***प्रेस व्हिजिट***
आदिवासी विकास विभाग
आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह
42,कोरेगाव पार्क, पुणे- 01
-बार्टीकडून काही पुस्तके घेण्यासाठी आज पुणे कॅम्पला जाणे
झाले.दुपारचं टळटळ ऊन.जेवणाची कार्यालयीन वेळ झालेली. थोडा उशीर म्हणून प्रेस
व्हिजिटसाठी वेळ मिळाला. आदिवासी वसतिगृह तिथून जवळजवळ दीड किलोमीटर.चला म्हटलं
जाऊ.फिरून,नजर टाकून येऊ.विद्यापीठातील वस्तीगृहातून आज
तब्बल सतरा दिवसांनी लांब जात होतो.तसे मधेमधे येणे जाणे होते.आज पायाला घासून
घ्यावं म्हणून.चालत चालत आदिवासी वसतिगृहकडे आलो.
तर वाटेतच फाटक लोखंडी. भरमसाठ कचरा.गांजरगवत टोंगळाभर
वाढलेलं.प्लास्टिकच्या थैल्या अस्तावयस्थ कुत्र्याने गरळ वकून
फेकल्यासारख्या.वाळलेला पालापाचूळा पिवळा गढूळ.हिर्वी गदाड चिच. गर्द सावली फेकत
उभी.फटकातून वळून पुढं आलो.कौलाची मुख्य इमारत अन त्यावर पाटीवर पेंटिंग केलेली
अक्षर.त्या वसतिगृहाची शासकीयता दर्शवित होती.चारदोन पावलांचे फरसीचे आंगण सोडलं
तर सारा मातीनं भरलेला परिसर.त्याच्या मागच्या बाजूने बंद पडलेलं समाजकल्याणचं जून
,पडीक झल्यासारखं अजून एक वसतिगृह.पण ते भग्नाळ झालेलं.तिथं
सहसा कोणी दिसून येत नव्हतं.बाजूलाच संडास,मुत्रीघर आणि
स्वछता कक्ष,असा अगज आननारा सिमेंटचा वास्तूपरिसर.शेवाळलेली
काळी पाण्याची टाकी.अन भंगारलेले,गंज चढलेले,तोट्या फुटलेले नळ.लोखंडी पत्र्याच्या खोल्या.पण आतून पृष्ठाच्या,फायबर,कोपीन केलेल्या खोल्या उन्हाची रग ओकत
होत्या.अन त्यात ते जंगलाचा राजा असलेले,अन जगण्यासाठी,शिक्षणास्वाभिमानासाठी शहरात येऊन पडलेले जीव-आदिवासी मुलं.एकाच्या
दरवाज्याला लोटलं त्यो आत पुस्तकं लावीत होता.बोललो,
"काय कर्तो ब्वॉ मित्रा....?"
मित्रा...!"या शेवटच्या शब्दावर त्याची नजर फिरली.
"काय नाही....!पुस्तकं लावतोय.ये न आत!"
त्यो म्हणला.पायातलं पायतान कडून आत गेलो.पुस्तकांचा ढीग पडलेला.त्यो सारीत होता.अन मधेच बोलत होता.
"काय सांगू बापा, आता परीक्षा संपेल.गावी,घरी जावं लागेल.तर पुस्तकं पण न्यावे लागेल.माझं शिक्षण संपल.शेवटचं वर्ष
होतं.!"
शेवटचं ह्या शब्दांवर त्यानं जोर दिला.
"म आता...?"
प्रश्न करीत पुढं बोलतो तोच बोलला.
"आता काय....? बापासंग वावरात राबायचं.
वय झालंय त्यांचं.
गेलं पहिजे. माय एकटी हाय.लहान बहीण घरी आहे लग्नाची.शिकतेय.पण
लग्नासाठी पैसे नकोत का??"
शून्यात पाहून त्यो बोलला.
"हं.....!"
होकारत म्हणलो,
"कोर्टात काहून नाही लग्न लावत म...?तिथं
काय पैसे अन भावकीलं जेवणखान थोडं लागतंय...??"
त्याच्या डोळ्यात काही वेगळे भाव तरळले.अन "शेतकऱ्याचा
आसूड"हे पुस्तक पुस्तकाच्या चलतीवर ठेवत त्या उत्तरला,
"सारं खरं पण तिला जगावं लागेल समाजात.संसार धकलाव लागेल.लढावं
लागेल.तसं ठरवलंयच की कुळाचं हे पहिलं लग्न शासनाच्या दारातच लावायचं. पण हे पाह्य
शासन दारात आ वासून आहे....अव्यवस्थेचं सोंग घेऊन...!"
पण आता बापासंग वावरात काम करून पुढचं वरीस बाहेरून शिकतो.बहिणीचं
लग्न विनापैश्याचं लावून पाड्यावर एक नवी रीत उभी करतो.!"
अन त्यानं पुस्तकाची चळत पेटीत ठेवली.
" जेवतो का???"
त्यानं प्रश्न केला.भूक लागली होती चालून चालून थकलो होतो.पटकन
"हो"भरली.
"चालेल ,तू जेवला...?"
"नाही सकाळी नास्ता केला पोटभर.भूक नव्हती.म ताट् आणून ठेवलं
आहे.जेवू दोघेही."
त्यानं हात धुवायला पाणी देऊन ताट लावलं.
त्या अनोळखी भेटीनं जेवण केलं.
त्यो रेवान-नासिकचा.आदिवासी पड्यावरचा. माणुसकीपूर्ण.जाताखेपी
त्यानं आभार घेतले नाही. ते शब्द तसेच पुढचं वास्तव न्याहाळत फिरू लागले.इकडे काही
खोल्यात मुलं आडवे झालेले.त काही निपचित पडलेले.काही वाचनात गुंग.काही बोलण्यात
बेतलेले.काही खोल्या धूत होते.कुठं खोलीबाहेर सायकली तर कुठं मोटारसायकली
उभ्या.बाहेर पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळच गटार झालेली. चेंबर तुडुंब भरून
काळ्हिर्वा गढूळ रंगात प्लास्टिकचे फोत्रे साचलेलं.गांजरगवतानं वसतिगृह मढुन
गेलेलं.एका खोलीपुढं त जळालेल्या कचऱ्याची ताजी राख अन त्याच्याजवळच खर्कटेल्या,कैक दिवसाच्या धुन्यात न आलेल्या कचराकुंड्या एक वातावरणात दरप फेकत
होत्या.त्यामुळं तिथं उडत्या माशांना जत्रा लागली होती.
शासकीय अधिकाऱ्याची भेट मात्र घडून आली नाहीच शेवटी.पुन्हा
परतीला.बार्टीच्या कार्यालयाकडे आलो.डोस्क्यात सारं वास्तव घुसमटून जात होतं.नसा
तिडके मारत होत्या.
"अनोळखी माणुसकी-शाससकीयतेतील दरप-खर्कटलेल्या
कचराकुंड्या-स्वाभिमानी उर्मी-वसतिगृहावर मढुन आलेलं वास्तव अन भग्नाळ पत्राच्या
इमारती-तुडुंब चेंम्बरं-जंगट तोट्याचे नळ-समाजाच्या रितभाती-लोखंडी फाटक-अन
वेदनेची तिडीक घेणाऱ्या नजरेतली शब्दता वास्तवाचं जिवंत विश्व टिपत होती.
.....................................................................................................
Comments
Post a Comment