात, काम करू लागतात, वैज्ञानिक दृष्टिकोन पेरू लागतात. नेमकी ही प्रक्रिया कशी आहे?

मासिक वाचकापर्यंत जातं. ते गेल्यानंतर ते त्यांना आवडतं. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ कशी आहे हे त्यांना समजतं. आणि त्यांना असे वाटते की, ही चळवळ सर्वसामान्य माणसाची  आहे. त्यात माझासुद्धा काही छोटासा प्रयत्न- सहभाग असावा. या हेतूने ते तिथे स्थानिक लोकांशी संपर्कात राहतात. सभेत हजर राहतात. अंधश्रद्धा व विज्ञान विषय समजून घेऊन त्यावर चर्चा करू लागतात. अंधश्रद्धा निर्मूलन वर्तापात्राला मदतही करतात. आणि प्रसंगी छोट्या मोठ्या प्रश्नांची उत्तरेही मागवतात. छोट्या मोठ्या घटनेत प्रत्यक्ष कृतीही करतात. ह्या मासिकाच्या प्रवाहाने संघटनेत आलेले कित्येक कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत. संघटनेतील काही कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या राज्यसमितीवरही आहेत. नव्या तरुणांना या प्रवाहात, संघटनेमध्ये आणायचं काम सुद्धा मासिकाच्या प्रेरणादायी हेतूने झालेले आहे. केवळ अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र रसास्वाद- वाचक- प्रतिसाद आणि वाड्मय आस्वाद असे एकांगी भूमिका न राहता कृतीशीलता हा प्रतिसाद राहिलेला आहे.

इतर मासिकांच्या तुलनेत अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा हा एक महत्त्वाचा उद्देश सफल होतो आहे. की, माणसं वाचक- सभासद बदलतात. ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या जीवनातील प्रश्न नष्ट होऊ लागले आहेत. प्रश्नापासून ते दूर जाऊन निर्भय, वैज्ञानिक आणि विवेकी रीतीने जीवन जगू लागले आहेत. त्याचबरोबर ते दुसऱ्यांना बदलण्यासाठी चळवळीत येतच राहतात. समाजासाठी चांगले काम करण्याची इच्छा त्यांना होते. आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात स्वतःला झोकून घेतात. समाजाच्या शोकांतिकातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की, चळवळी ह्या आज नामशेष होण्याच्या मार्गावर असतांना जनप्रवाह सामाजिक परिवर्तनाच्या भूमिकेतून दूर जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलनाचे हे काम जनप्रतिसाद मिळवण्यास नोंदणी असे आहे.

आपण सांगितल्याप्रमाणे कवडसे नंतर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या नावाने सुरू झालेल्या वार्तापत्राने पुणे- मुंबई नंतर सांगली असा प्रवास केला. सांगलीला ते स्थायिक झालं. यामागची कारणे काय होती? हा प्रवास नेमका कसा होता?

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र सांगलीला आले. त्यामागचं कारण असं होतं की, त्या काळी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यालय वगैरे असं काही नव्हतं. आजची सांगलीतील कार्यालयीन इमारती दिसत आहे. ती मागच्या तीन-चार वर्ष अगोदरच डॉ. दाभोळकरांच्या खुनानंतर लोकांनी आम्हाला सहानुभूतीतून देणग्या दिल्या. त्यातून अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे कार्यालय घेतलं आहे. गेली ३० वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे कामकाज भाडे तत्वाच्या खोलीतच चालायचं. सांगलीकडे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र कार्यालय येण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या काळात असं होतं की, जे संपादक या मासिकाचे व्यवस्थापक असतील त्यांच्या घरातूनच हे सगळं कामकाज चालायचं. कारण स्वतःचं असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्यालय नव्हतं. त्यावेळी पुण्यात डॉ. विद्याधर बोरकर संपादक होते. तेव्हा त्यांच्या घरातच हे कामकाज चालायचं. प्रदीप पाटकर मुंबईला होते. त्यावेळी त्यांच्या घरातून हे मासिक प्रकाशित व्हायचं. आणि त्यावेळेचे काही काम खूप मोठ्या प्रमाणात नव्हतं. सांगलीच्या संपादक पदाची जबाबदारी डॉ. प्रदीप पाटील यांनी स्वीकारली. आणि ते म्हणाले की, वार्तापत्र सांगलीला घेऊन जावं. या वार्तापत्राची ग्रामीण भागाकडे गरज आहे. तिकडे या मासिकाची निर्मिती व्हायला हवी. या वार्तापत्राची  भूमिका आम्ही चालवतो. सांगली शाखा त्यावेळी खूप चांगली कामे करत होती. सांगली शाखेकडून चांगली मदत अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राला असायची. त्यामुळे हे मासिक सांगलीकडे स्थलांतरित झालं. या ठिकाणी मासिकाची वाढ झाली. वैचारिक विस्तार झाला. मासिक महाराष्ट्रभर पोहोचले. महाराष्ट्राच्या बाहेरही जाऊ लागलं.

संपादकत्व बदलत जातं. त्यामागे काही कारण असतात. काळानुसार, वेळेनुसार, स्थळानुसार किंवा काही कारणानुसार. अशावेळी त्या त्या संपादकाचा विचारप्रवाह सुद्धा त्या मुपत्रांवर पडत जातो. असं काही अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या संदर्भात झाल्याचं दिसून येतं का?

नाही. अगदी स्पष्टपणे नाही. कारण, संघटनेची जी काही ध्येयधोरणे आहेत. ती पुढे नेण्याचं कामच हे मासिक करतं. संपादक जरी कोणीही आला तरी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या ध्येयधोरणांशी एकनिष्ठ राहावे लागते. मुळात ही त्यांची अंतप्रेरणाच असते. ती धोरणे त्याला पलेली असतात म्हणूनच तो संघटनेकडे आकर्षित झालेला असतो. संघटनेने त्याला संपादकत्व बहाल केलेलं असतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुखपत्राचे जे काही संपादक भूषविलेले आहेत हे काय बाहेरचे वैचारिक- साहित्यिक आपण मागून घेतले नाहीत. तर ते चळवळीच्या मुशीत तयार झालेले कृतिशील कार्यकर्ते आहेत. ही सगळी संघटनेची वैचारिक ठेवा असलेली कार्यकर्ते आहेत. कोणीही पत्रकारिता वगैरे केलेले नाही. बोरकर, पाटकर, पाटील, देशपांडे हे सर्व खंबीर भूमिका घेणारे कार्यकर्ते आहेत. चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना सगळी ध्येयधोरणे आणि मूल्यवादी भूमिकेशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकणे करून द्यायचे असतात. त्यामुळे संपर्कात संपादकत्व बदललं तरी मासिकाच्या ध्येयधोरणात म्हणावा तितका फरक पडत नाही.

सामाजिक परिवर्तनाच्या पार्श्‍वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राची वाटचाल, सध्याची स्थिती कशी आहे? देणगी, देणगीदार, लोकसहभागाचा वाटा आहे तो नेमका कशा पद्धतीने क्रियाशील असतो?

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राला हे उघड करायला आनंद वाटेल की, कोणत्याही शासकीय निधीशिवाय, मदतीशिवाय, कुठल्याही परदेशी आर्थिक मदतीशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र सुरू आहे. आजपर्यंत ३० वर्षांच्या कालखंडात कधी एक रुपयासुद्धा सरकारी किंवा परदेशी आर्थिक मदत घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आलेले नाही. कुणाचे मिंध्ये झालेले नाही. सरकारकडून खूप वेळा आर्थिक मदत देण्याची सहमती आली. ते धोरण म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नाकारलं. इतकच नाही तर मागे वाड्मयीन साहित्य मंडळाचे अनुदान घेण्याचे मासिकाने नाकारले. नारायण सुर्वे ज्यावेळेस साहित्य संमेलनाचे, साहित्य संघाचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राला स्वतःहून विनंती केली होती की, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने आर्थिक मदत घ्यावी. बाकी कुणीही अडतूस-  फडतूस मदत घेऊन जातात. फोल साहित्य निर्माण करतात, निधी मिळवितात. तुम्ही आर्थिक मदत घ्या. तुमचे मासिक सत्तेच्या मार्गस्थ आहे. परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने नाही शब्दात स्पष्ट नकार दिला. कारण सरकारी पैसा घेतला की, लोकांची त्याकडे बघण्याची भूमिका बदलते. कोणाचे मिंधेपण न घेता मासिक लोकसहभागातून चालतं हे बलस्थान आहे.

महाराष्ट्रात ज्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या ३५० शाखा आहेत. त्या शाखेत हे मासिक जाते. त्याचे काम करणारे कार्यकर्ते आहेत. ते कार्यकर्ते हे मासिक वाढवण्याचं काम करतात. त्या त्या गावातील वर्गणीदार करणे, त्यांच्या पर्यंत अंक पोहोचविणे, सांगलीकडे देणगी पाठवणे. हे काम अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते कुठलेही, कोणतेही मानधन न घेता अहोरात्र करत असतात. या कारणामुळे गेल्या ३० वर्षाच्या काळापासून आम्ही टिकून आहोत. कार्यकर्त्यांच्या जीवावर आमचे मासिक टिकून आहे. आणि कार्यकर्ते केव्हा टिकतात हे माहितीये तुम्हाला? ज्या वेळेस संघटना जिवंत असतात, विचारकृती सक्षम असते, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे वैचारिक लोक न्याय बाजूने असल्याने वार्तापत्रसुद्धा सक्षम राहिलेले आहे. संघटना पाठीमागे खंबीरपणे उभी असल्याकारणाने हे मासिक ३० वर्ष सुरू आहे. हा द्विगुणित कार्याचा आनंद वाटतो. आणि काम करण्यास हुरूपही येतो.

१९९० च्या काळात सुरू झालेली काही समकालीन मासिके कालांतराने बंद पडली त्यांची छपाई यंत्रणा थांबलेली आहे. खप व वार्तापत्राचे वाचक या दोन्ही बाजूने ते पडले. परंतु त्या तुलनेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या मुखपत्राची वाटचाल योग्य रीतीने सुरू आहे. असे म्हणायला हरकत नसावी. काही चळवळीचे मुखपत्र म्हणून तीन ते चार हजारांच्यावर वाचक संख्या पर्यंत गेले नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सांगायचे म्हणजे १५ ते २२ हजार पर्यंतच्या घरात जातो आहे. हा वाचकवर्ग हे वर्गणीदार वाचक सभासद कार्यकर्ते महाराष्ट्राच्या गाव-खेडे पर्यंत आहे. तर खेडोपाडी आहेत, तांडोतांडी आहेत.


दुसरी गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा वार्षिक अंक नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान प्रसिद्ध केला जातो. दिवाळी दरम्यान जाहिरातीतून ही वर्गणी निर्माण होते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र जशी आर्थिक मदत स्वीकारत नाहीत. तशीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीही घेत नाही. शासनाचा वा फॉरेन फंड नाकारला गेला आहे. या कामाकडे आणि प्रामाणिकपणाच्या भुमिकेकडे पाहून वाचक देणगीदार आहेत. किंवा जाहिरातीतून ही अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र छपाई खर्च निघतो. आताची अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र वार्षिक वर्गणी ही ४५० रुपये आहे. तसे पाहता छपाई व वितरण खर्च हिशोब करता अत्यंत माफक व ग्रामीण भागातील सर्वसामान्यातील सर्वसामान्यांना परवडेल अशी वर्गणी आहे. दर महिन्याला ३६ पानांचा अंक दिवाळीचा ४०० ते ५०० पानांचा अंक प्रकाशित करून वाचकापर्यंत पोहचवणे, हीच व्यवहाराच्या दृष्टीने महागाईच्या काळात अशक्य गोष्ट आहे. उरलेले १०० ते १५० रुपये हे वर्ताळा हिशोबात निर्माण होतात. एकूण ५०० ते ५५० रुपये प्रकाशनासाठी खर्च येतो. वर्गणी ४५० रुपये असते. कारण जे अंधश्रद्धा निर्मुलनाचे धोरण उद्दिष्ट व प्रामाणिकपणाची भूमिका आहे की, ग्रामीण भागातील लोकांना सहज उपलब्ध होईल, परवडेल अशा किमतीला ही वर्गणी असते. वार्षिक, त्रैवार्षिक, वार्षिक, सभासद नोंदणी फी आहे. ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा आहेत. शोषणाला बळी पडलेल्या समाज आहे. त्या वर्गापर्यंत हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रबोधनाचा विचार, कृतीशील विचार पोच व्हावा हाच उद्देश यामागे आहे. वरचे छपाईची १५० रुपये वर्गणी आणि जाहिरातीतून आम्ही गोळा करतो. आणि अंक प्रकाशित करतो. पोस्टल खर्च, प्रवास खर्च, छपाई खर्च, वितरण व प्रकाशक, मुद्रक, अंक बायडिंग खर्च असा सर्व प्रवास बघता वर्गणी मध्ये हे मासिक हिशोबात न बसणारा असा आहे. तरीही अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे धोरण ठेवून आहे. आम्ही लोकांना अशी विनंती करतो की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे काम चालू आहे, समिती काम उभं करते आहे, त्या कामाला मदत म्हणून आपण सहकार्य करावे. ५०० रुपयांपासून जाहिरात घेतली जाते. म्हणजे दिवाळीच्या काळात वृत्तपत्र, साप्ताहिके, दैनिके, वार्तापत्र व मासिके चढ्या भावाने जाहिरातीचा दर लावतात. ती स्पर्धा अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राकडे शोधूनही सापडणार नाही. या रकमेच्या वरच जाहिरात असावी. असा आमचा आग्रह कधीच नाही. सर्वसामान्य माणसाला उत्पादनाच्या व आर्थिक पायाभरणीच्या क्षेत्रात येण्याचे मार्ग खुले हवे. यासाठी जाहिरातीचे माध्यम म्हणून त्यांनी कमी रकमेत या जगात उतरावं. हा यामागचा उद्देश होय.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मासिक मुख्यत्वेकरून ग्रामीण भागात, खेडोपाडी, तांड्यात तांड्यावर, वस्ती- वाडीवर म्हणजेच उदाहरण द्याच झाले तर चाळीसगाव पासून ४० किलोमीटरच्या अंतरावर जो तांडा आहे त्या तांड्यावर, नंदुरबार, नाशिक, नाशिकच्या पाड्यांवर मासिक वाचले जाते. वे वाचक, सर्वसामान्य वाचक अश्या समूहाकडे मासिक जाते. विद्वान किंवा वैचारिक वृत्ती असणाऱ्या लोकांकडे मासिक जात नाही. प्राध्यापक.डमि लोकांकडे खूप कमी प्रमाणात हे मासिक पोस्ट होते. किमान नव्वद टक्के वाचक हा ग्रामीण भागातला आहे. रोजच्या जीवनात घडणाऱ्या अंधश्रद्धांना तोंड देणारा आहे. त्याची चिकित्सा करणारा वाचकवर्ग आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आणि तोच वाचक डोळ्यासमोर ठेवला आहे. त्याजनतेचे प्रबोधन करायचे आहे. ज्यांना अंधश्रद्धा निर्मूलन व्हावी अशी गरज वाटते आहे. त्यांच्याकडे मासिकाचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे मासिकातील लेखांची मीमांसा व त्याचे स्वरूपही हलकेफुलके असे आहे. लोकांना समजेल अशीच त्यातली भाषा आहे. जास्त वैचारिक लेख अजिबात अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र छापत नाही. साधना, सुधारक, परिवर्तनाचा वाटसरू ही जशी मासिके, ही साप्ताहिके  वैचारिकतेला वाहिलेली आहेत. त्या मासिकात वैचारिक लेख छापलेली जातात. त्यांची समीक्षा व्हावी असा त्या मासिकाचा आग्रह असतो. कदाचित त्या त्या संपादकाचा रस त्यात असेल. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्त्राला त्यासंदर्भ काहीएक नाही. कारण की, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र पार्श्वभूमी ही परिवर्तनाची आहे. चळवळीची आहे. अंधश्रद्धेने व शोषणाने पिडलेला समाज सर्वसामान्य आहे. त्यांना सोपी, समजेल अशी भाषा सुरू होते. त्यांना त्यांच्या भाषेतच विवेकवाद, विज्ञानवाद पटवून देणे काळाची गरज आहे. असे  वार्तापत्राला वाटत असते. त्या दृष्टीने इतर मासिकांना प्रसिद्ध व्हायचं असतं. स्पर्धा, हितसंबंध जोपासायचे असतात. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे परिवर्तनाच्या मुशीतून तयार झालेले असल्याने परिवर्तनाला स्पर्धेची नाही तर विवेकाची, स्थिरतेची आणि विज्ञानाची कास धरणे गरजेचे असतं. असं वार्तापत्र समजते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राला विद्वतीय लेख छापून आपली विद्वत्ता प्रदर्शित करायची नाही. सामाजिक अंगाने परिवर्तन आणि चळवळी सुरू ठेवायच्या आहेत. सर्वसामान्य ग्रामीण जनतेचे प्रबोधन व्हावं, धर्मापासून त्यांना वाचवायचं व शोषणापासून आणि पिडल्या जाणाऱ्या व्यवस्थेपासून त्यांचं रक्षण व्हावं, त्यांना मार्गदर्शन व्हावं या उद्देशाने त्यांच्या जीवनात अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र परिवर्तनाचा विचार घेऊन जाणरे असे अमासिक आहे. विवेकपूर्ण माणसं सर्वसामान्य जनतेस विवेकपूर्ण, निर्भय, नीतीने आणि विचार दृष्टिकोनातून विवेकवादी सुखर जीवन बहाल करत असतात. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा उद्देश आहे. त्यामुळे असे विद्वत्ता, पांडित्यपूर्ण लेख पूर्णतः मी टाळतो. छापत नाही. मुद्दामहून छापत नाही. मासिकांच्या वाचकांना पुरेसा विचार मिळाला पाहिजेत. आणि तो विचार साध्यासोप्या भाषेतच असायला हवा असं वार्तापत्र समजतं.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा पहिला अंक म्हणजे माझ्या वाचनातील धुळे जिल्ह्याच्या बोराडी या गावी येथे माझं अध्यापकीय शिक्षण पूर्ण झालं. तिथे वाचनात आला. गेली ते १० वर्ष सतत अंक वाचतोय. सातत्याने नवी पिढीतील लेखकांना अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र स्थान देत आहे. दर पिढीवर लिहिणारे बदलत जातात. मला असं जाणवतं आपण त्यांना स्थान देत असता. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र सामाजिक वाड्मयीन उद्दिष्टे घेऊन किमान  समजून घेवून ही लिहिणारी तरुण मंडळी आहे. त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राची भूमिका पटलेली आहे का? त्या अनुषंगाने ती लिहिती झाली आहेत का?

खरंतर आमच्या चळवळीचे वय हे ३० ते ३५ एवढेच आहे. म्हणजे आजकालच्या चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्तेही तर पन्नाशीच्या साठीच्या पुढचे असतात. अवजड वयाने टक्का;लं पडलेले असतात. अंधश्रद्धा निर्मूलन समिती या परंपरेस अपवाद आहे. व्यवस्थेशाहीलाच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची विचारधारा अपवाद ठरते. महाराष्ट्रात तरुणांची चळवळ म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीकडे बघितले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या शाखेतील बहुतांश वर्ग हा तरुणांचा आहे. याचे हे वास्तव काही लोकांना पटत नाही. इतके संख्येने तरुण यांच्याकडे कसे आकर्षित झालेले आहेत? यामुळे विरोधकही आश्‍चर्यचकित होतात. कधीकधी त्रागा करतात.

या संघटन कौश्यालामागे मला असं वाटतं की, डॉ. दाभोळकर यांचे संघटन कौशल्य, नेतृत्व, समजून घेण्याची आणि सांगण्याची पद्धती याबाबी प्रेरक अशा आहेत. भोळकरांच्या संघटन कौशल्यामुळे तरुण महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीकडे आकर्षित झालेला आहे. नुसतेच आकर्षित होतात असे नाही तर ते मासिक वाचतात. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ आणि चळवळीतील पुस्तके वाचतात. पुस्तकातून ते विचार घेऊन संघटनेसाठी म्हणजेच समाजासाठी काम करतात. काम करण्यापर्यंत थांबत नाहीत तर अशा तरुणांचा समूह हा उद्बोधक म्हणूनही पुढे येतो आहे, लिहितो आहे, वाचतो आहे, नव्या धोरणांची चिकित्सा करतो आहे, धर्म धर्माच्या अंधश्रद्धांना आव्हान करतो आहे. आणि चळवळीत उतरतो आहे.

बव्हंशी प्रस्थापित माध्यम तरुणांना पाहिजे तितकी, उमेदीच्या काळी, लिहिते असण्याच्या ऊर्मीत मुरडून टाकतात. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र असं करत नाही. लिहिणाऱ्यांना लिहायचे आव्हान करते. न लिहिणार्‍या लिहिते व्हा असे प्रबोधन करत असते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कुठल्याही, कोणत्याही वर्षाचा अंक वाचून घ्या. या अंकातील तुम्ही अनुक्रमणिका बघा. आणि लेखकांची नावे बघा. त्यात तुम्हाला अर्धे तर तरुण पोरं दिसतील. नवीन नावंच पाहायला, वाचायला मिळतील. जे चांगल्या पद्धतीने, मार्मिक आणि सम्यक दृष्टीने, वैद्नानिक दृष्टिकोन ठेवून विवेकवादाने लिहितात. छोट्या- छोट्या सर्वसामान्य प्रश्नांपासून तर संविधानासारख्या सखोल विषयापर्यंत तरुणांची क्षमता विकसित होत आहे. ते लिहिते आहेत. ही चांगली बाब आहे.

मागच्या काही काळात जोडीदाराची निवड म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या एका ग्रुपने संवाद लेखमाला सुरू केली आहे. त्यात जोडीदार कसा असावा? जीवन? त्याचे शिक्षण का असावं? वर्तन? त्याच्या धारणा? व त्याची समाजाप्रती असलेली भूमिका काय आहे? इतक्या खोलपातळीचे लिखाण ही तरुण पिढी लिहिते आहे. हे जीवन समृद्ध होण्याचे मार्ग म्हणावे लागतील.

तसेच संविधानाचा प्रचार प्रसार करणारा अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा एक विभाग आहे. तोसुद्धा प्रामुख्याने वैचारिक व घटनादत्त आधार घेत लिहितो आहे. ग्रामीण भागात जिथे संविधान पोहोचणार नाही तिथपर्यंत हा विचार या मासिकाच्या माध्यमातून जातो आहे. सर्व थरात स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता आणि सामाजिक न्याय पोहोचला पाहिजे. त्या उद्देशाने सर्व स्तरातून युवक लिहितो आहे. विचार करतो आहे. त्यांना हक्काच शब्दपीठ अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राकडे केव्हाही उपलब्ध आहे. असे आम्ही अभिमानाने सांगतो आहोत.

मी सुद्धा युवक होतो. या युवकांच्या खांद्यावरच पुढची धुरा आहे चळवळीची. ज्यावेळी दाभोळकरांनी माझ्याकडे जबाबदारी दिली होती. २००० साल असावे कदाचित ते. कदाचित त्या काळात मी २० वर्षाचा होतो. त्यावेळी मी पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. आणि पूर्ण वेळ मासिक संपादक अशी जबाबदारी स्वीकारली. दाभोळकरांनी युवकांच्या हातात चळवळ दिली. याचे मुख्य उदाहरण मीच स्वतः आहे. संघटनेतून कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दाभोळकरांनी दिला. त्यावेळी अविनाश पाटील या युवकाची निवड दाभोळकरांनी राज्याचे कार्याध्यक्ष म्हणून केली. पुण्यात यासाठी खास कार्यक्रम ठेवून ही चळवळ युवकांच्या हातात बहाल केली. महात्मा फुले वाड्यात हा कार्यक्रम होता. मशाल हे परिवर्तनाचे प्रकाशाचे व उज्ज्वल यशाचे प्रतिक म्हणून युवकांच्या हातात मशाल देऊन चळवळीचे नेतृत्व हे युवा करेल अशी भूमिकाही त्यावेळेस दाभोळकरांची म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चळवळीची होती. मानवतावादी उदिष्ट अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे असल्याने मासिकानेही पाळलेले आहे. युवकांनाही संधीच आहे.

कैकदा समाजाकडून असं दर्शविले जाते की, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ केवळ धर्माच्या विरोधात काम करणारी चळवळ आहे. देवळे- हिंदूधर्म, केवळ हिंदूंच्याधर्मात लुडबूड करते. इतर धर्मांची ह्यांना गरज नाही. देव दैवतांच्या विरोधात आहे. आणि या अशा सामाजिक रोषाच्या काळात धारणेचा, विचारांचा व व्यवस्थेशाहीच्या एकांगी अशा विचारसरणीचा रोष मुखपत्रावर तसेच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीवर झालेला आहे. या काळात चळवळीच्या आपल्या सर्वांच्या  कोणत्या भूमिका, प्रेरणा, आणि जाणीवा मुखपत्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ घेऊन असते?

धर्माची सखोल चिकित्सेला नेहमीच म्हणजे इतिहासापासून धर्ममार्तंडांचा हा विरोध राहिलेला आहे. तो उघड- उघड असतो. कधी छुप्या पद्धतीने असतो. कारण, धर्म हा खरे तर त्यांच्या उपजीविकेचे साधन असते. आणि धर्माची देवळे, दैवतांची भीती, फसवणुकीची व्यवस्था त्यात निर्माण केलेली असते. देव्दैवाताची भीती घालून सर्वसामान्य जनतेला फसवणे, लुबाडणे त्यांचे शोषण करणे हेच खरं तर त्यांचं काम असतं. आणि या कामाच्या विरोधातच प्रबोधनाचं काम अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ करते आहे. त्यामुळे विरोध हा होणारच हे इतिहासापासून सत्य आहेत. आमचे लहान- मोठे कार्यकर्ते होते. त्या त्या काळात काम करायचे. बुवाबाजीचा भांडाफोड करायचे. त्यावेळी सुद्धा समाजाच्या काही स्तरातून विरोध व्हायचा. आमचाच दुवा खरा आहे.” कोणी तुम्ही चुकीच्या माहितीवर ही कार्यवाही करत आहात.” कायदा हातात घेत आहात.” अशी टीकाटिप्पणी व्हायची. हा विरोध केवळ चळवळीला आणि तिच्या कार्यकृतीशिलतेलाच नव्हता तर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रालासुद्धा होता. ज्यावेळी चळवळीतून अंधश्रद्धेची, धर्माची, वसुलीची, फसवणुकीची चिकित्सा होऊ लागली. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र प्रखरपणे यावर लिहिले जाऊ लागले. म्हणजे चळवळ तिकडे कार्यकृती करत होती. तर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र त्यावर प्रखरपणे न्यायाची बाजू घेऊन लिहीत होते. समाजव्यवस्थेचे संयंत्र समजून सांगत होते. समाजाला जागृत करत होते. शोषणापासून दूर राहा असं सांगत होते.

ज्यावेळी आम्ही धर्माची चिकित्सा करायला लागलो. तेव्हा काही धार्मिक व सनातनी संघटनांनी आमच्या मागे मासिकांवर खटले लावली खटले. या संघर्षाच्या काळात मासिकांवर खटले ही टाकलेले आहेत. महाराष्ट्रात कुठल्याच मासिकांवर खटले भरले नसतील तितके एकट्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रावर एकूण ११ खटले आहेत. गोवा, मुंबई, पुणे, सांगली, सातारा या भागात हे खटले दाख आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रातून लिखाण होते त्या लिखाणामुळे त्यांचे स्थान डळमळीत होत आहे. याची भीती बाळगून कधी मानहानी करण्याचे व विरोधी लेखनाचे दावे- खटले केलेले आहेत. त्यातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आम्ही खटले जिंकलो आहोत. आणि ५ खटले अजूनही सुरू आहेत. खटले टाकून सनातनवाद्यांनी धर्मांधांनी छळवणूक, मानसिकता बिघडण्याची खेळी केली आहे. संघटनेचा आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा वेळ त्यात जावा. असा त्याचा उद्देश होता. पण चळवळीने चांगली लोकं कमावलेली आहेत. समाजाचा परिवर्तनवादी विचार करणारे वकील मित्र मिळालेले आहेत. न्याय भूमिका करणारा वर्ग असे भेटले. त्यांच्या सहकारी आणि मार्गदर्शनाच्या पद्धतीने काही खटल्यातून सहीसलामत आम्ही मुक्त झालो आहोत. आम्ही जे लिहिलं होतं ते सत्याला धरून होतं. त्याचे पुरावे होते. त्याचे वैज्ञानिक, सांख्यिकीय व गणितीय चिकित्सा होती. थोडक्यात पुरावा असल्याशिवाय कुठलीही गोष्ट आम्ही मासिकात छापत नाही.

विरोधकांची भीती चळवळीलाही नाही आणि वार्तापत्रालाही कधीच वाटली नाही. वाटणार नाही. कारण कि कधी तरी एकदा जन्म झाला. त्याला मृत्यू निश्चित आहे हे ठाऊक असतांना मरणाची भीती का बाळगावी? आमच्या वाटेला समाजसुधारक, संत, विज्ञान आणि विवेक, नीतीचा आधार आहे. आणि सत्याचीम, विवेकाची, न्यायची कास धरून आम्ही चालत आहोत. लोककल्याणकारी शहाणपण सुचवणारी ही वाट राहिलेली आहे. चुकीच्या गोष्टीला वार्तापत्रात स्थान नाही. किंवा मुद्दामहून टीका करायची म्हणून टीका कधीही केली नाही. चुकीचे आहे ते चुकीचे आहे ही भूमिका चळवळीची राहिलेली आहे. देव- धर्माच्या नावाने जी शोषण व्यवस्था समाजात निर्माण झाली आहे, होते आहे. ही व्यवस्था या षड्यंत्राच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ काम करते आहे. चांगल्या बाबींना, चांगले तत्त्वांना आम्ही कधीच विरोध दर्शवला नाही. त्यामुळे विरोधकांचा तो विरोध मोडून निघाला. आणि विरोधकांना ज्यावेळी वाटलं तेह त्यांनी मासिकांवर खटले चढवले. माझ्यावरही कोटीचा अब्रूनुकसानीचा खटला आहे. तुमच्या लिखाणामुळे आमची भावना दुखावल्या गेली आहे.” आमच्या संस्थेची बदनामी झाली आहे.” असे ते खटले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचं हे काम करणं पाहिजे तितकं सोपंही नाही.

ज्या काळात सावित्रीबाई फुले शेण, दगड अंगावर झेलले. तसेच वार्तापत्र आणि चळवळसुद्धा अविवेकी समाजाचा रोष झेलला आहे. अंधश्रध निर्मुलन चळवळ धर्मचिकित्सेचे काम करते. त्या काळात मुलींना न शिकवणे ही धर्माज्ञा होती. सावित्रीने धर्माच्या विरोधात जाऊन ते काम केलेले आहे. धर्मज्ञा, धर्मगुरूंना आव्हान दिलेले आहे. एवढेच नाही तर धर्मनियम त्या काळात त्यांनी मोडला आहे. हा रोष होता काळानुसार रोज बदलतो. आता खटले आलेत बस इतकें. रोज चेहरा बदलून रोष पुढे आला आहे.

ज्या काळात धर्म अशी चिकित्सा करणाऱ्यांवर घणाघाती आरोप म्हणा, विरोध म्हणा किंवा त्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या काळातही  पुरोगामी विचारसरणी रोष बाजूला सारून जोमाने पुढे गेलेली आहे. हा इतिहास आहे. म्हणजे तुकारामांपासून ते फुले- शाहू- आंबेडकर, दाभोळकरापर्यंत ते आता संपादकीय भूमिकेपर्यंत हा रोष पसरलेला आहे. आपण व्यवस्थापकीय संपादक म्हणून रुजू झालात त्या वेळेस अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राची आणि आपली स्वतःची जी काही सकारात्मक विचारसरणी होती. सामाजिक परिवर्तनाचा वारसा पुढे नेण्याच्या बाबतीत आपलं मत होतं. आपण त्या विषयी थोडे व्यक्त व्हा.

खर तर मी अकरावीला असताना अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमध्ये काम करत होतो. बलकवडे नावाचं गाव. तालुका तासगाव. कॉलेजला असतानाच संघटनेच्या सानिध्यात आलो. त्यानंतर मला असं वाटलं की, हे काम पूर्णवेळ करावं. हे अर्धवेळ करून काम होण्यासारखे नाही. डॉ. दाभोळकरांना मी सांगितलं की, मला आता पूर्णवेळ काम करायचं.” त्यावेळी डॉक्टरांनी मला वर्षाचा कालावधी दिला. आणि म्हणाले, “२ वर्ष तू विचार कर. तुझ्याकडे कौटुंबिक जबाबदारीसुद्धा आहे.” त्या काळात मी पूर्णतः चळवळीत काम करायचं म्हणूनच घरातून सुटलो होतो. म्हणून डोक्यात विचार होता की, कुटुंबाचा विचार वगैरे करणं मी ठरवलं नव्हतं. डॉक्टरांनी आग्रहाखातर त्या २ वर्षानंतर वार्तापत्राची जबाबदारी माझ्यावर सोपविली. ते म्हणाले की, हा वार्तापत्राचा विभाग तू बघ.” त्या अगोदर मी सकाळ, लोकमतमध्ये काम करत होतो. त्यामुळे वर्तमानपत्राच्या कामकाजाचा मला थोडासा अनुभव गाठीला होता. एक पार्श्वभूमीही अशी आहे की, माझ्या घरी घरातल्या प्रत्येकांवरसुद्धा असे पुरोगामी विचारांचे वातावरण सतत असते. माझे आजोबा आंबेडकरी चळवळीच्या विचारांचे. आणि त्यांचीच मूळ प्रेरणा माझ्या विचारसरणी होती. हे काम अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आंबेडकर चळवळीचे काम आहे असं मला त्या काळात वाटायचं. त्या काळातसुद्धा साम्यविचारधारा वाहत होती. ज्या धर्मामध्ये दलितांचे नुसकान झाले. शोषण झाले. सामाजिक, आर्थिक, शारीरिक शोषण होत गेले. दलित सामूहिकरित्या त्या सर्वक्षेत्रे मागे राहिले. उपेक्षितच ठेवल्या गेले. त्यास देव- धर्माच्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत. त्यावर ही संघटना काम करते आहे. हे काम आपलं आहे असं मला वाटतं. म्हणून या कामाकडे पूर्णपणे आकर्षिला गेलो.

अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीकडे ज्यावेळी आलो होतो. तेव्हा मला केवळ ९०० रुपये मानधन होते. संघटनेची पण क्षमता नव्हती की, पैसे देऊन मासिकाचे प्रकाशनातून खर्च कसा करायचा आणि वितरण भागवायचे? यावेळेच्या संघटनेच्या भूमिकेमुळे मी पूर्णता विवेकवादी वाटचाल सुरू केली. निर्पेक्षी जी काही गोष्ट असते ती संघटनेमुळे मला समजली. दुसरी गोष्ट म्हणजे विज्ञानाबद्दलची गोडी माझ्यामध्ये निर्माण झाली. विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोण याकडे कसे पाहावे? कसे उधिष्ट ठेऊन अभ्यास करावा? हे समजत आहे. महाराष्ट्राला एक मोठा परिवार म्हणून आपली जशी भावकी, कौटुंबिक नाते-गोते असतात. रक्ताच्या नात्यापेक्षाही ही नाती माणसं मला प्रिय वाटत असतात. हा विचारांचा परिवार महाराष्ट्रातील सगळ्या तालुक्यातालुक्यात आहे. ही मोठी आपली शिदोरी आहे.

आजचे वातावरण देशात आहे या वातावरणात हे मासिक चालवायचं सुद्धा आमच्या पुढे एक मोठे आव्हानच आहे. येथून पुढेसुद्धा हे काम प्रामुख्याने महत्त्वाच्या भूमिका घेत आहे. कारण का या विचाराला येनकेन प्रकारेसुद्धा विरोध होण्याचे काम सगळ्याच क्षेत्रात सुरू आहे. त्यामुळे आम्ही या कार्यात टिकून राहणे हेच मोठे आव्हान घेऊन हार न मानता यापुढील काळात वार्तापत्राचा विषय घेणार आहोत. ते पाठपुराव्यानिशी देणार आहोत, चिकित्सेने देणार आहोत, विज्ञान दृष्टिकोनातून नवा विचार देणार आहोत. ज्या दिशेने आम्ही काम करणार आहोत त्यात फसवे विज्ञानसंदर्भी चिकित्सा, संविधानाचा प्रचार-प्रसार, मानसिक आरोग्याबद्दलचे काम असेल किंवा धर्मनिरपेक्षता, विवेकवाद आणि मानवतावाद यादृष्टीने वार्तापत्रा वाटचाल असणार आहे.

जागतिकीकरणाच्या युगात अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने अशी काही प्रगती केली आहे का? संगणीकृत जगात अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा स्थान कसे आहे? अंकाची आधुनिक यंत्रणेच्या- तंत्रज्ञानाच्या बाबतीत काय भूमिका आहे? डिजिटलायझेशन झाले आहे का?

खरं सांगायचं झालं तर थोडं कमी पडलेलो आहोत आम्ही त्यामध्ये. डिजिटल माध्यमांमध्ये यायला आम्ही खूप उशीर केला आहे. परंतु आम्ही त्याची सुरुवात केली आहे. ती वार्तापत्रातील दाभोळकरांचे जे लेखन आहे. किमान ४०० पानांची आहेत ते युनिकोडमध्ये आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही विषयांवर दाभोळकरांचे लिखाण वाचायला हवे असेल तर ते एका क्लिक वर मिळेल. त्याचबरोबर संघटनेचा आणि वार्तापत्राचा पुढील एक प्रकल्प आहे. अंधश्रद्धा निर्मूलन माहिती केंद्र निर्माण करायचा असा आहे. सरकारचे जसे विविध केंद्र असतात, असे प्रशिक्षण केंद्र, संशोधन केंद्र, महिला अन्याय अत्याचार विरोधी मार्गदर्शन केंद्र, समुपदेशन केंद्र, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन विषयात काम करणारे केंद्र म्हणजेच अंधश्रद्धा विरोधात प्रबोधन करणारे माहितीचे केंद्र. सर्व माहिती देण्याची केंद्र काम करेल. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची पुस्तके, संदर्भग्रंथ, कार्य, ध्येयधोरणे, मासिके हे या माहिती केंद्रात असतील. भारतातील तसे महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाला माहिती हवी असल्यास या केंद्राच्या डिजिटलायझेशनने मिळावी हा हेतू आहे.

मध्यंतरी दाभोळकरांच्या हत्येमुळे चळवळ थोडीही मंदावली होती. भावनाशील झाली होती. असे म्हणण्यापेक्षा या प्रकरणाचा छडा लावणे, खटले, कोर्टकचेऱ्या, फेऱ्या यात वेळ जात होता. मात्र वाचक, सभासद- पत्राची आंतरजालीय नोंदणी करण्याचे कामही आता अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र करते आहे. वर्गणीदारांना आंतरजालीय यंत्रणेद्वारे वर्गणी भरता येईल. त्याचे संकेत संदेश मिळतील. पोस्ट सूचना मिळत राहतील. अशी ती प्रणाली आहे.

एक वेगळा प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे की, या पुरोगामी वर्तुळांमध्ये ज्या विचारसरणीच्या हत्या झालेल्या आहेत, तिकडे कलबुर्गीला पानसरे, पुण्यात दाभोळकर किंवा बेंगलोरमध्ये यांची हत्या झाली. याचा प्रभाव मासिक किंवा आपल्या लेखनावर झालेला आहे का? असे वाटते का की, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राला अजून धारदारपणे जनतेसमोर यायला हवे?

हत्या का कराव्याशा वाटतात? हाच एक मोठा प्रश्न आहे. हत्या केवळ शरीराच्या नसतात. हे प्रथम आपण समजून घेणे गरजेचे आहे. हत्या तत्त्वांच्या, विचारांच्या, धरणांच्या व मूल्यांच्याही असतात. पुरोगामी विचारसरणीच्या इतिहासापासून म्हणजेच बुद्धांच्या विचारांच्या हत्तेपासून ते तुकारामांपर्यंत हत्या होत आलेल्या आहेत. धर्मांधांना ज्यावेळी असे वाटायला लागले की, हा विचार लोकांच्या मनात, बुद्धी व वागण्यात रुजतो आहे. आणि आपलं धर्मावरचं आरूढ झालेलं आसन डळमळीत होत आहे. त्यावेळेस हा ते टोकाचा निर्णय करतात. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीबद्दल त्यांना असाच विचार आला. त्यांनी असाच विचार केला की, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे सर्वसामान्यांमध्ये हे प्रबोधनाचे बीज रुजते आहे. लोक शहाणी होत आहे. लोकांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन येतोय. धर्माची चिकित्सा जनमाणसात होते आहे. देव- देवतांच्या बाबतीत ते जागृत होऊ लागले आहेत. ही विचारसरणी  आपल्या पोटावर पाय आणण्याची आहे. आणि आपण अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला विचाराने प्रतिवाद करू शकत नाही. कारण, विचाराने प्रतिवाद करण्याचा खूप प्रयत्न केला गेला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी खूप केली. की, अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही वारकऱ्यांच्या विरोधात आहे देवतांच्या देव- देवतांच्या विरोधात आहे हिंदूच्या विरोधात आहे मुस्लिमांच्या धर्मश्रद्धेची चिकित्सा करत नाहीत किंवा त्याविषयी काही बोलतही नाहीत या सगळ्या वादविवादाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुरून उरली. आमची वैचारिक बदनामी करणाऱ्यानी खूप यत्न केले. धर्मांधांनी व सनातनी विचारसरणीच्या त्या बदनामीलासुद्धा लोकांनी दाद दिली नाही. लोकांना माहीत होतं की, ही चळवळ आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे काम कोणाच्या विरोधात आहे? धर्माच्या विरोधात नाही तर अंधश्रद्धेच्या विरोधात आमचे कार्य आहे. हे लोकांना माहीत होतं. त्यामुळे त्यांच्या मनात गैरसमज निर्माण होण्याचं कामच नव्हतं. म्हणून सनातनी वृत्तीला भीती वाटली की, त्या माणसांना मारल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. विचार संपणार नाही. आणि विचार संपण्यासाठी त्यांना गोळ्या घातल्या.

परंतु इथे झाले उलटेच.त्याच गोळ्या त्यांना लागल्या. माणूस मारल्या जातो विचार मरत नाही. दाभोळकर गेल्यानंतर लोकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामात हिरीरीने सहभाग घेतला. कलबुर्गीला पुढे पानसरे यांची हत्या झाली. बेंगलोरला हत्या झाल्या बाबतीत लोकांनी खूप खूप विचार केला. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राला २०० शाखांच्या ३५० शाखा निर्माण झाल्या. आणि हे चळवळीला सहानुभूतीपूर्ण काम होतं. लोकांनी देणग्या दिल्या. आम्हाला सगळ्या क्षेत्रातून पाठबळ दिले. लेखक, वैचारिक, वैज्ञानिक, शैक्षणिक, अश्या सर्व स्तरातून जनतेपासून पाठबळ मिळत गेलं. मिळत आहे. त्यामुळे त्यांना पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे की, ज्या गोष्टीसाठी आपण ज्या हत्या घडवून आणल्या. ती गोष्ट नष्ट झाली नाहीच परंतु विचार अजून फोफावला. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या विचारांना पाठिंबा मिळत गेला. प्रसारमाध्यमांनीही यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रचंड प्रमाणात हे प्रकरण उचलून धरून या विषयाला न्याय देण्यासाठी माध्यमिक कुठे पण कमी पडली नाहीत. त्यांचा ऐक्यासाठी महत्त्वाचा वाटा आहे.
मुख्यत्वे सांगायचं झालं म्हणजे, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे, संघटनेचं नुस्कान झालेलं खूप आहे. दाभोळकर हे या चळवळीचे पाया होते. संघटन व नेतृत्व कुशल होते. ते नुसकान भरून न येण्यासारखे आहे. यावेळी सामूहिक नेतृत्व उभारून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम पुन्हा जोमाने सुरू केलेले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र सामाजिक- वाड्मयीन जाणिवाबद्दलचे मत तर व्यक्त केलं. परंतु आपण विचाधारेला आणि नव्या पिढीला तरुणांना काय संदेश देऊ इच्छितात? चळवळीच्या व वार्तापत्राचे एकूणच संदर्भात आपलं मत काय आहे?

खरंतर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राची सामाजिक जाणीवा आम्ही लेखनातून लोकांच्या वागणुकीमध्ये उतरविण्यात यशस्वी आहोतच. की, जसे तुकारामांच्या शब्दात सांगायचे झाले तर बुडती हे जन न देखवे डोळाया अर्थीही सामाजिक जाणीव वरवरची नाही तर ती अंतप्रेरणेतून जीवाशी जीवाला झालेली अशी जाणीव आहे. या जाणिवेतूनच काम करत असल्यामुळे समाजपरिवर्तनासाठी वार्तापत्राची कार्यशैली राहिलेली आहे. नुसते वैचारिक प्रबोधन, वैचारिक हलकल्लोळ मचविणे हा वार्तापत्राचा कधीच उद्देश राहिलेला नाही आणि राहणारही नाही.

समाजामध्ये वैचारिक परिवर्तन होणे, त्यांना विज्ञान व कार्यकारण भाव त्यामागील शास्त्र समजून चिकित्सक दृष्टी प्राप्त होणे, हा अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा उद्देशजाणिवांचा भाग राहिलेला आहे. आपली कृतिशीलता आदर्श बाळगून इतरांना त्याचा अंगीकार करावा यासाठी हे मासिक आहे. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आणि चळवळीचे जे काही काम आहे ते काम वार्तापत्रातून, मासिकातून प्रसिद्ध होते. लोकांपर्यंत सत्य- सत्य वास्तव नेता येतं. त्या कामातून प्रेरणा घेत समाज जागृती करणे, हेच उद्देश वार्तापत्राचे आता वार्तापत्रांनी ठेवलेले आहे.

आता महाराष्ट्राला स्वतंत्र मिळून ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या ६० वर्षात महाराष्ट्र उभारण्यात उद्योगपतींचे, राजकारण्यांचे, नेतृत्व, उद्योगपतीचे योगदान राहिलेले आहे. तसेच सामाजिक नेत्यांचेसुद्धा तितकेच मोलाचे योगदान राहिले आहे. सामाजिक योगदान कोणीही अधोरेखित करत नाही. लोकांची धारणा ह्याच असतात की, महाराष्ट्राला विकासाच्या ओघाकडे नेणाऱ्या केवळ उद्योगपती, राजकारणीची योगदानं नसतात. मात्र सामाजिक नेतृत्वाची कुणीही मीमांसा करत नाही. सामाजिक योगदान मोलाचं आहे. आणि त्याचे ते मुली मोजण्याचे तंत्र आपल्याकडे विकसित नाही. भौतिकदृष्ट्या येथे होतं असलेल्या विकासाचे प्रकल्प, नद्याजोड विकास क्षेत्रे- उद्योग- व्यापार हेच केवळ योगदान समजून घेतात. महाराष्ट्र विकसित करण्याचे खरे काम तर समाजविचारवंत आणि समाजसुधारकांनी केलेले आहे. आज हेच तरुण पिढीच्या लक्षात येत नाही. महाराष्ट्रात घडविण्यात सामाजिक चळवळ ह्या विचारांचा वाटा मोठ्या प्रमाणात अग्रगण्य राहिलेला आहे. सामाजिक उन्नतीचा विचार, समाजसुधारकांचा विचार येथे मोलाचा आहे. जसे आर्थिक, सहकारी योगदान, राजकीय, औद्योगिक योगदान, आपण नाकारत नाही, तसंच आपण सामाजिक योगदान सुद्धा नाकारता काम नये. महाराष्ट्रात विविध सामाजिक चळवळी आहेत. स्त्री, दलित, ग्रामीण, आदिवाशी, कुपोषित बालकांच्या प्रश्नांवर, अन्याय- अत्याचारांवर न्यायाची भूमिका घेऊन काम करणाऱ्या विचारसरण्या यापासून ते आताच्या कास्ट जेंडरपर्यंत या चळवळीमुळे समाजमन एकवटत आहे. हे चळवळीचे व समाजिक ऐक्याचे बलस्थान आहे. हे तरुणांनी विसरता कामा नये. चळवळीमुळे मत मानवतावादाला भिडते. तात्विक बदल विवेकवादाकडे होतो. वार्तापत्राची झेप आहे पुरोगामी महाराष्ट्र विकसित करण्यात आणि तो पुरोगामी विचार टिकविण्यात आहे. सामजिक उन्नतीला पुढे नेण्यात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे आणि वार्तापत्राचेसुद्धा मोठे योगदान आहे. या योगदानावरच पण पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये ९, १०, ११ तारेखेस मुंबई येथे आंतरराष्ट्रीय परिषद घेणार आहोत. आणि ते सामाजिक योगदान आपण अधोरेखित करतो आहोत. महाराष्ट्रांमध्ये इतिहासापासून पुरोगामी वैचारिकतेचे योगदान राहिलेले आहे. आणि ते योगदान लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. लोकांना त्या योगदानाचा, विचाराचा, विवेकाचा, आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा फायदा होऊन त्यांचे जीवन सुकर व्हावे. लोकांनी या योगदानाचा व्यवस्थित यथोचित गौरव करावा. हे योगदान अंगीकारून सामाजिक चळवळीत एकवटावं अशी आमची अपेक्षा आहे.

अगदी. सत्य. अगदी, मी आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रासाठी आणि अंधश्रद्धां निर्मूलन चळवळीच्या या कार्यासाठी, एकूणच सामाजिक योगदानासाठी सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठाच्या वतीने प्रतिनिधी स्वरुपात शुभेच्छा देतोय.
आपण या विषयाशी विचाराने एकनिष्ठ ,तटस्थ,व पुरोगामी राहून चर्चा घडवून आणली त्यासाठी मी शतशा खूप धन्यवादी आहे!
****
विश्वनाथ अर्जुन साठे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
मराठी विभाग
दि. २०/७/२०१९


Comments

Popular posts from this blog