★★★"मिलाई रस्त्यावर आली...!"★★★
-भाग 1 ते 5

"त्यो चेहरा इद्रुप झालाय रे....आसी नव्हती मिलाई....!"
त्यो भडकन बोलून गेला.पुढचं काही बोलनं गर्दीमुळं इरत होतं.
"नाही..ती मिलाई नाहीच....!"
"येव्हढ्या लांब कस्यालं येईल ती...."
"अन रस्त्यावर.....नाहीच....!"
"आस्यानं आणखीनच इद्रुप होईल तिचं जिणं..!"
त्याची नजर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडं गेली.अन पुन्हा त्यानं खिस्यात हात घातला.पन तसाच रिकामा हात बाहेर घेत त्यो त्या गर्दीकडं पाहू लागला.ती आकृती गर्दीत इरून गेली.दिसेनाशी झाली.मान्सात मान्सं मिसळतात तसी.त्याची शून्य नजर ठाव घेत होती.नाना प्रश्न थैमान घालू लागले.कैक ईच्यार येऊन मेंदूला कोरून गेले.
रस्ते गावालं कोरून लांब जातात. ते शहरालं कोरतात.अन पायाच्या भेगालंही.त्याच वेदना पोटातल्या आतड्यालंही.
गाव सोडून कैक काळ झालाय. गाव धुमसत चाल्लेत मान्सावाचून.घरं फुटू लाग्लेत.अन इथं शहरं भोपळ्यासारखे फुगू लाग्लेत.जगू नाही तसे शहराकडं येणारे जगतात.शहर पोस्तात का त्ये शहरालं ह्यो प्रश्न पडलाय.
त्याच्या नजरेतून पाहत गर्दीकडं नजर फेकली.कधी ओळखीचे,त्त कधी न पाह्यलेले मुंडके डोळ्यांपुढं उभे होते.हिसोबात ही गनती नव्हती.वारुळातून मुंगळ्याचे लोंढेच्या लोंढे बाहीर यावे तसे रस्त्यावर लोकं गर्दीनं होते.ते काळजाच्या आतून बाहेरून बिथरत होते.पुन्हा चालत होते.
गर्दीतून नजर फिरवून पुन्हा त्याच्या रिकाम्या हाताकडं पाहून म्हंन्लो,
"अय काय ईच्यारात गुत्ला...अन कोन ह्यै ही मिलाई...?"
त्यो भानावर येत बोलू लागला.
मिलाई लगन होऊन नवऱ्या घरी आली.वाड्यात आनंद वाहू लाग्ला.ज्यो त्यो नव्या सुनेचं गुणगान गाऊ लाग्ला.
"पाटलाच्या घरी लक्षुमी जमून आली ब्वॉ...!"
"पोर्गी गुणावानाची ह्यै हो..."
काही म्हनाय्चे की,
"बाणाजीलं जोड लाग्ली..."
त्त कोन्ही म्हणत होतं,
"अन आउंदा तिच्या पायगुनानं आबाच्या घरात धान्यरासी लाग्ल्यात...!"
गुजा आबाच्या घरात पहिली सून नांदू लाग्ली.सातजनाचं कुटुंब त्यात आली आठवी मिलाई.चंदा लहान होती.कुमा लगनवयात येत होती. सोनाजी,श्यामा अन राहू आजून लगनाचे घरीच बसून होते.मोठ्याचं लगन उरकून आबा दुसऱ्या सोयरिकी पाहू लाग्ला.बाणा खुश होता.त्यालं पिवळं हाळकुंडच सापडलं होतं.मिलाईची हाळद फिटली का नाही अशी मिलाई उजळ होती.नाकानं तरतरीत.बोलक्या स्वभावाची.अंगानं उजवी होती.हिर्वी साडी खुलुन दिसाय्ची.एकदा बोलाय्लं लाग्ली की पुढच्यालं जिकून घ्याची स्वभावानं.नितळ मनानं ती वागाय्ची.जीवानं प्रेमळ होती.
पाच सहा महिन्यातच मराठ येटाळीत तिनं साऱ्या बायाचे मन आपले करून घेत्ले. तसी गावाच्या खालच्या गोरगरीबाच्या बायालंही ती आपुल्कीची वाटू लागली.पाहटव्यालं उठली की सडा समार्जन.भांडीकुंडी,रांगोळी करून आंघोळ केली की तुळशीलं पानी घालाय्ची.लगेच आबालं च्या कराय्ची. बानालं अंघोळीलं पानी गरम करून ठेवाय्ची.कुमा कधी कधी भांडीकुंडी उरकाय्ची.भाक्री थापाय्ची.चंदा कामात ध्यान घालत नसे.कामात ती कुचर हार्भरा होती. मिलाईच्या भाक्री कोडर्यास झाल्या न झाल्या आळीतून वावरात जानाऱ्या बायांबरोबर निंदायच्या घाती निंदाय्लं जाय्ची.कुमा पन तिच्याबरुबर जाई.
"चाला व बाई घरी ऱ्हावून काय व्हईल.वावरात तरी इकडची काडी तिकडं करता येईल."
"सुसाक्का आज हाडूळ्यात जाऊ.उरक्लं का तुम्चं. कोर्ड्यास राहू द्या.म्या बेसन केलं.दोन चम्चे जास्त घेते. वावरात लैय चव येती....खाऊ."
मिलाईनं भाक्री पाल्वात बांधून बिगिबिगीनं वावराची वाट धराव.पेरणीच्या काळात पेरणी,फवारणीत हांड्यानं पानी टाकायलं. कामधंद्याच्या दिसात तिच्या कैक जिवाभावाच्या मैत्रिणी झाल्या.झाडाखाली बस्ल्या की पाल्वातली भाकर सोडाय्ची.अन बोलाय्ची,
"घ्यावं माय शप्पत इतका घास.म्या तुंम्च्यासाठी जास्त बांधून आन्लंय."
त्त बाया म्हनाय्च्या,
"तू आम्हांलं देनार अन तू क्काय खानार वं मिलू.. राहू दे..!"
बाया तिलं "मिलू"म्हनाय्च्या.
एकमेकींची कोडर्यासं एकमेकींना द्याची.पानी पिऊन पुन्हा कामालं लागाय्चं.तूर बडवाय्लं, काडीकचरं येचाय्लं.उडदामुंगाच्या सिजनात शेंगा तोडाय्लं.नाना कामं ती जीव लावून करू लाग्ली.वाड्यात नवा बदल झाला.आतापातूर कोन्हीच बाईमानुस वावराचं तोंड पाहत नव्हतं.मिलाई वावरात जाऊन कामं करू लाग्ली.बाणानं पहील्यांदा इरुध केला.पन मंग त्यो पन वावरात जाऊ लाग्ला.शेती पाहू लाग्ला.दुबार पिकं वढून घेत होता.इहिरीतलं पानी आटलं की मैलावरून बैलगाडीतून पानी आनाय्चा.दहा येकर जमिनीचा तुकडा होता.त्याच्यात्लं दोन येकर पडीक.धुरेबंधुरे अन झाडाखोडानं येखादं येकर झाकाळून होतं.खुट्यावर दोन बैल बारदाना.जुनीपानी गाडीखिळी.बाणाजी वावर पाहू लाग्ल्यानं गुजा निवांत झाला.
कांतूबाई गेल्यापसून गुजा उतरनीला लाग्ला होता.वाड्याच्या पायऱ्या वलांडल्या की उरातून धापा पडत होत्या.गुजाबाचे कामं आता बाणाजी करू लाग्ला.तरी गुजाबा सोनाजी,श्यामा अन राहूचे हात पिवळे करण्यासाठी धावपळीत होता.चंदा लहानच पन कुमा वयात झाली म्हून त्याच्यात्ल्या बापाची तगमग सुरू झाली होती.
"बाणा...! आरssss कुमा वयात आली.आपल्यालं येखाद दोन येकर गहान ठेवाव लागल गड्या....!"
वसरीत बस्लेला गुजाबा देवळीकडं एकटक पाहत म्हंन्ला....
बाणानं हातात्ली कळशी खाली टेकव्ली अन गुजाबाच्या तोंडाकडं न्याहाळत बोलू लागला...
"जे सुसल ते करा ब्वॉ...महा त्त क्काय दिमाख चालेना..!"
"मागच्या सुगीत पेरणी,खताच्या याजाची फिकीर.अन त्यात ह्ये...राहूंद्या नं आउंदा..पुढंदी करू...
ईहीर ढासळली तिलं कडे घालाय्चेत...!"
गुजाबा हबकला....त्यानं मोठा सुस्कारा सोडला..
"तुलं क्काय माहीत बापाचं काळज....पोर्गी वयात आली की ते इंगळावर भाज्ल्यासारखं होतंय.....समाज क्काय म्हनल,सोयरेधायरे क्काय बोल्तील...?"
गुजाबा मनातल्या मनात ईच्यार करू लाग्ला.
"बरं.... पाहू पुढंदी...."
अन गुजाबा वसरीतून उठून वाड्याच्या भाईर पडला.
बाणा ईच्यारात रुतला....
हिवाळा सुकू लाग्ला.ऊन रग धरू लाग्लं.काही दिव्सातच उन्हाळपाळी झाली होती. वावरं काळीभोर दिसू लाग्ली.गवतगुळी वाळून पिव्ळाटली.आभाळ कोर्डंफट पळत होतं.खोप्यात पाखरं चिडीचीप.व्हल्या काळ्या बाभळीच्या ढोलीत घुत्कारत होता.त्याच्या घुत्कारन्याच्या आवाजानं शिवारात गंभीरता वाढत होती.एखांदी वाह्यटूळ गावभर फिरून माळाच्या बर्गाडीलं जाऊन इरत होती.
बाणा कळशी उचलून राजनात वतु लागला.राजनात धबंधबंsss आवाज करत पानी फेसाळत होतं.बाणा मांघचं आठवू लागलं.मागच्या पेरणीत बी-बियानं अन खतालं कर्ज उचल्लं होतं.तव्हा फवारणीसाठी मिलाईनं स्वतःहून अंगावरचे मनीमन्कुलं, डुलं बाणाच्या हातात टेकवले होते.मिलाईलं वाटत होतं,
"होईल सुरळ...काळ ताव काढतो...सतोपरिक्सा आंतोय.
जिगर काहून हाराव आपुन.... बाई.
अन कर्ते मान्सं ह्यैतनं घरात...मंग क्काय??"
बाणाच्या डोस्क्यात ईच्याराचा फेस तयार होऊ लागला.
"खरंच माय झं.....आउंदा धोsss धोsss पान्यानं
पडावं ब्वॉ...!
सारं दे दे व्हईल मांघ्ची..जीव मोक्ळा त्त व्हईल याजातून!"
"ईहीर बांधून काढाव लागल.फाडी आत पडल्यात.पव्हऱ्यानं पानी काढता येईनं.आटत चाल्लयं....!"
अन कळशीत्लं पानी खंडलं. त्याचा हात हाल्का झाला.
घर झाडता झाडता मिलाईचं लक्ष बाणाकडं गेलं.
ती म्हंन्ली,
"आवंsss...आसी रिकामी कळशी राजनावर धरून क्काय ईच्यार करता.....?
कुमा याहीलं वाढ.अन आप्ली भाकर बांध.
आधीच घरावर काळ फिर्लाय.धड काही सुसेनं माय....
भाकर खाऊन घ्या.मलं वावरात काडीकचरं येचाय्लं जाचंय."
अन तिनं भाकर बांधली.अन कुमालं संगं घेतलं.अन पांदीची वाट धरली.
त्या दोघी वाट तुडवत होत्या. पांदीत निरव शांतता पसर्ली होती.लिंबाच्या दाटगर्गट सावल्या पांदी आंधारून नेत होत्या.दुतर्फा झाडखोडं वाढलेले.चिल्हाऱ्या अंगावर येत होत्या.चिचा,बाभळी, लिंबं,रुगडी,उरूंची,चंदरजोती,बिब्बे,पळसाचे झाडं तग धरून होते.डांख्या वाऱ्यानं एकमेकींवर घासत होत्या. जणू त्या सासूसुनेसारख्या खेस्कु लाग्ल्या.नाना आवाज तिथं कर्कर्टत व्हत होते.मिलाईचे दोन्ही हात डोस्क्यावरचं टोप्लं धर्लेले.आभाळाच्या दिशेने धन्यष्यबाण धरल्यासारखे.कुमा तिच्या पाठीमांघं पाय उचलत होती.
"आता त्ये भाकर खातील अन येतील वावरात...!"
"आज काहून बाई म्या टोक्लं आसल त्याहिलं.त्ये क्काय ईच्यार करत आस्तील....माय...?"
"बाया म्हंतात की बाई नवरा देवाबाम्हनावानी वाग्वाव."
"त्यालं टोचू नाही.त्यालं त्तोंड टाकून बोलू नाही."
"पन बाई नवराच सरळ चालत नसंल त्त??"
"त्यानंच त्तोंड टाकलं त्त??"
"देवासारखा नाही वाग्ला त्त???"
"मंग बाईनं क्काय कराव?"
"कसं जगावं....कुढत....कुजत...???"
तिच्या मनात वाऱ्यासारखे ईच्यार रिंगन घालून तिला घुटमळवत होते.अन ती पाचूळ्यासारखी त्यात भिर्कांडत होती.मनालं सांगत होती...
"आप्लंच चुकलं...म्या आसं वागा व्हतं क्का??"
"मह्या हातानं वाढून द्याव होतं.. पन हे हात्चं काम कुठं सुट्टंय...जल्मालंच गेलं बाई आता ह्यै....!"
मिलाई मनालंच प्रश्न ईच्यारत तिचे तीच उत्तरं पडताळत चालत होती.कुमा गांगरून गेली.तिलं नाना प्रश्न अडकवत होते.ईचारांच्या उमळ्यात ती दाटून जात होती.उन्हानं हिर्वाई गलितगात्र व्हावी तसी तिची आवस्था झाली.ती कधी कोमेजून त्त कधी नव्या बदलांनं उम्लत होती.तिलं वाटत होतं....,
"आप्लं लगन व्हईल....संसार थाटल...रात्री सुखानं भर्तील...अभाळासारखं घरपन होईल....देवराजा आसल सुखी जगू...पै लं पै जोडू...!"
"आसा कर्जाचा यापार नको बाई जीवनात..."
"पन लगन पैस्यावरच होतात नं...आप्ल्यात..."
"हुंडा म्हून पदरात टाकाव लाग्ते न भीक नवऱ्याच्या..."
ती वक्मुख होत स्वोतालं बोलू लाग्ली.
"सोयरे मंडळी त्त कसाई व्हतात कस्साई.बैलबजारात गाय इकाय्लं ठेवाव तसी वयात्ल्या पोरीची गत.ज्यो त्यो येतोय पोर्गी पाहून जातोय.भाव ठर्वतोय.दावणीची कव्ळी गाय कापाय्लं फर्फटत न्याव तसी नेतात.आतल्या खांदीचा धंदा सारा.जल्म देला मायबापानं अन त्यालंच येढलं तनानं,पैश्यानं.समाजाच्या रूढीरिवाजानं...असा उल्टा खेळ सारा.पोरालं क्काय येतंय ह्यै कोन्ही पुसत नाही.पन पोरीचा जल्म उत्तरं देण्यात गेला...नं..!"
"तिलं ह्ये येतंय का?"
"त्ये येतंय का?"
"ती सडी ह्यै का?"
"तिलं ना पनबा..तिनं कोन्हालं शिवलं त्त नाही न आजून?"
"ती तुळशीवानी पवित्र ह्यै का?"
या उलटपालट ईच्याराचा गुत्त्यात तिचा मेंदू इरघळत होता.इहिरीवरल्या चऱ्हाटासारखा काचत होता.तिची घालमेल होत होती.
ती मनातच बरळत होती,
"अन नाहीच लगन केलं त्त क्काय मरी येईल का
जीवावर..."
"एकटं जगू....इथं राहून...गोत्रालं हात्भार त्त लागल.." "वावरासिव्रातले कामधंदे करू...तसंच जगू....."
"पण बक्करबजारात नाही जीव उतरत...तिथं मानेवर सुरीच बाई.....सुरीच...सुरीच...!"
"सुरीच","सुरीच","सुरीच....!"
तिचे हे शब्द पांदीत मोठ्यानं घुमले.त्या आवाजाकडं मिलाईनं मान वळवून पाह्यलं.तिलं वाटलं आज कुमा आसं क्काय बोल्ती...
"क्काय वं कुमा क्काय म्हंता....?"
"कोन्ती सूरी....??"
"क्काय झालं......आं...??"
दोघीच्या मनात पांदीसारखं अंधारून आलं होतं.ईचारांच्या चिल्हाऱ्या दोघीच्या काळजालं बोच्कारत होत्या.वरखांडत होत्या.त्या दोघी अंतःकरणातून मलूल झाल्या होत्या.पन पाऊल ठयैरत नव्हतं.त्या पांदी कापत होत्या.उशीर व्हईल म्हून पुढं चालत होत्या.
"पण तुलं ह्ये सारं कसं ठाऊक हाये...?"
त्यालं ईच्यारलं.अन संबोरच्या वास्तवाकडं नजर टाक्ली.
आस्यात लैय काही घडून गेलं होतं. महाराष्ट्र होर्पळून निंघत व्हता.देस्यात आराजक माज्ली व्हती.जगात मानुस आस्थिर जिणं जगत व्हता.उघड्या डोळ्यांत सारं उघडं पडत जानारं जग भरत व्हतं.
गावोगाव भूक पेटली होती.ती कधी पैस्यांची,शरीराची,धनासंपत्तीची,सत्तेची,हुक्मि व्यवस्थेची, जुलूम जब्रीची,अधिकार्शाहीची,त्त कधी वासनेची, लाल्सेची,बेर्किची,भांडनकुदळीची,अधर्माची,त्त त्यात्ल्या त्यात हिंसेची,जाळपोळीची,लुच्चेलबाडी,कत्तलीची ती करारी भूक व्हती.
इतभर पोटाची भूक यापुढं कडबुडी वाटत व्हती.नामानिर्राळी दिसत व्हती.म्हणून भाक्रीच्या भुकेनं व्याकौळ झालेले मान्सं जीव मुठीत घेऊन दिस ढक्लत व्हती.
"भाकर नाही मिलाळी तरी मर्नं हाय अन आसह्ये मर्नं हायंच....कधी जीव गमवाव लागल पत्ता नव्हता.बरं हाय ह्यै मान्सं भाक्रीसाठी रस्त्यावर उतर्ले नाहीत.नाही त्त काय हाक्कार माजल सांग्ता येत नाही ब्वॉ.....!"
"जग्तात बिच्चारे गोरगरीब,मजूरं, हमाल,कस्टकरी,मालवाहू,गु-मूत काढणारे,नाल्या उपस्नारे,पुलाखाली बस्लेले सारे सारे....जग्तात गुलामीत भाक्रीच्या.त्याहिलं ह्ये माहीत नस्तं का आपुन मानुस हाय...अन ढोरसारखं आपल्यालं आज जिणं जगाव लाग्तंय...मुकाट जग्तात.खपत, राबत,घामग्ळत,रक्ताळत, दुःखाचं खवंद पार्झर्तं ठेवत."
काळजालंच म्हंन्लो,
"येवस्था पन आसी हाय हे जख्मीचं रक्ताळनं उघडं ठेवत उभी राह्यती.सत्तालोलुप व्हती.जरा बी कदर करत नाही. हया वाटत नाही.अन ह्ये जीव जळत,कर्पटत राह्यतात... जानूनबुजून....याहीच्या वाचून ह्ये कामं कोन्ही कर्नार नाही आसी तजविज कर्ती ही व्यवस्था.ती नोकर्शाही... मजुर्शाही....अन गरीबशाहीतून टिक्वून ठेव्तात.नाड्या आवळल्या जातात साऱ्या.बैल केल्या जातोय या मान्सांच्या जीवांचा...बैल...जु वढनारा...!"
खायलंप्यालं व्हतं ज्याहीच्याकडं ते बरे जगत व्हते.पन तिथंही तुकडेतुकडे पडून गेलेत. भावकी वाढली.बिऱ्हाडं झालेत.पहिलं येक घर फुटून त्याच्यातून कैक घरं बाजूलं उभे राह्यलेत.धुरेबंधुरे अन आडव्या भित्ती बांधल्या गेल्यात.इकडचा पाऊल इकडं टाक्ता येत नाही.कत्तली व्हतात.डोस्क्ये कुऱ्हाडीनं फोडले जातात शेंदाडासारखे.भावभावात तोडाय्चं अन भोस्काय्चं नाही त्त टाक्तराखाली रगडून टाकाय्चं राजकारनं शिजतंय.आर्ध्यातून हिस्से झालेत.माडी,वावरं, बैलंढोरं,धनसंपत्ती,कर्जांचे त्त म्हताराम्हतारी, जमीनजुम्ल्याचे वाटेहिस्से रक्तानं भिजून निंघालेत.या महाराष्ट्रात...भारतात.....जगात.!"
"महाराष्ट्रातच नाही त्त जिथं जिथं मानवी वस्ती हाय तिथं ही हुक्मि अन सत्तेची लूत जल्म घेती.सत्तेची अन स्वार्थाची लूत आंगावर्ल्या लवेसार्खी हाय.जिथं गेलं तिथं ती उग्ती,जग्ती,जल्मं घेती अन मान्सालंच जळून गेल्याशिवा जळत नाही....!"
"अन या आभाळाचा बी क्काय भरूसा नाही ब्वॉ....लैय पडलं त्त सडतंय नाही त्त सारं करप्तंय.बर्साद बरुब्बर झाली की दाळधान्य निस्तार्ता येतंय.कर्जाची दे दे कर्ता येती.हात मोक्ळा सुट्तोय. सुदीसन्वार घाल्ता येतोय. तळीमळीव कराय्लं सुच्तंय. पोऱ्हं साळत सिक्सान घेतात. म्हंजे पिकलं तव्हा खायलंप्यालं,लेवानेसाय्लं नाही त्त दोरखंड हाय नर्डीलं. धर्बांधून आवळलेला.पन जीव तरीबी म्हंतो,
'आसं इद्ध खेळल्याबिगर पळी काहून काढाव...!' लढाव... संगर कराव....हार येईल नाही त्त जित येईल...जिणं त्त आसल.माग्च्याची तर्फड त्त होनार नाही नं...त्ये नात्याच्या आगीत जळणार त्त नाही नं...!"
मन मलूल होत होतं.उत्तरं सापडत व्हते.प्रश्न गुर्फटून नेऊ लागले.नाना जंव्जाळ डोस्क्यात उगाळत व्हतो.पार्ध्याच्या जाळ्यात डुक्कर आडक्ल्यागत जीव व्हत व्हता.वास्तवाच्या जहरी तळ्यात मन हिस्काळून निंघत व्हतं.
"पण तुलं ह्ये सारं कसं ठाऊक हाये...?"
"मलं.....म्हंजे...कोंतं?"
"त्या मिलाईबाब्तीत...तिचं जग्नं...
"मलं त्त काही समजेना ब्वॉ ह्ये...!"
"अन पुढं काय सांग नं...आतुर झालोय रे ब्वॉ...
"सांग नं.....

-क्रमशः

Comments

Popular posts from this blog