***ग्रेट भेट***
--अविसमर्णीय शब्दक्षण--
नामांतराच्या चळवळीची मीमांसा,मराठी साहित्य व वास्तव,नवखे लिहिणारे लेखकं अन लेखन.बदलते वास्तव या मार्मिक विषयासवे शहरं व खेडं हा संघर्ष सांगतांना ते म्हणत होते- "मुंबई ही जगात घडणाऱ्या घटना भारतवर्षात प्रथमतः मांडणारी सिटी.पुणे त्या माहितीचं ज्ञानात भर व लिखित स्वरूप आणणारे.अन ह्या पुण्यात वाईट काय नि चांगलं काय हे समजणारे ज्ञानी.धरपडणारे तरुण रक्त या धावपळीच्या शहराकडे वळतात.मात्र खरी गरज तर गावाकडं आहे.गावखेडं धुम्सत आहे...! त्याला विचार करणाऱ्या तरुणांची गरज आहे. मराठी साहित्याचा अभ्यास करणारे हे सत्य जाणून आहेत....!"
--डॉ.नागनाथ कोत्तापल्ले-अ.भा.मराठी साहित्य संम्मेलन-चिपळूण(2012),डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू(2004),आज प्रगल्भ विचारतत्व असलेलं व्यक्तिमत्व लाभलेल्या माणसाशी हितगुज करण्याचा दिवस जुळून आला.निवांतातले पिंपळे सौदागर ते विद्यापीठापर्यंत काही अविसमर्णीय शब्दक्षण.!
..................................................................
***अविस्मर्णीय शब्दक्षण***
              
                         ".....त्या दिवशी म्या पाह्यटंच आंघुळ करून तयार झालो होतो.कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे-मराठी विभागातर्फे आंतरराष्ट्रीय गझलचर्चासत्राचा दुसरा दिवस होता.पहिल्या दिवशी धावपळीतच तिसऱ्या सत्राचं मोठ्या गरबडीत सूत्रसंचालन झालं.पाहिजे तसं मन भरलं नव्हतं.गझलगंधर्व व महाराष्ट्रातील आद्य मराठी गझलगायक सुधाकरजी कदम सरांचे ते अध्यक्षित सत्र होतं.पण भारतीय नियमानुसारच का म्हणा नियोजित वक्त्यांनी पोटभरून मनोगते व व्याख्यांनं दिल्यानं तिसऱ्या सत्राचा डहारा फुटला.स्टेजवर बराच वेळ"आता वेळ मिळत नसेल तर हे सत्र उद्या घ्यावं....!"अशी रसिकातून उभळ सुटू लागली.मग विभागाच्या प्रमुख संगोलेकर सरांनी माईक हाती घेऊन विनंती केली की,प्रत्येकी पाच मिनिटे दिली जातील.आणि लगेच गझलगायनाला सुरुवात करू.श्रोते चुळबुळत होते तसे कलाकारही.हे मी एका कोपऱ्यातून न्याहाळत होतो.आणि संगोलेकर सरांनी मला बोलवून माईक माझ्या हाती दिला.अन मी अनाहूतपणे शब्द केले,
"सांगोलेकर सरांनी मांडलेल्या सुचनावजा विनंतीला आपल्या सर्व सभागृहातील मान्यवरकडून अनुमोदन समजून पुढील कार्यक्रमाची मी सुरुवात करत आहे...नि निफाडकर सरांनी
असा हात करून खुनवलं....हं...!
                                   पाच गझला झाल्या रानडेची गझल वन्स मोअर साठी रसिकांसाठी होती.नंतर कदम सरांनी स्वरबद्ध केलेली रचनेचं त्यांच्या टीमने गायन झालं तीही जोमदारपणे रसिकांच्या मनात उतरली.बाकीही उत्कृष्ट झाल्या.नंतर सूत्र कदम सर सांभाळत होते.मी अधूनमधून माईकवर येत होतो.कदम सर फेसबुकवर असल्यानं बराच वेळ बोलत होतो आम्ही कार्यक्रम सुटल्यावर.या गरबडीत सरांना सोडवायला पिंपळे सौदागरला गेलो.अंधार झाल्यानं काहीही सुचलं नाही.विद्यापीठातून पिंपळेला केव्हा आलो समजलंच नाही.कारण एकेकाळी आपल्या शब्दाच्या जोरावर नि सत्यावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे काही काळ कुलगुरू राहिलेले मा.डॉ.नागनाथजी कोत्तापल्ले सरांच्या सोबतीत काही क्षण राहण्याचं भाग्य मिळालं. यापेक्षा साहित्य समजणाऱ्या व समजेल असं लिहणाऱ्या माझ्यासारख्या लहान जीवालं मोठे कौतुक कोणते असावे?कारण सरांना मी डी.एड ला अस्तांनी वाचलं होतं.त्यांची
कृष्ण,मेघ,मुड्स कर्फ्यू आणि इतर कथा,ग्रामीण साहित्य स्वरूप,पाचोळा,साहित्याचा अवकाश (समीक्षा)स्त्री-पुरुष तुलना इत्यादी लेखन वाचून होतो.नि या लेखकाला कधी भेटणं होईल.किती प्रगल्भ लेखन व विचारतत्व आहे.ही एक त्या काळातली कुतुहलावंगी गोष्ट.सरांना रेसिडेन्सी ला सोडलं अन खुशीतच विद्यापीठाच्या वाहनाने होस्टेलवर आलो.दिवसभराच्या वदवदींनं लवकर निद्रा कधी अंगावर आरूढ झाली कळलंच नाही.पण लवकर उठायची सवय असल्यानं पाचलाच जाग आली.पुन्हा तयार होऊन मी विभागाच्या दिशेने मनातल्या मनात विचाराचं भारूड गुणगुणत चालू लागलो.
"आजही ख्यातनाम अन् प्रज्ञावंत लोकं इथं हाजरी लावतील अन ते आपुन आय्कलं पाह्यजे ब्वॉ..!"
अन तितक्यात खिश्यातला भ्रमणध्वनी खंन्नांला....
                 क्रमांक नवीन असल्याने कळलं नाही.बराच वेळ बोलल्यावर कळलं की विदर्भातून गझलकार सुरेशकुमार शेंडे सरांचा तो आवाज होता.धावपळीत बोलणं झालं नाही.महत्वाचं ते बोलणं झालं नि सरांना म्हणलो,"मी जरा गरबडीत आहे नंतर बोलतो आपल्याशी."आणि "शुभदिवस!"म्हणून मटकन खिश्यात भमणध्वनी ठेवला.तितक्यात मराठी  विभाग आला होता.
विभागात सत्राचे नियोजन चालू होतं. काल कोण कोणत्या पाहुण्यांना सोडवायला गेलं होतं ते आज पुनश्च त्यांना आणायला जातील.नि मी पुन्हा दिलभरून खुश झालो.आजपण बोलायला,ऐकायला मिळणार.नवीन खबरबात होणार.नवं तंत्र हाती लागणार.जुनं काय ते समजणार.या सुखानं मी सांगोलेकर सरांना बोललो,
"सर मी निघतो वेळ होत आली कार्यक्रम सुरु करण्याची नि पाहुणे आणायचे बाकी आहेत..!"
"अरे..विद्याधर मग जा विचारण्याची गरज काय त्यात..? कालच्याला तूच सोडवायला गेला होता न मग जा."
सर म्हणले.(सर हल्ली विश्वनाथ म्हणायचं सोडून विद्याधर अश्या नावाने बोलवत)मग मी अन सानप बंधू विद्यापीठाच्या वाहनाने सरांची परवानगी घेऊन बाहेर पडलो.
                     "काल बाहेर अंधार अन मनात आनंद असल्यानं ध्यानात ठेवलेलं घर इसरलं ब्वॉ.झालं होत्याचं नव्हतं..!"
पण प्लॅनेट ला सर राहतात हे चटकन लक्षात आलं अन पिंपळे सौदागर ला वाकड फाट्यावरून वळलो.मोठमोठ्या इमारती मांघं पडत होत्या.लांबसडक रस्ते भर्गच्च वानुसारखे वाहत होते.किड्यामुंगीसारखं जीवन पळत होतं.आम्ही गाडी घेऊन रेसिडेन्सीच्या आत गेलो.एकसारखी घरं वळींनं थाटली होती.शेवटच्या टोकावर जाऊन एका शिपायाला विचारलं तर तो बोलला,
"साब हमको मालूम नाही कौन कहा राहता है...?"
मग गाडी पुन्हा वळवून आम्ही परतीला लागलो.आता पुढं गेलं पाहिजे म्हणून गाडीचा थोडा वेग वाढवला.तोच 3/4 च्या घर क्रमांक असलेल्या दरवाज्यातून कोत्तापल्ले सर बाहेर येतांना दिसले.मी म्हणलो,
"थांबा,ते सर समोर आहेत.इथं गाडी उभी करा मी आलोच घेऊन...!"
सानप बंधू अन मी दोघे खाली उतरून सरांकडे गेलो.खादीच्या सदऱ्यात अन पायजम्यात सर बाहेर निघाले होते.आमच्याकडं बघताच सर बोलले,
"अरे आलात तुम्ही..?या मी जरा बाहेरून येतो काही वेळात आत बसा.तयार होऊन जाऊ."
काही वेळाने ते आले.तयार झाले.कोट घातला.स्वतः बुटाला काळंकुळकुळीत केलं.त्याअगोदर आम्हांला तिळाच्या वड्या खायला दिल्या,पाणी पिले.आम्ही म्हणणार तोच अन सर म्हणाले,
"चला!मी तयार आहे!"
लगेच आम्ही दरवाजा उघडून सरांना आत बसवून दुसऱ्या दरवाज्याने आत बसलो.सानप बंधुला मी म्हणालो,
"की,सानपजी तुम्ही पुढं बसा मी मांघं बसतो.थोडं बोलायचं आहे सरांना."
अन तेही कबूल झाले.गरबडीत गाडी चालू झाली.
"आर्रर्रर्रsss माझा भ्रमणध्वनी घरीच विसरला मी...!"सर बोलले.
सानप बंधू बोलले,
"आणू का सर मग परत."
सर म्हणाले,
"नको राहू दे.फक्त घरी म्हणावं लागेल की,चार्जिंगचा भ्रमणध्वनी काढून ठेवा.!"पहिले काय हे तंत्र होतेच का?
"अंsssहं"अन आम्ही गाडीच्या वेगानं पुढं पळू लागलो.सर बोलत होते,
"गरजा वाढल्या की माणूस वेग वाढवतो.मग तो कोणत्याही क्षेत्रात असो.कोणत्याही तंत्रात असो.जबाबदारी, दर्जात्मकता अन न्यायता टिकवून ठेवणे त्याच्या हातोटीच्या कक्षातून जाते.त्यातूनच त्याचा विनाशही तो जन्माला घालत असतो.एकीकडे विकास-विलास-विनाश  जुन्याला नवी रीत उभी असते तर दुसरीकडे अधोगती-अवनती-अनाघाची गती उभी असते."
शब्द जड होते पण काही अर्थ काळजाला भिडत होते.शब्दाच्या मागोमाग तसे चित्र व वास्तवाचं दृश्यपटीय साखळं फिरून गेलं.
बोलता येतं तेव्हढ्या शब्दांत मी बोललो,
"मग सर ह्यो बदल तरुणांनी कसा साधायचा..?"
प्रश्न साहजिक होता तरुणपणात अडकलेला.तो प्रतिनिधित्व करत होता सळसळत्या रक्ताचं.
"मी माझं सांगत नाही,थोरमंडळी ते सांगून गेली.चांगलं ते घ्या.मानवतेला पोषकसं.सर्व प्राणिमात्रास न्यायकतेचं.सौहार्दतेच्या बाजूने.अन वाईटाचा मार्ग सोडून द्या..!"
गाडीच्या काचेतून बाहेर पाहत सर बोलू लागले.
"समाजप्रबोधन करायचं ते पोट भरून असल्यावर होतं.आठ दिवस उपासपोटी राहून कोणता बदल समाजात घडवायला मनगटात किती बळ असते?गरजेपूर्ती भाकर अन समाजप्रबोधन हे दोन्ही टोकाचे विषय आहेत.ज्याला हे भाकरीचं गणित सुटलं त्यो ...."
सर बोलण्याचे थबकले.अन पुन्हा सर खिडकीतून बाहेर पाहत होते.
चालक,सानप बंधू अन मी अशी आम्ही तिघेही व चौथे सर निशब्द झालो.कोणीच शब्द उच्चारत नव्हते.न राहवून कवी मन निसटलं शब्दांतून.....
"सर एक रचना हाय घाटमाथी शब्दांत म्या तयार केलेली ऐकवू का....?"
"आं sssss."हं..."
"ऐकवं लैय दिवसात नवी रचना ऐकली नाही."
ऐकव म्हणण्याची दर्कार होती.म्या तोंडपाठ ठेवलेली *गाव कात टाकत्कोय धुम्सत*हि रचना म्हणायला चालू केली.
गाव कात टाकत्कोय धुम्सत-

"गावात्त्ल्या खाल्तल्ल्या
सेन्कुडाच्या झोप्ड्या जागी
नाना इंद्रधनूस्याच्या रंगार
भित्तीनं निवडुंगाडचं
नाकार्लेलं जग उजळलंय
मांगाम्हाराच्या कुडातून
कुबट्यावास ऊबग्लाय
आत्तराचा गंध तिथं
घुटमळू लाग्लाय
थांब्लाय घम्कारा कव्हाच
त्या पांढुर्कट पान्यावर
खेळतात नाना उद्देम
लेकुर्वाळ्या बाळात्नीवानी
पार्ध्या-वड्राची लेंगार
वळीनं थाटून गल्लीतोंडावर
दिस्तयं नवंकोरं वाघृळ आथर्ल्यासार्ख
पल्डाय हात्त्चा डुक्करफास
पोऱ्हापोर्हीचे दप्तर सिव्तांनी
रवंथ कर्तोय
घान्याचा बईल अन् तेलीपन
नव्या फाडीच्या जोत्याटेक्नीलं
रापीचा उस्वास् आरीनं घेऊन
कोप्र्यात बस्ली वाधी केधोेळची
चंभार उध्डत्तात पारावर
चारचौघात नये इच्यार
बईल बार्दान्याच्या जागी
यंतर आलंय
कुठंमुठं कौल्हारू घुंग्रं
सिवंवर वाजत्तात तांबरच्या
चराय्लं गेलेले
डफ्डं अन् हाल्गी
म्हार्काच्या डांखीलं कैकाळची
हाये लटक्ली
उदाजीब्वॉच्या डोस्क्याउपर
रंगाळ झाल्या धुड्क्याजवळ
दुपार्ची घन्गर्भ वाय्टूळ
गल्ल्या,बोळांड्या गोलांडून
माळबर्गाडी आडव्या
थर्रथर्रत थबक्ती
उड्व्वे दर्रदर्रत्तात आर्तून
चिक्टा उप्तर्ल्या मढ्यागढ्या बी
खुर्प्यानीचे बोच्कारे उरावर
घेत उन्हावाऱ्यापान्यात
खंगा लाग्ल्यात
उस्मर्ती ....
काळजतोड रोष
भग्नाळ माळ्व्दाची माडी
आतून धुस्मुस्ती
सुस्कारा फेक्ता फेक्ता
अधिकाराच्या डामडौलीची
उच्चीच्या उच्ची सत्तांतरे
नुस्ती न्याहळत...
इम्ल्ये,वाडे जंग्ट्लेत
हुजूर्बाजीचा सूर आय्कुन आय्कुन
अन् लुभ्र्यावानी आसुस्लेत
त्ये त्या गाव्गाड्याची
रीत चालवाय्लं
खर्रं तर
कुज्लेले ढोरं, मांज्रं, कुत्रे
वढाय्लं कोन्हीच
नाही धजत
आज्काल गावकुसात
कारन....
कष्टानं हातुळ्यावर
बर्कतीची कमाई
धडा घाल्ती
स्वातंत्रतेचा अन् स्वाभिमानाचा...!"
                                 "मध्ये काय उच्चीच्या उच्ची...?"कोत्तापल्ले सरांनी प्रश्न केला.
ते असे शब्द आहेत सर-
"अधिकाराच्या डामडौलीची
उच्चीच्या उच्ची सत्तांतरे
नुस्ती न्याहळत..."
"हं रग्गड मर्म आहे कवितेत....!"सर फक्त इतकंच म्हणले.अन वाटलं शब्दाचं सार्थक झालं.सोनारानं जंत्रीतून सोनकण छाटावे तसे ते मुद्द्याचे शब्द सरांनी विचारले.अन तेच मी कवितेत सांगू पाहत होतो.यापेक्षा बावनकशी कुठली असेल?असो.
                                 मी बोललो,"सर तुम्ही औरंगाबाद विद्यापीठात होता.त्यावेळी नामांतर चळवळ चालू होती.आजचा दिवस तोच आहे.
मी थोडं लिहिलंय.औरंगाबादचे देवदत्त म्हात्रेजींनी नामांतराचा लढा चित्रपट केलेला आहे.तो मी पाहिला अन वाटलं ते लिहिलं.असंच गावी जातावेळी पुरी सरांचीही भेट घेतली.त्यांनी नमस्कार सांगितला तुम्हांला."
"त्यांना कसं माहीत की मी भेटणार तुला?"
सर उच्चारले.
अनाथ आश्रमाच्या कामासाठी मी औरंगाबादला गेलो होतो तेव्हा सरांशी भेट झाली.अन सांगितलं सर्व.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकत आहे. त्यावर ते बोलले कि,"कोत्तापल्ले सरांना माझा नमस्कार सांग..!"
"अच्छा....! ते हिंदी पत्रकारिता करत होते नि त्यांच्यासोबतचा मी वर्गमित्र होतो मराठीचा."सरांनी खुलासा केला.
मला त्यावेळी नमस्काराच्या सांगव्याचा आज खुलासा झाला.
"आणि म्हात्रेंचा चित्रपटगृहात चित्रपट आला नाही का..?"
"इव्हन नाही वाटतं सर.नाहीतर त्यांनी माहिती दिली असती.सीडी,केसेट्स झाल्या आहेत."
मला माहिती असलेली पुष्टी दिली.
             "ठीक..! नामांतराचा इतिहासाचा मी साक्षीदार आहे.माझ्या काळातच ती चळवळ उभार झाली.ज्यावेळी महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह आंबेडकरांनी केला.आणि आम्हांला मुक्त जगण्याचं शिवार मिळत गेलं.तिथून आपण चळवळी सिध्ध करू शकलो असं दिसतं उदाहरण आहे.तोच दलित मुक्तीदिन आहे.आणि महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद या ठिकाणी उभारलेल्या मराठवाडा विद्यापीठाचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर करावे अशी चळवळ उभी राहते.खरे तर घनघोर संघर्ष पुढेच आहे. आंबेडकरांनी घटनेत दिलेले हक्क लोकांना कळू लागतात.त्यावेळी गावकुसावर तरफडणारी जमात गावात मानसंन्मानानं जगण्यासाठी धरपड्तात.मात्र व्यवस्थेतील हि जातीविद्रोहाची आग त्याहीच्या विचार संघटनेला,कुटुंब संस्थेस,वा कुळालादेखील नष्ट करण्यास माग पुढं बघत नाही.ह्ये समाजचं भीषण तत्कालिक वास्तव निर्भिडपणे जनार्धनाच्या समाजसंघर्षातून आल्हादपणे प्रकट केलेलं जाणवत राहतं. हा विचारांचा परिपाक या प्रसंगातून ओसांडतांना दिसतो.तत्कालीन विचार करता सर्व एकजुटीने सामोरे येतात.जनार्धन कट्टर भीमक्रांत आहे.तो कुंकवाचा टिळा पुसतो त्यावेळी एक विरता अंगात संचारल्यावानी मन दाटून येतं.या नामांतराच्या चळ्वळीसाठीच नव्हे तर जीवनभर भीमविचार नखशिखांत  घेऊन धर्मांध व्यवस्थेला डागळण्यासाठी मांग जातीललं पोचिराम कांबळे नावाचं ठिणगीरूपी विद्रोही आग्वादळ शेवटच्या स्वासापर्यंत लढत मरण घेतं जातं. ह्ये धडधडीत वास्तव डोळ्यास पाणी वलावतं.त्या पोचीसाठी ढसाढसा रडणारा,प्रसंगी आपल्या घरात त्याच्या सर्व कुटुंबाला जागा देणारा अब्दुल हा जातीपातीच्या कुसाला तिर लावतो.हा संघशर तरुण मनात घुसतो.व जातीपाती नष्ट हो असं त्या तरुणाला वाटतं."शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिस वाघ होऊन शत्रूला फाडून मरण आलेलं बरं"या विचारणं प्रेरित झालेला तरुण ,उमद्या,धडाडीचा गौतम वाघमारे हा सारं आयुष्य भींमचळ्वळीस अर्पित करतो.हे मी डोळ्यानं बघितलं आहे...!"
प्रखडपणे व बिनदिक्कत इतिहासाची साक्ष अनुभवाच्या बलबूत्यावर कथन करत होते.
          "त्या शौर्य वीरांच जगणं मरणं, ती अगतिकता,ती तळमळ अतिशय जाज्वल्य असा व्यवस्थेच्या विरोधातील विद्रोहच म्हणावा लागेल..!"
"पन हल्लीचे तरुण काय करतात?"
असा तरुण मनाला खर्चटनारा रोकडा सवाल सरांनी केला.मी मुकाट होतो.शब्द तिथं घुटमळू शकले नाही.मी ऐकूण घेत होतो.अन सर पुन्हा बोलू लागले.
"कठोर काळ्या पाषाणासारखं तरुणांनी झगडत रहावं पोलादी पाहरीशी.पण फुटू नाही.उन्मळू नाही,की चिरु नाही....!"
कोत्तापल्ले सर हे शब्द तोंडातून फेकत्तांनी चिरतरुण वाटत होते.अगदी विशीतल्या तरुण सळसळत्या रक्ताच्या उमद्या श्वासासारखे.मात्र दुसऱ्याच क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर
खंत उमटली.
"कधी कधी पठारावस्था येते लिहिण्यात..!"
विषय मोडावा म्हणून मी बोललो.
"कोणी सांगत आहे म्हणून नाही लिहायचं.स्वतःला वाटलं म्हणून योग्य ते लिहीत जा.आणि असं होतं या अवस्थेत.कडक उन्हात नवी रोपं करपावी तसे नवखे लिखानकार होरपाळल्या जातात.प्रस्थापित झाडं जशी नव्या पालवींना सूर्य दिसू देत नाहीत तसाच हा साहित्यातील ढगाळपणा. तरुणांनी भरपूर वाचलं पाहिजे.ते समजून घेतलं,विचारलं पाहिजे.मंथन केले पाहिजे जुन्या नव्या विचार संकल्पनांचे.चांगलं काय?वाईट काय?विवेकाच्या नजरेनं पारखलं पाहिजे.व्ययस्थेत कनकाला तोलणारे गुंजखडे मापानं उभेच आहेत.जोखिम म्हणावी तर अनंत पिढ्या या अज्ञानाने गंजल्या आहेत.टळतील असे दिवस स्वतः टाळावे लागतात.ज्ञानाच्या जंतर तलवारीने धर्मांध व अज्ञानत्वाला चरचर कापायचे आहे.आणि ही खांदेपालट काळानुसार स्वीकारली पाहिजे. थकलेल्या लेखणीचे श्वास तरुण झाले पाहिजे...!"
सर एकेक शब्द सर करून काळजात घुसत होते.आम्ही सर्व ऐकत होतो.
"मी म्हणतो,कालानुरूप लेखणी झिजावी पण जुने प्रश्न तिने फोडून काढावे.जुन्या अडचणींचा ढिगार उपसून वास्तवाची दरी ही नव्या उपाययोजनांनी सपाट करून ठेवावी.अन त्यावर सुखाचे पाऊल उमटणार नाही असं कोण म्हणतंय मग?"कोत्तापल्ले सर बोलले.
मी काही मुद्दे टिपत होतो.काही डोस्क्याउपर थैमान घालत होते.
                    "लेखकत्व ही स्वत:च एक अत्यंत जबाबदार नैतिकता आहे. माणसांच्या दुनियेत, एकमेकांना ओरबाडणाऱ्या तृष्णांध दुनियेत लेखकाचं स्थान काय असतं? केवळ सर्वच सत्तास्थानांपासून दूर राहणाराच नव्हे, तर सर्वच सत्तास्थानांची कठोर चिकित्सा करणारा आणि स्वत:ला अप्रिय करून घेणारा वा स्वत:ला अडचणीत आणणारा हा लेखक कशासाठी लिहितो? माणसांच्या या अस्तित्वसृष्टीत त्याचं स्थान काय? समाजाच्या एकूणच मूल्यव्यवस्थेशी, तिच्यातील संघर्षाशी त्याचं नातं काय असतं? लेखकत्व हे स्वत:च एक पराकोटीचं गांभीर्य असतं. लेखक स्वत:च एक सर्वहितैषी संविधान असतो."      "कवी,लेखक,त्त्वविचारवंत व समाजसुधारकांनी विसरू नयेत.या जाणिवेसह प्रखरपणे धूर्त व अविचारांच्या विरोधात गेलं पाहिजे.मनात मत्सर न बाळगता मानवतेसाठी लढलं पाहिजे.जातिवंत विचाराची खंबीर भूमिका मांडली पाहिजेत.माणूस म्हणून जगलं पाहिजे.ही खऱ्या साहित्य व साहित्यिक निर्मितीची बावणकसोट सत्य पडताळणी असते.कारण स्वतःची भाषा ही एखाद्या समूहाची खरी ओळख असते तेव्हा ती दडपण्याचा व त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न होत असतो हे भारतवर्ष इतिहास न विसणारे सत्य बाळगून आहे.शब्द हीच खरी त्या समूहाची ओळख असते.समाजाची प्राण असते.ती व्यक्तता असते.आणि लोकशाहीत दलित,कष्टकरी,शेतकरी,श्रमिक,मजूर,पीडित व शोषित केवळ निःशब्द असल्याने अन्यायाचा डोंगर पोखरत बसतात.तो घाव सहन करत असतात.त्यांचा आवाज हि खऱ्या अभिव्यक्तीचा अविष्कार असतो.तेच खरे स्वातंत्र्य असते.आज मात्र वास्तव तसे उरले आहे हे सत्य सांगणे नकारवादी आहे.ती वस्तुस्थितीचा भागच नाही.विचारांचा विरोध आज गोळी,बंदूक, सुरे,जंबे व तलवारी आणि तालिबानी शस्त्रास्त्रे,विध्वंसक जाणिवेने घेतला आहे.मानवतेला हि कलंक लावणारी भूमिका आहे.असे लिखाण नवोदित लेखनकार करतांना दिसून येत नाहीत.जे लेखक, कवी वा समाजसुधारक,तत्ववेत्ते हे अविरत विचारमग्न व अस्वस्थ असतात ते जिवंत जाणीवा जन्मास घालतात.ते खरे वास्तवाचे निरपेक्ष इतिहासकार असतात."
                     कोत्तापल्ले सर साहित्याचा गाभा चिरत होते. त्यातील एकेक पदर उलगडत होते.नि आम्ही त्यात कानसेन होऊ लागलो.औंध आलं तेव्हा ट्राफिक लागली.अन गाडीनं ब्रेक धरला.जिकडं तिकडं घर्घर चालू होती.ज्यो त्यो घाईगरबडीत.आपल्या जवळ कोण आहे?याची एकमेकांना खबरबात नव्हती.सिग्नलला काही लोकं फाटक्या कपड्यात उभी होती.हेल्मेटच्या आत प्रत्येकाचं एक विश्व होतं.जाऊद्यात शेणातल्या किड्यांना काय माहिती.की ही वळवळ किती काळ टिकणारी?
"शहरं भोपळ्यावानी फुगू लागलेत."सर पुढं म्हणाले,"खुल्या अर्थव्यवस्थेंने बाजारी भांडवल खेळतं केलं खरं पण पोशिंदा शेतकरी नागवला.मजूर तटपूंज्या मजुरीत भरडून गेले महागाई ह्या जात्याखाली.दलाल सुखाच्या गादीवर लोळत पडलेत.गाव खरं तर धूम्सतयं बेरोजगारीची वेदना मस्तकात ठणकून. जाती विसरायचा युगात त्या घट्ट रक्तातून मिसळत आहेत मानसिकतेला.माणूस खातो ते अन्न शेतीतून पैदा होते हा विसर पडत आहे.मॉलच्या काचेतून काउंटरवर मिळणारी अर्धीकच्ची चपाती त्याला हीच खरी भाकरीची जन्मभू वाटत आहे.!"
"हे वास्तव आहे सर डोळ्यात सलत जातंय."
पण पोटापाण्यासाठी दुसरं काय...?शहरं उरावर ठेवावेच लागतात."
मी व्यक्तलो.
                  सर म्हणतात कसे,"गावातली माती साऱ्या जगाला जगवती......!" गावातला लोंढा शहराकडे येतो खरा पण चाकरमानी गुंतून घण्याच्या बैलागत त्याची अवस्था.गावाकडचा सर्वसामान्य माणूस शहरात हातगाड्यावर माळवं,भाजीपाला विकतो,रोज कंपनीला खेटे घालतो,इतर पडेल ते कामं करतो,मिळेल त्या मजुरीच्या भरवश्यावर संध्याकाळच्या चुली चेतवितो, कारण त्याला लगेच उद्या कामधंद्यासाठी हजर रहावं लागतं. मग तो एखाद्या मोठ्या उड्डानपुलाखाली,एखाद्या नाक्यावर काम मिळेल काय म्हणून घटिकाघटिका ताटगाळत उभा राहतो.अन इथंच दलालीची पैदास होते   कुंटलावर.कंत्राटदारीची लक्षणरेषा ह्या दारीद्र्याच्या सीतेला श्रीमंतीसुख ओलांडू देत नाही मरेस्तोर.सारं सारं इतभर पोटासाठी.चंद्रकोर भाकरीच्या तुकड्यासाठी तर हांजी हांजी करायलाही मागे न पाहणारी अजून एक पिढी उगवते.गावाकडील दुष्काळाची धारदार सूरी त्याच्या बेरोजगार काळजावर वार करत असते वास्तवात.एकदा पेरून न आलेलं पीक दुबार पेरणीवर वांझच होतं त्यावेळी कर्जापाई ही मंडळी शहराच्या दिशेने आगेकूच करतात.शहरातल्या वाकड्या नळावर पाणी पितांना गावाकडच्या पिण्याच्या पाण्यासाठी डोंगरदऱ्यात केलेली पायपीट त्यांचा हिर्मोश्या करत असते.म्हणूनच औद्योगिकरणाच्या जाळ्यात एक पिढी काय हजारो पिढ्या गुलामीपण स्वीकारून घेण्यात गेल्या.उद्याच्या सुखाचा दिवस या यंत्रतंत्राच्या गुरफाट्यात गुदमरलाय. गावाकडचा माणूस शहरात स्वतंत्र म्हणून आहे का?असा संघर्ष चालू आहे वर्तमानात.हे वास्तव ओळखून जो जगतो तो वर्तमान शिकतो.अन ज्याला वर्तमान कळतं तो येणारा दिवस बघतो.गतकाळाची शिकवण त्याला अनुभूत आसते.वर्तमानाचं सुख हे न गतकाळात चिटकतं न उर्वरित काळात."
"बरोबर आहे सर.!" माझ्याकडे या शब्दांखेरीज दुसरा पर्यायच नव्हता.कारण हे सारं वास्तवाचं सचित्र सत्य होतं.
विद्यापीठाच्या आत गाडीनं वळण घेतलं.सर्व शांत झालं. गाडी इव्हन नामदेव सभागृहाजवळ आली. मी गाडीच्या खाली उतरून सर उतरतील या हिशोबाने गाडीचा दरवाजा उघडला.हळूच सर भाहेर आले.अन हातात हात देत शब्द उच्चारले,
                              "आपण ज्या परिसरात जगतो,राहतो त्या ठिकाणची अस्थिरता, अस्वस्थता आपण लेखणीच्या माध्यमातून निर्भीड व वास्तवाच्या दृष्टीकोणातून मांडली पाहिजेत.मराठी साहित्याचा अभ्यास करणारे हे सत्य जाणून आहेत.सत्य ते कि ज्या लेखण्या केव्हाही जिवंत असतात....!"
मी स्तब्ध झालो.सरांची आकृती पाठमोरी झाली नि सभागृहाच्या पायऱ्या ओलांडू लागली.मी मागे मागे जात होतो.
***ग्रेट भेट***
--अविसमर्णीय शब्दक्षण--
(नामांतराच्या चळवळीची मीमांसा,मराठी साहित्य व वास्तव,नवखे लिहिणारे लेखकं अन लेखन.बदलते वास्तव या मार्मिक विषयासवे शहरं व खेडं हा संघर्ष सांगतांना ते म्हणत होते- "मुंबई ही जगात घडणाऱ्या घटना भारतवर्षात प्रथमतः मांडणारी सिटी.पुणे त्या माहितीचं ज्ञानात भर व लिखित स्वरूप आणणारे.अन ह्या पुण्यात वाईट काय नि चांगलं काय हे समजणारे ज्ञानी.धरपडणारे तरुण रक्त या धावपळीच्या शहराकडे वळतात.मात्र खरी गरज तर गावाकडं आहे.गावखेडं धुम्सत आहे...! त्याला विचार करणाऱ्या तरुणांची गरज आहे. मराठी साहित्याचा अभ्यास करणारे हे सत्य जाणून आहेत....!"
--डॉ.नागनाथ कोत्तापल्ले-अ.भा.मराठी साहित्य संम्मेलन-चिपळूण(2012),डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू(2004),आज प्रगल्भ विचारतत्व असलेलं व्यक्तिमत्व लाभलेल्या माणसाशी हितगुज करण्याचा दिवस जुळून आला.निवांतातले पिंपळे सौदागर ते विद्यापीठापर्यंत काही अविसमर्णीय शब्दक्षण..!")

(टीप-मा.मारोती कसबे यांच्या प्रेरणेखातर लिहिलेला लेख)






Comments

Popular posts from this blog